देवी रक्षति रक्षितः.. भाग ६३

कथा एका असामान्य मुलीची
भाग ६३


"त्वदन्यः पाणिभ्यामभयवरदो दैवतगण..
स्तवमेका नैवासि प्रकटितवराभीत्याभिनया।
भयात् त्रातुं दातुं फलमपि च वाञ्छासमधिकं
शरण्ये लोकानां तव हि चरणामेव निपुणौ॥

मंत्र म्हणतच एका तेजस्वी माणसाने गुहेत प्रवेश केला. शांभवी अजूनही शांत झाली नव्हती.

"माते, शांत हो.. आम्ही तुला शरण आलो आहोत. तुला शरण आलेल्यांच्या मनातील भीती नाहीशी करण्यास तुझे पायही समर्थ आहेत. शांत हो माते.. शांत हो.." ते मंत्र ऐकून संतापलेली शांभवी हळू हळू शांत होऊ लागली. ते बघताच त्या माणसाने रुद्रला खुणावले. रुद्रच्या चेहर्‍यावर आश्चर्य दिसत होते. आज्ञा मोडू नये म्हणून तो बाहेर गेला. आत येताना तो अंघोळ करुन कद नेसून ओलेत्यानेच आला होता. तो तेजस्वी पुरूष अजूनही मंत्रजप करत होता. रुद्रने आपली सॅक उघडली. त्यातले एकेक यंत्र तो बाहेर काढू लागला. ती यंत्रं बघून पार्थ स्तिमित झाला. जयंतीसुद्धा दोन क्षण रडणं विसरली. रुद्रने ती यंत्र शांभवीने ठेवलेल्या यंत्रांच्या मध्ये ठेवली. ती तशी ठेवताच ती पूर्ण गुहा प्रकाशाने न्हाऊन निघाली. मगाशी चिडलेली शांभवी आमूलाग्र बदलली. तिच्या चेहर्‍यावरचा चिडका भाव जाऊन सुंदर हसू उमलले. तिने प्रेमाने रुद्रकडे बघितले. त्याने आत यावे म्हणून आपला हात पुढे केला. रुद्रने तो हात हातात घेत त्या यंत्रात प्रवेश केला. तसे करताच आधीपेक्षा कितीतरी पटीने गुहेत प्रकाश निर्माण झाला.

"महीं मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहं
स्थितं स्वाधिष्ठाने ह्रदि मरुतमाकाशमुपरि।
मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्वा कुलपथं
सहस्त्रारे पद्मे सह रहसि पत्या विहरसे ॥

"माते, सर्व चक्रांचा भेद करून तू तुझ्या प्रियतम अश्या शिवासोबत सहस्त्रार चक्रात विहार करत आहेस.." त्या पुरुषाचे वाक्य पूर्ण होताच यंत्राने बनवलेल्या आकृतीतले कमळ फुलले. पार्थने परत एकदा स्वतःचे डोळे चोळले. सहस्त्रदल कमळ जसे असते, तशीच आकृती रुद्र आणि शांभवीभोवती तयार झाली होती.
त्या तेजस्वी पुरूषाने त्या दोघांसमोर हात जोडले. त्याचे बघून नकळत पार्थही त्या दोघांसमोर झुकला. जयंतीचे हातही आपसूकच जोडले गेले.

"बोल, तुला काय हवे आहे?" शांभवीच्या तेजस्वी चेहर्‍यातून शब्द ऐकू येऊ लागले. पण तो आवाज शांभवीचा नव्हता. घंटी किणकिणावी असा नाजूक दैवी आवाज होता.

"माते, तुझे दर्शन झाले.. आता अजून काय हवे मला? माझ्या आयुष्याचे सार्थक झाले." त्या पुरूषाने शांभवीला साष्टांग दंडवत घातले.

"राघव, उठ.. मी खरंच प्रसन्न झाले आहे. तुझ्यामुळे माझी या रूपातील भैरवाशी ओळख झाली." शांभवी रूद्रकडे बघत म्हणाली.

"माते... शिवाची ओळख शक्तीला होणार नाही असे कधी होईल का?"

"दिलेल्या समयाच्या कितीतरी आधी हे यंत्र कार्यान्वित झाले आहे." रुद्र त्याच्या गंभीर आवाजात बोलू लागला.

"क्षमा असावी प्रभो.. त्या दुष्टाने मातेची यंत्रे शोधायला सुरुवात केली म्हणून नाईलाजाने आम्हाला तुमची यंत्रे पण आणावी लागली."

"विधिलिखित कोणीच टाळू शकत नाही. यानंतर ही यंत्रे अजून एकदाच आपला प्रभाव दाखवू शकतात. आणि फक्त त्याचवेळेस आम्ही परत एकदा या भूलोकात येऊ." रुद्र म्हणाला.

"तू आमची आराधना करुनही काहीच मागितले नाहीस.. मी तुला वचन देते.. जेव्हा जेव्हा तू संकटात सापडशील तेव्हा तू न बोलावताच मी तुझ्या मदतीला येईन." शांभवी म्हणाली.

"देवी रक्षति रक्षितः..." जयंतीच्या तोंडून शब्द निघून गेले. शांभवीने तिच्याकडे बघितले.

"अगदी बरोबर.. तुम्ही सगळ्यांनी आमच्या यंत्राचे, आमचे संरक्षण करण्यासाठी प्राण संकटात घातले.. मग तुमचे रक्षण करण्यासाठी इथे येणे हे आमचे कर्तव्यच होते. राघव, ही यंत्रे नीट जपून ठेव. यामध्ये आमची शक्ती आहे. तिचा क्षय न होता ती त्या घटनेपर्यंत जपली गेली पाहिजेत." शांभवी म्हणाली.

"कोणती घटना?" पार्थने विचारलेच. तो प्रश्न ऐकून शांभवी आणि रुद्रने एकमेकांकडे बघितले.

"कलीचा विनाश.. त्या गोष्टीला आमचाही हातभार लागेल. आणि त्यावेळेस ही यंत्रेच आम्हाला परत जागृत करतील. असो.. आता आम्ही निघतो." शांभवी आणि रुद्रने एकमेकांचा हात हातात घेतला.. एक तेजस्वी प्रकाशशलाका कालीमातेच्या मूर्तीत विलीन झाली. शांभवी तिथेच बेशुद्ध होऊन पडली.

"हे नक्की काय होते?" पार्थने राघवला विचारले.

"सगळं सांगतो.. पण ही ती वेळ नाही. मला जरा ही यंत्रे गोळा करायला मदत कर." त्याचे बोलणे ऐकून पार्थला वाटलेली भीती त्याच्या चेहर्‍यावर दिसू लागली.

"घाबरू नकोस.. आता तुला काही नाही होणार. निदान काही काळतरी. आत्ताच ती यंत्रे कार्यान्वित झाली होती. माता आणि प्रभू इथून गेल्यामुळे ती आता निष्प्रभ झाली आहेत. ती त्या वस्त्रात गुंडाळून ठेवण्यास मला मदत कर." राघवने काळजीपूर्वक एकेक यंत्र उचलून पार्थच्या हातात दिले. त्या दिवशी जड वाटणारे यंत्र, एवढं हलकं कसं झालं.. पार्थ या विचारात पडला. आबासाहेबाने काढलेली आकृती राघवने पुसून काढली. त्याने आणलेल्या बॅगेतून गंगाजल तिथे शिंपडले. सर्व यंत्र नीट ठेवून झाल्यावर राघवने शांभवीला आवाज दिला,

"शांभू..." तो आवाज ऐकताच शांभवीने डोळे उघडले. स्वतःच्या अंगावरील अपुऱ्या कपड्यांची तिला आता लाज वाटू लागली. तोपर्यंत रुद्रही भानावर आला होता. शांभवीची अवस्था बघून त्याने आपल्या सॅकमधली शाल तिला काढून दिली.

"आता कसं वाटतंय?" रुद्रने हळूवारपणे विचारले.

"डोकं जड झालं आहे. काही समजत नाहीये.. आणि या दोघांना काय झाले?" शांभवीने कपिल आणि आबासाहेबांकडे बघत विचारले.

"ताई, तुला काहीच आठवत नाही?" पार्थला आश्चर्य वाटले.

"काय आठवायचं आहे? तू आता बोलतो आहेस माझ्याशी?" शांभवीच्या डोळ्यात पाणी आले.

"ताई.." पार्थ पण शांभवीच्या गळ्यात पडला. रुद्रने दोघांनाही आपल्या मिठीत घेतले. रडता रडता शांभवीच्या चेहर्‍यावर हसू उमटले. डोळे पुसता पुसता तिची नजर समोरच्या जयंतीकडे गेली.

"काय झाले याला नक्की?" शांभवीने जयंतीकडे जात विचारले.

"गणूने... वार केला.." जयंती कपिलकडे बघत म्हणाली.

"सर, प्लीज याला डॉक्टरकडे घेऊन चला ना.." शांभवी रुद्रला विनवत म्हणाली.

"त्याचा काहीच फायदा नाही.." रुद्र हताशपणे म्हणाला.

"तुला मायंबाच्या इथे मिळालेली मुळी काढ." राघव म्हणाले.

"तुम्हाला कसं माहित?"

"वेळ दडवू नकोस.." शांभवीने तिच्या सॅकमधून ती मुळी काढली. राघवने ती उगाळून शांभवीकडे दिली.

"ही त्याच्या तोंडात घाल. आणि थोडी जखमेवर लाव.."

"मी??" शांभवीने विचारले.

"हो.. तूच.. काही झाले तर यानेच होईल.. नाहीतर.." राघव म्हणाले. थरथरत्या हाताने शांभवीने ते औषध कपिलला दिले. थोडी मुळी त्याच्या जखमेवर लावली. तरीही तो उठला नाही.. हे बघून जयंती निराश झाली.

"माझ्या प्रेमाचा प्रवास सुरू होण्यापूर्वीच संपून गेला." तिच्या डोळ्यातला अश्रू कपिलच्या चेहर्‍यावर पडला. त्याने डोळ्यांची उघडझाप केली. ते बघून पार्थ आनंदाने ओरडला.

"दादा, शुद्धीवर आला.."

कपिलने डोळे उघडले. जयंतीने त्याला तशीच मिठी मारली.

"अगं ए.. हळू ना.. दुखतंय मला.."

"इथे मी रडत होते तुझ्यासाठी.. आणि तुला तुझ्या दुखण्याचं पडलं आहे." जयंती कपिलचं डोकं खाली ठेवून उठू लागली. तोच त्याने तिचा हात घट्ट पकडला.

"अजूनही मस्करी समजत नाही का? आणि रडलीस का? तुझं तर माझ्यावर प्रेम नाही ना?" कपिलला बोलायला त्रास होत होता, तरी तो बोलत होता.

"हो.. माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही. मूर्ख होते मी म्हणून रडले. प्रेम करावं तर या दोघांसारखं.." जयंती शांभवीकडे बघत म्हणाली. ती असं म्हणताच कपिलचे आजूबाजूला लक्ष गेले. रुद्रला बघताच तो उठण्याचा प्रयत्न करु लागला. जयंतीने त्याला मदत केली. उठून बसताच त्याला बांधून ठेवलेला गणू आणि त्रिशूळाने मृत्युमुखी पडलेले आबासाहेब दिसले.

"आबा..." कपिल किंचाळला.

"शांभवीवर ते जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते. ते करताना माझ्या हातून.." रुद्र म्हणाला. रुद्रचे शब्द ऐकून कपिल लज्जित झाला. त्याने शांभवीकडे बघून हात जोडले.

"मला माफ कर.." एवढेच शब्द त्याच्या तोंडून निघाले.

"रुद्र, आपण इथून आपल्या घरी जाऊयात. तुला काय वाटते?" राघवने विचारले.

"तुम्ही म्हणाल तसे.. खाली गाडी उभी आहे."

"मी याला घेऊन जातो." राघव गणूकडे जात म्हणाले.

"पार्थ, मला मदत करशील?" जयंती कपिलला उभं करत म्हणाली. बघता बघता गुहेत शांभवी आणि रुद्र दोघेच उरले. रुद्र एकटक तिच्याकडे बघत होता.

"आता निघायचे की मी उचलून घ्यायची वाट बघते आहेस?" रुद्रने मिस्किलपणे विचारले. ते ऐकताच शांभवी अजूनच लाजली. रुद्र हळूच पुढे झाला. त्याने आपला हात पुढे केला. शांभवी त्याच्या हातात हात ठेवणार तोच त्याने तिला मिठीत घेतले..

"आता, मी तुला कुठेही दूर जाऊ देणार नाही.." तो पुटपुटला.


राघव नक्की कोण आहे? पार्थ उघडेल का ते पाकिट? बघू पुढील भागात.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all