देवी रक्षति रक्षितः.. भाग ६१

कथा एका असामान्य मुलीची
भाग ६१

मागील भागात आपण पाहिले की आबासाहेब चौघांना नाशिकला घेऊन चालले आहेत. काय हवं असेल नक्की त्यांना? त्यांची योजना यशस्वी होईल?


"पार्थ, तू बरा आहेस ना?" हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या पार्थला शांभवीने विचारले.

"त्याच्यापासून लांब रहायचे. काल सुरा होता, आज रिव्हॉल्व्हर आहे." आबासाहेब पार्थवर रिव्हॉल्व्हर रोखत म्हणाले. जयंतीने कपिलकडे बघितले. तो गप्प बसून होता. पार्थच्या चेहर्‍यावर सुकलेले अश्रु जाणवत होते. समजत होतं की तो रात्रभर झोपला नव्हता. बहुतेक कपिलही नसावा. त्याचे डोळे लाल दिसत होते. डोळ्यातलं पाणी मागे ढकलत शांभवीने बाहेर बघितलं. काल बोलणं झाल्यापासून रुद्रशी परत काहीच संपर्क होऊ शकला नव्हता. तो जर वेळेवर नाही आला तर या आबासाहेबांशी ती एकटी कशी लढणार होती? कपिलला जर काही करता येत असतं तर त्याने आधीच केले असते. जयंती काही मदत करू शकेल का? हेलिकॉप्टर उडाले. शांभवीने डोळे बंद करून घेतले.

'शांभू.. किती वेळा सांगितलं, अनोळखी लोकांकडे जायचे नाही म्हणून..' ती बाई शांभवीला ओरडत होती.

"आई, मी कुठे गेले. ते काका ये म्हणाले." तीन वर्षांची चिमुरडी आईशी वाद घालत होती.

"तू ना फार हट्टी होत चालली आहेस. थांब बाबांनाच सांगते."

"अहो.. ऐकताय का?" नुकत्याच बाहेरून आत आलेल्या त्यांना ती सांगू लागली. त्यांचा चिंताग्रस्त चेहरा बघून ती घाबरली.

"काही झाले आहे का? तुम्ही खूपच काळजीत दिसत आहात."

"ती माणसे आपला शोध घेत गावात पोहोचले आहेत." ती बातमी ऐकताच त्या बाईने शांभवीला घट्ट मिठी मारली.

"आता इथून पुढे काय करायचे? आपण कोणाचं वाईट केलं होतं की आपल्याला हा त्रास सहन करावा लागतो आहे?" ती बाई रडत म्हणाली.

"आई, तू का रडते आहेस?" शांभवीने त्या बाईच्या डोळ्यातलं पाणी पुसत विचारले.

"काही नाही.. डोळ्यात कचरा गेला."

"मी फुंकर मारून देते थांब.." तिचं ते प्रेमळ बोलणं ऐकून ती बाई अजूनच रडू लागली.

"शांभवी बाळा, तू इथे ये.." शांभवीला मांडीवर घेत ते म्हणाले. "तुला आईबाबा आवडतात का?"

"खूप.."

"मग मी जे सांगतो, ते ऐकशील?"

"हो.."

"मग सुरूवात कर माझ्यासोबत म्हणायला.."

"शांभवी.. शांभवी.." जयंती शांभवीला हलवत होती.

"आई.. बाबा.." शांभवीने डोळे उघडले.

"शांभवी, काही होतंय का तुला?" जयंतीने काळजीने विचारले. कपिलने जवळची पाण्याची बाटली तिला दिली. पाणी पिताच शांभवी भानावर आली. पार्थ अजूनही तिच्याकडे एकटक बघत होता.

"पार्थ.." तिने हाक मारताच त्याने मान फिरवली.

"तू काय बडबडत होतीस?" जयंतीने हळूच विचारले.

"मी??" शांभवीला आपल्याला पडलेले स्वप्न आठवले. ते जोडपं आपल्या मुलीला शांभू हाक मारत होते. आणि ती त्या दोघांना आईबाबा.. ती लहान मुलगी म्हणजे नक्की कोण होती? मीच तर नव्हते ना?" विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागलं. तिने परत डोळे बंद करून घेतले.

"पार्थ, तुझा सख्खा भाऊ नाहीये.." शांभवीच्या कानात कपिल पुटपुटला. शांभवीने खाडकन डोळे उघडले. तिने पार्थकडे बघितले. त्याने परत नजर चोरली. आबासाहेबांच्या नजरेत विजयी हास्य होते.

"गणू, पाहुण्यांना नाश्ता वगैरे दे जरा. काही न खाता निघाले आहेत." आबासाहेब म्हणाले. गणू जवळचा नाश्ता देणार तोच जयंती म्हणाली.

"आम्हाला भूक नाहीये.."

"अच्छा..तुमची इच्छा.. बघू, किती वेळ उपाशी राहता ते." आबासाहेब ब्रेड ऑम्लेटचा घास घेत म्हणाले. जयंतीने कपिलकडे बघितले. त्यानेही काहीच घेतले नव्हते. पार्थ बाहेर एकटक बघत विचारात गढला होता. आबासाहेबांनी खुणावल्यावर गणू पायलटला भेटून आला.

"अर्ध्या तासात आपण नाशिकला उतरू आणि मग हा जो काही लांबलचक प्रवास सुरू झाला आहे, तो संपून जाईल." आबासाहेब म्हणाले.

त्यांचे बोलणे ऐकून शांभवीच्या मनात पार्थविषयी काळजी दाटून आली. कसंही करुन त्याच्याशी बोलणं गरजेचं होतं. पण तो तिच्याकडे बघायलाही तयार नव्हता. तो खरंच तिचा सख्खा भाऊ नव्हता? जरी नसला तरी तिने त्याला जीव तर लावला होता ना? मग एका अनोळखी माणसावर विश्वास ठेवून त्याने माझ्याशी बोलू नये? शांभवीच्या डोळ्यातून पाणी आले. नाशिक जवळ आलं होतं बहुतेक.. गणू आणि आबासाहेबांची हालचाल सुरू झाली होती. कपिलही यांत्रिकपणे त्यांना मदत करत होता. गणू मात्र शांभवी आणि देवीच्या वस्तूपासून लांब रहात होता. शांभवी खिडकीबाहेर बघू लागली. सह्याद्रीच्या रांगा दिसत होत्या. या एवढ्या मोठ्या प्रदेशात रुद्र येणार तरी कधी होता आणि तिला शोधणार तरी कसा होता? एक विचित्र बेचैनी शांभवीला जाणवू लागली. डोळे बंद करुन बसावेसे तिला वाटत होते.. पण परत नजरेसमोर कोणते दृश्य येईल याची भिती वाटत होती. हेलिकॉप्टर खाली उतरले. गणू आणि आबासाहेब पार्थला घेऊन बाहेर पडले. कपिल मागे घुटमळत होता.

"तू काळजी करु नकोस.." तो शांभवीला म्हणाला.

"काळजी करु नकोस म्हटलं की झालं? आधी आम्हाला या सापळ्यात अडकवलंस.. आणि आता म्हणतो आहेस की काळजी करु नकोस." जयंतीला राग अनावर होत होता.

"जयंती, कशी खात्री पटवून देऊ मी तुला माझी? आबा, तिथे येतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं."

"पण ते आले.. आणि त्यांनी पार्थच्या डोक्यावर बंदूक लावली.. हे तुला काहीच माहित नव्हतं. कसा विश्वास ठेवू तुझ्यावर आणि का?" जयंती बोलतच होती.

"कारण.. जसं तू माझ्यावर प्रेम करतेस.. तसंच प्रेम मी ही तुझ्यावर करतो." कपिल शांतपणे म्हणाला.

"माझा ना तुझ्यावर विश्वास आहे ना तुझ्या प्रेमावर.." जयंती म्हणाली.

"चिरंजीव.. येताय की तिथेच निकाल लावताय?" आबांचा बाहेरून आवाज आला. तो येताच कपिलने घाई करायला सुरूवात केली.

"शांभवी, प्लीज ते घेऊन बाहेर येशील?" देवीच्या वस्तूंकडे बोट करत कपिलने विचारले. तिने मान हलवताच कपिल जयंतीला घेऊन बाहेर पडला. शांभवीने मन शांत केले. आणि देवीच्या वस्तू घेऊन ती बाहेर आली. बाहेर येताच तिला समोर दिसले सह्याद्रीचे कडे. समोर एक उंचच्या उंच शिखर दिसत होतं.

"ते सामान इकडच्या गाडीत ठेव. आपण वरती दर्शनाला जातो आहोत. तुम्हा दोघींना वाटेल, गर्दीत आहोत, आरडाओरड करून इथून सुटून जाऊ. तर एकच लक्षात ठेवा. खिशात रिव्हॉल्व्हर आहे आणि माझा नेम चुकत नाही. फक्त एक गोळी आणि हे पोरगं खलास.. अगदी त्याच्या आईबापासारखं.." आबासाहेबांनी धमकावलं.

"आईबापांसारखं म्हणजे?" शांभवीला आश्चर्य वाटलं आणि पार्थच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं.

"एवढ्यात विसरलीस? ट्रकचा ॲक्सिडेंट.. ते हॉस्पिटल?" आबासाहेब हसत विचारत होते.

"म्हणजे आईबाबांचा तो खून तू करवलास? आणि मी मूर्ख.." शांभवीच्या कपाळावरची शीर उडू लागली होती.

"नाहीतर मग तू या गोष्टीसाठी तयार कशी झाली असतीस? आम्ही किती प्रयत्न केला की तू गपगुमान आमचं काम करायला तयार व्हावंस म्हणून.. पण नाही. तू तर नकार दिलास. काय तर आईबाबा तयार नाहीत म्हणे." नाटकीपणे आबासाहेब बोलत होते. "मग आमच्याकडे दुसरा उपायच नव्हता."

"लाज नाही वाटत तुम्हाला? स्वतःच्या क्षुल्लक स्वार्थासाठी लोकांना मारायला?" शांभवीने चिडून विचारले.

"कशाला एवढी चिडतेस तू? हजारो वर्षांपासून चालत आलेला हा संघर्ष आहे. या संघर्षात कितीतरी आहुत्या पडल्या आहेत. तसेही, ते तुझे खरे आईबाप नव्हतेच."

"तुला माझ्याबद्दल एवढी माहिती कशी?"
शांभवीच्या प्रश्नाकडे आबासाहेबांनी दुर्लक्ष केले.

"आता दर्शनाला चलायचं. काहीही नाटक न करता." आबासाहेब म्हणाले. गाडी मंदिराजवळ आली होती. सगळेजण मंदिराच्या दिशेने चालू लागले. पार्थला कोणीच एकटं सोडत नव्हतं.

"चालत जाणार की रोपवे ने?" गणूने विचारले.

"जाऊ चालत.. तसंही आधी भैरवाचे दर्शन घ्यायचे आहे." आबासाहेब कपिलकडे बघत म्हणाले. खाली असलेल्या भैरवाचे दर्शन घेऊन सगळे मंदिरात पोहोचले. एवढ्या पायर्‍या न थांबता चढल्याने सगळ्यांना दम लागला होता. झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाने जयंतीला भोवळ आली. कपिल लगेचच तिला धरायला पुढे झाला. ते बघून आबासाहेबांच्या कपाळावर आठ्या आल्या.

"तिच्या तोंडावर पाणी मारा. येईल शुद्धीवर लगेच." आबासाहेब कठोरपणे म्हणाले. जयंती शुद्धीवर आली. आबासाहेबांनी आपली ओळख सांगितल्यामुळे त्यांना व्हीआयपी दर्शन मिळाले. सगळे देवीच्या गाभाऱ्यात पोहोचले. समोर अठरा हातांची आठ फुटी मूर्ती समोर होती. पार्थ सोडून प्रत्येकाने देवीसमोर हात जोडले. देवी हसतमुखाने त्यांच्याकडे बघत होती. पुजार्‍याने देवीच्या मुखातला विडा काढून शांभवीच्या हातात ठेवला.

"देवीचा प्रसाद.." कसलाच विचार न करता शांभवीने तो विडा तोंडात घातला. दर्शन घेऊन सगळे बाहेर गेले. शांभवी एकटीच देवीसमोर होती. तिने देवीच्या पादुकांवर डोकं टेकवले.

"डोळे उघडू नकोस. मी तुझ्यासोबत सतत आहे. योग्य वेळ येताच मी समोर येईन."


कोण येणार शांभवीच्या मदतीला? पार्थ बोलेल का तिच्याशी बघू पुढील भागात.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all