राज्यस्तरीय करंडक कथामालिका
विषय- कौटुंबिक कथामालिका
विषय- कौटुंबिक कथामालिका
धाकटी सून (भाग ८)
दुपारच्यावेळी सायलीला थोडाफार वेळ मिळायचा. त्या वेळात सायली अभ्यास करत होती. सासूबाईंना सगळ सरळ सरळ सांगून टाकावं असं तिला सतत वाटत होतं; पण ललिताबाईंची करडी नजर पाहिली की तिची घाबरगुंडी उडून जायची. आज बोलू उद्या बोलू असं करत ती एकेक दिवस पुढे ढकलत होती.
एक दिवस सायली दुपारी अभ्यास करत बसली होती. राधा तिच्यासोबत तिच्याच रूममध्ये बसली होती. तेवढ्यात ललिताबाई तिथे आल्या.
"राधा, इथे काय करताय तुम्ही दोघी?" ललिताबाई रागाने बोलल्या.
"सासूबाई… ते… आम्ही… " सायली पुढे बोलणारच तेवढ्यात राधा बोलायला लागली.
" सासूबाई, ते सायलीला मी थोडं विणकाम शिकवत होते." राधा एकादमात बोलली. त्या दोघींकडे रागाने बघून ललिताबाई तिथून निघून गेल्या.
"हे बघ सायली… हा असा एक खांब विणायचा… मग एक साखळी… पुन्हा हे असे दोन खांब आणि एक साखळी… कळलं? असाच एक राऊंड करून घ्यायचा..." राधा सायलीला क्रोशाचं विणकाम सांगत होती. ललिताबाई दाराच्या मागे उभं राहून एकत होत्या. त्या दोघींच बोलणं ऐकून, खात्री करून त्या तिथून गेल्या.
"राधाताई, मला हे पटतच नाही असं… आपण काय चुकीचं काम करतोय का? की काही चोरी चपाटी करतोय? तुम्ही मला खरं काय ते का सांगू दिलं नाही?" सायली बेचैन झाली होती.
"तू ना तुझा अभ्यास कर. भाऊजींनी सांगितलय ना, इकडे लक्ष देऊ नको." राधाने तिलाच दटावलं.
" तुम्ही दीर भावजय मिळून काय करायंच ते करा…" सायली पुटपुटली आणि अभ्यासाला बसली.
दिवस सरत होते. दुपारच्या वेळी, रात्री वेळ मिळेल तसा सायलीचा अभ्यास बरा सुरु झाला होता. सायलीला वेळ मिळावा म्हणून राधा घरातली बरीच कामं उरकून घेत होती. हेमंतही सायलीच्या अभ्यासातल्या अडचणी तिला समजावून सांगत होता. बघता बघता सायलीची परिक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली.
"हेमंत, अरे परवा पेपर आहे माझा आणि तू घरात काहीच बोलला नाहीस… पेपरला कसं जाणार मी?" सायलीने एवढूस तोंड करून हेमंतला विचारलं.
"आता तू त्याचा विचार करू नको… मी करतो म्हटलं ना तर करतो सगळं ऍडजस्ट… तू आता पटापट रिविजन करून घे." हेमंत तिला समजावून सांगत होता; पण सायलीच्या डोक्यात मात्र तिला परीक्षा द्यायला मिळते की नाही तेच सुरू होतं.
दुसरा दिवस उजाडला आणि नेहमीप्रमाणे कामाच्या राड्यात संपत आला. संध्याकाळी हेमंत ऑफिसमधून आला.
"आई, सायलीच्या बाबांचा फोन आला होता; खूप दिवसांत सायली माहेरी गेली नाही तर त्यांनी बोलावलं आम्हा दोघांनाही…" चहा घेत तो ललिताबाईंसोबत बोलत होता.
"मग…?" ललिताबाई
"मग… मग काही नाही… मी म्हटलं मला वेळ नाहीये… तर ते म्हणाले की एखादा दिवस तरी येऊन जा…वाटलं तर मी विहिणबाईंना फोन करून त्यांची परमिशन घेतो." हेमंत शब्दांची जुळवाजुळव करत बोलत होता.
"मग…?" ललिताबाई
"मग… मग मी म्हटलं की आमची आई खूप चांगली आहे हो… असं परमिशन वगैरे घ्यायची गरज नाहीये… मलाच वेळ नाहीये… पण तुम्ही एवढ्या आग्रहाने बोलवताय तर उद्या सकाळी येतो आणि संध्याकाळी परत निघू आम्ही, तसंही दोन तासांवर तर आहे सायलीचं माहेर…" हेमंत एका दमात बोलला.
"ठीक आहे… जाऊन या…" ललिताबाई म्हणाल्या आणि हेमंत खूप खुश झाला. सायलीच्या चेहऱ्यावर मात्र टेन्शन होतच.
रात्री झोपण्यापूर्वी सायली दुसऱ्यादिवशी परीक्षेची तयारी करत होती.
"हेमंत, परत खोटं बोललास तू!" सायली पर्समध्ये हॉल तिकीट टाकत बोलली.
"काय करू मग? तुला माहिती सायली या सगळ्यावर एक खूप सोपा उपाय आहे… आपण आपलं वेगळं राहणं… पण कसं आहे ती जन्मदेती माय आहे तिला असं सोडू नाही शकत आणि तू माझी बायको आहेस… तुझी स्वप्नं पूर्ण करायला मदत करायची जबाबदारी माझी आहे… दोन्ही गोष्टींची सांगड घालायचा प्रयत्न करतोय मी; म्हणून सध्या जे जसं आहे तसंच राहू दे… पुढचं पुढे बघू… आता कसलाही विचार न करता उद्याची परिक्षा दे." हेमंतने सायलीची समजूत काढली.
दुसऱ्यादिवशी हेमंत आणि सायली लवकरच घराबाहेर पडले. सायलीची परिक्षा आटोपली. त्यानंतर दोघे मस्त बाहेर फिरले. पिक्चर पाहिला, छानपैकी बाहेर जेवण केलं, मस्त मजा केली. लग्नानंतर सायली पहिल्यांदाच अशी बाहेर आली होती. खूप दिवसांनी असं हिंडून-फिरून सायली खूप आनंदीत झाली होती. हेमंतसोबत तिला एकांत मिळाला होता. खरंतर हा दिवस संपूच नये असं सायलीला वाटत होतं. संध्याकाळनंतर दोघे परत घरी यायला निघाले. तेव्हा मात्र दिवसभरातल्या गमती-जमती कधी एकदा राधाला सांगते असं सायलीला वाटत होतं. दोघेही घरी आले. सायलीने आनंदातच दारावरची बेल वाजवली. राधाताई दरवाजा उघडायला येतील असं सायलीला वाटलं; पण ललिताबाईंनी दरवाजा उघडला.
"अरे वा! आलात का? या… सायली, बघ बरं कोण आलंय ते…!" ललिताबाई अगदी हसून बोलल्या.
ललिताबाईंच्या अशा बोलण्याचं सायलीला आश्चर्य वाटलं आणि सोबत थोडी भीती देखील वाटली. हेमंत आणि सायली दोघे घरात आले.
समोरचं चित्र बघून सायलीच्या पोटात भीतीने गोळाच आला.
ललिताबाईंच्या अशा बोलण्याचं सायलीला आश्चर्य वाटलं आणि सोबत थोडी भीती देखील वाटली. हेमंत आणि सायली दोघे घरात आले.
समोरचं चित्र बघून सायलीच्या पोटात भीतीने गोळाच आला.
"आई-बाबा! तुम्ही!" सायली पुटपुटली.
सायलीच्या आई-बाबांना असं समोर बघून हेमंतही चपापला. स्वतःचच खोटं बोललेलं इतक्या लवकर अंगाशी येईल असं त्याला वाटलंसुद्धा नव्हतं. सायलीला तर आई-बाबा भेटायला आले या आनंदापेक्षा आता सासूबाईंची काय प्रतिक्रिया राहील याचंच टेन्शन आलं होतं. सायलीचा चेहरा अगदी एवढूसा झाला होता.
क्रमशः
डॉ.किमया मुळावकर
टीम-नागपूर
टीम-नागपूर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा