लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिने त्याचा हात झिडकारला. त्याच्याकडे ती साधं बघतही नव्हती. भीती, राग आणि तिरस्कार या तिन्ही भावनांनी तिचं मन झाकोळून गेलं होतं. तिचा श्वास मोठमोठ्याने सुरू होता.
त्याने पुन्हा एकदा तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला प्रेमाने आवाज दिला,
"सुखदा..."
सुखदाने अजून जोरात हात झिडकारला आणि प्रचंड तिरस्काराने ती तिथून उठली आणि बाजूला उभी राहिली.
"माझ्याजवळ यायचा प्रयत्न करायचा नाही, समजलं?"
"माझी बायको आहेस तू आता.."
हे ऐकून सुखदाला अजूनच राग आला, हा माणूस काहीही करू शकतो असं वाटल्यावर तिने जवळची सुरी हातात घेतली आणि त्याला धमकी दिली,
"मी स्वतःचं बरंवाईट करून घेईन माझ्याजवळ आलात तर.."
हे ऐकून नकुल शांत झाला, तिला समजवण्याचा सुरात म्हणाला..
"ठीक आहे, मी तुझ्या जवळही बसत नाही, इथे बाजूला खुर्चीवर बसतो, मग तर झालं?"
असं म्हणत नकुल बाजूला बसला. तो बराच वेळ काहीही बोलला नाही, सुखदाला तेही विचित्र वाटलं, तिने बडबड सुरू केली.
"का? का केलंत असं?? मी तुम्हाला लग्नाआधी स्पष्ट सांगितलं होतं की माझं एका दुसऱ्या मुलावर प्रेम आहे म्हणून..मग तरी का होकार दिलात?"
"होकार तर तुसुद्धा दिलेला की.."
"तो होकार माझ्या घरच्यांनी मला न विचारता दिलेला..मी जेव्हा अनिकेतबद्दल घरी सांगितलं तेव्हा त्यांनी विरोध केला आणि झटपट माझं लग्न उरकावं म्हणून महिन्याभरात सगळं आटोपायच्या मागे लागले, माझ्या विरोधाला अजिबात जुमानलं नाही त्यांनी..त्यांना तर मी माफ करणारच नाही..पण तुम्ही असं का केलं? का केलं??"
असं म्हणत तिने खाली बसून घेतलं जोरजोराने रडायला लागली,
नकुल तिच्याजवळ येऊ पाहत होता पण ती मागे सरकत होती..
"लग्नातून पळून जायचं होतंस की मग.."
या प्रश्नाला तिच्याकडे उत्तर नव्हतं, कारण तिने तसा प्रयत्न केलाच होता..अनिकेतचा फोन त्यादिवशी पूर्ण दिवस बंद येत होता आणि इकडे सुखदाचे लग्नविधी सुरू राहीले. कुणाचीही मदत नसल्याने सुखदा हतबल झाली आणि जे होत होतं त्यात सामील झाली.
"बोल ना..तुझा अनिकेत न्यायला आला नाही तुला?"
हे ऐकून सुखदा आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली,
"अशी बघू नकोस, तुला उत्तर हवंय ना? तुझं दुसऱ्यावर प्रेम आहे माहीत असूनही मी का नकार दिला नाही याचं??"
"हो...मला उत्तर हवंय.."
"ऐक मग.."
सुखदा कानात प्राण आणून ऐकू लागली..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा