देवीचे वरदान (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
देवीचे वरदान

रामाने काली मातेला प्रसन्न तर करून घेतले होते आणि ती त्याच्यासमोर उग्र रुपात अवतरली होती. उग्र रूप, दशमुखी आणि विराट हास्य जे असुरांच्या मनात भय उत्पन्न करेल असे रूप तिचे होते. रामाने तिला साष्टांग दंडवत घातला.

“रामा! माझ्याकडे बघ.” देवी म्हणाली.

“नाही माते. माझ्यात एवढी शक्ती आणि हिंमत नाही. तू तुझ्या मूळ सौम्य रुपात ये. मी तुझ्या या असुरनाशिनी रुपाकडे नाही बघू शकत.” रामा थरथरत म्हणाला.

देवीने लगेचच ते उग्र रूप सोडून आल्हादिनी रूप धारण केले. ते सौम्य आणि शांत रूप धारण केल्यावर रामा उठून उभा राहिला आणि देवीला पुन्हा नमस्कार केला.

“माते! माझा तर विश्वासच बसत नाहीये साक्षात तू मला दर्शन दिले आहेस. मी तर ऐकलं होतं तुझ्या दर्शनासाठी कित्येक वर्षे तप करावे लागते पण मला मात्र तू लगेच दर्शन दिलेस. मी धन्य झालो.” रामा म्हणाला.

“अरे रामा तू आदल्या जन्मापासून हे व्रत करत आहेस. या जन्मी हा अंतिम टप्पा होता तर तुझ्यासारख्या भक्ताला दर्शन देण्यासाठी मला यावे तर लागणार होतेच.” देवी प्रसन्न मुद्रेने म्हणाली.

“माते! पण तू आधीच तुझ्या या सौम्य रुपात का नाही आलीस? हे बघ माझे हात पाय अजून कापतायत तुझं उग्र रूप बघून.” रामा विनम्रपणे म्हणाला.

“ते रूप वाईट विचार, आचार आणि कपटी लोकांच्या मनात भय निर्माण करणारे आहे. तुला घाबरायची काहीच गरज नाही रामा.” देवी म्हणाली.

“माहित आहे माते पण काय करणार शेवटी आम्ही तुझी बालके आहोत. भीती तर वाटतेच.” रामा म्हणाला.

“बरं. सांग मला तुला काय हवे?” देवीने विचारले.

“मला काय हवे असणार? एका पंडिताला तुझ्या दर्शनाचीच ओढ असणार पण जर मला अभय मिळणार असेल तर मी एक प्रश्न विचारू का?” रामाने चाचरत विचारलं.

“विचार रामा काय विचारायचं आहे?” देवी म्हणाली.

“आम्हा सामान्य माणसांना कधी साधी सर्दी झाली तरी खूप त्रास होतो पण तुझ्या तर उग्र स्वरूपाला किती तोंड आणि नाकं आहेत. तुला किती त्रास होत असेल? तू तेव्हा कसं…” रामा म्हणाला.

त्याने देवीकडे पाहिले तर त्याला ती थोडी चिडल्यासारखी दिसली पण नंतर देवी हसू लागली. त्याबरोबर रामा हसून नाचू लागला.

“कदाचित मी पहिला व्यक्ती असेन ज्याने देवी आईला एवढं हसवलं. खरंच माते तू मूर्ती, चित्र, पुस्तकं यात जेवढी दाखवली गेली आहेस त्यापेक्षा खूपच मायाळू आणि कृपावत्सल आहेस.” रामा पुन्हा हात जोडून म्हणाला.

“रामा तुझ्यासारखा निष्कपट माणूसच असा प्रश्न विचारू शकतो. मी तर या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता.” देवी म्हणाली.

आणि तिने एका हातात दूध आणि एका हातात दही असे पात्र उत्पन्न केले.

“हे बघ रामा माझ्या एका हातात दुधाचे पात्र आहे आणि एका हातात दह्याचे. यातले एक तू निवड. ही माझी दोन वरदाने आहेत. म्हणजेच जर तू दुधाचे पात्र निवडलेस तर तुला वैभव प्राप्त होईल आणि जर दह्याचे निवडलेस तर ज्ञान प्राप्त होईल.” देवी म्हणाली आणि देवीने रामासमोर दोन्ही हात पुढे केले.

रामाने दोन्ही पात्र स्वतःच्या हातात घेतली आणि काही कळायच्या आतच दोन्ही मिसळून पट्कन ते प्यायला.

“हे काय केलंस तू रामा? तू तर एकदम चलाख निघालास. मी तुला यातलं एकच निवडायला सांगितलं होतं.” देवी थोड्या रागाने म्हणाली.

“माफ कर माते पण तूच सांग नुसतं धन आणि वैभव काय कामाचं जर ज्ञानच नसेल तर? आणि मी फक्त ज्ञान घेऊन रस्त्यावर येणार असेन, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होणार असेल तर काय करू त्या ज्ञानाचे? जर मिळाले तर दोन्ही बरोबरीने किंवा काहीच नको.” रामा नम्रपणे म्हणाला.

“ठीक आहे रामा तू खूप हुशार आहेस. मी तुला दोन्ही वरदान देते. आजपासून तू संपूर्ण वेद, पुराण, उपनिषद यांचा मोठा ज्ञानी असशील आणि आजीवन तुझ्या सोबत वैभव नांदेल. तुझ्यामुळे तेनाली गावाला एक ओळख प्राप्त होईल. फक्त एक लक्षात ठेव रामा फळ मिळवण्यासाठी झाडाच्या मुळाची काळजी घ्यावी लागते मग फळ आपोआप मिळतं.” देवी म्हणाली.

रामाने तिला नमस्कार करून धन्यवाद म्हणले आणि देवी अंतर्धान पावली. आता देवळातून निघताना रामाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. एक वेगळाच आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. रामा नेहमीप्रमाणे त्याच्या विश्रांती करायच्या जागेवर आंब्याच्या झाडाखाली आला. त्याला तिथे एक पिकलेला आंबा दिसला आणि देवीचे शब्द आठवले. “फळ हवे असेल तर झाडाच्या मुळाची काळजी घ्यावी लागते.” त्याने लगेचच एका रांजणातून झाडाला पाणी घातले आणि आंब्याच्या फांदीजवळ आला. तो पिकलेला आंबा त्याच्या हातात गळून पडला.

‘मी येतोय शारदा.’ तो स्वतःशीच म्हणाला आणि तिथून निघाला.

गावात येऊन त्याने शारदाला सोबत घेतलं आणि गावाच्या मधोमधच लाकडाचा एक ढीग करून त्या अग्नी भोवती सात फेरे घेतले. संपूर्ण गाव त्या दोघांवर फुलांच्या पाकळ्या उधळत होते तर अम्मा साश्रू नयनांनी त्या दोघांना बघत होती. फेऱ्यांचा विधी करून ते जोडीने अम्माच्या पाया पडले.
************************************
इथे विजयनगरमध्ये राजा कृष्णदेवराय यांचं दरबारात आगमन होत होतं. संपूर्ण दरबार “राजा कृष्णदेवराय यांचा विजय असो” या जयघोषाने दुमदुमला होता. राजा कृष्णदेवराय आसनस्थ झाले.

“महाराज तुमची परवानगी असेल तर आजची कार्यवाही सुरू करूया?” महामंत्री तिम्मानासू यांनी विचारलं.

“जरुर.” राजाने परवानगी दिली.

“महाराज! आपले सेनापती तुम्हाला भेटू इच्छितात.” मंत्री म्हणाले.

लगेचच सेनापतींना बोलवण्यात आलं. सेनापती खाली मान घालून शांत उभे होते.

“सेनापती तुमच्या चेहऱ्यावरून कळून येतंय आपण बाजूच्या राज्यावर आक्रमण केलं होतं तिथून पुन्हा हार पत्करून तुम्ही आला आहात.” राजा म्हणाला.

“होय महाराज. मला माफ करा. यावेळीही आपल्या सैन्याने खूप प्रयास केले पण तरीही…” सेनापती मान खाली घालूनच म्हणाला.

“पण तरीही आपण हरलो. मला एक कळत नाही महाराज हे दरवेळी कसं होतं? आपण प्रत्येकवेळी पूर्ण तयारीनिशी बिदार राज्यावर आक्रमण करतो. कृष्णा नदीच्या पलीकडे असलेलं ते राज्य मुघल सम्राज्याखली येते. आपल्याला त्या राज्यावर असलेली जुलमी मुघल राजवट संपुष्टात आणायची आहे आणि तिथल्या जनतेला आपल्याला त्या जाचातून मुक्त करायचं आहे पण दरवेळी आपण हरतो.” मंत्री म्हणाले.

“हम्म! तर जसं तुम्ही म्हणालात बिदार राज्य कृष्णा नदीच्या पलीकडे आहे. तिथे पाण्याचा प्रवाह खूप आहे. आपली सेना पूर्ण तयारीनिशी बोट, तराफ सर्व घेऊन जाते पण हरून परत येते. यावर एकच उपाय आहे. सेनापती! पुन्हा युद्धाची तयारी करा. यावेळी मात्र सगळं सैन्य नदीपार गेलं की तिथल्या तिथे सैन्याने वापरलेल्या बोटी आणि तराफे जाळून टाका.” राजाने आदेश दिले.

“माफ करा महाराज पण असं केलं तर आपल्या सैन्याकडे जीव वाचवण्याचा दुसरा पर्यायच नसेल.” सेनापती म्हणाला.

“हेच तर चुकतंय. सैन्याला एक पर्याय उपलब्ध आहे. जेव्हा पर्यायच नसेल तेव्हा नक्कीच आपला विजय होईल याची आम्हाला खात्री आहे. पर्याय उपलब्ध असल्यावर माणसाची कार्यक्षमता अर्ध्यावर येते. बोटी आणि तराफे जाळल्यावर मारा नाहीतर मरा अशी अवस्था निर्माण होईल आणि आम्हाला आपल्या सैन्यावर पूर्ण विश्वास आहे अश्या स्थितीत ते नक्कीच विजय मिळवून येतील. जा पुन्हा युद्धाची तयारी करा.” राजा कृष्णदेवराय यांनी हुकूम सोडला.

सेनापती लगेचच तिथून निघून गेले आणि तितक्यात राजपुरोहित आचार्य तथाचार्य यांचं आगमन झालं. लंगडत, अडखळत ते दरबारात आले.

“आचार्य तथाचार्य तुम्ही तर तेनाली गावात गेला होतात ना? मग या जखमा कसल्या?” राजाने विचारलं.

राजाच्या या बोलण्याने आचार्यला चिखलात पडलेला प्रसंग आठवला पण त्याच्या कपटी स्वभावानुसार त्याने खोटे सांगितले; “महाराज तुम्हाला तर माहीत आहे मी प्रभूंच्या स्मरणात किती दंग असतो. गावात चालत असताना मी जप करत होतो आणि समोर खड्डा आला ते माझ्या लक्षात आले नाही आणि मी त्यात पडलो. तरीही महाराज मी जप थांबवला नाही.”

“खरंच तुमच्या सारखे प्रभुभक्त आपल्या राज्याला लाभले आहेत ही भाग्याची गोष्ट आहे.” राजा सिंहासनावरून खाली येत म्हणाला.
*************************************
इथे तेनाली गावात शारदा आणि रामाची लग्नाची वरात निघाली होती.

“आता लग्न झालंच आहे तर जबाबदारी उचला. पुढे काय करायचं ठरवलं आहे?” शारदा रामाला म्हणाली.

“आता जायचं आपल्या राजाकडे विजयनगरला.” रामा म्हणाला.

“विजयनगर? कसं?” शारदाने आश्चर्याने विचारलं.

“आचार्य तथाचार्य कधी कामी येईल?” रामा म्हणाला.

दुसरीकडे आचार्यचे दोन शिष्य धनी आणि मणी अजूनही तेनाली गावातच होते. त्यांना पालखी सजवायला सांगण्यात आली होती तिथे रामा गेला.

“चला.” रामा पालखीच्या दिशेने पालखीत बसायला जात म्हणाला.

“कुठे? आणि का?” त्या दोघांनी विचारलं.

“अरे विजयनगरला. तुमच्या गुरूंना भेटायला.” रामा म्हणाला.

“तुमचं नाव धन आहे का? आमच्या गुरुजींना फक्त धन प्रिय आहे.” धनी म्हणाला.

“विसरलात का? तुमच्या गुरुंनीच तर मला निमंत्रण दिलं होतं.” रामा म्हणाला.

“कधी?” मणीने विचारलं.

“आठवा आठवा.” रामा म्हणाला आणि त्या दोघांना ती बाजारात घडलेली घटना आठवली.

“पण ते निमंत्रण नाही तर धमकी होती.” धनी म्हणाला.

“जर सगळ्यांनाच आचार्य तथाचार्य यांची गोष्ट कळायला लागली तर सगळेच महान नसते का झाले? पण जाऊदे तुम्हाला मला नाही ना घेऊन जायचं आहे? मी सांगतो त्यांना तुमच्या शिष्यांनी मला विजयनगरला घेऊन यायला नकार दिला. मग त्याचे परिमाण काय होतील ते तुम्हीच बघा.” रामा म्हणाला.

“काय होतील?” मणीने विचारलं.

“कदाचित ते तुम्हाला चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा देतील किंवा गरम तेलात तुमची भजी करतील किंवा मारून मारून फाटक्या कपड्यात भर रस्त्यात भीक मागायला लावतील. माझं काय? मला काही हौस नाहीये विजयनगरला यायची.” रामा म्हणाला आणि तिथून जाऊ लागला.

“थांबा थांबा. तुम्ही तर वाईट वाटून घेतलं. या या पालखीत बसा.” धनी म्हणाला.

“नाही आता माझं मन बदललं आहे. मला नाही यायचं.” रामा नाटकीपणे म्हणाला.

त्या दोघांनी मिळून त्याची समजूत घातली आणि तो तयार झाला.

“एक काम करा अजून एक पालखी तयार करा.” रामा म्हणाला.

त्या दोघांनी अजून एक पालखी तयार केली. एका पालखीत रामा आणि गुंडप्पा तर दुसऱ्या पालखीत शारदा आणि अम्मा बसून विजयनगरसाठी रवाना झाले.
**************************************
इथे आचार्य सगळ्या दरबारात प्रसाद वाटत होता. तर नगर कोतवाल राजा समोर उभा होता. महामंत्र्यांनी त्याला चांगलंच फैलावर घेतलं होतं.

“कोतवाल अजून किती दिवस त्या मल्लुदेवा चोराला पकडायला? जेव्हा संपूर्ण राज्यात चोरी होईल आणि आपल्या न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल तेव्हा तुम्ही त्या चोरांना पकडणार आहात का?” मंत्र्यांनी विचारलं.

“नाही मी….” कोतवाल बोलत होता एवढ्यात राजा बोलू लागला. “त्या चोर मल्लुदेवाला पुढच्या ४८ तासात पकडून आणा कोतवाल नाहीतर तुमच्या पदावरून तुम्हाला काढण्यात येईल.”

“हो महाराज.” कोतवाल म्हणाला आणि तिथून निघाला.

आता आचार्य राजाला प्रसाद द्यायला पुढे झाला. त्याला सतत उचकी येऊ लागल्याने तो राजाच्या हातावर नीट प्रसाद ठेवू शकत नव्हता म्हणून त्याचा हात धरून राजानेच प्रसाद घेतला.

“आचार्य बहुतेक आज कोणीतरी तुमची खूप आठवण काढतंय.” राजा म्हणाला.

“याच्या उलट देखील असू शकते महाराज.” आचार्य म्हणाला.

“उलट? म्हणजे?” राजाने गोंधळून विचारलं.

“म्हणजे मला वाटतंय कोणतं तरी मोठं संकट आपल्या दिशेने येतंय. काहीतरी विचित्र घडणार आहे.” आचार्य म्हणाला.

क्रमशः……

Credit:- Sony SAB “Tenali Rama serial”.

🎭 Series Post

View all