राज्यस्तरीय करंडक कथामालिका
विषय- कौटुंबिक कथा
धाकटी सून (भाग १)
"असं नाही हां जाऊबाई… नाव घ्यायचं… त्याशिवाय घरात प्रवेश नाही बरं!" राधा आपल्या लहान जावेला सायलीला म्हणाली. सायली आणि हेमंतचा पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा पार पडला होता. गृहप्रवेशावेळी नवदाम्पत्य दारात उभं होतं. राधाने दोघांना औक्षण केलं होतं. उंबरठ्यावर ठेवलेल्या तांदुळाच्या कलशाला सायली पाय लावणार तोच राधाने तिला छेडलं. सायलीचा चेहरा लाजून गुलाबी झाला होता.
"जाई-जुईच्या कळ्यांची
विणली नाजूक वेणी
हेमंतरावांच नाव घेतेय
ऐका बरं सर्वजणी…!" सायलीने लाजतच नाव घेतलं.
"वा वा वा! मस्तच अगदी! हेमंत भावोजी, आता तुम्ही घ्या बरं नाव! ते भाजीत भाजी घेऊ नका… सप्तपदीवेळी ऐकलंय आम्ही…!" राधा
"वहिनी… मला नाही येत दुसरं नाव…" हेमंत
"असं कसं? ते मला काही माहिती नाही… तुम्हाला नाव घ्यावच लागेल." राधा
"लहान माझी बाहुली
तिचं नाव सायली…!" हेमंतने नाव घेतलं आणि सगळे अगदी खळखळून हसायला लागले.
"काय हो भावोजी, असं कुठं नाव असतं का? ते काही नाही… दुसरं नाव घ्या." राधा हसत हसत बोलली.
"पुरे झाली चेष्टा मस्करी! गृहप्रवेशाला उशीर होतोय! अजून बरेच विधी आहेत… राधे… तुला सगळं सांगावं लागेल का?" आतमधुन हेमंतची आई, ललिताबाई आपल्या करड्या आवाजात बोलल्या. त्यांचा आवाज ऐकून राधाच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात पळून गेलं. बाकीच्या बायकांमध्येही शांतता पसरली.
दारावरचं भरल्या तांदळाचं माप ओलांडून सायलीने गृहप्रवेश केला. देव दर्शनासाठी नवदाम्पत्य देवघरात गेलं. राधाही सोबत होतीच.
"आता घरातल्या सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्या." राधा सायलीच्या कानात पुटपुटली.
हेमंत आणि सायली दोघे घरातल्या ज्येष्ठांच्या पाया पडत होते.
"सौभाग्यवती भव!" ललिताबाईंनी आशीर्वादही अगदी कडक शब्दात दिला.
"राधा, आमच्या धाकट्या सुनेला घरातले सगळे कुळाचार, चालीरीती समजावून सांगायचं काम तुझं… कळलं?" ललिताबाईंचा आवाज कडकच होता.
"राधा, आमच्या धाकट्या सुनेला घरातले सगळे कुळाचार, चालीरीती समजावून सांगायचं काम तुझं… कळलं?" ललिताबाईंचा आवाज कडकच होता.
त्यावर राधाने अदबीने मान डोलावली. त्यानंतरचे कुळाचार, विधी वगैरे पार पडले. रात्रीची जेवणं आटोपली. घरातली पाहुणे मंडळी आपापल्या खोलीत झोपायला गेली. राधाची स्वयंपाकघरात आवरसावर सुरू होती. तेवढ्यात तिचं लक्ष हॉलमध्ये ताटकाळत बसलेल्या सायलीकडे गेलं. सायलीसोबत तिची पाठराखीण म्हणून आलेली बहीण शाल्मलीसुद्धा होती. सकाळपासून भरजरी शालू आणि दागदागिने घालून सायलीचा जीव अगदी मेटाकुटीला आला होता. तिला पाहून राधा बाहेर आली.
"सासूबाई, ते… सायलीला हेमंत भावोजींच्या खोलीत पाठवू का झोपायला?" राधाने थोडं चाचरतच विचारलं.
"राधे, अग डोकं ठिकाणावर आहे का तुझं? अजून सत्यनारायण झाला नाही." ललिताबाई एकदम खेकसल्या.
"नाही… म्हणजे… हो…. हेमंत भावोजी आणि हे, मुलांना घेऊन आमच्या खोलीत झोपलेत… म्हणून मग सायलीला आणि तिच्या ताईला भावोजींच्या खोलीत झोपायला लावते." राधा ततपप करत बोलली. ललिताबाईंनी रागातच होकार दिला आणि राधा हेमंतच्या रूममध्ये सायलीला घेऊन गेली. सायलीला आणि तिच्या बहिणीला तिथे सोडून राधा चटकन परत निघाली होती.
"राधाताई… एक मिनिट…" सायलीने गडबडीत जाणाऱ्या राधाला आवाज दिला.
"काय ग सायली? काही हवंय का?" राधा
"तुम्हाला मी राधाताई म्हटलेलं आवडेल ना?" सायली
"हो ग… आवडेल ना! न आवडण्यासारखं काय आहे त्यात? एखादी साधी साडी असेल तर झोपताना ती नेसून घे. साडीवर झोप येत नसेल तर ड्रेस घाल हवं तर; पण उद्या रूमच्या बाहेर येताना साडी नेसून ये. सासूबाई थोड्या कडक शिस्तीच्या आहेत म्हणून म्हटलं." राधा बोलत होती, तेवढ्यात ललिताबाईंनी तिला आवाज दिला आणि ती चटकन तिथून निघाली.
"काय गं? एवढा वेळ! लगेच नवीन सुनबाई बरोबर माझ्या चुगल्या सुरू केल्या की काय?" ललिताबाईंनी राधाला दरडावून विचारलं.
"नाही… तसं काही नाही सासूबाई… थोडंस तिला…" राधा बोलत होती तर ललिताबाईंनी तिचं वाक्य मध्येच तोडलं.
"पुरे पुरे… माझ्या खोलीत माझं अंथरूण पांघरूण घातलं की नाही? आणि हो… उद्या जरा लवकर उठा… उद्या हळद फेडायची आहे, त्यानंतरची पूजा वगैरे… त्याची तयारी केली आहे का नीट? मला ऐनवेळी धांद्रटपणा कुठेच नकोय… कळलं?" ललिताबाई आपल्या खोलीकडे जात राधाला चार शब्द सांगून गेल्या.
"रोज पाच वाजताच तर उठते… अजून किती लवकर उठू?" राधा घड्याळात बारावर जाणाऱ्या तास काट्याकडे बघत मनातल्या मनात बोलली. स्वयंपाक घरात एक सतरंजी टाकून तिने पाठ टेकवली.
इकडे शाल्मली आणि सायली दोघी पलंगावर पडल्या.
"शालूताई, किती छान आहेत ना ग राधाताई! माझ्या मनातलं अगदी मी न बोलताच समजून गेल्या." सायली शाल्मलीला म्हणाली.
"सायले, एक लक्षात ठेव, कोणी कितीही चांगलं वागलं तरी जाऊ ती जाऊच असते आणि सासू ती सासूच!" शाल्मली
"पण मला नाही तसं वाटत… सासूबाई थोड्या कडक शिस्तीच्या आहेत, हे हेमंतसुद्धा बोलला होता… राधाताई मात्र चांगल्या वाटल्या स्वभावाने… आपले बाबा एकलुते एक असल्यामुळे आपल्याला कधी असं एकत्र कुटुंबात राहायचं कामच पडलं नाही ना… आजी आजोबाही मला फारसे आठवत नाहीत… तू, मी आई आणि बाबा… एवढंच चौकोनी कुटुंब होतं आपलं…! इथे मात्र मोठ्या नणंदबाई, मोठ्या जाऊबाई… सगळीच नाती आहेत… आणि मी…. मी या घरची धाकटी सून!" सायली थोडी उत्साहात बोलत होती. बोलता बोलता तिने शाल्मलीला आवाज दिला; पण शाल्मली मस्त ढाराढुर झोपली होती.
"बापरे! माझा तर विश्वासच बसत नाहीये! माझं लग्न झालं पण! अगदी काल परवाचीच गोष्ट आहे असं वाटतंय… हेमंत बघायला आला काय, त्याच्या घरच्या लोकांनी पसंती कळवली काय…! माझ्या घरचे तर लगेच माझ्या लागले, होकार दे म्हणून… त्यांच्या मते हेमंतसारखं स्थळ अगदी शोधूनही सापडणारं नव्हतं… खरंतर मला माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं… आताच तर बी.एस.सी. झालं होतं… अजून पुढे शिकून रिसर्चमध्ये काम करायचं होतं…पण…
आई बाबांचं ऐकलं मी आणि \"चट मंगनी पट ब्याह\" सारखं पटापट एक एक कार्यक्रम झालेही! आणि मी आज चक्क हेमंतच्या घरी आहे! ते एक बरंय शालूताई सोबत आहे… आई-बाबांची किती आठवण येतेय! ते माझं मलाच माहिती… खरंच आपलं घर सोडून असं दुसऱ्या घरात येऊन राहणं सोपं नाहीये…! सासरच्या सर्व लोकांसोबत जुळवून घ्यावं लागेल… पण, सासू ती सासूच आणि जाऊ ती जाऊच असते, असं का बोलली असेल शालू ताई? तसं काही नसेल ना…! म्हणजे हेमंतच्या आई थोड्या कडक शिस्तीच्या आहेत, घरात त्यांनाच विचारून सगळं करावं लागतं, असं हेमंत बोलला होता… तरी एवढंही अवघड नसेल ना सगळं…? आणि राधाताई… त्या देतील ना मला साथ…? समजून घेतील ना मला? आणि समजावून सांगतील ना?" या कुशीवरून त्या कुशीवर कड बदलत सायलीचा आपल्या विचारांसोबत झिम्मा सुरू होता.
क्रमशः
© डॉ.किमया मुळावकर
टीम- नागपूर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा