विषय-कौटुंबिक कथामालिका
धाकटी सून (भाग ७)
हेमंतने एम.बी.ए. च्या एन्ट्रन्सचा फॉर्म सायलीजवळ दिला होता.
"हेमंत, पण मला एम.एस.सी. करायचं होतं ना… एम.बी.ए करून मी काय करू…?" रात्री झोपायला आल्यावर सायलीची भुणभुण सुरू होती.
"सायली, मी थोडा वेगळा विचार करतोय." हेमंत
"काय…? सांगशील का काही?" सायली थोडी चिडून बोलली.
"हे बघ, तुला एम.एस.सी. करून पुढे रिसर्चमध्ये जायचंय… पण मला नाही वाटत की असं होऊ शकेल… कारण एम.एस.सी. इथे होऊन जाईल पण रिसर्चसाठी तुला कदाचित दुसरीकडे जावं लागेल… आईचा स्वभाव पाहता, ती तुला घराबाहेर शिकायला पाठवणे अवघडच आहे… त्यापेक्षा एम.बी.ए.चं कॉलेज आपल्या घराजवळच आहे आणि ते चांगल्या कॉलेजपैकीच आहे. त्यातल्या त्यात महिला महाविद्यालय! पुढे तुझ्या शिक्षणासाठी एक एक अडथळा कमी करायचा प्रयत्न करतोय, बाकी काही नाही… अजून दोन दिवस वेळ आहे… विचार कर, पटलं तर फॉर्म भर…" हेमंत बोलला आणि लाईट बंद करून झोपला. सायली हेमंतच्या बोलण्याचा विचार करत होती. रात्री कधीतरी उशिरा तिचा डोळा लागला.
सायली रोजच्यासारखी सकाळी उठली. तिने भराभर सगळं आवरलं. मनातली चलबिचल तिला राधासोबत बोलायची होती; राधा घरात एकमेवच तर होती जिच्यासोबत सायली अगदी मनातलं सगळं बोलू शकत होती… पण सकाळची सगळ्यांची घाई गडबड आणि त्यात ललिताबाईंचा धाक यामुळे राधासोबत तिचं बोलणं झालं नाही. सायलीच्या डोक्यात एक आयडिया आली आणि तिने मुद्दामच धुण्यासाठी जास्तीचे कपडे काढले.
"काय ग? आज चादर, बेडशीट, सोफ्याच्या खोळी… सगळं एकदम काढलंस धुवायला!" ललिताबाई पोथी वाचता वाचता सायलीकडे मोठे डोळे करून बघत बोलल्या.
"सासूबाई… ते… पावसाळा सुरू झाला ना आताच…! सध्या तेवढा पाऊस नाहीये… म्हणून म्हटलं मग कपडे धुवून घ्यावेत… पावसापाण्याचे कपडे लवकर वाळत नाहीत ना… आज जरा ऊनपण कडक आहे…" सायली घाबरत घाबरत बोलली.
"ठीक आहे… गरम पाण्यात भिजवा जरा… कपडे जरा स्वच्छ तरी निघतील." ललिताबाईंनी आपल्या करड्या आवाजात विनाकारण एक सल्ला दिला. सायलीने मान हलवून होकार भरला आणि कपडे घेऊन ती मागच्या अंगणात गेली. राधाही राहिलेलं आटोपून तिच्या मागे गेली.
"काय ग सायली? काय झालं? काय महत्वाचं बोलायचं…?" राधा
"तुम्हाला कसं कळलं?" सायलीने आश्चर्याने विचारलं.
"एवढी ओळखते ग मी तुला… बोलायला वेळ मिळावा म्हणूनच तर जास्तीचे कपडे भिजवलेस की…चल सांग बघू." राधा
सायलीने हेमंतने परिक्षा फॉर्म आणला इथपासून तो काय बोलला ते सगळं राधाला अगदी दबक्या आवजात सांगितलं.
"सायली हाता-तोंडाशी आलेला घास सोडू नकोस… पुढे शिकायला भेटतंय तर शिकून घे… यातूनही पुढे काही चांगलं होणार असेल हा विचार कर… आणि हेमंतभावोजी पण तेच शिकलेत ना एम.बी.ए. का काय ते…? त्यांची तुला अभ्यासातही चांगली मदत होईल." राधा आनंदाने बोलली.
"वॉव ताई! माझ्या तर हे लक्षातपण आलं नाही… थँक्यु! थँक्यु! थँक्यु…!" सायलीने आनंदाने राधाला मिठी मारली.
"पुरे पुरे… आता अभ्यास करायचा हो चांगला… आणि घरातल्या कामांच टेन्शन घेऊ नको… मी आहे ना! मी करेल सगळं…" राधा
"हो… राधाताई… माझ्या मोठ्या बहिणीनेही मला एवढा सपोर्ट केला नसता… खरंच खूप ग्रेट आहात तुम्ही!" सायलीचा आनंद अजून ओसंडून वहातच होता.
"माझं कधीकाळी पाहिलेलं अर्धवट स्वप्नं मी आज तुझ्या डोळ्यांत बघतेय… आणि ते स्वप्नं पूर्ण व्हावं म्हणून माझीही सगळी धडपड…" राधाने बोलता बोलता सायलीचा हात हातात घेतला. सायली तिच्याकडे बघून गोड हसली.
"माझं कधीकाळी पाहिलेलं अर्धवट स्वप्नं मी आज तुझ्या डोळ्यांत बघतेय… आणि ते स्वप्नं पूर्ण व्हावं म्हणून माझीही सगळी धडपड…" राधाने बोलता बोलता सायलीचा हात हातात घेतला. सायली तिच्याकडे बघून गोड हसली.
दुपारच्या वेळी सायलीने शांततेत परिक्षा फॉर्म भरला. संध्याकाळी हेमंत घरी आल्यावर सायलीचा आनंदी चेहरा बघून समजायचं ते समजून गेला.
"हेमंत, उद्या आठवणीने फॉर्म सबमिट कर हां." रात्री झोपण्यापूर्वी सायली तो फॉर्म हेमंतच्या बॅगमध्ये ठेवत बोलली.
"सायली… अजून एक… परीक्षा होईपर्यंत आईला याबद्दल काही बोलू नकोस." हेमंत
"का…? का बरं…?" सायली
"नको सांगू म्हटलं तर नको सांगू ना…" हेमंत
"पण अशी लपवाछपवी करायचीच कशाला? आणि आता जरी नाही सांगितलं तरी पुढे तर सांगावच लागेल ना?" सायली
"एवढे दिवस या घरात राहूनही तुला कळलं नाही का? सायली… सगळं वाटतं तेवढं सोपं नाहीये…लहानपणापासून बघत आलोय मी… तुला निव्वळ स्वतःला त्रास करून घ्यायचा असेल तर सांग खुशाल…" हेमंत थोडा चिडून बोलला.
"बापरे! आता अभ्यास, शिकणं हे पण लपूनछपून करायचं म्हणजे जरा अतिच होत नाही का? पण मला मुळीच पटत नाहीये हे… काय करावं? हेमंत एवढं सांगतोय म्हणजे खरंच तसं काही असेल का? कदाचित असेलही! आपल्या आईबद्दल कारणाशिवाय कुणी असं नक्कीच बोलणार नाही… सासूबाईंना सांगावं का सगळं? काय होईल? पुढे शिकू नको म्हणतील? पण शिक्षणाचे फायदे त्यांना पटवून दिले तर? तरी त्यांनी नकारच दिला तर मग? पण शिक्षण घेण्यात वाईट काय आहे? आपले विचार चांगले असले तर येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण चांगलं सांगू शकू ना! आई-बाबांची मदत घेऊ का यासाठी? नको… उगीच काही वाद झाला तर पुन्हा बाबांना टेंशन येईल… त्यापेक्षा मीच काहीतरी करते… काय करावं बरं?" सायलीच्या डोक्यात पुन्हा विचार सुरू होते.
तितक्यात हेमंतने सायलीला एक पुस्तक आणि काही नोट्स दिल्या.
"हे घे, तोपर्यंत वाचायला सुरुवात कर. वेळ मिळेल तसं वाचत जा आणि काही अडचणी असतील तर त्या लिहून ठेव म्हणजे त्या सॉल्व करायला बरं होईल." हेमंत बोलला आणि सायलीने मान डोलवली; पण तिच्या डोक्यातला विचारांचा भुंगा काही केल्या डोक्यातून जात नव्हता.
क्रमशः
©® डॉ. किमया मुळावकर
टीम-नागपूर
टीम-नागपूर