Login

देवता _ असंही एक नातं (भाग ३ अंतिम)

एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला अडचणीच्या वेळी केलेली मदत

देवता - असंही एक नातं (भाग ३ अंतिम)

नीलिमाला असं शून्यात हरवलेलं पाहून मधुरा तिला म्हणाली,

"नीलिमा आता सगळं सुरळीत चालू आहे.  मयूर पण खूप हुशार मुलगा आहे."

"अग तू नसतीस तर मी आज जी काही आहे ती अशी दिसली असती का ग.  माझ्यासमोर किती मोठं आव्हान होतं पण तू मला त्यावेळी आधार दिलास आणि सगळं काम लीलया समजावलंस.  बाकी कोणी माझ्याशी बोलायलाही तयार नव्हतं.  तू खऱ्या अर्थाने माझी ऑफिसमधील गुरू आहेस.  मी तुला जास्त काही देऊ शकत नाही  म्हणून ही फुल ना फुलाची पाकळी माझ्यातर्फे." नीलिमा मधुराच्या पाया पडायला वाकली इतक्यात मधुराने तिला मिठी मारली आणि म्हणाली,

" तू माझ्या लहान बहिणी सारखी आहेस.  त्या वेळी तुला आधार देण माझं कर्तव्यच होतं." मधुराने असं म्हणताना तिला नीलिमाचा ऑफिस मधील पहिला दिवस आठवला. ज्या दिवशी ती ऑफिसमध्ये रुजू झाली तेव्हा साहेबांनी तिला काय काम करायचं ते सांगितलं आणि काही शंका असेल तर इतरांना विचार असे सांगितले.  तिला काही अनुभव नव्हता.  इतर सगळे आपल्या कामात व्यस्त होते.  तिने शेजारी बसलेल्या मॅडमला एक दोन वेळा कामाबद्दल विचारलं तर ती म्हणाली जरा वेळाने सांगते.  नीलिमाला खूप कानकोंडं झाल्यासारखे वाटले.  नुसतं बसून राहण्याचा कंटाळा आला होता.  इतक्यात चार पाच टेबल दूर बसलेल्या मधुराची आणि तिची नजनजर झाली.  मधुराला तिची व्याकूळ नजर पाहून दया आली.  ती तिच्या जवळ आली आणि तिला विचारले काही मदत हवीय का ?  नीलिमा तिला म्हणाली,

" साहेबांनी हे काम दिलं आहे.  मला काही कल्पना नाही.  तुम्ही एकदा समजावून सांगितलं तर मी करू शकेन".  मधुरा तिला म्हणाली,

"अग मला मधुराच म्हण.  अहो जाहो नको करुस."  मधुराने तिला सर्व नीट समजावून सांगितलं.  एंट्री कशी करायची ते सांगितलं.  एक तिने तिला करून दाखवलं.  आणि तिला सांगितलं की तुला रोज वेगवेगळे काम देतील.  मी तुला सर्व शिकवेन काळजी करू नकोस.  आज हे काम पूर्ण कर.  लंच टाईम मध्ये तिने तिला तिच्याबरोबर डबा खायला नेलं.  त्यावेळी नीलिमाला मिलींदच्या आठवणीने रडू कोसळलं.  मधुराने तिच्या पाठीवर थोपटलं . तिला धीर दिला.  तिला बोलतं केलं.  नीलिमाला कामाचा काहीच अनुभव नव्हता.  मधुराने तिला धीर दिला त्यामुळे पहिल्या दिवशी तिचा निभाव लागला.

दहा पंधरा दिवस मधुरा तिचं काम सांभाळून नीलिमाला सर्व काम शिकवत होती.  तेही अगदी मोठ्ठया बहिणीच्या मायेने.  त्यानंतर दोघी अगदी खास मैत्रिणी झाल्या.  एकमेकींची सुखदुःख डब्याबरोबर शेअर केली जात होती.  नीलिमाला घरातील आर्थिक गणित जुळवणं कठीण जातं होतं तेव्हा मधुराने तिला तीही मदत केली होती. मधुराने तिला विचारलं की मीलिंद चे सर्व ड्यूज मिळाले का?   जेव्हा मधुराला कळलं की तीचे काही पैसे अजूुन मिळायचे बाकी आहेत तेव्हा तिने पाठपुरावा करून तेही मिळवून दिले.

आज तिच नीलिमा मधुराला कृतज्ञेपोटी भेटायला आली होती.  मधुरा विनयशील होती.  तिला वाटत होतं की तिने काही विशेष केलं नव्हतं.  पण तिलाही तिचा नोकरीचा पहिला दिवस आठवत होता.  पहिल्या दिवशी बावरलेली मनस्थिती असतेच.  त्यात नीलिमाला तर नवऱ्याच्या जागी त्याच्याच ऑफिसमध्ये काम करायचं होतं.  त्यामुळे त्याच्या आठवणीने ती व्यथित झाली होती.

"मधुरा" नीलिमाच्या हाकेने मधुरा भानावर आली.  नीलिमा म्हणाली,

" मधुरा वेळेला महत्त्व असतं ग.  आता मला सर्व कामं सोपी वाटतात ती तुझ्यामुळेच.  स्वतःचे काम सांभाळून एखाद्याला शुन्यापासून शिकवणं हे मोठ्या मनाचं लक्षण आहे. बहूतेक लोकं विचार करतात की आपण पण आपलं आपणच शिकलो.  पण जेव्हा एखादी व्यक्ती अशा पार्श्वभूमीतून येते तेव्हा तिला आधाराची नितांत गरज असते.  एक तर तिला नोकरी म्हणजे नक्की काय माहीत नसतं.  तिचं भावविश्व पूर्णतया उध्वस्त झालेलं असतं.  जबाददारीचं जोखड मानेवर असतं.  मुलांचं भविष्य घडवायचं असतं.  अशावेळी तू माझ्यासाठी अगदी देवासारखी धावून आलीस."

मधुराला वाटत होतं की आपण नीलिमाच्या अडचणीच्या वेळी तीला उपयोगी पडलो हेच आपल्यासाठी समाधान आहे.  देवत्वाचा सोस तिला कधीच नव्हता. संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे, ' एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' असेच तिचे आचरण होते.