देवी रक्षति रक्षितः.. अंतिम भाग

कथा एका असामान्य मुलीची
भाग ६५


"माझी जन्मवेळ देवीच्या वेळेशी जुळत होती? आणि जर माझ्यात देवीचा अंश असेल तर मला का नाही जाणवत ते?" शांभवीने उद्विग्न होऊन विचारले.

"बाळा, आजपर्यंत देवीचे जेवढे अवतार झाले आहेत, एकाही अवतारात तिला तिच्या रुपाची जाणीव झालेली नाही. मग तू याला अपवाद कशी असणार? आत्ता थोड्या वेळापूर्वी तुझ्यातला दैवी अंश जागा झाला होता.. पण तुला आठवतो आहे का?" शांभवीने नकारार्थी मान हलवली. राघवने पुढे बोलणे सुरू ठेवले. "जन्मवेळ म्हणशील तर आधीच्या अंदाजावरून त्यांनी ती ठरवली असावी. मग त्या वेळेत जन्म झालेल्या मुलींचा शोध घेणं काहीच अवघड नव्हतं. तोच शोध घेत ते आपल्यापर्यंत पोहोचले. मग तिथे नाईलाजाने सदाशिवला मध्ये पडावं लागलं."

"म्हणजे बाबा?" शांभवीने विचारले.

"हो.. त्याला आमची बिकट अवस्था दिसत होती. तुला घेऊन आम्ही गावं बदलत फिरत होतो. तुझा जीव वाचवणं ही आमची प्राथमिकता होती. मग त्याने तुला त्याच्यासोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळेस आम्ही एकटं पडू नये म्हणून त्याने स्वतःच्या मुलाला, रुद्रला इथे ठेवलं." राघव बोलत होते.

"खरंच?? हा माझा खरा दादा आहे?" पार्थ ने विचारले.

"हो.. भैरवाबद्दल नसलेल्या माहितीमुळे असेल कदाचित पण भैरवानाथाचे कधी तिकडे लक्षच गेले नाही. त्यामुळे रुद्र तसा सुरक्षित होता. पण सदाशिव आणि वहिनींनी मात्र जीवावरची जोखीम उचलली होती. माझ्या शांभवीला सांभाळायची जबाबदारी घेऊन." शांभवीच्या डोक्यावरून हात फिरवत राघव म्हणाले.

"म्हणून त्यांचा खून झाला.. माझ्यासाठी त्यांचा जीव गेला." शांभवी हताश होऊन बोलत होती.

"फक्त त्यांचाच नाही.. या जयंतीकडे बघ. तिच्या बाबांना तर तुझा ठावठिकाणा मिळावा म्हणून जिवंत जाळलं.." राघव म्हणाले.

"तरीही ती माझ्यासोबत??" शांभवीच्या तोंडून शब्द फुटेना. ती जयंतीजवळ गेली.
"म्हणून स्मशानाची भिती वाटत होती?"

"माझ्यासमोर मारलं गं त्यांनी.. आणि मी काहीच करु शकत नव्हते. आईने तोंड बंद करुन ठेवले होते माझे." जयंतीला जणू तो क्षण आठवत होता. "तेव्हाच मी स्वतःशी शपथ घेतली.. या दुष्टांच्या विरुद्ध उभं राहण्याची.. मग आपल्या पथकात आले. तिथूनच तुझी जबाबदारी घेतली."

"पण मग तू आणि सर एकमेकांना आधीपासून ओळखत होता?"

"नाही.. रुद्रची ओळख कोणालाच नव्हती. तू कपिलसोबत गेल्यावर मात्र जयंतीला सगळं सांगावं लागलं." राघव म्हणाले.

"मग हे आधीच का नाही मला सांगितलं?" शांभवी डोकं धरून खाली बसली.

"याचं उत्तर कपिलच देईल.." रुद्र कपिलकडे बघत म्हणाला.

"मी... " कपिल हडबडला.

"हो.. तूच सांग याचे कारण.." रुद्र ठामपणे म्हणाला.

"मला बाबांनी एवढंच सांगितलं होतं की आपल्याला शक्तीपीठांमधून यंत्र मिळवायची आहेत. कुठून तरी त्यांना शांभवीची माहिती मिळाली. तिने ते चिन्ह काढताच माझी खात्री पटली." कपिल सांगत असताना मध्येच रुद्र चिडला.

"पण ते चिन्ह मी तिच्याकडून काढून घेतले होते."

"ते मला माहित नाही. पण मी ते चित्र बाबांना पाठवताच शांभवीच आम्हाला हवी असणारी व्यक्ती आहे याची खात्री पटली. तिच्या पुढे पुढे करणं हा बाबांच्या प्लॅनचा भाग होता. त्यात जयंती आली. आधी मला तिच्यापासून धोका जाणवत होता.. पण तिच्याशी भांडता भांडता मी कधी तिच्या प्रेमात पडलो तेच समजलं नाही." जयंतीच्या उतरलेल्या चेहर्‍याकडे बघत कपिल बोलत होता.

"तुमची प्रेमकथा नंतर सांग. आम्ही शांभवीला काहीच का सांगू शकत नव्हतो त्याचे उत्तर दे तिला आधी." रुद्र म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून कपिलने आवंढा गिळला.

"रुद्रने शांभवीच्या जवळ जरी येण्याचा प्रयत्न केला तरी मी पार्थला इजा पोहोचवीन अशी मी धमकी दिली होती."

"म्हणून तू मला एकट्याला कुठेच सोडत नव्हतास?" पार्थने विचारले.

"मला खरंच माफ कर. बाबांच्या बोलण्यात येऊन मी खूप मोठी चूक केली." कपिल अपराधीपणे बोलत होता.

"केवढा मोठा विश्वासघात?" जयंती म्हणाली.

"त्यासाठी माफी मागतो ना.. प्लीज.. बाबा या अश्या पंथात आहेत हे मला माहित नव्हते." कपिल म्हणाला.

"जयंती, खरंच माफ कर त्याला. त्याच्या मनात काही वाईट हेतू असते तर त्याने पार्थला वाचवण्यासाठी मध्ये उडी घेतली नसती." राघव जयंतीची समजूत काढत म्हणाले. "तुमचे सगळे प्रश्न संपले असतील तर तुम्ही आता आराम करा. गेले काही दिवस खूप दगदग झाली आहे तुमची."

"माझा एक प्रश्न राहिला आहे. ही जर चारच शक्तीपीठे महत्वाची होती तर मग आम्हाला तारापीठ इथे त्या माणसाने काय दिले? आणि तो होता तरी कोण?" शांभवीने विचारले.

"ही चार पीठे तांत्रिकदृष्ट्या महत्वाची आहेत. ही जी शक्ती होती ती देवीची तांत्रिक शक्ती होती. देवीच्या सर्व पीठांच्या इथे एकेक यंत्र आहेच. तेच तुम्हाला सुद्धा मिळाले. आणि तो माणूस बहुतेक देवीचा लाडका मुलगा असावा. ज्याने ते यंत्र जपले असावे." राघवने उत्तर दिले. ते ऐकून सर्व गप्प झाले. "मी आधी आत जाऊन खाणं तयार आहे का बघतो.. ते खा आणि मग आराम करा. पार्थ, येणार का सोबत?"

"मी येतो.. पण मी आईबाबांनी दिलेलं पाकीट उघडू?" पार्थने शांभवीकडे बघत विचारले.

"मलापण पेटी दिली आहे.." शांभवी म्हणाली.

"उघडा ते.." राघवने परवानगी दिली.
पार्थने स्वतःची सॅक आणली. त्याच्या तळाशी जपून ठेवलेले ते पाकीट काढले. त्यावरून हळूवारपणे हात फिरवला. शांभवीसुद्धा तिची पेटी घेऊन आली. शांभवीने पार्थच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने थरथरत्या हाताने पाकीट उघडले. आत एक पत्र होते.

'प्रिय पार्थ, तू हे पत्र वाचतो आहेस.. याचा अर्थ आम्ही या जगात नाही, असा होतो. तुला असं वाटत असेल की तू एकटा पडला आहेस.. तर तसं नाहीये. आमचा शांभवीवर विश्वास आहे. ती तुला अजिबात एकटं पडू देणार नाही. शांभवी आमची मुलगी नाही. हे का आणि कसं घडलं हे नाही सांगता येणार.. पण त्यामागे खूप मोठे कारण आहे हे नक्की.' हे वाक्य वाचताना शांभवी आणि पार्थ दोघांनाही हुंदका फुटला. ते पुढे वाचू लागले.
'तुला कधी सांगू शकलो नाही.. पण तुझा एक भाऊही आहे. तो कसा दिसतो हे ही आम्हाला आता आठवत नाही. पण पुढेमागे तो जर कधी तुला भेटला तर त्याला हे पत्र नक्की दाखव. आमचे आशीर्वाद नेहमीच त्याच्यासोबत असतील. हे सांग त्याला. आणि अजून एक गोष्ट.. तुला वाटत असेल की आम्ही शांभवीला का आणले.. तर चांगल्या कार्यात आपला खारीचा वाटा.. बस्स. काळजी घे.. तुझीही आणि शांभवीची ही. देव करो आणि राघव तुम्हाला लवकरात लवकर भेटो. तुमचेच आईबाबा.' पार्थने पत्राची घडी घातली. त्याने रुद्रकडे बघितले. त्याच्या डोळ्यातही पाणी तरळत होते. त्याने हात फैलावले. पार्थ त्याच्या मिठीत जाऊन रडू लागला.

"आता यापुढे रडणं बंद. मी आहे." रुद्र म्हणाला.

"त्याची मोठी बहिण असताना त्याला कोणाची गरज नाही." शांभवी पाठून म्हणाली.

"बरं.. तुझी ती पेटी उघडते आहेस ना?" रूद्र पेटीकडे बोट करत म्हणाला. शांभवीने ती पेटी उघडली. आत तिने बघितलेले तेच कमळाचे चिन्ह होते. जे आबासाहेबानेसुद्धा काढले होते. त्याच्या आत एक सोन्याची चेन होती. तिने ती चेन उचलली. तिचे पेडण्ट उघडले. आत तेच तीन फोटो होते, जे तिला स्वप्नात दिसत होते.

"बाबा.." तिने राघवकडे बघितले.

"मी, तुझी आई आणि तू.. तुझी खात्री पटावी म्हणून ते ठेवलं होतं." राघव गहिवरून म्हणाला. "पार्थ, चल आपण खायचं बघूया.." डोळ्यातलं पाणी पुसत राघव म्हणाले. ते दोघेही जाताच कपिल जयंतीच्या मदतीने रुद्रजवळ आला.

"शांभवी, मला माफ कर.. मी तुझ्या भावनांशी खेळायला नको होते." कपिल हात जोडत म्हणाला.

"जे झालं ते विसरून जा.. आता जयंतीशी न भांडता रहा म्हणजे झालं." शांभवी हसत म्हणाली.

"मी भांडतो तिच्याशी? काहीही.." कपिल जयंतीकडे बघत म्हणाला.

"मग कोण, मी भांडकुदळ आहे?" जयंती कंबरेवर हात ठेवत म्हणाली.

"नाही गं.. माझी हिंमत.. आहे का असं काही म्हणायची.." कपिल शेवटची वाक्य हळू आवाजात म्हणाला. "जरा पाणी मिळेल का बघ ना?"

"चल आत.. " जयंती त्याला घेऊन आत गेली. शांभवी ते दोघं गेलं त्या दिशेने बघत हसत होती. अचानक तिला जाणवले की ती आणि रुद्र दोघेच तिथे आहेत.

"मग.. अजूनही घाबरतेस तू मला?" रुद्रने शांभवीच्या अगदी जवळ येऊन विचारले.

"घाबरत नाही.. पण चिडले आहे.. का नाही आधी सांगितलं मला हे सगळं? आणि ते जाऊच दे.. इतकं सगळं होतं तरी सतत का चिडायचात ऑफिसमध्ये?"

"का नाही सांगितलं? त्याचं कारण तर तुझ्यासमोर आहे.. आणि चिडचिड म्हणूनच होत होती. तू समोर असतानाही काही सांगू शकत नव्हतो.. काही करू शकत नव्हतो.." रुद्रने बोलता बोलता शांभवीला मिठीत घेतले.

"हे काय?? कोणीही येईल इथे?" शांभवी लाजत म्हणाली.

"कोणी येणार नाही.. आणि आलं तरी आता त्यांना माहित आहे.. की आपल्याला दूर करणं हे कोणालाच शक्य नाही.. शिव आणि शक्तीचे मिलन रोखणं अशक्य आहे."



दूर कुठेतरी....

"स्वामी.. देवीची यंत्रे मिळाली सुद्धा आणि त्या लोकांनी ती परत लपवली सुद्धा.." वेदांत कलीसमोर मान खाली घालून बोलत होता.

"एकेक गोष्ट हातातून निसटून जाते आहे.. आधी ती कवचकुंडले.. आणि आता ही यंत्र.. पण मी कली आहे.. या युगाचा स्वामी.. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मी या देवांवर विजय मिळवणारच.." कली गडगडाटी हसला.



देवी रक्षति रक्षितः... मागच्या वर्षी पडलेल्या एका स्वप्नातून सुचलेली कथा. पुरेसे साहित्य न मिळाल्यामुळे तशीच राहिलेली.. पण योद्धानंतर ही कथा पूर्णत्वाला गेलीच पाहिजे अश्या निश्चयाने पूर्ण केली. कथा लिहिताना अनेक पुस्तकांचा अभ्यास करावा लागला. देवीकोश, गर्भगिरीतील नाथ संप्रदाय, नाथ संप्रदायाचा इतिहास, श्री तुळजाभवानी अशी अनेक पुस्तके परत परत वाचून ही कथा पूर्ण केली. गेले सहा महिने चाललेला हा अभ्यास आज थांबला. कथा पूर्ण करुन घेणारी ती देवी.. वाचणारा वाचकवर्ग आणि लिखाणावर प्रेम करणारे माझे सहकारी.. पौराणिक कथा लिहिताना मला मदत करणारे माझे यजमान आणि माझी लेक.. यांच्या उल्लेखाशिवाय ही कथा पूर्ण होणे शक्यच नाही. परत एकदा सगळ्यांचे आभार मानून इथेच थांबते.

परत भेटू.. एका नवीन कथेसह.. एका नवीन प्रवासात.. तोपर्यंत.. लोभ आहेच.. तो वाढावा हिच इच्छा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all