Login

धागा प्रेमाचा भाग २

प्रेम, आपुलकी, जिव्हाळा नात्याचा आधार
भाग २

"अहो कुठे जाताय? बाहेर जात असाल तर थोडे पैसे घेऊन या एटीएममधून. ओवाळणीत टाकायला ताईला.

"माझ्या भावासाठी आणि आपल्या गोल्या आणि छुटकीच्या पण
आणा पैसे काढून..." प्रेरणाने सांगितलं.

"गोल्या आणि आपली छकुली, त्यांच्यासाठी ओवाळणी. लहान आहेत ती दोघं, त्यांना कशाला हवेत पैसे वगैरे.. एखाद छोटसं खेळणं दे घेऊन दोघांना एकमेकांकडून.... खूश होतील. पैसे नको." पंकजने पटवण्याचा प्रयत्न केला.

"खेळणं नको? आपल्या छुटकीसाठी पितळेची भातुकली घ्यायचा विचार करतेय मी? भांड्याच्या दुकानात बघितली.. चार हजारांची आहे. गोल्याकडून घेईल छुटकीसाठी." प्रेरणाने सांगितलं.

"चार हजार रुपयाची, पितळेच्या भांडी... वेड लागलं की काय तुला? ती भांडी, उपयोगगी तरी येतील का? अशी किती दिवस खेळणार ती. स्टील आणि प्लास्टिकची केवढी भांडी पडलीत घरात. पुन्हा एवढी महागाची भांडी कशाला?" पंकज रागावूनच बोलला.

"माझी छूटकी मोठी होईल. तेव्हा छान वाटेल तिला. आपण तिच्या बालपणात, आयुष्यभर आठवणीत जपता येईल अशी इन्व्हेस्टमेंट समजा हवं तर. ती ही सर्वांना सांगेन. महागडी भातुकली होती माझ्याजवळ."

"पोरी काय हो, बावीस पंचवीस वर्ष राहतात आणि सासरी निघून जातात.. जेवढं देता येईल तेवढं प्रेम द्यावं मुलींना"...... प्रेरणा कणवाळूपणे बोलली.

"मला तर वाटतं, मुलीना माहेराहून हिस्सा सुद्धा मिळायला हवा. मला नाही मिळाला? आहे तरी काय म्हणा माझ्या माहेरी? पण मी माझ्या छुटकीला देणार हिस्सा."

"हो का? हिस्सा देणार तू.."

"आपलं असेल तर... देणार न आपण." पंकज हसतच बोलला.

"अहो, विसरलात की काय तुम्ही? तुमच्या ताईने, हक्क सोड पेपरवर सही नाही का केली?" मला नकोय काही म्हणून स्पष्टच सांगितलं होतं तिने."

"आता तिचा हिस्सा नाहीये या घरात. कधीच सोडलाय तिने तिचा हक्क... आता हे घर, आपलं आहे.. आपल्या मुलांचं, आपल्या हक्काचं. कुणाचा अधिकार नाहीये आता या घरावर." प्रेरणाने खोलीत चारही बाजूने नजर फिरवली.

प्रेरणा आणि पंकजच लग्न झालं आणि पहिल्याच दिवाळीत.... आई वडिलांच्या शब्दाचा मान ठेवत प्रेरणाने हक्कसोड पत्रावर सही दिली आणि घरावरचा हक्क सोडला.

"काही गरज नाहीये ह्या सगळ्याची..... मी काय, माझं घर सोडून तुमच्या घरी राहायला येणार आहे का?" ताई गंमतीने म्हणाली होती.

"बेटा, कागदोपत्री सगळं निपटलेलं बरं.... आमच्या नजरेसमोर, सगळं झालं की आम्ही मरायला मोकळे. एकुलता एक पोरगा आम्हाला. पुढे त्याचा संसार असेल, मुलबाळ असतील. तु तुझ्या घरी खूश आहेस." वडिलांनी सगळे कागदपत्र आधीच तयार करून ठेवले होते. ताईने सही केली आणि, वडिलोपार्जित शेतजमीन आणि राहत घर पंकजच्या नावावर झालं होतं." पंकजला आठवत होतं सगळं.

"हो ताईने, बिनदिक्कत, आनंदाने सही केली होती.... आठवतंय, आई म्हणाली होती आपल्याला. माझ्या लेकीला परक करू नका. माहेरी येईल तेव्हा तिचा मानपान करा!" बोलता बोलता, पंकजने प्रेरणाकडे बघितलं.

"करत नाही का मग, आपण ताईंचा मानपान.. आता दरवाजात उभं राहून त्यांना ओवाळत नाही. ओवाळायला हवंय का? राखी बांधायला आणि दिवाळीत येतात... चांगलं खाऊ पिऊ घालतो. दरवर्षी साडी घेतो अजून काय करायला हवं?" प्रेरणा थोडी चिडून बोलली.

"खरयं, ताई फक्त दिवाळीत भाऊबीजेला आणि राखी पौर्णिमेला, राखी बांधायला येते.... आई बाबा गेल्यापासून मध्येमध्ये फार येत नाही. आईबाबा होते तेव्हा उन्हाळ्यात यायची रहायला सुट्ट्यांमध्ये.... एक वर्षी आपण हॉलमध्ये कूलरच लावला नाही.. आईबाबांची रूम लहान, त्यात ताई आणि तिची दोन मुलं खाली झोपलेली. रात्री, बाबा खाली टाकलेल्या चटईला तनगडले आणि पडता पडता वाचले. ताईला खूप वाईट वाटलं होतं. तेव्हापासून ताई राहायला कधी आलीच नाही. आई बाबांच्या आजारपणात आणि बाबा दवाखान्यात ऍडमिट असताना तेवढी राहिली फक्त. नंतर नंतर आई म्हणायची सुद्धा तिला.. उन्हाळ्यात येत जा मुलांना घेऊन राहायला. उगाच आपल्यामुळे त्रास नको म्हणायची." आपणच परकं केलं माहेराला तिच्यापासून. आठवून पंकज हळवा झाला.
शुभांगी मस्के...

फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या

Subscription Plan

0

🎭 Series Post

View all