Login

धाकटी सून (भाग५)

कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत आपली स्वप्नं पूर्ण करणाऱ्या सुनेची कथा


राज्यस्तरीय करंडक कथामालिका
विषय- कौटुंबिक कथामालिका

धाकटी सून ( भाग ५ )


राधाच्या साथीने आणि हेमंतच्या प्रेमाने सायली घरात स्वतःला पूर्णपणे ऍडजस्ट करून घ्यायचा प्रयत्न करत होती. सगळं बऱ्यापैकी जमतंही होतं. दिवस सरत होते. बघता बघता हेमंत आणि सायलीच्या लग्नाला एक महिना झाला होता. हेमंतच्या कामाचा व्यापही बराच वाढला होता, बरेचदा तो उशिरा घरी यायचा आणि लवकर ऑफिसमध्ये जायचा. या काही दिवसांत हेमंतच सायलीसोबत नीट बोलणही होत नव्हतं. सायली विनातक्रार सगळं सांभाळून घेत होती.

एक दिवस हेमंत थोडा लवकरच ऑफिसमधून आला. त्याने दारावरची बेल वाजवली. सायलीने दार उघडलं आणि समोर हेमंतला बघून तिला आनंद झाला.

"सायली, हे बघ काय आणलंय!" हेमंत हातातली बॅग तिच्याजवळ देत बोलला. ललिताबाई हॉलमध्ये सोफ्यावर बसलेल्या होत्या. राधा स्वयंपाक घरात मुलांसाठी दूध बनवत होती.

"काय आणलंय?" सायली उत्सुकतेने म्हणाली.

"अक्षय कुमार आवडतो ना तुला? त्याचा नवीन पिक्चर रिलीज झालाय आज… रात्री नऊ ते बाराच्या शो ची तिकिटं आहेत…" हेमंत रूममध्ये जात बोलत होता.

"काय! पिक्चरची तिकिटं!" सायलीला खूप आश्चर्य वाटलं आणि सोबत आनंदही झाला होता.

"हो! माझ्या बायकोच्या आनंदासाठी एवढं करूच शकतो मी! चल, तू पटापट घरातलं थोडं आवरून घे. राधा वहिनींना काही मदत लागली तर ती करून घे… आपण लवकरच निघू, पिक्चरला जाण्यापूर्वी बाहेरच काहीतरी खाऊन घेऊ… पावभाजी चालेल ना?" हेमंत बोलला आणि सायलीच्या मनात आनंदाची कारंजी उडाली.

"चालेल काय! धावेलही! पण सासूबाई…" सायली

"मी बोलतो तिच्यासोबत. तू तयारी कर." हेमंत बोलला आणि सायली एकदम आनंदात तिच्या रूमच्या बाहेर येत होती… दाराच्या बाजूला तिथे तिला ललिताबाई दिसल्या. अचानक असं सायलीला बघून त्या थोड्या चपापल्या.

"चहा पाण्याचं बघा जरा…" आपल्या कडक आवाजाने बोलत त्यांनी स्वतःला सावरलं आणि तिथून निघून हॉलमध्ये येऊन बसल्या.

सायली आनंदाने स्वयंपाकघरात गेली. तिने हळूच राधाच्या कानात संध्याकाळचा प्लॅन सांगितला… राधाही खूप खुश झाली. सर्वांचं चहा-पाणी झालं. राधाने सायलीला तयार होण्यासाठी तिच्या रूममध्ये पाठवलं. राधा स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती.

सायलीने सुंदरसा काळ्या रंगाचा कॉटनचा कुर्ता आणि लेगिन्स घातला आणि त्यावर शोभतील असे नाजूकसे कानातले घातले, गळ्यात मंगळसूत्र आणि हलका मेकअप केला. केस मोकळे सोडले आणि आजूबाजूचे केस घेऊन मध्ये एक छोटसं क्लचर लावलं. छानशी तयार होऊन सायली रूमच्या बाहेर येतच होती तेवढ्यात हेमंत रूममध्ये आला. त्याने सायलीकडे पाहिलं, सायलीच्या सौंदर्याने तो पुरता घायाळ झाला होता. त्याने पटापट त्याची तयारी केली. दोघे आनंदात रूमच्या बाहेर आले.

ललिताबाई हॉलमध्ये सोफ्यावरच बसून होत्या.

"कुठे निघाली स्वारी?" ललिताबाईंनी बाहेर हसतच आलेल्या हेमंत आणि सायलीला एकदम कडक आवाजात विचारलं. त्यांच्या चेहऱ्यावर चीड अगदी स्पष्ट दिसत होती. सायली त्यांना बघून घाबरलीच!

"आई, आम्ही सिनेमाला जातोय… आणि बाहेरच जेवण करणार आहोत." हेमंत

"सिनेमाला! कशाला? कशाला हवीत ही असली थेरं…?" ललिताबाई

"थेरं…! काही ही काय बोलतेस आई तू…!" हेमंत

"मग थेरंच नाहीत का? जहागिरदारांच्या सुना कधीच हे असलं सिनेमा वगैरे पाहायला गेल्या नाहीत… मुळात जहागिरदारांच्या सुना विनाकारण घराच्या बाहेर पडतच नाहीत." ललिताबाईंचे डोळे रागाने लाल झाले होते.

"आणि हे असं… ड्रेस वगैरे घालून हिंडण फिरणं…! आमचा डोक्यावरचा पदर अजूनही तसाच आहे म्हटलं… थेरं म्हणणार नाही तर काय याला?" ललिताबाई चिडून बोलत होत्या.

"आई, तो काळ वेगळा होता आणि हा काळ वेगळा आहे… आजकालच्या मुली बघ जरा, मुली काय मोठ्या बायकाही बघ, सगळ्या कशा राहतात! अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामं करतात… तूच तेवढं स्वतःला आणि तुझ्या सुनांना घरात डांबून ठेवलं आहे." हेमंत त्यांची समजूत काढायचा प्रयत्न करत होता.

"आता उद्धट बोलायला लागला का तू? बाहेर जाताना विचारणं तर सोडं… वरून मलाच चालीरीती शिकवायला लागला का?" ललिताबाई गरजल्या.

"हे मात्र अतिच होतंय हां आई तुझं! आपल्या बायकोला बाहेर घेऊन जाण्यात कोणती रीत खराब होते…? तू चालीरितींच्या नावाखाली राधा वहिनीला, सायलीला नुसतं छळत असतेस… मला, दादाला हे काय दिसत नाही का? तुला उद्धट बोलायचं नसतं म्हणूच सगळे हे सगळं सहन करतात. आमच्या सगळ्या मित्रांचे कुटुंब एकमेकांना भेटतात, तुझ्यामुळे आम्हाला कुठे जायला मिळत नाही." हेमंतही आता चिडला होता. बोलता बोलता त्याचा आवाजही चढला होता.

अचानक ललिताबाईंना चक्कर आली आणि त्या तिथेच सोफ्यावर बसल्या… त्यांना बघून राधा तिथे धावत आली… सायलीही धावत त्यांच्याजवळ गेली… राधा त्यांच्या हाता-पायाचे तळवे स्वतःच्या तळहाताने घासून गरम करत होती… सायली त्यांच्यासाठी पाणी घेऊन आली. ललिताबाईंनी पाणी पिलं… थोड्यावेळाने त्यांना जरा बरं वाटलं.

"चला, दवाखान्यात जाऊन येऊ." हेमंत घड्याळाकडे बघत, थोडं रागानेच बोलला.

"काही गरज नाहीये त्याची… मला बरं वाटतंय." ललिताबाई

"हो! आता तुला बरं वाटणारच ना… आमचा जायचा सगळा वेळ बरोबर वाया घालवलास तू! मुद्दाम करतेस का हे सगळं?" हेमंत अजून चिडला होता.

"तुला जे समजायचं ते समज…!" असं बोलून ललिताबाई त्यांच्या खोलीत निघून गेल्या. हेमंतनेही तावातावाने पिक्चरचे तिकिटं फाडून टाकले… आणि तो रूममध्ये निघून गेला.

सायली मात्र राधाच्या गळ्यात पडली आणि तिने अश्रूंना तिची वाट मोकळी करून दिली.

क्रमशः