देवयानी विकास आणि किल्ली.
पात्र परिचय
विकास नायक
देवयानी नायिका
सुप्रिया देवयानीची मैत्रीण
लक्ष्मी सुप्रियाची रूम पार्टनर.
राजू सुप्रियाचा मित्र
शीतोळे पोलिस इंस्पेक्टर
भय्या विकासचा मोठा भाऊ.
अश्विनी विकासची वाहिनी, भैय्याची बायको
भगवानराव विकासचे बाबा
यमुना बाई विकासची आई
गोविंदराव देवयानीचे बाबा
कावेरी बाई देवयानीची आई.
मावशी आणि काका देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर
मनीषा विकासची बहिण
अंकुश मनीषाचा नवरा.
सुरेश देवयानीचा भाऊ.
विश्राम देवयानीचा चुलत भाऊ.
विनोद विकास चा चुलत भाऊ
प्रिया विकासची चुलत बहीण.
सेजल देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.
पूर्णिमा देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.
राजेश विकासचा मित्र.
भाग २२
भाग २१ वरून पुढे वाचा ................
मधेच केंव्हातरी विकासला न्यूज पहात असतांना वंदे भारत योजनेची माहिती मिळाली. त्याने लगेच त्याच्यावर रिसर्च केला. आणि बरीच माहिती गोळा झाली. त्या योजनेनुसार देवयानीचा भारतात येण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो यांची त्याला कल्पना आली. रात्रीचे दहा वाजले होते. देवयानी नक्कीच उठली असेल असा विचार करून त्यांनी देवयानीला फोन लावला.
देवयानी सकाळच्या गडबडीत होती. वर्क फ्रॉम होम असलं तरी वेळेवर लॅपटॉप समोर बसणं आवश्यक होतं. त्या आधी सगळं आटोपून तयार होणं आवश्यक होतं.
पण तरीही तिने विकासचा कॉल घेतला.
विकास, सकाळची वेळ आहे, मी घाईत आहे. Make it short.
हो, महत्वाचं आहे, म्हणून फोन केला.
महत्वाचं आहे ? काय ?
भारत सरकार ची वंदे भारत योजना आहे. एयर इंडियाने evacuation flights चालू केल्या आहेत. जरा कामातून वेळ काढून, याच्या बद्दल माहिती मिळव. Maybe, you will be able to come back to India. बऱ्याच formalities कराव्या लागतील पण worth doing it. चल ठेवतो मी रात्री बोलू.
रात्री देवयानीनी फोन केला तेंव्हा विकास ऑफिस ला जायच्या गडबडीत होता.
देवयानी आज आमच्या vice president ची विजिट आहे त्यामुळे मला बोलायला मुळीच वेळ नाहीये. आपण मी मोकळा झाल्यावर बोलू का ?
Visit ? काल काही बोलला नाहीस ? अचानक ठरली का ?
हो, मला पण माहीत नव्हतं. त्यांना बंगलोर ला जायचं होतं पण आता ते आधी पुण्याला येणार आहेत. आणि इथूनच पुढे बंगलोर ला जाणार आहेत. आत्ता सकाळी, सकाळीच बॉस चा फोन आला. ताबडतोब ये म्हणून.
ओके.
विकासला दिवसभर वेळच झाला नाही. देवयानीशी बोलता आलं नाही म्हणून विकास सॉलिड वैतागला होता. रात्री दहा वाजता घरी आल्या आल्या कपडे सुद्धा न बदलता त्यानी फोन केला.
हॅलो, बोल आता. पण विकासचा थकलेला, मरगळलेला चेहरा देवयानीनी पाहीला आणि म्हणाली –
अरे, असा काय दिसतो आहेस? काही होतेय का तुला ? बरं वाटत नाहीये का ?
अग काही नाही, थकलो आहे आणि दिवस भर कामाचा इतका गोंधळ चालू होता, की काही विचारू नकोस. आमचे V. P. बॉस ला जबरदस्त डोस देऊन गेले. मग काय, तोच डोस बॉस ने आम्हाला पाजला. जेवायला, खायला सुद्धा फुरसत मिळाली नाही म्हणून मग पोटात काही नाहीये. एवढंच. ते जाऊ दे. मी आत्ता घेऊनच आलो आहे बरोबर. जेवीन आता निवांतपणे.
तू, सांग काय झालं ? बघितले का डिटेल्स वंदे भारत चे ? काय criteria आहे ? वेळ मिळाला का बघायला ?
नाहीरे , इतकं काम होतं काल की डीटेल मध्ये बघायला जमलंच नाही. पण जेवढं बघितलं, त्यावरून आशा पल्लवित झाली आहे. परवा शनिवारी, पूर्ण वेळ हेच काम करते.
म्हणजे शनिवारी रात्री आपण डीटेल मध्ये बोलू शकू ? सगळं आटोपलं की तू फोन कर.
हो, परवा म्हणजे शनिवारी मी सगळी माहिती गोळा करते आणि मग कसं आणि काय करायचं ते ठरवू.
चालेल. आता मला सुद्धा बरं वाटतंय. नुसतं तू परतणार म्हंटल्यांवर एकदम हुरूप आला. आता कधी एकदा तुला पाहतो असं झालय.
माझी अवस्था सुद्धा काही वेगळी नाहीये. चल. खूपच थकला आहेस तू आणि मला पण उशीर होतो आहे, तो लॅपटॉप वाट पाहतो आहे. ठेवते आता. बाय.
विकास खुश होता. चला, आता देवयानी सगळी माहिती काढेल आणि लगेच कामाला लागेल. म्हणजे लवकरच तिची आणि आपली भेट होणार. नुसत्या या कल्पनेनेच त्याचा उत्साह वाढला. चेहऱ्यावर टवटवी आली.
रविवारी, सकाळ पासूनच तो देवयानीच्या फोन ची वाट बघत होता. रविवार असून तो लवकर उठला होता. आणि आंघोळ वगैरे आटोपून, चहा पीत टेबल वर बसला होता. नाश्ता ऑर्डर केलाच होता, यायची वाट होती. पण हा देवयानीचा कॉल घ्यायला सज्ज होऊन बसला होता. साडे नऊ वाजले होते आणि आता त्यांची उत्सुकता ताणल्या जात होती. नाश्ता ही येऊन, खाऊन पण झाला, देवयानीचा फोन काही आला नाही. सगळं आटोपल्यावर देवयानी फोन करणार होती म्हणून त्यांनी फोन केला नाही. शेवटी दहा वाजता विकास ने फोन केलाच. देवयानीनी फोन उचलला पण म्हणाली की थोडा थांब. थोड्या वेळाने करते आणि फोन ठेवला.
साडे अकरा वाजता देवयानीचा फोन आला. चेहरा हसरा दिसत होता. विकासचा जीव भांड्यात पडला. देवयानीनी फोन कापल्यावर नाही, नाही ते विचार त्यांच्या डोक्यात आले होते त्याला पूर्ण विराम मिळाला. देवयानी बोलत होती.
तू म्हणालास त्या प्रमाणे मी बराच रिसर्च केला. सगळी माहिती मिळवली. मी eligible आहे कळलं. मग procedure काय आहे ते बघितलं. बरंच कन्फ्युजन होतं, पण मग काही जणांनी त्यांना आलेल्या अनुभवांचे विडियो टाकले आहेत, ते सर्व बघितले आणि मग सर्व क्लियर झालं.
मग आता, ?
मग एक फॉर्म आहे एयर सुविधा म्हणून तो भरायचा, मघाशी तुझा फोन आला तेंव्हा तेच करत होते मी.
अच्छा, मग ?
आता ते मला मेल पाठवतील मग त्या तारखेला इंटरव्ह्यु होईल.
अरे बापरे एवढी मोठी प्रक्रिया आहे ?
त्या इंटरव्ह्यु मध्ये ते माझी priority ठरवतील. मग टिकिट बूकिंग.
चलो, at least, ball has started rolling. एक बरं झालं की तू eligible आहेस हे कळलं.
हो, रे. त्यामुळे मी आज खुश आहे. दिवस भराच्या कष्टाला फळ आलं.
आता इंटरव्ह्यु केंव्हा होणार ?
ते त्यांची मेल आल्यावरच कळेल.
मी काय म्हणतो, इंटरव्ह्यु ला जायच्या अगोदर तू, RTPCR करून घे.
अरे, RTPCR ची आवश्यकता ही ट्रॅवल डेट च्या ९६ तास आधी करायची आहे. आत्ता नाही.
Aggreed. तू म्हणतेस ते बरोबर आहे. पण कसं आहे न, हा आहे सरकारी मामला. आणि वरती कोविड चालू आहे. नियम केंव्हा बदलतील हे सांगता येत नाही. तू इंटरव्ह्यु ला गेल्यावर जर ते म्हणाले की टेस्ट करून या, मग काय करशील ?
पुढची डेट मिळेल. कशाला रिस्क घेतेस ? करून घे टेस्ट.
हूं, तू म्हणतोस त्यात तथ्य आहे. सरकारी मामला आहे. करून घेईन मी टेस्ट. उद्या रविवार आहे. बघते उद्या होते का, नाही तर परवा करेन.
देवयानीनी सोमवारी टेस्ट करून घेतली. दुसऱ्या दिवशी रिजल्ट पण आला. नेगेटिव होता. रात्री तिने फोनवर विकासला सांगितलं.
रीपोर्ट नेगेटिव आला आहे.
चला एक काळजी मिटली. मेल आली का तुला ?
हो आत्ताच थोड्या वेळापूर्वी आली. पुढच्या आठवड्यात बोलावलं आहे.
ठीकच आहे. योग्य दिशेने चाललं आहे गाडं. छान. लवकर सारं निपटलं तर चांगलं होईल. आता तू कधी येते आहेस ? एक एक दिवस मोजणं चालू झालं आहे.
हो रे केंव्हा एकदा भारतात पोचते असं झालय बघ.
एकदा तुझ्या बॉस शी बोल. त्याला कल्पना दे. अंधारात ठेवू नकोस. तसा चांगला माणूस आहे न तो ?
हो, हो. त्या फ्रंट वर चिंता नाहीये.
पुढच्या आठवड्यात बुधवारी इंटरव्ह्यु पार पडला. देवयानीनी रात्री फोन लावला. पण विकासनी उचलला नाही. देवयानीनी पुन्हा थोड्या वेळाने फोन केला. तो विकास नि उचलला.
का रे उचलायला उशीर केलास ?
अग आज विजिट डे आहे. त्यामुळे मी लवकरच घरा बाहेर पडलो आहे. मी सिग्नल वर आहे, पांच मिनिटांनी मीच तुला कॉल करतो.
सिग्नल ओलांडून विकास एका झाडाखाली थांबला आणि देवयांनीला कॉल केला.
देवयानी म्हणाली की
तू घरी केंव्हा जाणार आहेस ? आत्ता तू रस्त्यात आहेस. तू घरी गेल्यावर आपण बोलूया का ?
घरी जायला रात्र होईल.
ठीक आहे न, तू आठ वाजता कॉल कर. मी उठलेली असेन त्या वेळेला.
अग काय घडलं ते शॉर्ट मध्ये सांग ना.
नको. खूप बोलायचं आहे. तू रात्रीच फोन कर. ठीक आहे ?
ओके. बाय.
रात्री नऊ वाजता विकासने कॉल केला.
हूं, बोल आता.
इंटरव्ह्यु झाला. तू म्हणालास ते बरोबर होतं. त्यांनी टेस्ट रीपोर्ट मागितला.
बघ मी म्हंटलं होतं ना, सरकारी काम आहे.
हो रे. रीपोर्ट जवळ होता. तो दाखवला. मग माझे डिटेल्स विचारले. कशासाठी भारतात जायचं आहे ते विचारलं.
मग काय कारण सांगितलं ?
जे खरं आहे तेच. माझं लग्न आहे असं सांगितलं.
मग ?
ते म्हणाले की priority list बनते तेंव्हा, medical emergency, student, diplomats, आणि ज्या कामा करता तुमचं भारतात जाणं आवश्यक असतं ते काम, अश्या प्रकारे लिस्ट बनते. मग मी म्हंटलं की माझच लग्न असल्यामुळे मी तिथे असणं आवश्यक आहे.
मग ? काय म्हणाले ते ?
म्हणाले की बरोबर आहे, तुम्ही eligible आहात, पण ही emergency नाहीये म्हणून बाकी priorities लक्षात घेतल्यावर तुमचा नंबर लागेल. मग मी विचारलं केंव्हा साधारण नंबर लागेल ? तर म्हणाले की बहुधा ऑगस्ट च्या दुसऱ्या आठवड्यात लागेल. आता ते मला allotment झालं की मेल करणार आहेत.
ऑगस्ट म्हणजे अजून दोन महीने.
हो पण इतके दिवस गेले तसे ते पण जातील.
ओके. अजून काय म्हणतेस ?
अरे, आज गंमतच झाली. ऑफिस मध्ये बॉस ला सर्व सांगितलं तर तो म्हणाला की त्याचा एक मित्र आहे त्यांनी त्यांचे वडील हॉर्ट च्या ऑपरेशन साठी अॅडमिट असल्याचं खोटच सर्टिफिकेट जोडलं होतं त्याचा लगेच नंबर लागला. तू ही असं कर म्हणजे तुला लगेच जाता येईल.
बापरे, काय सांगतेस ?
हो पण मी बॉस ला सांगितलं की जन्म भर इथे राहावं लागलं तरी चालेल पण असं खोटं सर्टिफिकेट देणार नाही.
करेक्ट आहे. अग पण तू एक करू शकतेस. मी पाठवू का असं सर्टिफिकेट ? तू सांग होणारा नवराच अॅडमिट असल्याने मला जाणं आवश्यक आहे.
विकास, आता मारीन हं तुला. का असा छळतोस मला, आधीच रडकुंडीला आली आहे मी. वर तू असं काही तरी विचित्र बोलतोस ?
ओके. ओके, नाही बोलणार, अग गंमत केली मी. नाही करणार आता.
जाऊ दे रे तुला कुठलीही गोष्ट गंभीर पणे घेताच येत नाही का ? काही तरी अभद्र बोलतोस नेहमी. जाऊ दे, इतका चांगला मूड होता, घालवलास. ठेवते मी आता मला उशीर होतो आहे. बाय.
असेच आठ दहा दिवस गेले. देवयांनीला इतकं काम होतं की त्यांचं बोलणंच झालं नाही. कामातून मोकळी झाल्यावर एक दिवस देवयानीनी रात्री फोन केला.
फोन विकासच्या आईने उचलला.
हॅलो, देवयानी मी यमुना बोलते आहे.
आई, तुम्ही ? केंव्हा आलात ? सर्व ठीक आहे ना ? विकास कुठे आहे ?
अग आम्ही इथेच आहोत नागपूरला.
मग विकास आला आहे का नागपूरला ? मला काही बोलला नाही.
तो आला आहे पण अग तो म्हणाला की तुला खूप काम आहे म्हणून तुमचं काही बोलणंच इतक्यात झालं नाही म्हणून. तू काय म्हणतेस ? कुठवर आलं तुझं मिशन इंडिया ?
चालू आहे त्यांची procedure असते. ती करणं चालू आहे. तुम्ही सगळे कसे आहात ? सर्व ठीक आहे न ? नागपूरला तर आत्ता खूप उन्हाळा असेल ना ?
हो. बाहेर खूप गरम आहे पण घरात काही जाणवत नाही. मागच्या मे मध्ये तर तू होतीसच की इथे. साखरपूडा झाला तेंव्हा, तुला माहितीच आहे.
हो. आई, जरा विकास ला देता का ?
अग विकास बाहेर गेला आहे. मित्रांच्या बरोबर. उशीर होईल घरी यायला असं सांगून गेला आहे. आणि वेंधळ्या सारखा मोबाइल घरीच विसरून गेला आहे.
लॉक डाऊन असतांना बाहेर गेला आहे ? आश्चर्य आहे. ते ही मोबाइल न घेता कसा गेला ? आई, तुम्ही लोकांनी कसं जाऊ दिलं ?
विकासची आई विचार करत होती की कसं सांगावं या पोरीला की विकास पॉजिटिव आला आहे आणि अॅडमिट व्हावं लागलं म्हणून. देवयांनीला काही सांगू नका असं सांगून गेला होता. कसं कोण जाणे पण तेवढ्यात फोन कटला आणि आईंना सुटल्या सारखं वाटलं.
क्रमश:.......
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा.
https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा