धाडस भाग १
©® सौ.हेमा पाटील.
"शी, भाऊबीजेला कसली साडी घेतली आहे भावाने? आपल्या मोलकरणीला पण आपण दिवाळीला यापेक्षा चांगली साडी देतो. असली साडी घेऊन बहिणीच्या सासरी येताना तुझ्या भावाला लाज पण वाटली नाही का? ठेव ती बाजूला." असे सुनंदाताई तुसडेपणाने म्हणाल्या.
ते ऐकूनही रमाने ती साडी नेसली, आणि ती देवाला नमस्कार करायला देवघरात गेली. खरंतर लग्न झाल्यापासून सासरच्या माणसांचे सारखेच टोमणे ती ऐकून घेत होती. तिच्या भावाने तिला कसली साडी आणली याबद्दल त्यांनी नाराजी दाखवण्याचे काहीच कारण नव्हते. साडी ती नेसणार होती, पण काही माणसांना इतरांना कमीपणा दाखवून देण्यात आनंद मिळतो. बरं, नवऱ्याला काही बोलावे तर त्याची ही याला मूकसंमती होती हे तिच्या लक्षात आले होते. त्यामुळे ती शांतपणे सुनंदाताईंचे लागट बोलणे गुपचूप ऐकून घेत होती.
रमा आणि तिच्या चार बहिणी, त्यांच्या पाठीवर झालेला तिचा एकुलता एक भाऊ! घराण्याला वारस हवा यासाठी तिच्या आजीने मागे लागून मुलगा होईपर्यंत तिच्या आईबाबांना वाट पाहायला लावली होती. तिची वडील शेतकरी होते. शेतीच्या जीवावर पाच मुलांचा सांभाळ करणे त्यांच्यासाठी जिकिरीचे झाले होते; परंतु तिच्या आईने मुलांवर मात्र खूप चांगले संस्कार केले होते.
घरची गरीबी असल्यामुळे मुलींना जास्त शिक्षण घेता आले नव्हते. जसजसे स्थळ येईल तसतसे मुलींची लग्ने वडिलांनी उरकली होती. रमा सगळ्यात धाकटी मुलगी होती. तिच्या पाठीला पाठ लावून हेमंतचा जन्म झाला होता. हेमंत अभ्यासात फारसा हुशार नव्हता, त्यामुळे ग्रॅज्युएट झाल्यावर तो एका कंपनीत क्लार्क म्हणून चिकटला.
घरची शेती आणि त्याची नोकरी याच्या जीवावर त्यांचे कुटुंब कसेतरी भागवत होते. त्यात चार बहिणींचे माहेरपण, आजारी आई हे सगळे सांभाळत सण साजरा करायचा म्हणजे त्यांची तारेवरची कसरत व्हायची. परंतु फुल ना फुलाची पाकळी म्हणून तो चौघींच्या सासरी साडी आणि फराळाचे पदार्थ घेऊन जात असे.
बहिणींना त्याचे अप्रूप वाटत असे. आपला भाऊ प्रेमाने आपल्या घरी येतो याचा आनंद वाटत असे. तसाच आज रमाच्या घरी हेमंत भाऊबीज घेऊन आला होता. त्यावर तिच्या सासूबाईंनी व नणंदेने नाक डोळे मुरडले होते.
गेल्या वर्षी तिची पहिली दिवाळी होती, तेव्हा ती आणि रमेश सासुरवाडीला गेले होते.जावईबापू सासरी गेल्यावर दोन दिवस रमाच्या आई-वडिलांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे जावयाची उठबस केली. चार चांगले पदार्थ खाऊ घातले आणि दोघांना उभयता पोशाख घेतला. परत आल्यानंतर सासूबाई म्हणाल्या,
"बघू सासुरवाडीवरून काय घेऊन आला?" यावर रमेशने सांगितले,
" ती काय पिशवी तिच्या हातात आहे." रमाने कौतुकाने पिशवी सासूबाईंसमोर ठेवली आणि त्यातील कपडे बाहेर काढले. ते कपडे हातात घेऊन सासूबाईंनी खाली जमिनीवर फेकले,
"असले कपडे माझ्या मुलाला घेतले? माझा मुलगा असले कपडे अंगाला लावत पण नाही. बघू रमेश, तुझे बोट पिवळे केले का?" असे त्या रमेशकडे पाहून म्हणाल्या. त्यावर रमेशने आपला हात पुढे करून म्हटले,
"कुठले ग! अंगठी वगैरे काही घातली नाही. अंगठी घालतायत होय. एवढी त्यांची कुठली ऐपत!" हे ऐकून रमाला फार वाईट वाटले. तिचे डोळे पाण्याने भरून आले. नवऱ्याने असे उद्गार काढायला नको होते असे तिला वाटले. आपले असणारे माणूसच आपल्याला समजून घेत नाही, तर इतरांचे काय? असा विचार तिच्या मनात आला.
क्रमशः
काय होते पुढे? रमा कायमच ऐकून घेत आयुष्य कंठते की सासूला धडा शिकवते? ते पुढच्या भागात पाहू या.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा