देवी रक्षति रक्षितः.. भाग ६२

कथा एका असामान्य मुलीची
भाग ६२


"ऐं र्‍हीं क्लीं चामुंडा विच्चै..." जोरजोरात मंत्रोच्चारण होत होते. समोरची कालीमातेची उग्र मूर्ती आज अजूनच उग्र भासत होती. तिच्या गळ्यात वेगवेगळ्या माळा होत्या. गुहेत थंडी वाढत होती. मधूनच ज्वाळा शरीराला ऊब देत होत्या. तिने स्वतःला सावरले. हे सगळं स्वप्न आहे. आपण उठल्यावर हे सगळं संपून जाणार, ती मनाची समजूत काढत होती. तोच एका रेड्याच्या हंबरण्याचा, कोकराचा बें बें आवाज तिच्या कानावर पडला. तिने त्या आवाजापासून सुटका मिळवण्यासाठी कानावर हात ठेवला. तोच कोणीतरी तिच्या चेहर्‍यावर पाणी शिंपडले.

"नाटक करुन झालं असेल तर ऊठ आता." आबासाहेबांचा चिडका आवाज ऐकून तिने खाडकन डोळे उघडले. शांभवीने इथेतिथे बघितले. बाजूलाच जयंती आणि पार्थ होते. तिच्या जीवात जीव आला. 'ते स्वप्न होतं तर..' असा विचार करत ती निश्वास सोडणार तोच समोरच्या देवीच्या मूर्तीने तिचे लक्ष वेधून घेतले आणि तिच्या ह्रदयाचा ठोका चुकला. देवीच्या मूर्तीच्या इथे कपिल हवनकुंड तयार करत होता. तिला परत कोकराचा आवाज ऐकू आला.

"हे काय सुरू आहे??" शांभवीने घाबरत विचारले.

"काही विशेष नाही. तू हे कपडे बदल आणि झऱ्यावर जाऊन अंघोळ करुन ये. ओले कपडे बदलायचे नाहीत हे लक्षात ठेव." आबासाहेबांचा आवाज बदलला होता.

"ते.. मी??" शांभवीच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.

"सांगितलेलं ऐकायचं.." आबासाहेब पार्थकडे बघत म्हणाले. गणूला पार्थजवळ उभं बघून शांभवीने ते कपडे घेतले आणि ती बाहेर अंघोळ करण्यासाठी गेली. ती ओलेत्याने आत आली. तिच्या ओल्या अंगावर खिळलेली आबासाहेबांची आणि गणूची नजर बघून शांभवी शरमली. तिने मान खाली घातली.

"आता तू जी काही यंत्रं आणली आहेस ती या जागेवर ठेव." बोलता बोलता आबासाहेबांचा आवाज घोगरा झाला होता.

"आबा, कसली यंत्रे?" कपिलने विचारले.

"तीच.. तुम्ही गोळा करून आणलेली.." आबासाहेबांची शांभवीवरची नजर हटत नव्हती. शांभवी, आपलं सामान जिथे ठेवलं आहे तिथे गेली. तिने आधी माठाला हात लावला. कालीघाटच्या पुजार्‍यांनी दिलेले वस्त्र तिने बाहेर काढले. पार्थ, जयंती, कपिल सगळे काय घडते आहे ते बघत होते. शांभवीने हळूवार ते वस्त्र उलगडले. प्रकाशाचा एक झोत त्या गुहेला उजळवून गेला. आतमध्ये एक देवीयंत्र होते. नुकतेच पॉलिश करून आणल्यासारखे ते चमकत होते.

"पण यात तर देवीची बोटे.." कपिल म्हणाला.

"हे रहस्य कोणाला समजू नये म्हणून उठवलेली अफवा.." आबासाहेब हपापलेल्या नजरेने त्या यंत्राकडे बघत होते. "ते यंत्र त्या आकृतीच्या पायापाशी ठेव." शांभवीने त्यांनी काढलेल्या आकृतीच्या पायापाशी पहिले यंत्र ठेवले.

"आता कामाख्याचे यंत्र तिच्या योग्य त्या जागी ठेव." आबासाहेबांचे ते शब्द ऐकून पार्थने मान खाली घातली. "विमलादेवीचे यंत्र त्याच्या थोडेसे वर.. आणि नंतर आता आणलेले.. तारातारिणीचे." सर्व यंत्र ठेवून झाल्यावर शांभवीने ती आकृती परत पाहिली. कसल्या कसल्या द्रव्याने त्यांनी ती आकृती काढली होती. ही अशीच आकृती कुठेतरी बघितल्यासारखी शांभवीला आठवत होती.. पण कुठे?

"आता त्या यंत्राच्या मध्यभागी तू जाऊन बस.. " आबासाहेबांनी हुकूम सोडला.

"आबा, हे नक्की काय चालू आहे?" कपिलच्या आवाजात भिती जाणवत होती.

"माझे गुरू कधीची वाट बघत आहेत या क्षणाची.. एकदा का हे विधी संपन्न होऊन देवीची शक्ती या मूर्तीत एकवटली की मी आधी माझ्या गुरूंना समाधीतून बाहेर काढणार.. आणि मग संपूर्ण जगावर फक्त आणि फक्त आमचंच राज्य.." आबासाहेबांच्या डोळ्यात वेडसर झाक दिसू लागली.

"पण आबा.. तुम्ही मला.." आबासाहेबांनी रोखून कपिलकडे बघितले. त्यांची नजर बघून कपिल जागेवरच थिजला.

"तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे चिरंजीव.. मध्ये बोलायचं नाही. गप्प.. एकदम गप्प बसायचं.. नाहीतर इथून निघायचं.. समजलं? गणूऽऽऽ" आवाज देताच गणू पुढे आला. तयार केलेला नेवैद्य त्याने मानवी कवटीत ठेवला. एका कवटीत मद्य होते, दुसर्‍या मध्ये मासे.

"त्याला आण.. असं वेगळं सांगायचं का?" आबांचा चढलेला आवाज ऐकून गणू परत बाहेर गेला. तिकडच्या कोकराला घेऊन आला. ते बिचारं तिथून निसटण्यासाठी अयशस्वी प्रयत्न करत होतं. पण त्याची धडपड निष्प्रभ ठरली. गणूने त्याला बलिवेदीजवळ आणले. आबासाहेबांनी त्याला कुंकू लावले, गळ्यात माळा घातल्या आणि त्यांनी ते खड्ग त्यावर चालवले. ते दृश्य बघून जयंती गुहेबाहेर पळाली आणि भडाभडा ओकली. तो आवाज ऐकून आबासाहेब खदाखदा हसले.

"गुरूदेव, तुम्ही सांगितलेले पंच मकार करुन मी देवीला आज प्रसन्न करणार. मद्य, मांस, मासे, मुद्रा आणि मैथुन.." शेवटचा शब्द ऐकून पार्थ चिडला. आबासाहेबांना काय म्हणायचे आहे ते त्याला समजले.

"ताईला हात जरी लावायचा प्रयत्न केलास ना.. तर बघ.." तो ओरडला.

"गणू, हे पोरगं लय उडतंय. जास्त आवाज केला तर नरबळीची खंडित प्रथा पण सुरू करु." आबासाहेबांच्या आवाजातल्या थंडपणाने कपिलही चरकला.

"आबा, नको ना.. हे सगळं.."

"तुम्ही बाहेर व्हा.. मी बघतो इथे सगळं." ते शांभवीकडे वळले. ती जणू या चित्रातच नव्हती. आसन घालून, डोळे बंद करून ती ध्यानाला बसली होती. आबासाहेब हवनकुंडाजवळ गेले.

"चतुःषष्टया तन्त्रैः सकलमतिसंधाय भुवनं
स्थितस्तत्तत्सिद्धिप्रसवपरतन्त्रैः पशुपतिः।
पुनस्त्वन्निर्बन्धादखिलपुरुषार्थैकघटना
स्वतन्त्रं ते तन्त्रं क्षितितलभवातीतरदिदम्॥" मंत्र म्हणत त्यांनी हवनकुंड पेटवले. त्यात वेगवेगळे हवी टाकायला सुरुवात केली. त्या विचित्र वासाने पार्थ आणि कपिल खोकू लागले. जयंती कधीची बाहेर होती. हवी तशी पूजा होताच गणूने महिष बलिवेदीपाशी आणला.

"सगळं झाल्यावर याचा बळी.." आबासाहेब सूचक हसत म्हणाले. आबासाहेब त्या आकृतीजवळ जाऊ लागले. जाता जाता अंगावरचा एकेक कपडा उतरवू लागले. शांभवीने अजूनही डोळे उघडले नव्हते. त्यांनी आत्मविश्वासाने त्या आकृतीत शिरण्याचा प्रयत्न करताच त्यांना जोरात शॉक बसला. ते त्या आकृतीच्या बाहेरच्या बाजूस फेकले गेले. त्याचं दुःख होण्याऐवजी त्यांना आधी आश्चर्य वाटले.. आणि मग आनंद वाटू लागला.

"माझी साधना सफल झाली.. ही यंत्रे कार्यान्वित झाली.. आता मी मला जे हवे आहे ते करू शकतो." म्हणत त्याने परत आत जायचा प्रयत्न केला. तो करताच शांभवीने डोळे उघडले.

"या यंत्रात तुला प्रवेश नाही.. हे अजूनही समजले नाही का मूढा.." शांभवीचा बदललेला आवाज कपिलने ओळखला. पण आबासाहेब त्यांच्याच धुंदीत होते

"हे यंत्र मी बनवले आहे. यात मलाच प्रवेश नाकारणारी तू आहेस तरी कोण? सांगतो ते ऐकायचे.. नाहीतर.." आबासाहेबांनी परत धमकी दिली.

"नाही तर.. काय करशील तू??" शांभवी उठून उभी राहिली. तिच्या डोळ्यातून आग बाहेर पडत होती.

"नाहीतर.. तो पोरटा जिवंत राहणार नाही. गणूऽऽऽ, ही अशी ऐकणार नाही. धर त्या पोराला." गणू पार्थच्या दिशेला धावला. बळी द्यायला वापरलेले खड्ग त्याच्या हातात होते. गणू पार्थच्या दिशेने जातो आहे हे बघून कपिलसुद्धा त्याच्या दिशेने धावला. गणूने ते खड्ग पार्थच्या अंगावर उगारले. त्याने ते खड्ग खाली घेताना कपिल मध्ये आला.. आणि त्याच्या अंगावर वार झाला.

"कपिलऽऽऽऽऽऽऽऽ" रूद्रला आत घेऊन येणारी जयंती जोरात किंचाळली. कपिलने पार्थचा वार झेललेला बघून गणूने परत ते खड्ग पार्थवर उगारले.. पण रुद्रने तोपर्यंत गणूवर उडी मारली होती. जयंती कपिलकडे धावली होती. हे बघून पिसाळलेला आबासाहेब शांभवीकडे वळला..

"आता तर तुझ्यासोबत मैथुन करून मी देवीला इथे यायला भाग पाडणारच.." त्याचे बोलणे ऐकणार्‍या शांभवीने पार्थला खूण केली. तिच्या खुणेचा अर्थ समजून त्याने समोरच्या देवीच्या हाताजवळ ठेवलेले त्रिशूळ शांभवीकडे फेकले.

"तू मला मारणार?? हो?? तुझ्यात ही ताकद आहे?" आबासाहेब शांभवीभोवती फिरत होते.

"तुला माझ्या शक्तीचा अंदाज नाही मूर्खा.." शांभवी त्रिशूळ हातात पेलत म्हणाली. तोवर इथे रुद्रने गणूला लोळावले होते. तिथेच असलेल्या एका दोरीने त्याला बांधले होते. रुद्रने शांभवीकडे बघितले. हातात त्रिशूळ पेलून ती आबासाहेबांवर नेम धरत होती.

"शांभवी, तुझे हात या दुष्टाच्या हाताने नको रंगू देऊस." रुद्र जोरात ओरडला. त्याच्या ओरडण्याने शांभवी विचलित झाली आहे हे बघून आबासाहेबाने पँटच्या खिशातले रिव्हॉल्व्हर काढले. तो ते पार्थवर चालवणार तोच शांभवीने हातातले त्रिशूळ त्याला फेकून मारले. तिची शक्ती एवढी जास्त होती की त्या शक्तीने आबासाहेब त्रिशूळासहित जाऊन देवीच्या पायाजवळ पडले आणि त्याने प्राण सोडला. तरी शांभवीचा राग शांत झाला नव्हता. ती त्या आकृतीत रागाने फेऱ्या मारत होती. दुसरीकडे जयंती कपिलचे डोके धरून त्याला उठवायचा प्रयत्न करत होती. रुद्र कपिलजवळ गेला. त्याने त्याची नाडी बघितली. आणि मान खाली घालून तो बाहेर गेला. त्याने खाली घातलेल्या मानेचा अर्थ समजून जयंती कपिलच्या अंगावर पडून जोरात रडू लागली.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all