Login

धाकटी सून (भाग १५)

कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत आपली स्वप्नं पूर्ण करणाऱ्या सुनेची कथा


राज्यस्तरीय करंडक कथामालिका

विषय- कौटुंबिक कथामालिका

धाकटी सून (भाग १५)

सायलीच्या कॉलेजमधून फोन होता. सायली फोनवर बोलली आणि काहीतरी विचार करीत होती.

"काय गं? काय झालं? कुणाचा फोन होता?" ललिताबाई

"कॉलेजमधून फोन होता… उद्या परीक्षेचा फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे…" सायली

"एवढं झालं तरी परीक्षा द्यायचीच आहे का? काही गरज नाही…इथं माझ्या मुलांच्या ट्रीटमेंटसाठी दागिने गहाण ठेवायची वेळ आलीये आणि तुला अजून फुकटचा पैसा उधळायचा आहे का? तुझ्या कॉलेजच्या कामामुळेच आपण घरी थांबलो ना… सगळे सोबतच गेलो असतो तर कदाचित हे असं झालंच नसतं… माझी दोन्ही मुलं…." ललिताबाई रागाने बोलल्या आणि रडायला लागल्या. सायलीने त्यांच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहिलं. मायेने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. बराच वेळाने ललिताबाई शांत झाल्या.

"मी असंच काही बोलेल हा विचार करत होतीस ना…? सायली तू परीक्षा दे… अगं दोन वर्षे झाली मी जाणीवपूर्वक तुझ्या रस्त्यात अडथळे तयार करतेय… ते सगळे पार करत तू इथंवर आली आहेस… आता हत्ती गेलाय आणि शेपूट तेवढं बाकी आहे… आता तर देवालाच तुझी परीक्षा घ्यायची आहे…" ललिताबाई बोलल्या आणि सायलीने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं.

"अगं बघतेस काय अशी? खरंच तू परीक्षा दे…" ललिताबाई

सायली दुसऱ्यादिवशी कॉलेजमध्ये गेली. परीक्षेचा फॉर्म भरला. कॉलेजमध्ये गेल्यावर तिला कळलं की कॉलेजमध्ये कॅम्पस सिलेक्शनसाठी बऱ्याच कंपन्या येणार आहे. अशा परिस्थितीत ही सायलीसाठी सुवर्ण संधी होती. कॅम्पसमध्ये सिलेक्शन झाल्यावर तिला शिक्षण संपल्यावर नोकरीसाठी वणवण फिरायची गरज पडणार नव्हती.

"ते एक बरं होईल… खरंतर आता पैशाची खूप गरज आहे… पण घरचं वातावरण हे असं… काय करू? इंटरव्ह्यू देऊन देते… सिलेक्शन झालं तर…? सासूबाई पुन्हा त्रास देणं सुरू करतील…! आता कसंबसं नीट तरी बोलत आहेत… काय करता येईल…? बघू पुढचं पुढे." सायलीने मनाशी ठरवलं.


सायलीने परत अभ्यासाला सुरुवात केली. रात्री हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये बसून तिचा अभ्यास सुरू असायचा.

बघता बघता हेमंतच्या अपघाताला एक महिना झाला होता. हेमंतच्या तब्येतीत खूप चांगली सुधारणा होत होती. त्याला स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. वसंताच्या तब्येतीत मात्र विशेष सुधारणा नव्हती. हेमंतला आय.सी.यू. च्या बाहेर आणल्यावर राधाच्या मनाची स्थिती मात्र विचित्र झाली होती. आता तिला वसंताची जास्तच काळजी वाटायला लागली होती आणि त्यामुळेच ती अजूनच शांत झाली होती. कोणाशी फारशी बोलायची नाही, एकटक शून्यात नजर लावून बसायची.


हॉस्पिटल, घर, राधाच्या मुलांकडे लक्ष देऊन, घरातली लाईट बिल भरण्यापासून, समानसुमान आणण्याची सगळी कामं करून सायलीने परीक्षा दिली. परीक्षा पार पडल्यावर मात्र सायली थोडी रिलॅक्स होती.


एक दिवस संध्याकाळी राधा आणि सायली दोघी आय.सी.यू. च्या बाहेर वेटिंग रूममध्ये बसल्या होत्या. तेवढ्यात तिथे एक इसम आला.

"मी सदानंद फडके… वसंतच्या ऑफिसमध्ये काम करतो… ऑफिसने हे लेटर दिलंय…" सायलीजवळ वसंतची चौकशी करून तो इसम परत गेला.

सायलीने पाकीट उघडून पाहिलं. त्यात एक पत्र आणि चेक होता.

"राधाताई, भाऊजींच्या कंपनीतून पत्र आलंय… त्यांनी तीन महिन्यांचा पगार दिला आणि सोबत हे पत्र… त्यात लिहिलंय की भाऊजींची तब्येत बरी झाल्यावर कंपनी त्यांना परत जॉईन करून घेईल… तोपर्यंत त्यांच्या जागेवर दुसरी नेमणूक करणार आहेत. ताई, म्हणजे तुम्हाला कळला ना याचा अर्थ… भाऊजींची नोकरी आहे पण आणि नाही पण…" सायली बोलत होती पण राधा मात्र एकदम गप्प होती. सायलीच्या बोलण्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. आता मात्र सायलीला राधाची काळजी वाटू लागली. तिने ही गोष्ट ललिताबाईंच्या कानावर घातली. मानसोपचार तज्ञांकडे राधाची ट्रीटमेंट सुरु झाली. वसंतसुद्धा दवाखान्यात अॅडमिट आहे ही गोष्ट हेमंतला माहिती नव्हती. तो सतत वसंताची चौकशी करत रहायचा; पण सायली आणि ललिताबाई त्याला काही सांगत नव्हत्या.


काही दिवसांनी हेमंतला डिस्चार्ज मिळाला. हेमंतला घरी आणलं होतं. दोन्ही पायांना बरेच दिवस प्लास्टर रहाणार होत.

"आता काय स्वतःचा नवरा घरी आलाय… आणि हेमंतला वसंतबद्दल कहीच माहिती नाही… आता सायली खरंच दवाखान्यात जाईल का बरं? वसंताकडे तेवढ्या काळजीने लक्ष देईल का? नाहीच द्यायची… हेमंताच्या मागे पुढेच करत राहिल." एवढे दिवस सायलीसोबत राहूनही ललिताबाईंच्या डोक्यात सायलीबद्दल परत शंका आली. त्याच विचारात त्या सायलीच्या रुममध्ये गेल्या; पण सवयीप्रमाणे त्या दाराशीच अडल्या आणि हेमंत-सायली काय बोलत आहेत ते कान देऊन ऐकू लागल्या. सायलीने हेमंतला आतापर्यंत झालेल्या सर्व गोष्टींची कल्पना दिली.

"हेमंत, वसंत भाऊजी हॉस्पिटलमध्ये आणि राधाताईंच्या मानसोपचार तज्ञांकडे ट्रीटमेंटसाठी होणारे सेशन्स… सगळीकडे मला नीट लक्ष द्यावं लागणार आहे. या घरची धाकटी सून म्हणून ते माझं कर्तव्य आहेच… पण तुझीही गैरसोय करून चालणार नाही म्हणून तुझ्यासोबतीला दिवसभर इथे एक नर्स आणि वॉर्डबॉय असतील… ते तुला उठवून बसवण्यापासून, तुला डॉक्टरांनी सांगितले हलके-फुलके व्यायाम, तुझ्या औषधी वगैरे सगळं बघतील. प्लिज त्यांना सहकार्य करशील ना?" सायली

"सायली, एवढी धडपड केलीस तू… आणि मी एवढंही करू शकणार नाही का? बरं, मला सांग… बाकी पैसे कसे जमवले गं तू? खर्च नक्कीच कमी नसणार ना?" हेमंत

"माझे दागिने गहाण ठेवले आणि लग्नाआधी मी एक एफ. डी. केली होती, ती मोडली आणि सध्या कॉलेजच्या मुलांचं प्रोजेक्ट टाईप करून द्यायचं काम करतेय त्याचा थोडा आधार आहे. आमच्या प्रोजेक्टवेळी आम्ही एका कंपनीत गेलो होतो तिथल्या एका सरांनी मला त्यांच्या कंपनीच्या प्रोजेक्टमध्ये घेतलं आहे… अमेरिकन वेळेनुसार काम करायचं आहे तो प्रोजेक्ट संपेपर्यंत… रात्री हॉस्पिटलमध्ये बसून असते तेव्हा काम होऊन जातं… पैसेही बरे देत आहेत… प्रोजेक्ट संपेपर्यंत आहे… एक दोन महिने करावे लागेल फारफार तर… नंतर बघू पुढचं पुढे… " सायली बोलत होती. तेवढ्यात ललिताबाई रूममध्ये आल्या.