Login

धाकटी सून (भाग १४)

कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत आपली स्वप्नं पूर्ण करणाऱ्या सुनेची कथा


राज्यस्तरीय करंडक कथामालिका
विषय-कौटुंबिक कथामालिका

धाकटी सून (भाग १४)

इन्टेंसिव्ह केअर युनिटमधून हेमंतला ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट करत होते. सायली धावतच त्याच्या जवळ गेली.

"हेमंत… सगळं नीट होणार आहे… काळजी करू नको… मी सांभाळून घेतेय सगळं…" चालत्या स्ट्रेचरसोबत सायली हेमंतकडे बघत बोलत होती. हेमंतने डोळे किलकिले करायचा प्रयत्न केला. औषधांच्या प्रभावामुळे तो ग्लानीतच होता. हेमंतला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. ऑपरेशन थिएटरचा दरवाजा बंद झाला आणि त्यावरचा लाल लाईट लागला. सायली तिथेच उभी होती. ललिताबाई तिच्या मागेच होत्या, त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला बाजूच्या बेंचवर बसवलं. त्यांच्या स्पर्शात प्रेमाचा ओलावा सायलीला जाणवला. तेवढ्यात तिथे ब्लड बँकेतला माणूस आला. हेमंतच्या ऑपरेशन वेळी ब्लड लागणार होतं. सायलीने त्याच्यासोबत बोलून मोबाईलवरून त्याला पैसे दिले. हॉस्पिटलच्या इंटरकॉमवर सायलीसाठी फोन आला, आय.सी.यू.मध्ये वसंतसाठी औषध आणून द्यायची होती. सायली औषधी आणून देण्यासाठी गेली आणि थोड्याच वेळात परत आली. ललिताबाई या सगळ्या गोष्टी कुतूहलाने बघत होत्या.

"खरंच काळ किती पुढे निघून आला…! साखरेच्या डब्ब्यामध्ये पैसे साठवण्यापुढे आपल्या विचारांची मजल गेलीच नाही कधी… घर आणि फक्त घरच यापलीकडे पण अजून खूप गोष्टी आहेत हे कधी जाणलंच नाही..." ललिताबाई स्वतःच्याच विचारात होत्या.

तेवढ्यात सायलीचे आई-बाबा तिथे आले. त्यांना बघून सायलीला अजूनच भरून आलं… आईच्या खांद्यावर डोकं ठेवून तिने अश्रूंना वाट मोकळी करून करून दिली. बऱ्याच वेळानंतर सायलीचं रडणं थांबलं. थोड्यावेळाने सायलीचे आई बाबा दोघींना घेऊन कॅन्टीनमध्ये गेले. सोबत आणलेला डब्बा त्यांना जबरदस्तीने खाऊ घातला.

हेमंतच ऑपरेशन तब्बल आठ तास चाललं. त्यानंतर त्याला पुन्हा इन्टेंसिव्ह केअर युनिटमध्ये हलवण्यात आलं. दुपारच्या वेळी पोलिसदेखील येऊन गेले… सायलीने धीटपणे त्यांना उत्तरं देत होती.

रात्री सायलीची आई ललिताबाईंना घेऊन घरी गेली. सायली आणि तिचे बाबा दोघे हॉस्पिटलमध्ये थांबले होते.

दुसऱ्यादिवशी ललिताबाई आणि राधा सकाळीच हॉस्पिटलमध्ये आल्या. सायलीच्या आईने घरी राहून घरातली सर्व जबाबदारी घेतली होती. सायलीच्या बाबांना हार्टचा त्रास असल्यामुळे ते परत आपल्या घरी गेले होते.

सायली, राधा आणि ललिताबाई तिघी वेटिंगरूमध्ये बसल्या होत्या.

"सासूबाई, हेमंतच्या आणि माझ्या अकाउंटमध्ये जी सेविंग होती ती आता संपत आलीये… आजचं औषध घेणं होईल फार तर…" सायली खिन्नपणे बोलत होती.

"यांच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत? कोणत्या बँकेत आहेत? मला तर काहीच माहिती नाही… आता कसं करायचं…" राधा चिंतेत बोलली.

"राधाताई, काळजी करू नका… माझे लग्नातले दागिने गहाण ठेवते… काही दिवसांचा प्रश्न मिटेल… पुढे बघू मग… मी थोडं घरी जाते आणि हे काम करून येते." सायली तिथून निघाली.

"थांब सायली…" ललिताबाई तिच्या मागे आल्या.

"मी पण येते सोबत…" ललिताबाई सायली सोबत आल्या. दोघी घरी गेल्या. ललिताबाईंनी स्वतः जवळ साठवलेली बरीच कॅश सायलीला दिली आणि स्वतःचे दागिने काढून तिच्याजवळ दिले.

"सासूबाई हे…" सायली

"हे पैसे मोजून घे… कमीच पडतील… तुझे दागिने गहाण नको ठेऊ… तुझं स्त्रीधन आहे ते… माझे दागिने मोडलेस तरी चालेल… आणि पैशाची काळजी करू नको… वेळ आली तर आपण आपलं शेत विकू, वाडा विकू…" ललिताबाईंनी आपला दागिन्यांचा डब्बा सायलीच्या हातात दिला.

"सासूबाई, तुम्ही घरी आराम करा… मी जाऊन येते…" सायली

"सायली… मी पण येते तुझ्यासोबत… तुला वाटत असेल तुझ्यावर विश्वास नाहीये म्हणून असं म्हणतेय… पण तसं नाही बरं… कालपासून बघतेय तुझी धावपळ… तुला सोबत म्हणून येतेय…" ललिताबाई पुढे बोलत होत्या.

"ठीक आहे, चला जाऊ आपण…" सायली घाईघाईने बोलली तेवढ्यात सायलीच्या आईने दोघींसाठी ताटात भाजी पोळी वाढली. दोघींना जबरदस्ती दोन घास खायला लावले. सायली आणि ललिताबाई दोघी घराबाहेर पडल्या. ललिताबाई आता मोठ्या विश्वासाने सायलीच्या गाडीवर बसल्या. थोड्याच वेळात दोघी बँकेत पोहोचल्या.

"मला वाटलं आपण सोनाराकडे जातोय… पण ही तर बँक आहे ना…! तसं जास्त कधी काम पडलं नाही मला बँकेत यायचं…" ललिताबाई बँकेच्या इमारतीकडे बघत बोलल्या.

"हो… आपण बँकेत सोनं गहाण ठेवतोय… इथे व्याजही कमी लागेल आणि आपलं सोनं सुरक्षित राहील याची शाश्वती सुद्धा मिळेल…" सायली सांगत होती. ललिताबाई तिच्यासोबत बँकेत गेल्या. सायली सर्व गोष्टी अगदी न घाबरता, आत्मविश्वासाने करत होती. ललिताबाईंना सर्व गोष्टींचं अप्रूप वाटत होतं. बऱ्याच फॉर्मलिटी करून दोघी बँकेच्या बाहेर आल्या.

"सायली, अगं पण पैसे…?" ललिताबाई

"अकाउंटवर जमा होतील…" सायली

"आपण तर आपले दागिने देऊन पण टाकले त्यांना…!" ललिताबाई

"हो… म्हणूनच आपण सगळा व्यवहार बँकेतून करतोय ना… म्हणजे फसवणूक व्हायचं काम नाही." सायलीने बोलता बोलता गाडी काढली आणि दोघी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. तेवढ्यात सायलीचा फोन वाजला.

"राधाताईचा फोन!" सायलीने फोन ऊचलला.

"राधाताई, पार्किंगमध्येच आहे मी… येते वर… " सायलीने राधाचं बोलणं न ऐकता फोन बंद केला आणि इन्टेंसिव्ह केअर युनिटच्या बाहेर पोहोचली.

"सायली… ही औषध मागवली आहेत ग…" राधाने घाबरत तिच्या हातात प्रिस्क्रिप्शन दिलं.

"घाबरताय काय ताई.. चला आज तुम्ही औषधी आणा…" सायली

"मला नाही जमायचं ग…ते मला तसे फोनमधून पैसे देता येत नाहीत आणि ते कार्ड ने तर बिलकुल नाही." राधा

"जमेल हळूहळू… तुम्ही या माझ्यासोबत…" सायली

"अगं वेळ कोणती आणि तुझं काय सुरू आहे…" ललिताबाई थोडं चिडून सायलीच्या जवळ जाऊन बोलल्या.

"सासूबाई, अहो राधाताईंना थोडं भाऊजींच्या विचारातून बाहेर काढायचा प्रयत्न करतेय… दोन दिवस बघताय ना कशा राहताय त्या… शून्यात हरवल्यासारख्या… म्हणून थोडं…" सायली बोलली.

एरवी सायलीचा प्रत्येक मुद्दा खोडुन काढणाऱ्या ललिताबाईंनी राधाला सायलीसोबत पाठवलं.

घर, हॉस्पिटल आणि बाहेरची कामं यात सायलीची खूप धावपळ होत होती. हेमंत आणि वसंतच्या अपघाताला एक आठवडा झाला होता. हेमंतच्या पायाच दुसरं ऑपरेशन झालं होतं, त्याच्या तब्येतीत बरीच सुधारणा होती, वसंत मात्र अजूनही कोमातच होता. या सगळ्या गडबडीत सायलीचं कॉलेज, अभ्यास या गोष्टींकडे बिलकुल लक्ष नव्हतं.

एक दिवस सायली आणि ललिताबाई दुपारी वेटिंग रुममध्ये बसल्या होत्या. तितक्यात सायलीचा फोन वाजला.

"कॉलेजमधून फोन…!" सायली आश्चर्याने फोन उचलत बोलली.


क्रमशः