देवता - असंही एक नातं (भाग १)
"मिहीर रात्री जास्त उशीर करू नकोस. लवकर घरी ये. नाहीतर मित्रांबरोबर असताना तुला वेळ काळाचे काही भानच राहत नाही."
"काय ग आई अजून मी माझ्या मित्रांबरोबर गेलो पण नाही तर तुझ्या लगेच सूचना सुरू झाल्या. मला माहिती आहे बाबा पण बाहेर गेले आहेत त्यामुळे तू, मी आणि प्रिया तिघंच घरी असणार आहोत. घरातला पुरुष माणूस मीच आहे. माझ्यावर तुमच्या दोघींची जबाबदारी आहे." अगदी मोठेपणाचा आव आणत मिहीर म्हणाला. इतक्यात प्रिया तिथे आली आणि म्हणाली,
"ए आई मी सुद्धा तुला चार दिवसांपूर्वीच सांगून ठेवलं होतं की मी मैत्रिणीबरोबर पिकनिकला जाणार आहे. खूप दिवसांनी आम्ही शाळेतल्या सगळ्या मैत्रिणी एकत्र येणार आहोत. संध्याकाळी मी परत येणारच आहे. पाहिजे तर तू पण तुझ्या एखाद्या मैत्रिणीला बोलावून घे म्हणजे तुला बोअर नाही होणार."
"हो ग बाई मी काही बोअर होणार नाही. मला उलट कधीतरी घरात असं एकटीलाच रहायला आवडतं. माझी कामे पण होतात." असं म्हणून मधुराने तिला पण आनंदाने परवानगी दिली होती. अशा रीतीने आज मधुरा एकटीच होती त्यामुळे तिने आज मस्त स्वच्छंदी जगायचं ठरवलं होतं. ऑफिसची घाई नव्हती त्यामुळे घड्याळाच्या काट्यावर धावायचं नव्हतं. रोजच्या धावपळीतून सुटका मिळाल्यामुळे तिने आज अगदी निवांत राहायचं ठरवलं होतं. दुपारी जेवण झाल्यावर टीव्हीवर एखादा मस्त सिनेमा पाहत पाहत ताणून द्यायची. संध्याकाळी बऱ्याच दिवसांनी सोसायटीतील नीताला भेटायचं ठरवलं होतं. तिचं जेवण होत नाही इतक्यात भर दुपारी दारावरची बेल वाजली. तिचा थोडा विरसच झाला. भर दुपारी कोण आले असं कुरकुरत तिने दार उघडलं. दार उघडल्यावर पाहिलं तर दरवाजात ऑफिसमधली तिची खास मैत्रीण नीलिमा उभी होती. मधुराने तिचं हसतमुखाने स्वागत केले आणि तिला मिठीच मारली.
"अरे वा अलभ्य लाभ! आज अचानक घरी! सहजच ना. काल बोलली पण नाहीस नाहीतर तुला सकाळीच जेवायला बोलावलं असतं ना. शहाणीच आहेस मी मुद्दाम काहीतरी विशेष करेन म्हणून आधी सांगितलं नाहीस ना."
"अग जेवणाचं काय मोठं. रोज तर तुझ्या हातचं खातेच की." असं म्हणून तिने तिच्याबरोबर आणलेल्या पिशवीतून एक सुंदर मोरपंखी रंगाची साडी, साडीला साजेशी पर्स मधुराला दिली. मधुरा आश्चर्याने तिला म्हणाली,
"नीलिमा हे सगळं काय आहे. आज माझा वाढदिवस पण नाही. वेडी आहेस का तु आणि आधी इथे सोफ्यावर बस बघू." मधुराचे हे शब्द ऐकल्यावर नीलिमा भावविवश झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मधुराने तिच्या पाठीवर थोपटल्यासारखे केले. तिचा हात हातात घेऊन ती म्हणाली,
"नीलिमा आता असं सारखं सारखं हळवं व्हायचं नाही. आता तुला मयूरला चांगलं शिकवायचं आहे. मोठं करायचे आहे. आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतच असतात. त्याला धैर्याने सामोरं गेलं की आपल्याला होणारा त्रास आपण सहन करू शकतो. तुझ्यात ते धैर्य नक्कीच आहे ग. शांत हो."
मधुराने असं म्हणताच नीलिमाच्या नजरेसमोरून तिच्यावर गुदरलेला कठीण प्रसंग आठवला आणि तिचे डोळे पुन्हा पाणावले.
क्रमशः
(नीलिमाच्या जीवनात असा कोणता प्रसंग घडला होता पाहूया पुढील भागात)
©️®️ सीमा गंगाधरे