Login

धाकटी सून (भाग ११)

कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत आपली स्वप्नं पूर्ण करणाऱ्या सुनेची कथा


राज्यस्तरीय करंडक कथामालिका
विषय- कौटुंबिक कथामालिका

धाकटी सून (भाग ११)


सायलीचा कॉलेजमध्ये जायचा दिवस उजाडला. सकाळचं सगळं भराभर आटोपून सायली तयार झाली. कॉलेजचा युनिफॉर्म ब्लु जीन्स आणि व्हाईट टी-शर्ट होता. सायलीने तो घातला आणि आरशात बघत होती.

"जीन्सवर या काचेच्या बांगड्या शोभतच नाहीये आणि हे मोठं मंगळसूत्र पण ऑड वाटतंय… काय करू काढू का? सासूबाई काय म्हणतील…?" सायली स्वतःच्याच विचारात होती. सायलीने मोठं मंगळसूत्र काढलं आणि छोटं नाजूक मंगळसूत्र घातलं… बांगड्या काढल्या आणि एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात एक नाजूक गोल्डन बांगडी घातली. सोन्याचे मोठे लोम्बते कानातले बदलून त्या जागी छोटेसे खड्याचे कानातले घातले आणि बारीक टिकली लावली.

"पहिलेपेक्षा हे बरंच बरं दिसतंय…" सायली आरश्यात स्वतःला न्याहाळत बोलली आणि बाहेर आली. हेमंत तिच्या आधीच ऑफिसमध्ये निघून गेला होता. राधाचा निरोप घेऊन सायली बाहेर निघाली.

"खबरदार सायली! उंबरठा ओलांडलास तर लक्षात ठेव! जहागिरदारांची सून ना ग तू! हे असले कपडे घालून बाहेर जाणार?" ललिताबाई गरजल्या.

"माफ करा सासूबाई पण हा माझ्या कॉलेजचा युनिफॉर्म आहे… मला तो घालवाच लागेल…" सायली.

"कोणत्या कॉलेजचा युनिफॉर्म असतो ग असा…? तुला असले हे बाप्यासारखे कपडे घालायला मिळावे म्हणून तू खोटं बोलतेय…थेरं नुसती! ना गळ्यात मंगळसूत्र, ना टिकली, ना बांगड्या…चाल्ले आपलं वर तोंड घेऊन…" ललिताबाई

"सासूबाई, आजकाल असतात असे गणवेश…" राधा सायलीची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत होती…

"तुला विचारलं मी? नाही ना… मग मध्ये मध्ये बोलायचं नाही…कळलं?" ललिताबाई राधावर चिडल्या.

"सासूबाई… मी खोटं बोलत नाहीये… तसं करायचं असतं तर मी बॅगमध्ये कपडे घेऊन गेले असते आणि बाहेर कुठंही… एखाद्या मैत्रिणीकडे कपडे बदलून मग कॉलेजमध्ये गेले असते… मुळात या ड्रेसमध्ये काय वाईट आहे ते सांगा आधी… गळ्यापासून पायापर्यंत सगळं झाकूनच आहे की… साडीपेक्षा जरा जास्तच झाकून आहे… आणि टिकली, बांगड्या, मंगळसूत्र म्हणाल तर मी सगळं घातलंय फक्त सगळं छोटं आणि नाजूक आहे… आणि त्याहीपेक्षा आमचं एकमेकांवर प्रेम आहे, विश्वास आहे ही गोष्ट आमचा संसार टिकवण्यासाठी जास्त महत्वाची आहे…" सायली बोलली आणि ललिताबाई निरुत्तर झाल्या… त्या तावातावाने आपल्या रूममध्ये निघून गेल्या.

सायली घरच्या बाहेर आली. समोरच्या चौकातून तिने रिक्षा केली.
"सासूबाई, मला माफ करा… तुम्हाला असं उलटून बोलयचं नव्हतं मला… पण तुम्ही त्याशिवाय माझं म्हणणं ऐकलं नसतं… मला माहितीये तुमच्या या पाषाण हृदयाच्या मागे एक मायाळू ममता लपलेली आहे… ती कधी ना कधी लवकर सर्वांसमोर नक्की येईल…" ऑटोत बसल्या बसल्या सायलीच्या डोक्यात विचारांचा पिंगा सुरू होता. सायली कॉलेजमध्ये येऊन पोहोचली.

"इथे आलं की घरचे विचार मुळीच करायचे नाहीत… बस आपण आणि आपला अभ्यास… तसही घरी जास्त अभ्यास होणार नाही… सो इथे सगळं फोकस करायचं…" सायलीने कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मनाशी पक्का निर्णय घेतला.

हळूहळू सायली कॉलेजमध्ये रुळू लागली. मुळातच तिचा गोड, लाघवी स्वभाव असल्याने तिच्या भरपूर मैत्रिणी झाल्या. शिक्षक लोकांची ती आवडती विद्यार्थिनी बनली.

बघता बघता सायलीचं पहिलं सेमिस्टर संपत आलं होतं. दिवाळीनंतर पहिल्या सेमिस्टरच्या परिक्षा होत्या. ललिताबाईंना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांना तर आयताच मोका मिळाला होता. त्यांनी गावाकडे पाठवायचा म्हणून खूप सारा फराळ दोन्ही सुनांकडून करून घेतला… त्यात दरवर्षीप्रमाणे घराची साफ सफाई तर होतीच आणि भरीसभर म्हणून की काय आपल्या मोठ्या मुलीच्या, सुषमाच्या सासरकडच्या लोकांना चांगलं आठ दिवस दिवाळीसाठी बोलावून घेतलं. सायलीची ही पहिली दिवाळी होती, या दिवाळसणात माहेरी जायला मिळेल म्हणून सायली खूप खुश होती; पण ललिताबाईंनी तिच्या स्वप्नांवर पाणी फेरलं होतं. सायलीचं मन अगदी खट्टू झालं होतं.

सायलीच्या या दुःखावर हेमंतने मात्र एक अलवार फुंकर घातली होती. पहिल्या पाडव्याला त्याने सायलीला एक टू-व्हीलर गिफ्ट केली. सायली खूप खुश झाली होती.

"कशाला हवी रे गाडी? आणि ही गाडी चालवणार का? आता तर काय गाडीच मिळलीये…! मग काय…! कॉलेजच्या नावाने घरून निघायचं आणि मस्त हुंदडायचं…" राधा सायलीच्या गाडीला औक्षण करत होती आणि ललिताबाई तिथे उभं राहून विनाकारण खोचक बोलत होत्या. बोलताना अगदी आपल्या लेकीच्या सासरकडचे सगळे लोकं तिथे आहेत याचं भानही त्या विसरल्या.

"अगं आई, सायली लग्नाआधी गाडीनेच जायची कॉलेजमध्ये… आताही जात जाईल… आणि बरं का तुला मंदिरातही नेत जाईल…" हेमंतने ललिताबाईंची गोष्ट थट्टेत घेतली.

"मुळीच नाही! मी हिच्या गाडीवर कधीच बसणार नाही… कळलं?" ललिताबाई नाक मुरडत तिथून निघून गेल्या.

दिवाळसण संपला, पाहुणेही परत घरी निघून गेले. सायलीला अभ्यासासाठी बराच वेळ मिळू लागला. सायली पुन्हा उत्साहाने अभ्यासाला लागली. गाडी आल्यामुळे तिची खूप दगदग वाचत होती.

दिवस सरत होते. ललिताबाईंच्या कुरघोडींवर विजय मिळवत सायलीचं पहिलं वर्षं संपलं होतं. सायली उत्तम गुणाने पास झाली होती. सायली पास झाली हे कळल्यावर ललिताबाईंच्या अंगाचा तिळपापड झाला होता.

ललिताबाई सायलीला हरएक प्रकारे त्रास देऊन बघत होत्या; पण सायलीही जिद्दी होती, ती सहज यातून स्वतःला सांभाळून नेत होती. आतामात्र ललिताबाईंच्या सुपीक डोक्यातून सायलीला त्रास द्यायला एक नवीन कल्पना सुचली होती.