Login

धागे मैत्रीचे...भाग 1

Dhage maitriche


धागे मैत्रीचे... भाग 1
जलद लेखन स्पर्धा
विषय- मैत्री कशी असावी?

©®ऋतुजा वैरागडकर

मैत्री कशी असावी
समुद्रातल्या लाटेसारखी
स्वतःत सामावून घेणारी...

मैत्री कशी असावी
शिंपलातल्या मोती सारखी
नेहमी चकाकणारी...

मैत्री कशी असावी
सुकलेल्या फुलांना
बहर देणारी...

मैत्री कशी असावी
राधा आणि कृष्णासारखी
सदैव स्मरणात असणारी...

मैत्री कशी असावी
न बोलताही
सगळं समजून घेणारी...

त्या कवितेच्या ओळी डोळ्यासमोर आल्या आणि डोळ्यातल्या कडा पाणावल्या.

पाय भूतकाळात पडणारच होतं.
त्याक्षणी कानावर शब्द पडले.

"का झुरत असतेस ग? का स्वतःला इतका त्रास करून घेतेस. जा भेट एकदा त्याला. सांग त्याला तुझ्या मनात काय होतं आणि आताही ते तसंच आहे. का आणि किती दिवस? मोकळी हो ना ग. त्या दाटलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दे. कोमेजलेल्या हृदयाला त्याच्या रंगात न्हाऊ दे."

आर्वीने निमिषाच्या गळ्यात मागेहुन हात घातला, तिच्या गालाच चुंबन घेतलं.

आर्वीला स्वतःसमोर बसवलं आणि आर्वीच्या गळ्यात हात घालून निमिषा खूप रडली.


निमिषा चाळीशीतलं एक सुंदर व्यक्तिमत्त्व.
स्वतःचा मोठा बिझनेस.
आर्वी एकुलती एक अठरा वर्षाची मुलगी.
मोठा बंगला, स्वतःची कार.

बंगल्यात ह्या दोघी मायलेकी, काम करणाऱ्या कुसुम मावशी आणि रघुकाका इतके लोकं असायचे.

आर्वीच्या बोलण्याने निमिषाने तिच्या भूतकाळात डोकावलं..
तिला तिचे कॉलेजचे दिवस आठवले.

कॉलेजचा पहिला दिवस, निमिषा तयार होऊन कॉलेजला गेली. मनात थोडी धास्ती होती पण निमिषा बोल्ड होती.
काहीही मनात न ठेवणारी, बिनधास्त बोलणारी निमिषा गेट जवळ त्याला धडकली.

"सॉरी सॉरी." असं म्हणत ती समोर गेली,

"काही कॉमन सेन्स वगैरे आहे काय तुमच्याकडे? माझ्या हातातल्या पुस्तका खाली पडल्या आणि तुम्ही ते उचलण्याची तसदी देखील दाखवत नाही आहात." त्याच्या आवाजाने तिचे पाय थबकले. ती वळली आणि त्याच्याजवळ गेली.


"सॉरी म्हटलं ना."

"नुसतं सॉरी म्हणून चालणार नाही. माझे पुस्तकं उचलून द्या."


"तू मला अहो जाहो करू नकोस मी काही बहेनजी टाइप मुलगी नाहीये. यंग कॉलेज गर्ल आहे."


"ओके ओके."

दोघांनी पुस्तक उचलले आणि दोघे आपापल्या दिशेने गेले.


कॉलेजचा पहिला दिवस असल्याने सगळ्यांचं हाय, हॅलो इंट्रोडक्शन झालं. हळूहळू निमिषा कॉलेजमध्ये रुळायला लागली.

कॉलेजमध्ये तिला एक बेस्ट फ्रेंड मिळाली.
सायली नाव तिचं.

सायली आणि निमिषाची खूप छान मैत्री झाली..
दोघींची मैत्री फुलायला लागली. त्या बहरलेल्या मैत्रीत त्याने प्रवेश केला.