Login

धडपड तिच्या अस्तित्वाची भाग 8

गोष्ट सामान्य गृहिणीची


"मानसी, आज एकत्र लंच करायचा?" भार्गव तिच्या डेस्कजवळ येत म्हणाला.

"सॉरी, पण तू हे सगळं राघवला सांगतेस ना? म्हणजे आपण कॉफी प्यायला जातो, तर कधी छोटीशी ट्रीट!"

"नाही रे. राघवना मी ऑफिसमधल्या गोष्टी सांगत नाही. तसा त्यांना यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. तुला माहिती आहे, आमच्यात हल्ली बरंचस अंतर पडलंय. आत्ता कुठे लग्नाला तीन वर्ष होतील. तरीही आम्ही पंधरा-वीस वर्षांपूर्वी लग्न झालेल्या जोडप्यासारखे वागतो. पण हे काही ठरवून किंवा मुद्दामहून वागलेलं नसतं. ते आपोआप होत गेलं आणि त्याला खूप साऱ्या गोष्टी कारणीभूत आहेत."

"एक विचारू?" भार्गव तिच्या जवळ बसत म्हणाला.

"हो. मला अंदाज आहे तू कशाबद्दल विचारणार आहेस! तरीही मोकळेपणाने विचार." मानसी.

"तुम्ही अजून चान्स का नाही घेतला?"

"राघवना पाच वर्ष मूल नको होतं. लग्न करताना तशी त्यांची अटच होती आणि हा माझंही वय तसं लहानच होतं, त्यामुळे मीही तयार झाले."

"सॉरी, फारच खाजगी प्रश्न विचारला मी. पण यामुळे तुम्ही एकमेकांच्या आणखी जवळ याल इतकाच माझ्या मनात होतं. नवरा -बायकोचं नातं जितकं निकोप तितकी दोघांची प्रकृती चांगली राहते म्हणतात." भार्गव.

"सॉरी काय त्यात? ठीक आहे रे. मैत्रीत इतकं चालायचंच."
भार्गव निघून गेला आणि मानसी विचारात पडली. 'किती समजूतदार आहे हा. मला असाच नवरा हवा होता. समजून घेणारा, चेष्टा -मस्करी करणार, कधी भांडण झालं तर समजूत घालून जवळ घेणारा. भार्गव किती चांगला आहे! हँडसम, स्मार्ट, काळजी घेणारा. राघवही असेच असायला हवे होते.'


पुढचे दोन दिवस भार्गव आला नाही म्हणून मानसी बैचेन झाली. न सांगता हा गेलाच कसा? मानसीने त्याला खूप फोन केले. पण त्याने एकही फोन उचलला नाही.
'हे काय होतंय आपल्याला? भार्गवची ओढ वाटते की आणखी काही? का त्याची सवय झाल्याने आपल्याला इतकं अस्वस्थ वाटतंय? आपण गुंतलो नाही ना त्याच्यात?'
-----------------------------------------

हल्ली माहेरी येण्याचं आश्लेषाचं प्रमाण वाढलं होतं. ती काहीतरी कारणाने माहेरी येते हे मनोरमा बाईंनी ओळखलं होतं. मानसीचा अपमान करून तिने चूक केली होती, हे मनोरमा बाईंना आवडलं नव्हतं. तरी सुनेसमोर आपल्या मुलीला चूक कसं ठरवणार ? म्हणून त्यांनी या प्रकारावर काहीही भाष्य केलं नव्हतं.

आश्लेषा राघवशी खोलीत तासंनतास बोलत बसायची आणि राघवही तिला काही आश्वासन देतो, हे मनोरमा बाईंच्या कानावर आलं होतं.

"राघव, हल्ली आश्लेषा तुझ्याशी इतकं काय बोलत असते?" बाई न राहवून म्हणाल्या.

"आई, अडचणी असतात काहीतरी. पण तुझ्यापर्यंत काही आलं नाही तर शांत राहा. आमचं आम्ही बघून घेऊ." राघवने मनोरमा बाईंना काही ताकासतूर लागू दिला नाही.

एक दिवस मात्र राघवने आश्लेषाला मोठी रक्कम दिल्याचे त्यांच्या कानावर आले.
"मानसी, राघवने आशूला मोठी रक्कम दिली याबद्दल मला बोलायचं तरी. परस्पर कसे व्यवहार करता तुम्ही? आम्हाला पेन्शन असूनही आमचे सगळे व्यवहार चोख असतात हं."

"आई, याबाबत मला काही माहिती नाही. मग मी तुम्हाला कसं सांगणार?"

"थांब. येऊ दे राघव. विचारून घेते त्याला."

इतक्यात राघव हजर झाला.

चहा -पाणी झाल्यावर मनोरमा बाईंनी विषय काढला.
"आई, मी आशूला काही दिलेलं नाही. तिने रक्कम मागितली होती. पण मी नकार दिला. कारण तिचा डोळा मानसीच्या पैशांवर होता. माझी बायको मिळवते जरुर. मात्र ते पैसे मी तिच्या परवानगी शिवाय मी देऊ शकत नाही, असं म्हणताच तिने फार दंगा केला.
मग मी म्हणालो, नुसतं घ्यायचं असेल तर घरी यायचं नाही. घरी यायचं असेल तर नीट वागावं लागेल." हे ऐकून मनोरमा बाईंनी डोक्याला हात लावला.

"आई, तिने मानसीला घराबाहेर काढून मोठी चूक केली. पण त्यावेळी मी काही बोललो नाही. कारण हा विषय मला वाढवायचा नव्हता."

"पण माझी बाजू घेऊन तुम्ही बोलला असता तर ताईंना कळलं असतं, चूक त्यांची होती ते." मानसी मधेच म्हणाली.

"तू जरा थांब. मी बोलतोय ना? तुझं काय मध्येच?" राघव चिडून म्हणाला.

"राघवा, सारखं चिडू नये. कधीतरी आपणही नमतं घ्यावं." मनोरमा बाई बोलल्या आणि मानसी त्यांच्याकडे पाहतच राहिली. आज पहिल्यांदाच त्यांनी तिची बाजू उचलून धरली होती.
--------------------------------------------

"मानसी, इतके फोन का करत होतीस? बिझी होतो मी. मला वाटलं काही इमार्जन्सी असेल म्हणून मी इतक्या रात्री फोन केला." भार्गव बोलत होता.

"अरे, काही नाही. दोन दिवस आला नाहीस म्हणून फोन केला होता." मानसी हळू आवाजात म्हणाली.
दोघे थोडा वेळ बोलत राहिले. फोन ठेवला तसा, भार्गवचा पुन्हा मेसेज आला. " गुड नाईट डियर."

हे पाहून मानसीला जोरात धडधडायला लागलं. तिने रिप्लाय न देता तो मेसेज डिलिट करून टाकला. उगीच राघवनी पाहिलं तर घोळ नको.

ऑफिसमध्ये 'यिअर एंडच्या 'पार्टीची जोरदार तयारी सुरू होती त्यामुळे मानसीला भार्गवशी बोलायला वेळ मिळाला नव्हता. पार्टीच्या दिवशी तो काहीतरी सरप्राईज देणार आहे, अशी दबक्या आवाजात कुजबूज सुरू होती.

"काय असेल हे सरप्राईज! मानसीला उत्सुकता होती, तितकीच धास्ती वाटत होती.

या पार्टीसाठी ऑफिसमधे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरच्या लोकांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं.
मनोरमा बाई अर्थातच येणार नव्हत्या आणि राघव येण्यासाठी उत्सुक होता. मानसी त्याला थेट नको कसं म्हणणार? म्हणून टाळायचा प्रयत्न करत होती.
-------------------------------------------

पार्टीचा दिवस उजाडला. थीम आधीच ठरली असल्याने मनोरमा बाईंची परवानगी घेऊन मानसीने बेबी पिंक कलारचा छानसा वनपीस घातला होता. ती फारच गोड दिसत होती तर राघव व्हाईट शर्ट आणि डार्क ब्ल्यू जीन्समध्ये हँडसम दिसत होता.

मानसी ऑफिसमध्ये लवकर आली तर राघव तासाभराने येणार होता.

ऑफिसच्या पार्टीची थीम आगळी वेगळी होती. भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीचे फ्युजन या थीमसाठी निवडले गेले होते. दारात सुरेख रांगोळी, तर आतल्या मोठ्या हॉलमध्ये ख्रिसमस ट्री उभारण्यात आला होता. महिलांसाठी आपल्या आवडीप्रमाणे साडी किंवा वन पीस हा ड्रेसकोड ठेवला होता.
खाण्याचे पदार्थ चायनीज, पंजाबी, इटालियन तसेच भारतीय देखील होते.
मंद सुरात इंग्लिश गाण्यांची धून ऐकू येत होती. फनी गेम्स किंवा प्रत्येकाला आपल्याला येणाऱ्या कलाही सादर करता येणार होत्या.

राघव थोडा उशीरच आला. मानसी स्टेजवर भार्गव च्या बाजूला उभी होती. दोघेही सुत्रसंचालन करत होते. मानसीला असं स्टेजवर पाहून राघवला आश्चर्याचा धक्का बसला. शांत, कमी बोलणारी आपलं मत फारसं न मांडणारी, कोणाचा राग आला तर तो मनात ठेऊन कुढत बसणारी, आलेल्या पाहुण्यांना बिचकणारी मानसी खूपच बदलली होती, आत्मविश्वासाने आज स्टेजवर उभी होती. 'ही सगळी रमाची कमाल!' तो मनातल्या मनात म्हणाला.

"ए, तुला माहिती आहे का! आजकाल भार्गव सर आणि मानसीचे रिलेशन्स फार पुढे गेले आहेत म्हणे. दोघे सारखे एकत्र असतात. एकत्र लंच, कॉफी आणि बरंच काही..ते दोघे कॉलेजमधले फ्रेंड्स आहेत आणि मानसी मॅरीड आहे बरं." मानसीच्या ऑफिसमधल्या दोन लेडीज कलीग राघवच्या पुढच्या रांगेत खुर्चीवर बसल्या होत्या.

ते ऐकून राघवच्या अंगाचा तिळपापड झाला. 'काहीही बोलतात या.' पण आजकाल मानसीच्या वागण्यात फरक पडला होता, हे तितकाच खरं होतं.
मानसी आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. तिच्या वागण्यात आत्मविश्वास आला होता. स्वतःची जरा जास्तच काळजी घेत होती. आधी दबकून वागणारी मानसी आता बरीच फ्री झाली होती. न घाबरता आपलं मत मांडत होती, मनोरमाबाई काही बोलल्या, ओरडल्या तरी हसून ती गोष्ट टाळून नेत होती.
राघव विचारात पडला. समोर काय चाललंय, याकडे त्याचं मुळीच लक्ष नव्हतं.

इतक्यात भार्गव स्टेजच्या मध्यभागी आला.
"मला वाटतं, आता आपण या सोहळ्याच्या मध्यावर आलो आहोत. मी काय सरप्राईज देणार आहे? याची उत्सुकता तुम्हा सर्वांना असेलच तर सर्वांनी कान देऊन ऐका.."

मानसीला धडधडायला लागलं. भार्गव आता काय अनाऊन्स करणार आहे, याची उत्सुकता तिलाही होती. आपल्याला भार्गवबद्दल जे वाटतं, ते त्यालाही वाटत असेल? की त्याच्या मनात आणखी काही असेल?"

"..तर लेडीज अँड जेंटलमॅन, मी लग्न करतोय!
अँड हियर इज शिवानी.."

भार्गवने गर्दीत नजर फिरवत हाक दिली. तशी नाजूकशी, उंच बांध्याची, पण दिसायला अतिशय छान अशी मुलगी स्टेजवर आली.

"ही माझी होणारी बायको आणि आपल्या ऑफिसची नवीन एम्पलोयी. शिवानीचं वय जरी कमी असलं तरी अनुभव जास्त आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीच एका साइटवरून आमची ओळख झाली. त्यांनतर आम्ही भेटलो, बोललो. तिच्या हुशारीचा अंदाज येताच आपल्या हेड बॉसना तिचा इंटरव्यू घ्यायला लावला.

अर्थात ती सिलेक्ट झाली, माझ्या मनात आणि ऑफिसमध्ये देखील. आता माझी सर्वात जवळची मैत्रीण मानसी, हिला मी अशी विनंती करतो की तिने आपल्या या नवीन ऑफिसच्या एम्प्लॉईचं स्वागत करावं आणि उद्यापासून तिला कामामध्ये मार्गदर्शन करावं." इतकं बोलून मार्ग बाजूला झाला.

मगाशी गॉसिप करणाऱ्या त्या दोन मैत्रिणींचा चेहरा पार उतरला होता. मानसीने शिवानीचं स्वागत केलं. आता राघवच्या मनावर मळभ बरंचस दूर झालं होतं.

मानसी एका कोपऱ्यात येऊन उभारली. तिच्या डोळ्यांत पाणी होतं अन् चेहऱ्यावर हसू.

क्रमशः
 

🎭 Series Post

View all