देवी रक्षति रक्षितः.. भाग ६४

कथा एका असामान्य मुलीची
भाग ६४


"मी नाही माझ्या शांभूला माझ्यापासून दूर करणार.." ती स्त्री रडत होती.

"तिचा जीव वाचवण्यासाठी हे गरजेचे आहे. आणि सुधाकर तर आपलाच आहे ना? त्याने मला शांभवीचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे." तो एका माणसाकडे हात करत म्हणाला.

"माझ्या काळजाचा तुकडा आहे तो.. असं कसं तिला कायमचं माझ्यापासून तोडू?" त्या स्त्रीने त्या मुलीला अजूनच जवळ ओढले.

"वहिनी, माझ्यावर विश्वास ठेवा.. मी तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. पण लक्षात घ्या तो प्रभाकर तुम्हाला शोधतो आहे.. त्याला जर तुम्ही दिसलात ना तर शांभवीचे काही खरे नाही. विचार करा.. तिचा जीव महत्त्वाचा की तुमची माया?" सदाशिवचं बोलणं ऐकून तिची त्या मुली भोवतीची मिठी सैल झाली. ते बघून त्या पुरूषाने सदाशिवला खुणावले. त्याने त्या मुलीला उचलले.

"आई.. मला नाही जायचं.." शांभवी जोरात किंचाळली.

"शांभवी.. काय झालं? परत स्वप्न पडलं का?" रुद्रने काळजीने विचारले. शांभवीने त्याचा हात घट्ट धरला. गाडी एका मठाजवळ थांबली होती.

"आपण कुठे आलो आहोत?" शांभवीने रुद्रला विचारले.

"आत चल.. सगळं समजेल." रुद्र गाडीचा दरवाजा उघडत म्हणाला. कपिल, पार्थ आधीच्या गाडीतून तिथे पोहोचले होते. शांभवी रुद्रच्या आधाराने चालत होती. आत प्रवेश करताच तिला ओळखीचे वातावरण वाटू लागले. आत राघव कपिलची जखम बघून त्यावर औषध लावत होते. ते बघून शांभवीला आठवण झाली.

"बाबा..." शांभवीने साद घालताच राघवने तिच्याकडे बघितले. त्यांचे डोळे अश्रुंने ओथंबले.

"मला वाटलं नव्हतं, तू मला ओळखशील म्हणून.." त्यांनी शांभवीला जवळ घेतले.

"आई??" शांभवीला काही क्षणांत आठवले.

"ती कधीच मला एकट्याला सोडून गेली. तुझं इथून निघून जाणं ती पचवू शकली नाही. हा पार्थ आहे ना? सदाशिवचा मुलगा?" एकट्याच बसलेल्या पार्थकडे बोट करत त्यांनी विचारलं.

"हो.."

"ये बाळा इथे.." राघवने हात पुढे करताच पार्थ पुढे झाला. राघवच्या मिठीत जणू तो त्याच्या बाबांना शोधत होता.

"मी एकटाच राहिलो.." पार्थ हुंदके देत म्हणाला.

"असा कसा एकटा राहशील? हा तुझा दादा असताना?" राघव रुद्रला बोलवत म्हणाले.

"दादा.. म्हणजे??"

"तुम्ही सगळे इथे बसा.. आणि मी जे सांगतो ते शांतपणे ऐका.." राघव त्याच्या आसनावर बसत म्हणाले.

"मी.. राघव.. मी आणि सदाशिव दोघेही खूप घट्ट मित्र आणि कट्टर देवीभक्त सुद्धा. एका टेकडीवर असलेले देवीचे मंदिर आणि त्याखालचा असलेला सर्व परिसर अखत्यारीत असल्याने पोटापुरते कमावून छान चालले होते. आमचं घराणं पुजारी असल्याने आधीपासूनच या घरात देवीची अर्चना मोठ्या प्रमाणात व्हायची. त्या अर्चनेचे फलित म्हणून माझ्या पूर्वजांना आशीर्वाद मिळाला होता की तुझ्या वंशात माझे रुप जन्माला येईल. अनेक पिढ्या गेल्या तरी ते खरे झालं नाही.. कारण आमच्या घराण्यात मुलीचा जन्मच झाला नाही. पण तुझ्या येण्याने तूच देवीचे रुप आहेस, याची खात्री पटली."

"पण मग त्या चक्रात हे पण गेले होते ना?" पार्थ रुद्रकडे बघत म्हणाला.

"अरे हो.. सांगतो.. सांगतो.." राघव हसत म्हणाले.

"देवीचा अंश पृथ्वीवर आला की तिच्यासोबत भैरव असतोच. या रुद्रच्या जन्माच्या वेळेस अश्या काही घटना घडल्या की त्यांनी तुम्हा दोघे दैवी अंश घेऊन जन्माला आला आहात यावर शिक्कामोर्तब झाले." राघव म्हणाले.

"मग असं होतं तर मला तुमच्यापासून दूर का केले? आणि ही यंत्रे??" शांभवीने उद्विग्न होत विचारले.

"शांभवी.. तुमच्या मध्ये दैवी अंश होता, पण सुप्त स्वरूपात. तो जागृत करण्याची आम्हाला गरज भासलीच नाही. पण.."

"पण काय??"

"पण, तुझ्या या स्वरूपाची गरज त्या प्रभाकरला होती.."

"कोण प्रभाकर?"

"तोच.. स्वतःला आबासाहेब म्हणवून घेणारा.. तामसी अरिष्टनाथ.."

"काहीही.. आबांचे नाव प्रभाकर होते, हे मान्य.. पण अरिष्टनाथ?" कपिल चिडून म्हणाला.

"यात नाथ संप्रदाय पण आहे?" पार्थने विचारले

"आहे.. पण तुम्ही समजता तसा नाही. तसं बघायला गेलं तर आम्ही सुद्धा देवीची पूजा करणारे नाथपंथिय.. पण आमच्यामध्ये सुद्धा एक वामाचारी ग्रुप होता. त्यांचाच मुख्य होता अरिष्टनाथ. ही कथा हजारो वर्षांपूर्वी सुरू झाली आहे.." राघव सांगू लागले.

"द्वापारयुगाचा अंत जवळ आला होता. त्यावेळेस नवनारायणांनी भगवान कृष्णांच्या आज्ञेने नवनाथांच्या रुपात कलियुगात अवतार घेतला. दुष्टांचा नाश, सज्जनांचे संरक्षण आणि जगाचे कल्याण हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. त्याप्रमाणे त्यांनी काम करायला सुरुवात केली. हे सर्व सुरळीत सुरू असतानाच तांत्रिक लोकांनी नाथपंथात प्रवेश केला. सर्वांना सामावून घेण्याच्या वृत्तीमुळे शाक्त, कापालिक सर्वच नाथपंथिय झाले. सुरूवातीला नाथपंथियांचे उपास्य दैवत फक्त शिव होते. पण शक्तीविना शिव हा शव आहे म्हटल्यावर मोठ्या प्रमाणात देवीच्या कालीरुपाची उपासना सुरू झाली. यातूनच नाथपंथाला उतरती कळा लागली. सर्वसामान्य लोकं यांच्यापासून दूर जाऊ लागले. सगळीकडे तांत्रिक अभिचार माजले होते. कुमारिकाबळी, नरबळी याचे प्रमाण वाढले होते. नाथपंथियांना यातून बाहेर काढण्यासाठी जालंदरनाथांनी यातल्या अघोरी चालीरीती बंद करवल्या.. तर मच्छिंद्रनाथांनी योगनिगडित साधनेवर जोर दिला. आजच्या प्रसंगाची पाळेमुळे तिथे रुजली आहेत." श्वास सोडत राघव म्हणाले.

"आजच्या प्रसंगाची म्हणजे?" पार्थने विचारले.

"मगाशी म्हटलं तसं.. जालिंदरनाथांनी अघोरी चालीरीती बंद करवल्या. पण त्यातही काहीजण होते ज्यांना हे मान्य नव्हते. मग तेव्हा सुरू झाला संघर्ष.. नाथपंथिय विरूद्ध अघोरपंथिय किंवा शाक्त.. सर्वसामान्य लोकांना या अघोरपंथियांची वाटणारी भिती नाथांच्या पथ्यावरच पडली. पण यातून त्याला रक्तरंजित रुप प्राप्त झाले. भैरवनाथ, अरिष्टनाथाचा गुरू कितीतरी शतकांपूर्वी देवीला प्रसन्न करण्याचा मार्ग शोधत होता. त्यातूनच त्याला शोध लागला देवीच्या यंत्रांचा."

"यंत्र??"

"हो.. आपल्याला हे माहित आहे की जिथे जिथे सतीचे अवयव पडले तिथे शक्तीपीठ निर्माण झाले. ही शक्तीपीठे प्रचंड ऊर्जेने भरलेली होती. ती सर्व ऊर्जा यंत्र रूपात एकत्र केली गेली. आणि ती त्या शक्तीपीठांच्या ठिकाणी लपवून ठेवण्यात आली. ती ऊर्जा इतकी प्रचंड होती की सुप्तरूपात असूनही ती अनेक भक्तांपर्यंत पोहोचत होती. ती यंत्रे योग्य त्या ठिकाणी ठेवून सिद्ध केली तर देवीची सर्व ऊर्जा त्या व्यक्तीला प्राप्त होऊन त्याला हवे ते मिळवणे शक्य होणार होते."

"पण मग भैरव??" पार्थ परत मध्येच बोलला.

"शिवाशिवाय शक्ती.. आणि शक्तीशिवाय शिव दोघेही अपूर्ण आहेत. प्रत्येक शक्तीपीठाच्या इथे जे भैरव आहेत.. तिथेच भैरवयंत्रही ठेवले गेले. जेव्हा ही दोन्ही यंत्रे एकत्र ठेवली जातील फक्त आणि फक्त तेव्हाच हे यंत्र पूर्ण होईल अशी क्लृप्ती करण्यात आली होती. त्यासोबतच गरजेचे होते काही मंत्र.. जे शांभवीकडून मी लहानपणापासून सिद्ध करुन घेतले होते."

"म्हणजे सर्किट सारखं??"

"हो.. सर्किट कसं एका विशिष्ट पद्धतीने लावले की हवा तो परिणाम साधला जातो. तसंच या यंत्राचेही आहे."

"पण मग इतर कोणीही या यंत्राला हात लावू शकत नसेल तर ही बनवली कशी ? आणि ठेवली तरी कोणी?" पार्थचे प्रश्न संपत नव्हते.

"ही बनवली कोणी हे खरंच माहित नाही. पण मी म्हटलं तसं ही त्या शक्तीपीठांच्याच जागेवर ठेवण्यासाठी काही लोकं गुप्त पातळीवर काम करत होते. कारण धोका दोन बाजूंनी होता.. एक परकीय आक्रमणाचा आणि दुसरा या अघोर पंथाचा."

"कसा??"

"तेच तर सांगतो आहे.. भैरवनाथाने पूर्ण भारतभर फिरून शक्तीपीठांची माहिती मिळवली. त्यातूनच त्याला या यंत्रांबद्दल समजले. तो ही यंत्रे हस्तगत करण्याचा प्रयत्न करत असतानाच मारला गेला. पण..."

"पण काय??"

"पण त्याच्या शिष्यांनी त्याचे अंतिम विधी न करता त्याचे शव तसेच एका गुहेत बंद करुन ठेवले आहे. त्यांचे म्हणणे आहे की तो अजूनही संजीवन समाधी अवस्थेत आहे. ही यंत्रे सापडून ती कार्यान्वित झाली की ते सगळ्यात आधी त्याला जिवंत करणार होते."

"या सगळ्याचा आणि मला दूर ठेवण्याचा काय संबंध??" शांभवीने विचारले.

"भैरवनाथ त्याच्या शिष्यांना अर्धवट माहिती देऊन मारला गेला. त्यांना हे माहित होते की यंत्र कार्यान्वित होतील. हे ही माहित होते की त्यांना याला हात लावता येणं शक्य नाही.. मग त्यांचा शोध सुरू झाला एका अश्या व्यक्तीचा, जो हे सगळं हाताळू शकेल. ती माणसे चुकीच्या मार्गावर असली तरी हुशार होती. त्यातूनच त्यांना माझ्या घराला मिळालेल्या वरदानाबद्दल समजले.. त्यांनी स्वतः देखील देवीचा जन्म घेण्याची एक वेळ शोधली होती.. ती तुझ्या जन्म वेळेशी जुळत होती.."


शांभवीच्या जन्माचा उलगडा तर झाला.. पण मग जयंतीची या सगळ्यात काय भूमिका आहे? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all