Login

धाकटी सून (भाग ३)

कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत आपली स्वप्न पूर्ण करणाऱ्या सुनेची कथा
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

विषय-कौटुंबिक कथामालिका

धाकटी सून (भाग ३)

ललिताबाईंच्या असं ओरडण्याने राधा आणि सायली जागीच स्तब्ध उभ्या राहिल्या. राधाच्या डोळ्यांत तर पाणी जमा झालं होतं. "ललिताबाई का ओरडल्या?" हे सायलीला देखील कळत नव्हतं.

"काय झालं आई?" कोणी काहीच बोलत नाहीये हे बघून सायलीने विचारलं.

"आई नाही सासूबाई….! कळलं? आणि तुला काय बोलणार म्हणा, तू अजून नवीन; पण या राधेला अक्कल नाही का?" ललिताबाई राधाकडे द्वेषाने बघत होत्या.

"सासूबाई… आम्ही दोघी… ते… रांगोळीत रंग…." राधा बोलताना अडखळत होती.

"ते मला माहिती नाही… मी तुला काय म्हटलं होतं… नवीन सुनेला घरातले सगळे नियम सांग… सांगितलेस तू? सांगितले असते तर सायलीने ड्रेस घातला असता का?" ललिताबाई बोलल्या आणि तडक तिथून निघून गेल्या. राधाने अपेक्षेने सायलीकडे पाहिलं… सायली लगेच तिच्या रूममध्ये निघून गेली. तिचा इतक्यावेळ अडवून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला… तिने रडत रडत बेडकडे पाहिलं… हेमंत बेडवर नव्हता…

"अंघोळीला गेला असेल." बाथरूममधून येणाऱ्या पाण्याच्या आवाजाने सायलीने कयास बांधला. कपाटातून एक साधी साडी काढली आणि रडत रडत नेसली. तितक्यात हेमंत बाथरूमधून बाहेर आला. त्याला बघून सायलीने पटकन पदराने डोळे पुसले.

"काय झालं सायली?" हेमंत

"काही नाही…" सायली

"मग रडतेय का?" हेमंत

"या घरात साडीचा नियम आहे, हे माहिती नव्हतं." सायलीला बोलताना परत भरून आलं.

"अग, आई थोडी जुन्या विचारांची आहे… माझी आजी तर यापेक्षाही कडक नियमांची होती… आता आजी असती तर तुलाही तिने तिचे नियम शिकवले असते पण… आता जेमतेम वर्षं होईल बघ तिला देवाघरी जाऊन…बरं, हे सगळं जाऊ दे… साडीतही अगदी सुंदर दिसतेय बरं तू…" हेमंत तिच्याजवळ जात बोलला. सायलीने लाजून मान खाली घातली.

"आता तुझ्या हातची मस्त कडक कॉफी पाज बरं." हेमंत अजून तिच्याजवळ आला.

"आलेच…" सायलीने त्याला अलगद दूर लोटलं आणि हसतच रूमबाहेर आली आणि स्वयंपाक घरात गेली. ललिताबाई देवघरात जपमाळ ओढत बसल्या होत्या. राधा सगळ्यांच्या चहा-नाश्त्याची तयारी करत होती.

"राधाताई, मी काय मदत करू?" सायली म्हणाली आणि राधाने तिला पोहे करायला लावले. सकाळचा अनुभव पाहता सायलीने तिला पोहे करता येत असूनही राधाला विचारून पोहे बनवले. स्वयंपाकाचाही तसंच केलं. सर्वांचा चहा-नाश्ता आटोपला आणि हेमंत, हेमंतचा मोठा भाऊ वसंत दोघे ऑफिससाठी निघाले.

"हेमंत, लवकर येशील घरी." सायली हेमंतच्या हातात डब्बा देत म्हणाली. ललिताबाईंचे कान ते दोघे काय बोलतात त्याच्याकडेच होते.

"हो, येतो…" हसून हेमंतने तिला उत्तर दिलं.
"आई, येतो बरं…" असं म्हणून तो घराच्या बाहेर पडला.

तितक्यात मुलांना बसमध्ये बसवून राधा घरात आली.

"राधे, आपल्या नवऱ्याला अहो-जाहो करून बोलायचं एवढीही अक्कल नाही का तुला?" ललिताबाई गरजल्या
आणि सायलीला रडू फुटलं. ललिताबाई तावातावात त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. राधाने हळूच सायलीच्या खांद्यावर हात ठेवला. सायलीचे डोळे पाण्याने डबडबले होते. राधाने तिचे डोळे पुसले आणि मान डोलावून इशाऱ्यानेच रडू नको म्हटलं.

"सायली, तुमचे कपडे पण आण धुवायला, सगळे कपडे सोबतच धुवून टाकते." राधा म्हणाली आणि सायलीने कपडे भिजवले. कपडे धुण्यासाठी दोघीजणी घराच्या मागच्या अंगणात गेल्या.

"राधाताई, सगळंच कसं चुकतंय हो माझं." सायली.

"काही चुकत नाही, नवीन नवीन असं होतंच असतं. मी तर किती बोलणे खायचे सासूबाईंचे! अजूनही खातेच की!" राधाने हसून विषय बदलायचा प्रयत्न केला.

"राधाताई, अहो इतके दिवस आईकडे असं काहीच नव्हतं ना… कामं सगळी शिकवली आईने; पण असं त्या कामाचं टेंशन नव्हतं हो." सायली

"सायली, अग किती मनाला लावून घेशील… आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या आहेत त्या. त्यांनी काही सांगितलं तर ते चुकीचं थोडी असणार आहे." राधाने पुन्हा सायलीची समजूत काढली आणि सायलीने होकारार्थी मान डोलावली.

"राधाताई, अहो कामवाली बाई येते तरी आपण कपडे का धुतोय?" सायली नळ बंद करत बोलली.

"बाई होय… अग ती लग्न होईपर्यंतच लावली होती आपण… घरात पाहुण्यांची वर्दळ होती म्हणून! आधी तर मीच करायचे सगळं… आणि तसंही सासूबाई कॉटनच्या सुती साड्या नेसतात ना, मशीनमध्ये त्याला खूपच वळ्या पडतात… आणि भांडी तर काय मी कामं करता करता अशीच घासून घेते." राधा बोलत होती.


"घरात वॉशिंग मशीन असूनसुद्धा कपडे धुण्यासाठी मशीन वापरायची नाही, सकाळी पण स्वयंपाक करताना मसाला मिक्सरमध्ये फिरवायचा नाही, काय तर म्हणे त्या खलबत्त्यात कुटायचा! घरात चॉपर असूनही कोशिंबिरीसाठी काकड-टोमॅटो सुरीनेच बारीक चिरायचे! उपकार ती तशी जुनी विळी नाहीये भाजी चिरायला! अजून काय काय नियम आहेत यांचे काय माहिती? सगळं मुद्दाम त्रास दिल्यासारखं…!" सायली मनातच बोलत होती आणि थोडी फार चिडली होती. आपली चिडचिड विनाकारण राधाताईवर निघू नये म्हणून ती मुद्दाम शांत बसली होती.

दुपारपर्यंत सर्व कामं आटोपून दोघी जावा जरा निवांत बसल्या होत्या. त्यात ललिताबाई भजनी मंडळात गेल्या होत्या त्यामुळे दोघी अजूनच रिलॅक्स होत्या.

"राधाताई, सॉरी बरं! सकाळी सकाळी माझ्यामुळे तुम्हाला ओरडा बसला." सायली राधाजवळ बसत बोलली.

"अजूनही तुझ्या डोक्यात तेच सुरू आहे का? मी तर विसरलेसुद्धा! बरं का सायली, घरात ड्रेस घालायची परवानगी नसली तरी बाहेर फिरायला गेल्यावर आपण ड्रेस घालू शकतो बरं! अगदी जीन्स वगैरे पण…!" राधा आनंदात बोलली.

"अय्या हो!" सायली

"हो…" राधा

"राधाताई मला सांगा ना तुम्ही कुठे गेला होतात फिरायला?" सायलीने उत्साहात विचारलं.

"कुठेच नाही…!" राधाचा चेहरा एकदम पडला. नेहमीप्रमाणे तिच्या डोळ्यांत पाणी आलं आणि सवयीप्रमाणे तिने ते डोळ्यांच्या कडांवरच अडवलं… सायलीने मात्र न बोलताच ते पाणी अलगद टिपलं.


क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर
टीम- नागपूर


🎭 Series Post

View all