Login

देवयानी, विकास आणि किल्ली भाग १९

एका नवीनच प्रकरणाला सुरवात काय आहे सुप्रियाच्या मनात ?

     देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

भाग   १९  

भाग  १८   वरून  पुढे  वाचा ................

विकास सुप्रियाला पीक अप करण्या साठी तिच्या फ्लॅट वर पोचला तेंव्हा नऊ वाजत आले होते. त्यांनी सुप्रियाला फोन करून खालीच यायला सांगितलं. सुप्रिया जेंव्हा खाली आली तेंव्हा विकास बघतच राहिला. विकास ने असच बघत राहावं या साठी सुप्रियानी विशेषच मेहनत घेतली होती. ती आज कुठल्याही हिरॉईन पेक्षा तसू भर सुद्धा कमी सुंदर दिसत नव्हती. उगाच नाही दुपारी जवळ जवळ  पांच तास तिने ब्युटि पार्लर मधे घालवले होते. एकदम stunning beauty. विकास ला साडीच आवडते म्हणून तिने खास शिफॉन ची ऑरेंज कलर ची डिजायनर साडी खरेदी केली होती. तसंही तिच्या  गोऱ्या रंगावर ही साडी फार खुलून दिसत होती. हलकासा मेक अप आणि साडीला साजेशी  हेअर स्टाइल करून घेतली होती. उंच टाचांचे सँडल आणि चेहऱ्यावर मादक स्मित. ब्युटि पार्लर मधे मिळालेल्या सर्व टिप्स ती आज वापरत होती. काय विचार होता तिच्या मनात ? विकास तिच्याकडे मंत्रमुग्ध होऊन बघत होता आणि तिला मनोमन समाधान होत होतं. लढाई जिंकण्याकडे पहिलं पाऊल पडलं होतं.

नेहमी जीन्स आणि टॉप मधे दिसणारी लांब सडक केस कसे बसे  गुंडाळून टॉम बॉय सारखी फिरणारी सुप्रियाचं  आजचं रूप वेगळंच होतं. ती आज विकासला तर  अप्सराच भासली.

चल मी तयार आहे. सुप्रिया म्हणाली.

अं, हो चल.

कशी दिसते आहे मी ?

त्या  मोनालीसाने जर आज तुला पाहीलं तर ती फोटो फ्रेम मधून पळून जाईल.

काय विकास इतकी पण  तारीफ नको. खरं सांग ना.

अग  खरंच. तू नेहमी जीन्स मधे असतेस आणि स्वत:च्या रूपाची  कधीच काळजी घेत नाहीस, म्हणून तू सुद्धा इतकी लावण्यवती आहेस हे कधी लक्षातच आलं नाही.

सुप्रिया लाजली. एक झकास स्माइल दिलं. आणि विकासच्या मागे बाइक वर बसली. तिने लावलेल्या परफ्यूम चा मंद सुगंध विकासला जाणवला. हॉटेल मधे पोचल्यावर सुद्धा विकासला अजून एक धक्का बसला. नेहमी तडक फडक आणि रोख ठोक बोलणारी सुप्रिया, आज एकदम मृदु, मुलायम आणि मधाळ स्वरात बोलत होती. प्रत्येक गोष्ट विकासला विचारून करत होती आणि मान डोलावत होती. हे काय चाललं आहे, विकासला कळेना. तो totally confused  झाला होता.

नेहमी मेनू कार्ड आपल्या हातात घेऊन आपल्याला हवी तशी ऑर्डर देणारी, आज विकास च्या आवडीचे पदार्थ मागवत  होती. विकास विचार करत होता की हिला कसं माहीत, मला नेमकं काय आवडतं आणि काय नाही ? कदाचित देवयानीने सांगितलं असेल. असा विचार करून गप्प बसला.

जेवण करतांना विकास तिच्याकडेच बघत होता. तो तिच्यातला बदल आश्चर्याने निरखून बघत होता. पण सुप्रियानी या त्याच्या एकटक पहाण्याचा वेगळाच अर्थ घेतला. ती अजूनच खुलली आता तिच्या स्वरात एक प्रकारचा लाडिक पणा आला.

तिचं लाडिकपण बोलणं विकासला सुखावून गेलं. तो खुळ्या  सारखा तिच्या कडे टक लावून पहातच राहिला. त्याला असच खिळवून ठेवण्यासाठी सुप्रिया हर तर्‍हेचे प्रयत्न करत होती आणि यशस्वी होत होती. जेवण संपलं, आइस क्रीम पण झालं आता निघायची वेळ आली. बिल अर्थातच विकास देत होता पण सुप्रियानी त्याला देऊ नाही दिलं. ती म्हणाली

Invitation  माझं होतं आणि म्हणून बिल मी pay  करणार.

मग सुप्रियानी वेटर ला थोडं थांबायला सांगितलं आणि दोघांचा हॉटेलच्या background वर फोटो काढायला सांगितलं. आणि तो फोटो काढत असतांना सुप्रिया विकासला अशी काही बिलगली की तिला विकासनी  मिठीतच घेतलं आहे असा समज तो फोटो पहाणार्‍याचा व्हावा. पण विकासनी तिला विचारलंच

सुप्रिया हे काय ?

अरे उंच टाचांच्या सॅंडल ची सवय नाहीये न म्हणून पाय थोडा लचकला. अजून काही नाही. असं तिरप्या  नजरेने त्यांच्याकडे पहात सुप्रिया बोलली. आणि एक मधाळ स्माइल दिलं.

कुठलाही तरुण अश्या वेळी थोडा विरघळणारच, तसंच विकास पण विरघळला.

तुला मी जवळ आले म्हणून त्रास झाला का ?

न, नाही. त्रास कसला व्हायचाय  ? छानच वाटलं की.

खरं म्हणजे विकास आता भानावर आला होता. पण सुप्रियाला वाईट वाटू नये आणि संध्याकाळचा विचका होऊ नये म्हणून तो असं म्हणाला. पण देवयांनीला कळलं तर तिची काय रिएक्शन असेल याचाच विचार डोक्यात होता. आणि त्याच वेळी त्यांनी ठरवलं की देवयांनीला सगळं सांगून टाकायचं म्हणून.

आणि रात्री देवयानीचा विकासला फोन आला. ती जरा चिडलेलीच होती. तिला ऑफिस ला  जायला उशीर होत होता पण तिला सुप्रियानी फोटो पाठवला होता, त्यामुळे खूप अस्वस्थ झाली होती. आता तिला सुप्रियानी इतक्या घाई घाईने फोटो का पाठवला हे सुप्रियाच जाणे. काय होतं तिच्या मनात ?

विकासनी फोन उचलला. त्याला, शनिवार  असून सुद्धा, देवयानी इतक्या लवकर उठली याचं त्याला जरा आश्चर्यच वाटलं. मग लक्षात आलं की आज शुक्रवार आहे.

हॅलो विकास, मी तुला एक फोटो पाठवते तो पहा मग  आपण बोलू.

विकासनी whatsapp उघडून फोटो पाहीला आणि आपसूकच तोंडातून निघून गेलं की अरे वा ! मस्त आलाय की फोटो. आणि त्यानी जीभ चावली. क्षणातच केवढी मोठी घोडचूक त्याच्या हातून झाली, हे त्याच्या लक्षात आलं. पुढच्या वादळाची कल्पना येऊन,  तो काही सारवा सारव करणार होता, पण देवयानीनी त्याला वेळच दिला नाही. म्हणाली.

मस्त आहे ना फोटो ! वाटलंच होतं मला. आणि तिने फोन कट केला.

विकासला जाणवलं की आता वादळाची सुरवात झाली आहे आणि त्यामुळे आणखी  किती काळ  सर्व फोन लाइन्स बंद किंवा आउट ऑफ रेंज राहतील यांचा अंदाज लावणं अवघड असणार आहे. विकासची मती गुंग झाली. किती काळ देवयानी असहकार पुकारणार आहे याची त्याला काहीच कल्पना येत नव्हती.

तीन दिवस विकास सतत फोन करत होता. अमेरिकेत दिवस असतो म्हणून तो रात्र रात्र जागून फोन करत होता. पण देवयानी फोन उचलत नव्हती. त्याला वाटलं की नशीब चांगलं म्हणून देवयानीनी त्याचा नंबर block केला नाही. म्हणजे अजून आशा आहे. आणि म्हणून तो दिवस रात्र प्रयत्न करत राहिला. आपल्या मनाला समजावत राहिला की आज ना उद्या देवयांनीला हृदयाला पाझर फुटेल आणि ती फोन उचलेल. आणि ती फोन वर आल्यावर कसं आणि काय बोलायचं याचा विचार करत राहिला. असेच सहा सात दिवस उलटून गेले. देवयांनीला अजूनही पाझर फुटला नव्हता.

पण देवयानी सुद्धा मलूल होती. कोणाशीच बोलत नव्हती. यंत्रवत तिची सगळी कामं चालली होती. शेवटी एक दिवस संध्याकाळी सेजल तिच्या खनपटीलाच बसली. खोदून खोदून विचारत तिनी देवयानीला हैराण करून सोडलं. शेवटी देवयानी कोसळली आणि तिने रडत रडत सर्व कथा सांगितली. सेजलला सुप्रियाचा रागच आला. जिवाभावाची मैत्रीण असं कसं वागू शकते ? तिने मग देवयांनीला शांत केलं आणि सांगितलं की आता विकास चा फोन आला तर घे. अग तू त्याच्या बद्दल आज पर्यन्त जे काही सांगितलं आहेस त्यावरून तरी तो इतका उथळ नक्कीच वाटत नाहीये. तो फोटो छान आहे असं म्हणाला, मला विचारशील तर फोटो खरंच छान आला आहे. पण हे मत फोटो बद्दल आहे, सुप्रिया बद्दल नाही असा विचार का नाही करत तू ?

रात्री विकासचा फोन आलाच नाही. देवयांनीला सेजलचं बोलणं पटलं होतं आणि त्यामुळे तिला फार अपराधी असल्या सारखी जाणीव होत होती. ती सेजलला रडव्या स्वरात म्हणाली की

विकासचा फोन आलाच नाही तर काय करायचं ? मी काय करू ?

तू फोन कर. सिम्पल. भांडण तू केलस, अबोला तू धरला आहेस. आता तूच संपव सगळं.

देवयानीनी फोन लावला, बराच वेळ घंटी वाजत होती. देवयानीनी दोन तीन वेळा try केला पण नो आन्सर. देवयानी रडकुंडीला आली. तिने सेजल कडे पाहीलं.

देवयानी, गेले काही  दिवस तो दिवस रात्र तुला फोन करत होता पण तू उचलला नाहीस. आता कळलं का की नो आन्सर झालं की कसं वाटतं ते ? try करत रहा. कदाचित आज रविवार असल्यामुळे उठला नसेल. पाच दहा मिनिटांनी पुन्हा फोन लाव.

देवयानीला ते पटलं नाही पण तरीही ती थांबली आणि दहा मिनिटांनी पुन्हा फोन लावला. उत्तर नाही. देवयानी आता रडायच्या बेतात होती. इतक्यात मेसेज ची रिंग वाजली. सेजल म्हणाली अग बघ, कदाचित त्याचाच मेसेज असेल. देवयानीनी मान हलवली. नको, त्याला बोलायचं नसेल तर मी पण आता बोलणार नाही. मग सेजलनीच  तिच्या कडून फोन घेतला. मेसेज विकासचाच होता. सेजलनी तो मोठ्याने वाचला.

फोन कट करणार नाही असं प्रॉमिस करत असशील तरच मी बोलेन.

सेजलनीच प्रॉमिस असा उलट मेसेज केला. आणि देवयांनीला सांगितलं की आता कर फोन, तो उचलेल आणि मग जे काही शिल्लक असेल ते सर्व भांडून घ्या आणि मिटवा हा दुरावा. पण आधी washroom  मधे जाऊन ये. काय अवतार करून घेतला आहे स्वत:चा, तो सावर, पाणी पी आणि मग कॉल कर. देवयानीने मान हलवली, आणि फ्रेश झाल्यावर मग थोडा विचार करून विडियो कॉल लावला.  

देवयानीनी विकासला बघितलं आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. किती तरी दिवसांपासून विकासने दाढी केली नव्हती, फोन करण्याच्या नादात, अपुरी झोप आणि खाण्या पिण्या कडे लक्ष नसल्यामुळे, डोळे खोल गेले होते, तारवटले  होते. चेहरा भकास दिसत होता, उमदे पणाची  रया लुप्त झाली होती. एखाद्या मोठ्या आजारातून उठल्या सारखा, थकलेला, निस्तेज, असा विकास दिसत होता.

अग आईग, विकास, काय झालं तुला ? बरं नाहीये का ?डॉक्टरला दाखवलं का ?

अरे अशी स्वत:ची आबाळ नको करूस. नागपूरला जातोस का ? का मीच येऊ ?

अग काहीच झालेलं नाहीये मला. मी एकदम fit and fine आहे.

काही तरी बोलू नकोस. मी पाहते आहे तुला. असा विकास मी कधीच पाहीला नव्हता. काय होतेय तुला ?

देवयानीला हुंदका आवरता आला नाही. ती  रडायलाच लागली. तिचा रडण्याचा आवाज ऐकून सेजल धावत आत आली.

अग काय झालं ? का रडते आहेस तू ? सेजलनी विचारलं.

देवयानीनी काही न बोलता मोबाइल सेजलच्या हातात दिला. म्हणाली

विकास बघ, कसा दिसतोय. मला सहन होत नाहीये. तो काही सांगायला तयार नाहीये.

सेजलला सुद्धा विकासला बघून धक्काच बसला. तिला सुद्धा सुचेना की काय बोलावं ते.

काय झालाय तुला ? कसला आजार आहे ? ट्रीटमेंट चालू आहे का ? डॉक्टर काय म्हणाले ? आठ, दहा दिवसांपूर्वी तर सगळं ठीक होतं. मग आता अचानक काय झालं ? सेजलनी एका मागोमाग प्रश्नांचा वर्षावच केला.

अग मला काहीही झालेलं नाहीये. मी एकदम ठीक आहे. जरा दाढी करायची राहून गेली म्हणून तुम्हाला असं वाटतंय. अजून काही नाही.

दाढी केली नाही म्हणून, डोळे खोल जातात ? चेहरा निस्तेज होतो ? असं असेल तर सर्व सरदार लोकांना  दाढी असते, ते असे दिसतात ? उगाच काहीतरी बोलू नकोस. खरं सांग ना. मला काळजी वाटते रे. प्लीज. देवयानी काकुळतीने म्हणाली.

अग काही नाही, विटामीन D3 रोज घ्यायचं असतं पण गेले आठ दहा दिवस नाही घेतल. म्हणून असेल कदाचित. नाईलाजाने सांगावं लागतंय असा चेहरा करून विकास बोलला.

अरे, असं कसं ? गोळ्या संपल्या का ? आणल्या का नाहीस ? आणि अचानक vitamin ची कमतरता कशी झाली ?

कुठून आणू ? इथे मिळत नाहीयेत. मग ?

असं कसं होईल ? पुण्याला मिळत नाहीत हे शक्यच नाही. तू आणायला विसरला असशील.

नाही, मी रोज प्रयत्न करतो आहे पण मिळत नाहीयेत.

मग कुठे मिळतात ?

अमेरिकेत.

मग मला सांगायचं नाही का ?

अग त्यासाठीच तर तुला फोन करत होतो पण तू, कसली फुरंगटून बसली होतीस. मग काय करणार ?

Oh my god, सॉरी, सॉरी. आत्ता सांग मला, मी पाठवते इथून.

ठीक आहे घे लिहून.

सेजल  पेन आणि कागद घेऊन आली.

हं. सांग.

लिही. Vitamin D3.

अरे नाव सांग ना.

ओके. D3 म्हणजे, देवयानी 3,  देवयानी, देवयानी, देवयानी. सध्या तरी हे औषध फक्त अमेरिकेतच available आहे. आणतेस ना मग ?

देवयानी क्षणभर नुसतीच बघत राहिली, मग डोक्यात प्रकाश पडला. रडायलाच लागली. रडता रडताच म्हणाली

इतकं प्रेम करतोस माझ्यावर ! मीच वेडी, तुझ्यावर चिडले. माफ करशील ना रे मला ?

अग, अग तू रडू नकोस, नाही तर असं करूया का, मी ठेवतो आता आणि अर्ध्या तासाने फोन करतो, तो पर्यन्त तू रडून घे मनसोक्त. ओके ?

आणि देवयानी रडता रडता हसायला केंव्हा लागली ते तिचं तिलाच कळलं नाही. सेजल हळूच खोलीच्या बाहेर गेली.

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद.