वयाची पन्नाशी गाठल्यानंतर शाळेच्या get together चं अचानक आमंत्रण आलं. मनात धाकधूक होती. सुनेने फेसबुक सुरू करून दिल्यापासून बरेच ओळखीचे चेहरे दिसत होते. काहींशी गप्पाही सुरू झालेल्या. वर्गातली कावेरी एकमेव माझ्या संपर्कात होती. मन भूतकाळात गेलं.
तेव्हा वर्गाची अवस्था म्हणजे खाली बसून शिक्षकांना बघून घाबरणं, दप्तराच्या नावाखाली एखादी पिशवी, चप्पल तर माहीतच नव्हती. आजकालच्या मुलांसारखं शाळेला दांडी मारण्यात सुख नसायचं, शेतात काही कामं निघाली की आपसूकच दांडी पडत असे. अभ्यास काय आहे, गृहपाठ दिलाय का, परीक्षा कधी आहे यात घरच्यांना काडीमात्र रस नसायचा. आपणच आपलं बघावं अन करावं एवढंच माहीत.
असं असताना काळे मास्तर म्हणून आमच्या वर्गात सर्वांचे लाडके शिक्षक होते. शिक्षण किती महत्वाचं आहे हे ते सतत सांगत असत. आमच्या लेखी काळे मास्तर म्हणजे जगातला सर्वात हुशार माणूस, कारण त्यांच्यापलीकडच्या हुशार माणसांशी आमचा संबंधच आलेला नव्हता.
"पार्वती, तुझ्या आई वडिलांना सांग..मला शिकू द्या पुढे.."
असं ते मला नेहमी म्हणत. वर्गातली हुशार मुलं शिक्षक लगेच हेरतात. मी फक्त मान डोलवायचे. घरी हे सांगायची हिम्मत नव्हती. कावेरी आणि मी शेजारी शेजारी बसायचो. आमच्या पुढे एक सावकाराचा मुलगा बसायचा - शेखर. तो आला की सर्व मुलं त्याच्या मागेपुढे करत. त्याचा मामा शहरात होता, शहरातून नवनवीन वस्तू त्याच्यासाठी आणायचा आणि ते दाखवायला आणि शायनिंग मारायला तो वर्गात यायचा. त्याचे कपडे इस्त्री केलेले लख्ख, पिवळंधमक दप्तर आणि करकरीत वह्या बघून हेवा वाटायचा. बघून फक्त नेत्र तृप्त करता यायचे, कारण तेव्हा आई वडिलांकडे असं मागायची हिम्मत कुणात होती?
शेखरकडे आत्ताच इतकं सगळं आहे, पुढे जाऊन तो तर सिनेमात असते तश्या चारचाकीत फिरेल असं कायम वाटायचं. अभ्यासातही तो बरा होता.
एके दिवशी त्याने त्याच्या मामाने दिलेली सायकल घेऊन आलेला. शहरातील आधुनिक सायकल, त्याला मागे रंगेबेरंगी छरे, हँडलचा आकार मोठा आकर्षक होता, नेहमीच्या सायकल प्रमाणे हातापाशी वाकलेली हँडल नसून सलग एक दांडी होती. सायकलवरून नजरच हटत नव्हती. घरी भावाला आणि काकाला सायकल चालवताना बघून मनात फार इच्छा व्हायची सायकल शिकण्याची, पण मी पडले मुलगी, मला सायकल तर सोडाच, विषयही काढायला भीती वाटायची. तरी एक दिवस हिम्मत करून अण्णांना विचारलं. "अण्णा, मला सायकल चालवायची आहे.." मनात भीती होती अण्णा काय म्हणतील, पण अण्णा हसले, आणि म्हणाले..चल..
जगातील सर्वात मोठं सुख मिळालं असं त्याक्षणी वाटलेलं, अण्णांनी मागे सायकल पकडून ठेवली आणि मला चालवायला दिली. जीव मुठीत घेऊन मी सायकल चालवली, त्यादिवशी मला आनंदाने रात्रभर झोप लागली नव्हती.
वर्गात एके दिवशी अचानक शेखर एका मुलीला घेऊन आला, त्याची मावसबहीण होती ती, शिकायला इथेच आलेली. इंदू नाव तिचं. दिसायला सुंदर आणि गर्भश्रीमंत. आई वडिलांना फिरस्तीची कामं असल्याने शाळेसाठी त्यांनी तिला बहिणीकडे पाठवलं होतं. पहिल्याच दिवशी तिने स्वतःचा अहंकार माझ्यापुढे सादर केला होता. माझ्या नेहमीच्या बसण्याच्या जागेवरून तिने मला उठवलं होतं. मी तशी भित्रीच होते, लगेच उठले. मनात मात्र तिच्याबद्दल राग, ईर्षा, द्वेष सगळंच दाटून आलेलं. आपण हिच्याइतके श्रीमंत का नाही? देवाने असा भेदभाव का केला असेल? असं नेहमी वाटायचं.
काळे मास्तरांनी विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तरं द्यायचे तर त्याची तिला ईर्षा वाटायची. तिला नेहमी अव्वल राहायचं होतं. माझ्याशी स्पर्धा करायला तिने सुरवात केली.
तर वर्गातले शेखर आणि इंदू अजूनही लक्षात होते. बाकीचे मित्र मैत्रिणी माझ्यासारखेच. पुढे लग्न झालं, वडिलांनी परिस्थितीमुळे शिकवलं नाही, मात्र नवऱ्याने हात पकडून शिक्षणाचा रस्ता दाखवला. डिग्री, मग उच्चशिक्षण करून नोकरी केली.
गेट टुगेदर ला जायला खरंच भीती वाटत होती. बालपणीच्या प्रवासातील ते सगळे साथी, कोण कुठे तर कोण कुठे पोचलं असेल..कुणी इंजिनिअर असेल, कुणी डॉक्टर असेल..श्रीमंत असतील सगळे...बरोबर च्या मुली अगदी टापटीप राहणाऱ्या असतील..आधीपासूनच साधं राहण्याऱ्या मला त्याचीही वेगळी भीती दाटून येत होती.
खूप विचार केला आणि शेवटी जायचं ठरवलं. आयुष्यात हे क्षण पुन्हा पुन्हा थोडीच येतात असं म्हणत मनाची तयारी केली.
ठरलेल्या दिवशी मिस्टरांनी हॉटेलमध्ये सोडलं आणि गाडीची चावी माझ्याकडे दिली, म्हणाले.
"मी दुसऱ्या एका कामासाठी चाललोय, टॅक्सीने परत येईल, तू गाडी घेऊन जा.."
मी हो म्हणाले तसं ते निघाले.
मी आपली त्यातल्या त्यात मला आवडणारी साडी नेसली होती. आत गेल्यावर सगळे चेहरे ओळखीचे असले तरी खूप बदललेले दिसले. मुलांच्या डोक्यावरची केसं उडाली होती, बायकांच्या ढेऱ्या सुटल्या होत्या. माझी अवस्था काही वेगळी नव्हती म्हणा, पण स्वतःपेक्षा दुसऱ्याचं व्यंग जास्त खुपतं. एकाच वयाचे सगळे असले तरी कुणी पन्नाशीत सत्तरीचं दिसत होतं तर कुणी चाळीशीचं..
आत गेले तसं कावेरीने जवळ बोलावून घेतलं. सगळ्यांना बघून आनंद झाला. खूप गप्पा झाल्या. तेवढ्यात एका बाईंची एन्ट्री झाली. सुटलेलं पोट, भलामोठा चेहरा आणि अंगावर अजिबात शोभत नसलेला चिकटून घातलेला ड्रेस. निरखून पाहिलं तेव्हा समजलं, इंदू होती ती.
माझी अन तिची नजरानजर झाली, इतकी वर्षे लोटली तरी मनातला इर्षेचा भाव तसाच होता. वयाचा मान ठेवत बळेबळे आम्ही एकमेकींशी हसलो. तिला बघताच मला शेखर आठवला, मी कावेरीला म्हणाले..
"हिचा मावसभाऊ, शेखर..तो नाहीं आला?"
"आलाय की, तो कोपऱ्यात बसलाय."
माझं लक्ष गेलं, अगदी शांतपणे हाताची घडी घालून बसला होता. आमच्या वेळचा सर्वात रईस माणूस आज एकदम कोमेजलेला वाटला. हळूहळू एकेकाचं मनोगत होऊ लागलं.. मी आणि अजून एक मैत्रीण सोडून सर्वजणी गृहिणी होत्या. शेखरने किराण्याचं दुकान टाकलं होतं..सर्वांचं ऐकून मला खरंच धक्का बसला. या कार्यक्रमात यायला मला खरंच लाज वाटत होती, सर्वांसमोर आपण फिके वाटू असं वाटत होतं.. पण इथे तर पूर्ण वेगळं चित्र दिसलं. मनात एक आत्मविश्वास आला, सर्वात जास्त शिक्षण माझंच झालं होतं, कदाचित सर्वाधिक पगाराची नोकरी मीच केली असावी..आणि इंदू...तिचं ऐकायला कान तरसले होते, ती शिलाईकाम करत होती.
मला आयुष्याचा एक धडा समजला,
"वेळ, माणसं आणि परिस्थिती एका योग्य वेळी एकरूप झाली की माणसाचं नशीब बदलायला वेळ लागत नाही"
तिथून परतताना सर्वजण एक समाधान घेऊन परतत होते, मी माझ्या गाडीत बसले आणि नजर शेजारी पडली, शेखर आपली ऍक्टिवाची किक मारून चालू करण्याचा प्रयत्न करत होता. दिवस भरभर डोळ्यासमोरून गेले..वर्गात नवनवीन वस्तू आणणारा, सर्वांसमोर हिरो असलेला, उंची वस्तू वापरणारा शेखर कडे बघून नेहमी वाटायचं,
"हा नक्की पुढे जाऊन चारचाकीतून फिरेल.."
तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला, तेवढ्यात त्याची दुचाकी सुरू झाली आणि तो भर्रकन निघून गेला. मीही चावी फिरवली आणि स्टीअरिंग फिरवत पार्किंगमधून बाहेर पडले.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा