Login

धागा प्रेमाचा भाग ५ (अंतिम)

प्रेम, आपुलकी, जिव्हाळा नात्याचा आधार
भाग ५..

भाग ५

"खरयं.... चुकलं माझं.. खरंच चुकलं. " मी कधी असा विचारच केला नाही."

"त्या निमित्ताने आल्या गेल्यातली कपाटातली एक साडी कमी होते. आणि ऐनवेळी साडीचा खर्च वाचतो, असचं वाटायचं मला."

"आपल्याबाबतीत, असं झालं तर!! विचारच कधी केला नाही."

"लग्न करून सासरी गेलेल्या प्रत्येक मुलीचं माहेरपण अबाधित ठेवायलाच हवं. आणि ती जबाबदारी आईवडिलांनंतर तिच्या भावाने आणि भावजयीने स्वीकारायला हवी ."

"म्हणतात, आईवडील आहे तोवर मुलींचं माहेर" आईवडिलानंतर मुलींचं माहेर संपतं." आपण नाही संपू द्यायचं आपल्या घरातल्या लेकींच माहेर."

"आज, तुम्ही माझे डोळे उघडलेत.... ताईला आताच कॉल करा आणि उद्या राखी बांधायला तिच्या हक्काच्या माहेरी येण्याचं निमंत्रण करा" बोलताना, प्रेरणा पंकजच्या हळूच कुशीत शिरली.

दुसऱ्या सकाळी सकाळी पटापटा आवरुन, प्रेरणाने उत्साहात सगळा स्वयंपाक आवरला. श्रीखंड पुऱ्यांचा बेत केला होता. ताई आली आणि तिने पंकजला राखी बांधली. पंकजने, ओवाळणी टाकली आणि साडी पण दिली...

"साडी कशी आहे आवडली का? आवडली नसेल तर बदलून घेता येईल." पंकज म्हणाला.

"अरे पंकज, एवढी महाग साडी." साडीवरचा टॅग बघत ताईने म्हटलं.

"ताई अगं... प्रेम पैशात आणि देण्याघेण्यात मोजायच नसतं, तूच म्हणतेस ना..... या भावाच प्रेम आहे समज." म्हणत त्याने ताईला नमस्कार केला.

एकत्र सर्वांनी मिळून जेवण केली. कार्यक्रम आटोपला होता. ताई आल्या तशा राहा, म्हणत प्रेरणाने पहिल्यांदा आग्रह केला.

"अगं तुला राखी बांधायला जायचं आहे ना, उशीर होईल उगाच! तू कर तयारी, वेळ होईल तुला." ताई पण तिच्या घरी जाण्याची तयारी करत होती.

"नाही होणार उशीर.... मी रात्री, राहती जाणार आणि दोन दिवस राहणार माहेरी. " प्रेरणा पटवून देत बोलली.

"ताई येत जा हो मध्येमध्ये कधी. दिवाळी आणि राखीला तेवढ्या येता तशा लवकरच जाता ही. या वर्षी आम्ही मुळीच ऐकणार नाही तुमचं. दिवाळीत राहायलाच या चार दिवस. आणि हो उन्हाळ्यात सुट्ट्यांमध्ये मुलांना घेऊन या तुमच्या हक्काच्या माहेरी. मुलांना पण पण छान वाटेल... मामाच्या घरी." उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये येण्याबदल प्रेरणा बोलत होती.

ताई आली, पंकजला राखी बांधली आणि तिच्या ठरल्या वेळेत, ती निघून सुद्धा गेली. आज प्रेरणाच्या केवळ दोन शब्दांच्या प्रेमाच्या आग्रहाने आज ती खूप खूश झाली होती. सुखावली होती. आज खऱ्या अर्थाने, ताईला खरी प्रेमाची ओवाळणी मिळाली होती.

रक्षाबंधन..... बहीण भावांचा सण. माया, ममता, प्रेम आपुलकी, जिव्हाळा... नावाचा नाजूक धागा या नात्याचा भक्कम आधार असतो. तो कुठल्याही अपेक्षेविणा जपता यायला हवा.

नाती, निभावल्याने टिकतात. नात्यांची जपणूक दोन्ही बाजूने झाली तरच नात्यात गोडी राहते नाही तर त्या नात्याला अर्थच उरत नाही.

कधी कधी आपलं माणूस चुकतंय. आपल्या लक्षात येतं. तेव्हा आपण मुकाट्याने फक्त बघत राहण्यात अर्थ नसतो. आपल्या माणसांकडून होणारी चूक, आपल्याला सुधारता यायला हवी. मोठ्या मनाने माफ करण्यात सुख आहे तेवढंच चूक झाली मान्य करून.. चुका सुधारण्यात सुद्धा मोठेपणा आहे.
समाप्त
शुभांगी मस्के...