भाग ६०
मागील भागात आपण पाहिले की तारातारिणी मंदिरातली वस्तू शांभवीला सापडते. आता बघू पुढे काय होते ते.
"आबा, तुम्ही?" कपिलच्या चेहर्यावर आश्चर्य दिसत होते.
"हो आम्हीच.. म्हटलं पोरांनी एवढं धाडस दाखवलं आहे तर तिथे जाऊन थोडी मदत तरी करावी." आबासाहेब म्हणाले. पाठीमागेच गणू उभा होता.
"पण अजून पाच गोष्टी जमा करायच्या आहेत ना? काम कुठे पूर्ण झाले आहे?" पार्थने निरागसपणे विचारले. ते ऐकून आबासाहेब जोरजोरात हसू लागले. ते हसणे ऐकून शांभवीच्या ह्रदयाचा ठोका चुकला. जयंती घृणेने आबासाहेबांकडे आणि कपिलकडे बघू लागली.
"नाही.. त्यांचं काम पूर्ण झालं आहे." जयंतीच्या आवाजात तिरस्कार भरला होता.
"अरे व्वा.. ही मुलगी तर जास्तच हुशार निघाली. मग.. कधी बरं समजलं हे तुला?" आबासाहेब आवाजात कृत्रिम गोडवा आणत म्हणाले.
"जेव्हा तुम्ही पुरीला जायचे सांगितले.."
"अरे व्वा.. तुला श्लोक माहित आहेत म्हणजे. काय आहे बरं तो श्लोक? आठवतो का?" आबांनी जयंतीला विचारले. जयंती काही बोलत नाही हे बघून त्यांनी खिशातला सुरा काढून पार्थच्या गळ्याला लावला. ते बघून शांभवी किंचाळली.
"त्याने काय केलं आहे तुमचं? त्याला सोडा.."
"सोडणार ना.. सगळ्यांनाच सोडणार.. प्रत्येकाची वेळ आली की त्याला सोडणार." आबांच्या डोळ्यात वेडसरपणाची झाक दिसून येत होती. "मग.. आठवला का श्लोक?" आबांनी जयंतीला विचारले. जयंतीने आवंढा गिळला आणि श्लोक म्हणायला सुरुवात केली.
"बिमला पादखंडनच स्तनखंडनच तारिणी
कामाख्या योनिखंडनच मुखखंडनच कालिका
अंग प्रत्यंग संगेन विष्णुचक्र क्षेतेन्यच.."
कामाख्या योनिखंडनच मुखखंडनच कालिका
अंग प्रत्यंग संगेन विष्णुचक्र क्षेतेन्यच.."
"विमला, तारातारिणी , कामाख्या आणि दक्षिण कालिका.. चार प्रमुख तांत्रिक शक्तीपीठ.. इथेच होती मला जी हवी होती ती सगळी शक्ती.." आबासाहेब गडगडाटी हसत म्हणाले.
"त्यासाठी आम्हाला का वेठीस धरलं?" शांभवीने शांतपणे विचारले.
"अजूनही समजलं नाही का?" आबासाहेबांनी विचारले. "समजलं असतं तर अजून काय हवं होतं? या जेवढ्या वस्तू होत्या त्यांना फक्त आणि फक्त तूच हात लावू शकत होतीस. म्हणून तर आमच्या या पठ्ठ्याला तुझ्या पाठी पाठवावे लागले." आबासाहेब कपिलकडे बघत म्हणाले. शांभवीने कपिलकडे बघितले. तो मान खाली घालून उभा होता. जयंती त्याच्याकडे रागाने बघत होती तर पार्थ अविश्वासाने.
"मग आता? पुढे काय?" शांभवीने शांतपणा सोडला नव्हता.
"हे आवडलं मला.. पुढे काय?? तर.. मी जे हेलिकॉप्टर मागवलं आहे, त्यात बसायचं आणि भुर्र जायचं. मी या पार्थला माझ्यासोबत घेऊन जातो आहे. तुमचं आवरायचं आणि तयार रहायचं.. समजलं ना?" आबासाहेबांच्या शेवटच्या शब्दात गर्भित धमकी होती. त्याने शांभवीच्या अंगावर काटा आला.
"गणू, धर रे या पोराला.." पार्थला दरवाजाकडे ढकलत आबासाहेब म्हणाले. "आणि हो.. काही शहाणपणा करायचा नाही." आबासाहेब आणि गणू पार्थला घेऊन जाताच शांभवी जागच्या जागीच बसली. जयंती मात्र कपिलच्या अंगावर धावून गेली.
"खोटारडा आहेस तू.. मी प्रेम करू लागले होते तुझ्यावर. वाटत होतं तू नसशील यांच्यासारखा.. पण नाही. तू ही तसाच क्रूर आहेस. माझीच चूक झाली." जयंती बोलता बोलता रडू लागली. आणि त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. कपिलने तिच्या पाठीवर हात ठेवला. त्याच्या डोळ्यातून एक अश्रू घरंगळला. त्याच्या स्पर्शाने जयंती भानावर आली.
"हात ही लावू नकोस मला. येताजाता तुला दादा दादा करणारा, तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवणारा पार्थ तुझ्यामुळे अडचणीत सापडला आहे."
"मी त्याला काही होऊ देणार नाही." कपिल त्याच्या खोलीत जात म्हणाला. जयंती तशीच रडत राहिली.
"जयंती, रुद्रसर तुझ्या संपर्कात आहेत?" शांभवीने अचानक विचारलेल्या प्रश्नाने जयंती दचकली.
"ते.. तुला.."
"त्यांना पटकन फोन करुन इथे काय झालं आहे ते कळव. आपण हेलिकॉप्टरने जाणार आहोत, हे न विसरता सांग." जयंतीने फोन लावला. फोनवर बोलून झाल्यावर तिने फोन शांभवीसमोर धरला.
"सर..." शांभवी कसंबसं म्हणाली.
"मी आहे तुझ्यासोबत.. प्रत्येक क्षणी.. फक्त धीर सोडू नकोस. आणि अजून एक.. पार्थच्या केसालाही धक्का लागणार नाही, ही माझी गॅरंटी." रुद्रने फोन ठेवला. शांभवीने तो फोन जयंतीच्या हातात दिला.
"आवर.. एका तासाची वेळ दिली आहे ना?"
"शांभवी, तू एवढी शांत कशी राहू शकतेस?" जयंतीने विचारले.
"कारण जे झालं ते तर मी बदलू शकत नाही. आणि ही गोष्ट तर नक्की की त्यांना माझ्याकडून काहीतरी हवं आहे. ती गोष्ट मिळेपर्यंत ते पार्थला काहीच करणार नाहीत. मग कशाला चिडचिड करुन डोक्याला त्रास करुन घेऊ. तू ही शांत हो. कपडे भरून घे." शांभवी ध्यानाला बसत म्हणाली. निर्जीवपणे जयंती कपडे भरू लागली. तिच्या डोळ्यासमोर सतत कपिल येत होता. आधी तिच्याशी सतत भांडणारा. आणि भांडता भांडता तिच्याशी प्रेमाने वागणारा. त्याच्या नजरेतला बदल तिला जाणवत होता. पण शांभवीचा विचार मनात येताच ती तो विचार झटकून टाकायची. नंतरचे त्याचे ते शब्द.. कोणत्याही परिस्थितीत तू माझ्यासोबत राहशील का? ती कोणतीही परिस्थिती म्हणजे ही का? नाही.. मी या परिस्थितीत नाही राहू शकत त्याच्यासोबत. कारण प्रेमापेक्षा माझं कर्तव्य जास्त महत्त्वाचं आहे. डोळे पुसत जयंतीने मनाशी निर्धार केला. देवीच्या वस्तू सोडून तिने इतर वस्तू भरल्या. शांभवीला हाक मारायला ती वळली तर शांभवीचे ध्यान अजूनही सुरू होते. तिच्या शरीरातून एक मंदसा प्रकाश बाहेर पडत होता. एका विचित्र जाणिवेने जयंतीने देवीच्या वस्तूंकडे बघितलं. त्यातूनही तसाच मंद प्रकाश येत होता. ती तशीच उभी राहिली. तोच बाहेरून कोणीतरी दरवाजा वाजवला. त्या आवाजाने शांभवीचे ध्यान तुटले. तो मंद प्रकाश नाहीसा झाला. जयंतीने पटकन दरवाजा उघडला. बाहेर गणू होता.
"इतका वेळ दरवाजा उघडायला?" तो डाफरला.
"बाथरूममध्ये होते." जयंती म्हणाली. काहीतरी बोलायला त्याने तोंड उघडले आणि शांभवीकडे बघताच तो गप्प बसला.
"मालकांचा निरोप आहे. हेलिकॉप्टरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून आता रात्री निघता येणार नाही. उद्या सकाळी लवकर निघायचे आहे. मी बाहेरच आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पार्थ आमच्या ताब्यात आहे. तर मग.. नको ते धाडस करु नका."
"नाही करत. तू ही झोपलास तरी चालेल. हे माझे वचन." शांभवी गणूला म्हणाली. त्यावर तो काहीच न बोलता बाहेर गेला.
"झोप तू.." बेडवर आडवं पडत शांभवी जयंतीला म्हणाली. रात्री कधीतरी जयंतीचा डोळा लागला. पहाटेच शांभवीने तिला उठवले. शांभवी आवरून तयार झाली होती.
"तू ही आवरून घे.. ती लोकं कधीही येतील." खरंच जयंतीचे आवरून होईपर्यंत गणूने परत दरवाजा वाजवला.
"हेलिकॉप्टर तयार आहे. आवरून खाली या. मालक निघाले आहेत."
"मी कसं करायचं?" शांभवीने विचारले.
"कसं म्हणजे?" काहीच न समजून गणूने विचारले.
"या वस्तू?" तिने देवीच्या वस्तूंकडे बोट केले.
"त्या वस्तू एका फटक्यात घेऊन जायच्या." म्हणतच गणू पुढे झाला. त्याने माठाला हात लावताच त्याला शॉक बसला. तो पाठी फेकला गेला.
"आता??" शांभवीने विचारले.
"मी मालकांशी बोलून येतो." गणू मान खाली घालून बाहेर गेला. ते दृश्य बघून जयंतीला मात्र काहीतरी आठवलं.
"शांभवी, तुला आठवतं?"
"काय??"
"तुम्ही कालीघाटवर जाऊन आल्यापासूनच कपिल बदलला होता. म्हणजे.."
"आधी तो माझ्या पुढे पुढे करायचा.. आणि नंतर तुझ्या.. हेच ना?" जयंतीने मान खाली घातली.
"तुला अजूनही समजले नाही का? त्याचं खरं प्रेम तुझ्यावरच होतं.. माझ्यासोबत तो फक्त नाटक करत होता, ते ही कोणीतरी सांगितलं म्हणून." शांभवी गंभीरपणे म्हणाली.
"आणि तू??"
"त्या दैवी वस्तूला ओझरता स्पर्श झाल्याने जशी त्याला काही गोष्टींची जाणीव झाली.. तशीच मलाही झाली. तो मला आधार देत होता. पण ते खोटं आहे, हे हळूहळू मलाही जाणवू लागले होते. मलाही आतून तो माझ्यासाठी नाही हे समजले होते." शांभवी जयंतीला समजावत म्हणाली.
"मग कोण आहे तुझ्यासाठी?" जयंतीने विचारले. तोच परत दरवाजा वाजला. बाहेर गणूच होता.
"मालकांनी दोनतीन फेऱ्या मारायला सांगितल्या आहेत." गणूच्या आवाजातली जरब गेली होती. "खाली गाडी आली आहे."
जयंतीने कपड्याच्या बॅगा तर शांभवीने देवीच्या दोन वस्तू धरल्या. गणू खोलीत उभा राहिला. शांभवीने परत येऊन सगळं व्यवस्थित गाडीत ठेवले. तरीही गाडीत आबासाहेब, कपिल आणि मुख्य म्हणजे पार्थचा पत्ता नव्हता.
"पार्थ कुठे आहे?"
"हेलिकॉप्टरमध्ये. चला लवकर." गणू घाई करत म्हणाला.
"आपण नक्की चाललो आहोत कुठे?" शांभवीने विचारलेच.
"जिथे हे सगळं संपणार आहे तिथेच. नाशिकला.." इच्छा नसूनही गणूने सांगितले.
काय आहे नक्की नाशिकला? रूद्र पूर्ण करू शकेल का त्याचे वचन? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा