Login

देवयानी, विकास आणि किल्ली भाग 20

देवयांनी आणि विकासच्या लग्नात एक नवीनच अडथळा , लॉक डाऊन जाहीर होतोय

      देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

भाग   २०

भाग  १९  वरून  पुढे  वाचा ................

देवयानी, रडता रडताच हसायला लागली आणि विकासला खूप बरं वाटलं सगळे ढग विरून गेले होते आणि आभाळ स्वच्छ झालं होतं. तो दोन मिनिटं थांबला देवयानीला शांत होऊ दिलं आणि मग म्हणाला –

देवयानी, मला म्हणालीस तू, की काय अवस्था करून घेतली आहेस म्हणून, पण तुझं काय झालं आहे हे मला दिसतंय. डोळे रडून रडून सुजलेले, चेहऱ्यावरची रया पार गेलेली, नेहमी हसतमुख आणि तरतरीत दिसणारी देवयानी, आज कोमेजून गेली आहे. सौन्दर्यवती  देवयानीच्या चेहऱ्यावर उदासीची छटा, हे काय आहे ? माझ्यावर रागवलीस  आणि स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेतलीस ? असला वेडेपणा करायची खरंच काही जरूर होती का ?

देवयानीनी मान हलवली. काही बोलण्याचं तिच्यात त्राणच नव्हतं. ती त्याच्याकडे नुसती बघतच राहिली.

अग आपण दोघंही फक्त आणि फक्त एकमेकांसाठीच जन्मलो आहोत, म्हणूनच तर इतक्या अकल्पितपणे आपली गाठ पडली आणि सगळ्या अडथळ्यांना दूर करून आपण इथ वर पोचलो आहोत. परमेश्वराने आपल्या गाठी वरच बांधल्या आहेत. प्लीज पुन्हा असा गैरसमज करून घेऊ नकोस.

नाही करणार असं. मी खरंच वाईट वागले रे तुझ्याशी. माफ करशील ना मला. ?

अग तुझ्या शिवाय माझं काही अस्तित्व आहे का ? मला खात्री होतीच की तू मला आज ना उद्या समजून घेशील म्हणून.

एवढी खात्री होती तरी, असा अवतार करून घेतलास ? जीवाला इतका त्रास करून घेतलास ?

तू समजूनच घेतलं नसतं तर, असा विचार मनात यायचा, आणि वर तू आठ दिवस माझा फोनच उचलला नाहीस, त्यामुळे फार निराश झालो होतो ग मी. पण आता तुला पाहीलं आणि सगळं विसरलो बघ. नाही नाही, काही विसरायच्या आत, त्या दिवशी काय काय घडलं ते आधी सांगतो तुला.

आणि मग त्यांनी सगळी कहाणी अगदी सुरवाती  पासून इत्थंभूत सांगितली. आणि म्हणाला –

मी पण तिला त्याच वेळेस विचारलं होतं की अशी एकदम अंगावर कशी आलीस म्हणून

मग ती काय म्हणाली ? काही तरी उत्तर असेलच तिच्या जवळ.

हो, ती म्हणाली की

“उंच टाचांची मला सवय नाहीये म्हणून उभी राहताना पाऊल तिरपं झालं. मुरगळलाच  असता पाय पण तू सांभाळलं म्हणून काही झालं नाही.”

हं ss

काय झालं ?

अरे पेन्सिल टीप च्या टाचांचे सँडल घालून गाव भर फिरते ती बऱ्याच वेळेला. सफाईदार पणे खोटं बोलली ती.  

हे मला माहीत नव्हतं. तुला मी कधीच पाहीलं नव्हतं असे सँडल वापरताना, म्हणून मला आपलं, ती बोलली ते खरंच वाटलं. म्हणून मी जास्त लक्ष दिलं नाही. पण मी काय म्हणतो, देवयानी, ती तुझी इतकी फास्ट फ्रेंड मग अशी का वागली ? म्हणजे मला जेवायला नेलं त्याबद्दल काही नाही, पण फोटो काढून लगेच तुला पाठवण्याचं काय कारण होतं ? आपल्या दोघांत बिब्बा घालायचा होता का ? आणि फोटो सुद्धा, तसा एक प्रकारे,  मला फसवूनच काढला तिने.

विकास मी काय म्हणते, हा विषय आपण थांबवू आता. तू जरा दाढी, आंघोळ करून घे. खूप दिवसांत काही पोटभर जेवलेला दिसत नाहीये, तेंव्हा काही तर ऑर्डर कर. मग आपण निवांत बोलू. तुला अश्या अवतारात पाहण्याची  माझी मुळीच इच्छा नाहीये. नेहमी सारखा स्मार्ट, कायम ताजा तवाना असणारा विकास मला दिसू दे. तो पर्यन्त मी पण छान फ्रेश होते. मग आपण बोलू. काय म्हणतोस ?

ओके.

विकास चा प्रश्नच नव्हता. रविवारच होता आणि तो घरीच होता. देवयानीचा पण प्रश्न नव्हता. शनिवारची रात्र होती. फक्त रात्री आंघोळ करून टवटवीत चेहऱ्याने विडियो कॉल करायचा  होता. इतक्या रात्री आंघोळ करावी का ? तिला प्रश्न पडला. पण सेजलनी तिला जबरदस्तीनेच बाथरूम मध्ये ढकललं.

तासा भरानंतर देवयानीनी फोन केला तेंव्हा ती वॉश घेऊन, आणि हलकासा मेकअप करून एकदम फ्रेश दिसत होती. विकास तिला पाहून खूप खुश झाला.

Now my girl is back to normal. देवयानी, तुझा असा हसरा चेहरा बघितला  आणि सगळा  शीण आणि मनस्ताप दूर पळून गेला बघ.

तुला सुद्धा आता बघतांना किती  आनंद होतो आहे म्हणून सांगू.

बोलतांना दोघांनाही वेळेचं भान राहीलं नाही. इतक्या दिवसांचं उपासाचं पारणं फिटलं. सर्व काही पहिल्या सारखं झालं. दोघांनाही जाणीव झाली की ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. मग पुन्हा पुन्हा दोघांनीही आणा भाका घेतल्या की सुप्रियाचा विषय काढून त्रास करून घेणार नाहीत आणि पुन्हा कधीच गैर समजाला  वाव देणार नाहीत म्हणून.

विकासचा एक शाळेतला मित्र होता, राजेश पटेल नावाचा, तो बंगलोर च्या एका आयटी कंपनीत होता. विकास देवयानीला सांगत होता.

तर, देवयानी हा माझा बाळपणीचा मित्र, आता अमेरिकेत आला  आहे. त्याची तिथ ट्रान्सफर झाली आहे. त्याचंही ऑफिस बहुधा तुमच्याच तिकडे आहे. तो त्याच्या फुरसतीने तुला भेटायला येईल. स्वभावाने खूप चांगला आहे. मी नंतर तुला त्याचा फोटो पाठवतो. म्हणजे ओळखायला त्रास जाणार नाही.  

ते ठीक आहे रे, पण विकास एक सांगू का, आता मला इथे कंटाळा आला आहे. अजून reliever चं काही चिन्हं दिसत नाहीये. सोडू का जॉब ? पुन्हा मिळेल की दूसरा. कदाचित इतकी सॅलरी मिळणार नाही पण आपण करू manage  तुला काय वाटतं ?

गुड आयडिया. अग इथे आल्यावर तुला नोकरी लगेच नाही मिळाली तरी काहीही बिघडणार नाही. भरपूर पगार आहे मला. माझ्या पगारात भागवू  की काही दिवस. नोकरी मिळणारच नाही असं तर होणार नाही.

ठरलं तर मग, मी उद्याच राजीनामा देते. तसंही एक महिन्यांची नोटिस द्यावी लागणार आहे. मी त्यांना request करीन की मी भारतातून work from home करते किंवा पुण्यातल्या ऑफिस मधे काम करीन म्हणून. कसं ?

बिलकुल गो अहेड. पण मला असं वाटतं की आधी तुझ्या बॉस शी बोल. जर तो काही arrangement करू शकला तर प्रश्नच मिटला.

ठीक आहे तसंच करते.

दोन दिवसांनी विकासने फोन केला

काय ग फोन नाही केलास ? काय झालं ? बोलली का ग बॉस शी ?

हो बोलली.

मग ? अग मला काहीच बोलली नाहीस ? काल पासून  वाट पाहतो आहे तुझ्या फोनची.

अरे काय बोलणार ? माझं तर डोकच फिरलं, ऐकून.

असं काय सांगितलं त्यांनी ?

बॉस ने भलतीच न्यूज दिली. आणि म्हणाला घाई करू नकोस जरा थांब.

का ग ? काय म्हणाला तो ? काही व्यवस्था करतोय का तो ?

प्रयत्न करतो म्हणाला, पण एक वेगळीच न्यूज दिली त्यांनी.

काय ?

तो म्हणाला की जग भरात कोरोंना चा उद्रेक झाला आहे आणि भारत बहुधा येत्या दोन चार दिवसांत सर्व international flights ना  भारतात उतरण्याची मनाई करणार आहे. आता या परिस्थितीत मी जर राजीनामा दिला आणि तो अॅक्सेप्ट झाला तर पंचाईत होईल. म्हणून तो म्हणाला की wait till the situation is clear. Otherwise, you, being a jobless person, will be in trouble.

हो मी पण असं ऐकलं आहे खरं. इथे पण कोरोंना  चा उद्रेक झाला आहेच. ठीक आहे वाट पाहू. नको देऊस राजीनामा. तू संकटात सापडलीस तर तिकडे परदेशात  मदतीला पण कोणीच नसेल. बरोबर आहे तुझ्या बॉस च म्हणण, थांबूनच जा. बघूया.

पुन्हा देवयानीचं रुटीन सुरू झालं. पण आता देवयानी नाइलाजाने काम करत होती.

आणि पुढच्याच आठवड्यात वर्क फ्रॉम होम सुरू झालं.

एक दिवस सेजलनी विचारलं की काय ग तो विकासचा मित्र येणार होता ना तुला भेटायला ? काय झालं त्याचं ?

काय माहीत ? विकासचा मित्र. कदाचित संकोच वाटत असेल त्याला यायला.

असेच दोन तीन दिवस गेलेत. आणि त्या शनिवारी, पूर्णिमा सकाळी सकाळी आपल्या सामानाची बांधा बांध करतांना दिसली. सहाजिकच सेजलनी विचारले –

काय ग कुठे चाललीस ? नोकरी सोडलीस की काय ?

नोकरी नाही सोडली पण मला आता इथे बोर झालय. तुमच्या सारख्या सनातनी लोकांबरोबर आता मला  कंटाळा आलाय. माझ्या आयुष्यात मला एंजॉयमेंट हवी आहे. Excitement हवी आहे. तुम्हा  दोघींना कशातच इंट्रेस्ट नाहीये. माझं तसं नाही. मला आवडतं हे सगळं. म्हणून.

अग कंटाळा आलाय ते ठीक आहे, पण जाणार कुठे आहेस ते तर सांग.

मी राजूच्या रूम वर शिफ्ट होते आहे. आम्ही दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.

अग पण त्यांचे रूम पार्टनर्स पण असतील ना.

नाही आम्ही एक दुसरं अपार्टमेंट घेतलय आणि राजू ऑलरेडी तिथे राहायला गेला आहे. आज मी जाते आहे.

आणि पूर्णिमा निघून गेली.

बराच वेळ देवयानी आणि सेजल कोणीच बोललं नाही. तिघीही मध्यम वर्गीय घरातून आल्या होत्या, पण अमेरिकेत आल्यावर पूर्णिमा नखशिखांत बदलली होती. तिला इथली लाइफ स्टाइल आणि फ्री सोसायटी याचं फार आकर्षण होतं. पण देवयानी आणि सेजल वरचे संस्कार त्यांना असं वागू देत नव्हते. म्हणून पूर्णिमाच्या मते या दोघी सनातन, बुरसटलेल्या विचारांच्या होत्या.  

त्यामुळे देवयानी आणि सेजल दोघींनाही  पूर्णिमाच हे बेताल वागणं मुळीच आवडलं नव्हतं. थोडा वेळ गेला आणि मग देवयानी म्हणालीच.

खरं आहे तिचं म्हणण आपण दोघी तश्या सनातनीच आहोत. आपल्याला आपल्या संस्कारांचे पाश नाही तोडता येत. Let her enjoy the life. It is her life and her decision. We can’t play any role in that.

True. I wish her very happy life. - sejal.

आपण आपल्या पद्धतीने जगू आणि एंजॉय करू. – देवयानी

Correct, आणि नक्कीच आनंदात जगू. – सेजल.

संध्याकाळी, एक स्मार्ट तरुण देवयानीच्या फ्लॅट वर आला.

इथे देवयानी कोण आहे ? मला त्यांना भेटायचं आहे.

मीच देवयानी. बोला.

मी राजेश पटेल. विकास चा बाल मित्र. आम्ही दोघ शाळे पासून बरोबर होतो.

हो हो, या बसा, विकास बोलला होता मला तुमच्या बद्दल. कुठे असता  तुम्ही ?

तेवढ्यात सेजल बाहेर आली.

कोण आलंय ग देवयानी ? मला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला.

ये ग. हे श्री राजेश पटेल. विकास चे मित्र. आणि ही सेजल शाह, माझी रूम पार्टनर.

राजेशने सेजलला विचारलं.

तुम्ही कुठले ? पुण्याचेच का ?

नाही आम्ही भावनगरचे. आमचं तिथे सगळंच आहे. आई, वडील, भाऊ, वहिनी सगळे.

अरे वा आम्ही पण भावनगरचेच. અમારું ગામ પણ ભાવનગર છે. અમે નાગપુરમાં રહીએ છીએ. દાદા, દાદી, કાકા બધા ભાવનગરમાં છે. અમે ભાવનગર જતા રહીએ છીએ.

आणि मग देवयानी बाजूलाच पडली. ती दोघं भावनगर मध्येच अडकून पडले. देवयानी आपली गप्पच बसली होती. मग तिनेच किचन मधे जाऊन चहा पाण्याचं बघितलं. तास भर हे लोक गप्पा मारण्यात रंगून गेले होते. मग केंव्हा तरी सेजल भानावर आली आणि तिने देवयानीला आवाज दिला.

देवयानी, अग कुठे आहेस तू ? काय करते आहेस, बाहेर ये ना.

देवयानी बाहेर आली.

मी इथेच आहे, तुम्ही दोघं गप्पांमध्ये इतके रंगून गेला होता की मी डिस्टर्ब केलं नाही.

मग थोडा वेळ बसून राजेश निघून गेला. अर्थात पुन्हा येण्याचं सेजलला कबूल करूनच.

तो गेल्यावर देवयानी बघत होती की सेजल हवेतच तरंगत होती. चेहरा एकदम खुशीने चमकत होता.

काय बोलत होता ग इतका वेळ ? कोड लॅंगवेज मधे ?

कोड लॅंगवेज ? अग गुजराती मधे बोलत होतो आम्ही.

ते समजलं, पण मला कुठे येते गुजराती. म्हणजे माझ्यासाठी ती कोड लॅंगवेज ठरत नाही का ? थांब, आता कोणी कर्नाटक मधून आलं की कानडी मधे बोलेन, मग कळेल तुला.

ए, तो तुला भेटायला आला होता, तू पळून गेलीस म्हणून मला त्याच्या बरोबर compulsory बोलावं लागलं. खरं तर तू मला थॅंक्स द्यायला पाहिजे. तुझ्या पाहुण्याला मी छान ट्रीटमेंट दिली म्हणून.

असं म्हणतेस ? compulsory बोलावं लागलं ? आता पुढच्या वेळी तो आला की त्याला सांगेन की सेजल नाईलाजाने तुझ्याशी बोलत होती म्हणून.

ए come on देवयानी, काय तू पण !

आणि मग सेजल, राजेश बद्दल भरभरून बोलत राहिली. देवयानी तिच्याकडे आश्चर्याने बघतच राहिली. एकाच भेटीत इतकं काही झालं ? आणि मग तिला realise झालं की तिला सुद्धा विकास असाच पहिल्या भेटीतच आवडला होता म्हणून. तिने मनोमन प्रार्थना केली की यांची गाडी सुरळीतपणे मार्गी लागू दे.

रात्री विकासला फोन करून काय काय घडलं ते सांगितलं. विकास म्हणाला की

देवयानी, सेजल कशी आहे हे मला माहीत नाही. पण राजेश आणि त्यांच्या घरची माणसं खूपच साधी आणि सरळ आहेत. सेजल पण साधी आहे असं तू म्हणतेस मग या दोघांचं  जमलं तर फारच छान. माझा मित्र आणि तुझी मैत्रीण. वा मजा आयेगा.

सेजल आणि राजेश ची गाडी एक्सप्रेस स्पीड ने निघाली होती आणि देवयानी समाधानाने पहात होती. तिला सेजलचं  बोलणं आठवत  होत, बिचारी निराश झाली होती लग्नाबद्दल. पण आता तिचे सुखाचे दिवस आले होते. All the best sejal असं देवयानी मनातल्या मनात म्हणाली.

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

0

🎭 Series Post

View all