Login

धागे मनाचे (भाग - ३)

अनुश्री आणि सार्थकच्या प्रेमाची गोष्ट
समोर साडी नेसलेली अनुश्री त्याच्याकडे बघत गालात हसत होती.

"सार्थक, चहा घेतोयस ना." नितीनने त्याला भानावर आणलं. तसा सार्थकने चहाचा कप उचलताच, ती आपल्या जागेवर बसली. सार्थक चहाचा घोट घेत अनुश्रीकडेच पाहत होता.

"अनुश्री लहान असतानाच वडील गेले तिचे.  तेव्हापासून नोकरी करून मीच वाढवलं तिला. पहिल्यापासून हुशार असलेल्या अनुश्रीने स्कॉलरशीप मिळवून तिने बीकॉम पूर्ण केलं आणि आता बी.एस.सी. रोडला नव्या बिल्डिंगच्या काही अंतरावर असलेल्या एका झाडाखाली कामगारांच्या मुलांना शिकवते." अलका ताई म्हणाल्या

"तिथेच आमच्या सार्थकची सध्या साईट सुरू आहे." श्यामराव हसत म्हणाले

"कामगारांच्या मुलांना का शिकवतेस? बिकॉम झालय म्हटल्यावर तुला कुठल्याही शाळेत सहज नोकरी मिळाली असती?" सुधा ताईंनी शंका व्यक्त केली

"हो, कुठल्याही शाळेत मला नोकरी नक्कीच मिळाली असती. रादर मला दोन ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बोलावलेल सुद्धा, पण शाळेत विद्यार्थ्यांना शिकवायला अनेक शिक्षक असतात, तसं हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या मुलांचं नसतं. त्यांना शिकण्याची इच्छा असूनही पैशांच्या अभावामुळे शिकता येतं नाही. मी आणि माझी मैत्रिण नेहा अश्या गरजू विद्यार्थ्यांना रस्त्याच्या कडेला झाडाखाली शाळा भरवून शिकवतो. ती मुलेही आनंदाने शिकतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला समाधान मिळतं." अनुश्री बोलली, तसा सार्थक तिच्याकडे कौतुकाने पाहू लागला

"मुलांची फी कशी मॅनेज करता तुम्ही?" श्यामरावांनी विचारलं

"तसा फारसा खर्च येतं नाही, नेहाचा मित्र आहे त्याच्याकडून आम्ही पुस्तकं घेतो आणि तोही आपुलकीने आम्हाला मदत करतो. अनुश्री बोलली, तसा सार्थकने नितीनकडे पाहिलं.

"सार्थक, तुला काही प्रश्न विचारायचे असतील, तर विचार." सुधा ताई अनुश्रीकडे एकटक बघणाऱ्या सार्थकला म्हणाल्या

"अम्म.. तुमची काही हरकत नसेल, तर मी अनुश्रीशी एकांतात बोलू का?" सार्थकने एक नजर अनुश्रीकडे बघत अलका ताईंना विचारलं, तसा त्याच्या बाजूला बसलेला नितीन आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला.

"हो, बोला ना. अनु, जा. त्यांना आपलं घर दाखव." अलका ताई म्हणाल्या, तशी अनुश्री वर गेली, तिच्या मागोमाग सार्थकसुद्धा वर गेला.

****

अनुश्री सार्थकला टेरेसवर घेऊन आली. संध्याकाळ झाल्याने सूर्यास्त झालेला. सार्थकने एक नजर टेरेसवर फिरवली. एका बाजूला गुलाब, मोगरा आणि झेंडू अश्या विविध प्रकारच्या फुलझाडांच्या कुंड्या ठेवलेल्या आणि दुसऱ्या बाजूला दोन खुर्च्या अन् मध्ये एक टेबल!

अनुश्री टेरेसवर येताच गुलाबाच झाडं बघू लागली. ज्याला काही दिवसांपूर्वी कळ्या आलेल्या अन् आज त्यातल्या एका कळीच फूल झालं होतं. ते पाहून अनुश्रीची कळी फुलली, "येस्स." अनुश्री तोंडात पुटपुटली

"काही बोललीस का?" अनुश्रीने पुटपुटलेलं सार्थकला ऐकू गेल्याने त्याने विचारलं

"काही दिवसांपूर्वी ह्या झाडाला कळ्या आल्या होत्या आणि आज त्यातल्याच एका कळीच फूल झालय. कसलं भारी ना!" अनुश्रीच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता, तिला असं हसताना पाहून त्यालाही छान वाटलं.

"भारी आहे. हे फुलंही आणि तुझं हसूही!" सार्थक तिच्याकडे बघत म्हणाला, तशी ती त्याच्याकडे बघू लागली

"तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना?" साडीच्या पदराशी चाळा करत तिने विचारलं

"हो. तू त्या मुलांना असं रस्त्यावर..," सार्थक पुढे काही बोलणार तेवढ्यात,

"एक मिनिट, तुम्ही काही बोलण्याआधीच मला एक गोष्ट सांगायचीय. भविष्यात आपल लग्न झालंतरी मी माझी शाळा बंद करणार नाही. त्या मुलांची आर्थिक परिस्थिती बिकट असलीतरी त्या मुलांमध्ये शिकण्याची जिद्द आहे." नेहाने शंका व्यक्त केल्यामुळे अनुश्रीने आधीच आपली बाजू सार्थकसमोर मांडली, तसा सार्थक हसू लागला

"मी काय म्हणतोय, ते तरी ऐकून घे. मला विचारायचं होतं की, तू मुलांना रस्त्यावर का शिकवतेस? एखादी जागा का नाही बघत शाळेसारखी?" सार्थकने विचारलं

"आमचे प्रयत्न चालू आहेत, पण प्रॉब्लेम हा आहे की, मनासारखी जागा मिळत नाहीय." अनुश्री काहीशी नाराजीने म्हणाली, तसा सार्थक काहीसा विचार करू लागला.

"एक्झॅक्टली कशी जागा हवीय तुला?" सार्थक, तसे अनुश्रीने त्याला जागेबद्दलचे सगळे विचार सांगितले. अचानक तिच्या लक्षात आलं, "आपण ह्याला का सगळं सांगितलं?"

"खाली जाऊया, सगळे वाट पाहत असतील." अनुश्री खाली जाण्यासाठी वळली.

"अनुश्री, ह्या फुलझाडांना रोज पाणी कोण घालत?" सार्थकने फुलझाडांकडे बघत विचारलं

"मीच घालते आणि मला वेळ नसेल तर आई घालते" अनुश्री

"अच्छा, मग उद्यापासून काकूंनाच पाणी घालायला सांग. आपल लग्न झाल्यावर त्या झाडांना सुद्धा सवय व्हायला हवी ना." सार्थक बोलला, तसं अनुश्रीने "हो" मध्ये मान हलवली, पण नंतर त्याच्या बोलण्याचा अर्थ लक्षात येताच तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि लाजून खाली गेली.

दोघांचा होकार येताच जवळच्याच नातेवाईकांमध्ये साखरपुडा झाला.

****

"हॅलो.." अनुश्रीने तयारी करतच फोन कानाला लावला

"काय करतेय माझी होणारी बायको?" सार्थकने लाडीकपणे विचारले

"शाळेत जायची तयारी करतेय." अनुश्री म्हणाली

"यार! किती अनरोमँटिक आहेस तू. कधीतरी म्हण, तुमचा विचार करतेय." सार्थक काहीसा चिडत म्हणाला

"एवढ्या घाईच्या वेळेला मी का तुमचा विचार करू? बर. ऐकाना, मी तुम्हाला थोड्यावेळाने फोन करू का? आता खरचं घाईत आहे." अनुश्री

"बर, मी काय सांगतोय ऐक. शाळा सुटल्यावर मी तुला पिकअप करेन. आपल्याला एका ठिकाणी जायचय." सार्थक

"कुठे?" अनुश्रीने काम थांबवत विचारलं

"सरप्राईज फॉर यू." सार्थक

"सांगा ना, काय सरप्राईज आहे?" अनुश्रीने लहान मुलीप्रमाणे विचारलं

"आताच बोललो ना, सरप्राईज आहे." सार्थकने हसतच फोन ठेवला

"सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं? आता दिवसभर माझ्या डोक्यात सरप्राईजचाच विचार येतं राहणार, पण मला माहितीये ह्यांच सरप्राईज काहीतरी बेस्टच असेल." अनुश्री स्वत:शीच म्हणाली आणि शाळेत गेली.

****

"सार्थक काय सरप्राईज देणार असतील." ह्या विचाराने आज शाळेत शिकवताना सुद्धा तिचं मन लागतं नव्हतं. तिची धांदल पाहून नेहाने तिला बसायला सांगितलं आणि स्वतः ऊभी राहून मुलांना शिकवू लागली. अनुश्री झाडाच्या कठड्यावर बसून सारख घड्याळ पाहत होती. काहीवेळाने, शाळा सुटली. तशी सगळी मुले निघून गेली.

"काय ग मगाचपासून एकसारखं घड्याळात का पाहतेयस? ते घड्याळ सुद्धा कंटाळल असेल तुला. (हसत) कोणाची वाट पाहतेयस?" नेहाने विचारलं

"सार्थकची. ते येणारेत आज. काहीतरी सरप्राईज द्यायला." अनुश्री

"ओह.. हो.. सरप्राईज अँड ऑल हा! (धक्का मारत) मग येतील ना ते, किंवा तू त्यांना फोन करून कितीवेळ लागेल हे विचार." नेहाने तिला सुचवल, तसं अनुश्रीने त्याला फोन लावला.

"हो, बायको मी जस्ट ऑफीसमधून निघालोय. पंधरा मिनिटांत पोहोचतो." सार्थक अनुश्रीच काही ऐकून न घेताच बोलला आणि फोन कट केला.

अनुश्री आणि नेहा सार्थकची वाट पाहत काहीवेळ तिथेच बसल्या. नेहाला मात्र एका जागेवर बसून कंटाळा आला, तशी ती समोरच्या झाडावर फुललेल्या फुलाचा फोटो काढायला गेली. अनुश्री घड्याळ बघत असताना तिचं समोर लक्ष गेलं. कामगाराचा दोन-तीन वर्षांचा मुलगा रस्त्याच्या मधोमध टायरच्या रिंगने हसत खेळत होता. तेवढ्यात, त्याच्यामागून एक फोरव्हिलर येताना तिला दिसली. तिला काय कराव सुचलं नाही. ती फोर व्हिलर त्या मुलाजवळ येताना पाहून तिने कसलाही विचार न करता स्वतःची पर्स तिकडेच टाकली आणि त्या मुलाला वाचवायला गेली.

फुलाचा फोटो अनुश्रीला दाखवायला नेहा त्या झाडाजवळ आली, पण तिथे अनुश्री नव्हती. तसं तिचं समोर लक्ष गेलं.

"अनु..." नेहा मोठ्याने ओरडली

****

गाडी चालवत असतानाच सार्थकचा फोन वाजला. सार्थकने हसतच फोन उचलला

"बायको, तुला माझ्याशिवाय..," सार्थकचे शब्द ओठांतच विरले. फोनवरच बोलण ऐकून सार्थक स्तब्धच झाला. त्याच्या हातातून मोबाईल खाली निसटला.

क्रमशः

✍️नम्रता जांभवडेकर

(असं काय घडलं असेल ज्याचा सार्थकला एवढा धक्का बसला? वाचूया पुढील भागात)

0

🎭 Series Post

View all