विषय- कौटुंबिक कथामालिका
धाकटी सून (भाग २)
सायलीच्या माहेरी एकदम मोकळं वातावरण होतं. शाल्मली आणि सायलीवर कोणत्याच प्रकारची बंधन नव्हती. बंधन नव्हती पण दोघी बहिणी अगदीच बेपर्वा रहात नव्हत्या. आपल्या आई वडिलांच्या नावाला धक्का लागेल असं कोणतंच काम दोघींनी कधीच केलं नव्हतं. खरंतर सायलीला बारावी विज्ञान शाखेत उत्तम गुण होते, अगदी मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला प्रवेश मिळू शकतील एवढे होते! पण सायलीला मायक्रोबॉयलॉजी या विषयात अभ्यास करून पुढे रिसर्च करायचं होतं. सायलीचे आई बाबा दोघांची त्याला परवानगी देखील होती; पण नियतीच्या मनात दुसरंच होतं… सायलीच्या बाबांना माईल्ड अटॅक येऊन गेला आणि त्याच काळात अगदी जवळच्या नातेवाईकांनी सायलीसाठी हेमंतच स्थळ सुचवलं. खरंतर इतक्या लवकर लग्न करायला सायलीचा विरोध होता; पण तिच्या बाबांच्या तब्येतीपुढे तिचा नाईलाज झाला.
"लग्न झाल्यावर पुढे शिक्षण घेता येतं ना सायली. एवढं चांगलं स्थळ आहे… मुलगा चांगल्या नोकरीला आहे, निर्व्यसनी आहे… आपल्या नातेवाईकांच्या ओळखीतला आहे… आणि या सर्व गोष्टींपेक्षा तुझ्या बाबांचा विचार कर… मरणाच्या दारातून परत आलेत… तेवढाच तुझ्या लग्नाचा त्यांच्यावरचा भार कमी होईल…" सायलीच्या आईने सायलीची समजूत काढली आणि सायलीने लग्नाला होकार दिला.
आतापर्यंत आयुष्यातले काही क्षण सायलीच्या डोळ्यासमोरून अगदी भुर्रकन गेले. त्या विचारातच सायलीला झोप लागली.
लग्नानंतरचे सगळे विधी, पूजा-अर्चा, देवदर्शन, मांडव परतणी वगैरे सगळं अगदी नीट पार पडलं. लग्नानिमित्त घरात होती ती पाहुण्यांची वर्दळही सरली होती. खरंतर लग्नानंतर कुठेतरी फिरायला जावं अशी सायलीची इच्छा होती. पण, "नंतर जाऊ कधीतरी" असं म्हणून हेमंतने तो विषय टाळला होता. सायलीनेही त्या गोष्टीचा एवढा काही विचार केला नाही. नवीन घरात, नव्या वातावरणात, नवीन माणसांत सायली स्वतःला रुळवून घेण्याचा, सर्वांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होती.
हेमंतची लग्नसाठी काढलेली रजा संपली होती. दुसऱ्यादिवशीपासून परत त्याचं ऑफिस सुरू होणार होतं.
"अजून काही दिवस सुट्टी नाही का काढता येत? तू घरी असला म्हणजे जरा बरं वाटतं रे…" सायली तिच्या रूममध्ये कपाटाची आवराआवर करताना हेमंतसोबत बोलत होती.
"अजून किती दिवस घरी राहू? उगीच घरी राहून सुट्टी वाया घालण्यात काही अर्थ नाहीये ना… जेव्हा सुट्टीची खरंच गरज असेल तेव्हा घेता येईल सुट्टी." हेमंत
"काय रे! अजून एक आठवडाच तर झाला आपल्या लग्नाला! माझं तर समानही अजून नीट सेट झालं नाहीये… आणि दिवसभर मी काय करू घरी… इतके दिवस बरं होतं ही पूजा, तो कार्यक्रम, हे मंदिर, तिकडं देवदर्शन…" सायली
"अग एकटी कुठे असणार तू घरी… आई आहे, राधा वहिनी आहेत… दुपारी सोनू, मनू शाळेतून येतात… तुझा वेळ अगदी मस्त जाईल बघ… बरं मला सांग लग्नाआधी तू काय करायची घरी असली की…?" हेमंत
"घरी कुठे राहायचे रे… कॉलेज नव्हतं का माझं? अभ्यास, प्रॅक्टिकल, परीक्षा यात वेळ जायचा ना माझा… ए हेमंत… मी इकडे घेऊ का रे ऍडमिशन… एम.एस.सी. ला…? एम.एस.सी. झालं की मग पी.एच.डी. करेन किंवा अजून काहीतरी नवीन करेल…" सायली उत्साहात बोलत होती.
"हो घे की… त्याआधी एकदा आईसोबत बोलून घे… तिचंही मत घे." हेमंत असं म्हणाला आणि सायलीच्या चेहऱ्यावरचा उत्साह मावळून गेला.
"पुढे शिकायचं का नाही हे पण विचारून करावं लागतं का? पैशाचा प्रॉब्लेम असता तर समजलंही असतं; पण असं तर काहीच नाही." सायली विचार करत होती.
"सायली… काय झालं ग? कोणत्या विचारात हरवली आहेस?" हेमंत तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवत बोलला.
"काही नाही असंच… हेमंत, घरात साडी नेसणं गरजेचं आहे का? ड्रेस घातला तर चालत नाही का? साडीत मला कामं सुचत नाहीत… चालता चालता सतत पायात येते…" सायलीने विषय बदलला.
"एवढंच का? अग घाल की! विचारायचं काय त्यात! तुला ड्रेस आवडतो तर तू ड्रेस घालत जा…" हेमंतच्या या वाक्यावर सायली एकदम आनंदित झाली.
"अरे, ते राधाताई साडीच नेसतात ना म्हणून विचारून घेतलं." सायली
"राधा वहिनीला साडी आवडत असेल म्हणून ती साडी नेसत असेल." हेमंत म्हणाला.
"चला, कमीतकमी साडी नावाच्या या जंजाळातून तरी आता सुटका होईल." सायली मनाशीच बोलली.
दुसऱ्यादिवशी हेमंतचं ऑफिस होतं, लवकर जाग यावी म्हणून सायली अलार्म लावून झोपली.
अलार्म वाजताच सायली उठली. हेमंत अजून झोपलेलाच होता. पटापट अंघोळ वगैरे करून तिने लाल रंगाचा सुंदर पंजाबी ड्रेस घातला. तिच्या गोऱ्या रंगावर तो अजूनच शोभून दिसत होता. छानशी तयार होऊन सायली बाहेर आली. घरात एकदम शांतता होती. घर झाडून-पुसून अगदी लक्ख होतं. सायली देवघरात गेली, देवाला नमस्कार केला. बैठकीच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. सायली बाहेर गेली. अंगणात राधा रांगोळी काढत होती.
"वॉव राधाताई, किती सुरेख रांगोळी काढलीये! मी रंग भरू लागू…?" सायली राधाच्या बाजूला बसत बोलली.
"हो भर की! विचारायचं काय त्यात! हे घे रंग… तुझ्या आवडीने भर हो!" राधाने तिच्यासमोर रांगोळीचा डब्बा धरला. दोघी जावांनी मिळून रांगोळीत मस्त रंग भरले. सायली धावत रूममध्ये गेली, मोबाईल आणला आणि रांगोळीचा एक फोटो काढला आणि राधासोबत एक सेल्फी काढला आणि लगेच व्हाट्सएप स्टेटस अपलोड केलं…."टुडेज् रंगोली विथ राधाताई…"
दोघी जावा हसत हसत घरात येत होत्या. हॉलमध्ये ललिताबाई बसलेल्या होत्या.
"राधे….!" दोघींकडे बघून त्या जोरात रागावल्या.
क्रमशः
© डॉ. किमया मुळावकर
टीम- नागपूर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा