विषय-कौटुंबिक कथामालिका
धाकटी सून (भाग १३)
रात्री हेमंतचा फोन येऊन गेला तेव्हापासून सायली अगदी स्तब्ध होऊन सोफ्यावर बसून होती. सगळ्यांना ही पाच मिनिटं पाच युगासारखी वाटत होती. राधा सायलीला हलवून हलवून काय झालं म्हणून विचारत होती, ललिताबाईही सायलीकडे बघत तिथेच उभ्या होत्या, काय करावं त्यांनाही काही सुचत नव्हतं.
"सायली, अगं बोल गं… काय झालं?" ललिताबाई
"सासूबाई… हेमंतच्या कारचा ॲक्सिडेंट झाला…." सायली एवढं वाक्य कसंबसं बोलली आणि रडायला लागली.
"काय! कसा काय झाला ॲक्सिडेंट? कुठे झाला? फोनवर कोण बोललं?" राधाही रडत रडत सायलीला विचारत होती. ही बातमी ऐकून ललिताबाईंचं अवसानच गळलं होतं. त्यांना एकदम चक्कर आली आणि त्या खाली बसल्या. सायलीचं लक्ष त्यांच्याकडे गेलं, तिने ललिताबाईंना तिथून उठवून आधार देत सोफ्यावर बसवलं आणि त्यांना पाणी आणून दिलं. राधाचं रडणं सुरूच होतं.
"सासूबाई… राधाताई… हेमंतच्या फोनवरून एका इसमाचा फोन आला होता… आपल्या शहरापासून काही अंतरावरच कारचा ट्रकसोबत अपघात झालाय असं त्याने सांगितलं… इथल्या सिटी हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन येत आहेत… आपल्याला पण तिथेच पोहोचायला सांगितलं आहे… आजूबाजूला खूप लोकांचे आवाज येत होते, पोलिसांच्या गाडीच्या, अँबुलन्सच्या सायरनचा आवाज येत होता… आपल्याला लवकर तिथे पोहोचावे लागेल…" सायली घाबरत, रडत बोलत होती… एकदम अंगात वीज संचारल्या सारखी ती धावतच तिच्या रूममध्ये गेली. राधा आणि ललिताबाई तिच्या मागेच गेल्या. तिच्याजवळ होती तेवढी कॅश, ए.टी.एम कार्ड, क्रेडिट कार्ड तिने पर्समध्ये टाकले… राधानेही तिच्याजवळची थोडीफार शिल्लक सायलीला आणून दिली.
"सायली, मी येते सोबत…" राधा डोळे पुसत म्हणाली.
"ताई, तुम्ही घरीच थांबा… रात्रीची मुलं उठली आणि तुम्ही दिसल्या नाहीत तर रडतील…" गाडीची चावी घेत सायली बोलत होती. तिने अपेक्षेने ललिताबाईंकडे पाहिलं.
"राधा, तू थांब हो घरी… आम्ही दोघी जाऊन येतो… काळजी करू नको सगळं व्यवस्थित असेल…" ललिताबाई कधी नव्हे ते मवाळ बोलल्या. दोघी सासू-सुना बाहेर आल्या. सायलीने गाडी काढली.
"अग, रिक्षा करून जाऊ ना… गाडीवर कशाला?" ललिताबाई
"एवढ्या रात्रीची रिक्षा कुठे शोधत बसणार? त्यापेक्षा गाडीवर जाऊ… लवकर पोहोचू." सायली बोलली आणि सायलीच्या गाडीवर कधीही न बसण्याची शपथ घेतलेल्या ललिताबाई लेकाच्या काळजीने पटकन गाडीवर बसल्या. दोघीजणी दवाखान्यात पोहोचल्या आणि धावतच अपघात विभागात गेल्या. बाहेरच पोलिसही उभे होते. आतमध्ये डॉक्टरांनी तोपर्यंत ट्रीटमेंट सुरू केली होती. हेमंत आणि वसंत दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत स्ट्रेचरवर निपचित पडले होते. एरव्ही कधी दवाखान्याची पायरी न चढलेल्या ललिताबाई हे सगळं बघून अगदीच भांबावून गेल्या. सायली पण तिथेच उभी होती. डॉक्टर नर्सला पुढच्या सूचना देऊन त्या दोघींजवळ आले.
"डॉक्टर, मी सायली… हेमंतची बायको… हे दोघे भाऊ आहेत…" सायली डॉक्टरांसोबत बोलू लागली.
"मी डॉ. निषाद, सरळ मुद्द्याचंच बोलू आपण… दोघांनाही गंभीर इजा झाली आहे… मि. वसंत यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे… तुम्ही येण्याआधी आम्ही सी.टी. स्कॅन करून घेतला…डोक्यात खूप रक्तस्त्राव झालेला आहे… त्यामुळे लगेच ऑपरेशन करावं लागेल… सध्या ते कोमात गेले आहेत, ऑपरेशन नंतरही कोमातून कधी बाहेर येतील हे सांगणे अवघड आहे… आणि मि. हेमंत यांच्या दोन्ही पायाचे आणि कंबरेचे हाडं तुटले आहेत… एका ऑपरेशनमध्ये सगळे हाडं जोडता येणार नाहीत… दोन- तीन ऑपरेशन करावी लागतील… सध्या मि. वसंत यांचे ऑपरेशन इमर्जन्सी मध्ये करावे लागणार आहे… हेमंतचे ऑपरेशन उद्या सकाळी ठेवू…"हॉस्पिटलचा खर्च वगैरे बाबत डॉक्टर बोलत होते… सायली लक्ष देऊन ऐकत होती… ललिताबाई मात्र अगदी सुन्न झाल्या होत्या.
सायलीने अगदी थोडे पैसे बाजूला ठेवून आणलेले सर्व पैसे दवाखान्यात भरले आणि वसंताला ताबडतोब ऑपरेशनसाठी हलवण्यात आलं. हेमंतला इंटेनसिव्ही केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. पोलिसांसोबत बोलण्यापासून अगदी इमर्जन्सी ऑपरेशन करायच्या कागदांवर सह्या करण्यापर्यंत सायली अगदी धीटपणे आल्या प्रसंगाला तोंड देत होती. ललिताबाईंना सायलीच्या या धीटपणाचं, निर्णय क्षमतेचं कौतुक वाटत होतं.
थोडंफार सगळं शांत झाल्यावर सायलीने आपल्या मैत्रिणीला फोन लावला आणि राधाला सोबत म्हणून घरी जायला लावलं. नंतर राधाला फोन करून सायलीने अगदी शांतपणे सगळं सांगितलं… राधापेक्षा मोठी होऊन तिने राधाला खूप समजावलं…
इतक्यावेळ आपण खूप कडक स्वभावाच्या म्हणून ललिताबाईंनी मनाला खूप आवर घातला होता; पण त्यांचा अश्रूंचा बांध फुटलाच… सायलीच्या गळ्यात पडून त्या अगदी लहान बाळासारखं हमसून हमसून रडल्या. सायलीने मायेने त्यांना समजावलं…आज त्यांना सुनेत त्यांची आई दिसत होती.
सायलीची मैत्रीण घरी पोहोचल्यामुळे राधाला खूप मोठा आधार वाटला होता. त्या मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणींना सांगितलं… आणि त्यामुळे एवढ्या रात्री एकजण आपल्या वडिलांना घेऊन तर एकजण आपल्या भावाला सोबत घेऊन दवाखान्यात पोहोचली. सायलीच्या मदतीला असे लोकं धावून आलेलं बघून ललिताबाईंनाही थोडा धीर आला. टेन्शनमध्येच सकाळ कधी झाली ते कळलं नाही. सकाळीच सायलीची अजून एक मैत्रीण चहा आणि नाश्ता घेऊन दवाखान्यात हजर झाली.
"सासूबाई, चहा घेऊन घ्या… मला माहितीये तुम्ही अंघोळ झाल्याशिवाय काही खात-पित नाहीत; पण आता नियमांपेक्षा आपण आपल्या तब्येती सांभाळणं जास्त महत्वाचं आहे…" सायलीने ललिताबाईंसमोर चहाचा कप धरला. त्यांनीही निमुटपणे चहा घेतला. चहा घेतल्यावर त्यांना थोडी तरतरी जाणवली.
"सासूबाई, मी थोडं घरी जाऊन येते तोपर्यंत माझी ही मैत्रीण इथे तुमच्यासोबत आहे." सायली ललिताबाईंना बोलून निघाली. एरवी छोट्या छोट्या गोष्टींवरून टोकणाऱ्या ललिताबाईंनी सायलीला एकही प्रश्न विचारला नाही. सायली घरी गेली आणि तासाभरात परत आली. सायलीसोबत राधाही आली होती. वेटिंगरूमध्ये तिघीजणी बसून होत्या. आधीच कमी बोलणारी राधा अगदीच शांत झाली होती.
"मुलं कुठं आहेत ग?" ललिताबाईंनी काळजीने विचारलं.
"माझी मैत्रीण त्यांना तिच्या घरी घेऊन गेलीये… तिच्या भावाचे छोटे मुलं आहेत तर खेळतील तिकडे." सायली बोलली आणि लॅपटॉप उघडून काहीतरी करायला लागली. ललिताबाई लॅपटॉपमध्ये डोकावल्या.
"सासूबाई, ऑपरेशनसाठी पैसे भरायचे आहेत हॉस्पिटलमध्ये… काल माझ्याकडून घाईघाईने चुकीचा पिन टाकल्या गेला त्यामुळे कार्ड ब्लॉक झालं… आता त्यांना ऑनलाईन पैसे पाठवते… रक्कम जास्त आहे ना.. मोबाईलवरून तेवढी पाठवता येणार नाही… म्हणून असे पाठवते." सायली बोलत होती आणि एकीकडे काम करत होती. ललिताबाई तिच्याकडे आश्चर्याने बघत होत्या. पैसे ट्रान्सफर करून सायली अकाउंट डीपारमेन्टमध्ये जाऊन आली. तिच्या हातात काही पावत्या होत्या. तिने त्या एका फाईलमध्ये नीट लावल्या.
"एवढ्या कठीण प्रसंगातही सायली किती शांतपणे सगळं संभाळतेय… खरंच कमाल आहे पोरीची…!" ललिताबाईंच्या डोक्यात विचार सुरू होते.
थोड्याच वेळात हेमंतला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आलं.
क्रमशः
© डॉ. किमया मुळावकर
टीम-नागपूर
टीम-नागपूर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा