Login

धाकटी सून (भाग ९)

कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत आपली स्वप्न पूर्ण करणाऱ्या सुनेची कथा


राज्यस्तरीय करंडक कथामालिका
विषय - कौटुंबिक कथामालिका

धाकटी सून (भाग ९)

"सायली, काय झालं? आई-बाबांना बघून आनंद नाही झाला का?" ललिताबाईंनी मुद्दामच विचारलं.

"आनंद झाला ना… त्यापेक्षा धक्काच जास्त बसला…" सायली तिच्या आईजवळ जात बोलली.

"सायले, अग इथं एक चांगले हार्टचे डॉक्टर आहेत म्हणतात, डॉ.मोरे… त्यांच्याकडे एकदा बाबांना दाखवून घ्या असे आपले डॉक्टर म्हणाले… मग काय, म्हटलं तुझी भेटही होईल आणि बाबांचं चेक-अप पण होईल… सायली, खरंतर आधी दवाखान्यात जाऊन मग परत जाता जाता तुला भेटून जाणार होतो; पण त्या डॉक्टरांकडे फोनवर नंबर लागत नाही, तिथे जाऊनच नंबर लावावा लागतो… सकाळी जेवढ्या लवकर जाऊ तेवढ्या लवकर नंबर लागतो… म्हणून मग मुक्कामी इकडे आलो… विहीणबाई, आमच्यामुळे तुम्हाला उगीचच त्रास होतोय." सायलीची आई

"हे काय बोलताय तुम्ही सायलीच्या आई? अहो त्रास कसला त्यात? तसंही आपल्या मुलीच्या संसारात आई-वडिलांनी डोकवावं जरा म्हणजे आपली मुलगी आनंदात आहे का नाही, मुलीचं तिच्या संसारात मन रमतं की नाही ते कळतं…" ललिताबाई नेमकं सरळ बोलत होत्या की उलटं बोलत होत्या ते सायलीला आणि तिच्या आई-बाबांना कोणालाच कळत नव्हतं.

सायलीचे आई-बाबा मुक्कामी तिथे राहिले आणि दुसऱ्यादिवशी सकाळी लवकर उठून,सर्व आटोपून दवाखान्यात जाण्यासाठी निघाले.

"बरं विहीणबाई, सायली, हेमंतराव येतो आम्ही. दवाखान्यातून परस्पर गावी जाऊ." सायलीचे बाबा

"असं कसं व्याहीबुआ, परत इकडेच या… रहा की लेकीकडे दोन-चार दिवस." ललिताबाई

"यावेळी नको, पुन्हा येऊ पुन्हा कधीतरी… " सायलीची आई बोलली आणि दोघेजण निरोप घेऊन निघाले.
सायलीच्या डोळ्यांत आसवांची गर्दी जमा झाली होती. आई-बाबांसोबत दवाखान्यात जायची तिची खूप इच्छा होती; पण कोणाला काहीच न बोलता ती गप्प राहिली. खरंतर ललिताबाईंच्या वागण्याचं तिला खूप आश्चर्य वाटत होतं. सायलीचे आई-बाबा आल्यापासून त्यांच वागणं-बोलणं अगदी विरुध्द टोकाचं होतं. सायलीच्या आई- बाबांसमोर त्या आपल्या सुनांसोबत अगदी प्रेमाने बोलत होत्या. स्वयंपाक करताना, जेवताना त्यांनी कोणत्याच प्रकारची कुरबुर केली नव्हती. एरवी जेवण झाल्यावर आपलं ताटही न उचलणाऱ्या ललिताबाईंनी जेवण झाल्यावर सगळी आवराआवर करू लागली होती. स्वयंपाकातही स्वतःच्या हाताने गोड शिरा केला होता. सायलीच्या आई-बाबांजवळ आपल्या दोन्ही सुनांबद्‌दल अगदी भरभरून बोलत होत्या, सुनांचं कौतुक करत होत्या. सायलीचे आई-बाबा अगदी समाधानाने लेकीच्या घरून गेले होते.

"काल सासूबाई जे वागल्या ते खरं की नेहमी जे वागतात ते खरं!" सायली आपल्या आई-बाबांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत विचार करत होती. एवढ्यात ललिताबाईंनी हेमंतला आणि सायलीला आवाज दिला. त्यांच्या आवाजाने सायलीची तंद्री भंगली आणि छातीत एकदम धडकी भरली .

"सासूबाई, काल आम्ही माझी परिक्षा द्यायला गेलो होतो. मला पुढे शिक्षण घ्यायचं आहे आणि स्वतःच्या पायावर उभं रहायच आहे. त्यासाठी कालची परिक्षा देणं आवश्यक होतं." सायली ललिताबाईंच्या समोर आली आणि त्यांनी काही बोलायच्या आत स्वतःच सगळं एका दमात बोलून गेली.

"म्हणजे बाहेर पडायचं आहे तर! जहागिरदारांच्या सुना उंबरा ओलांडत नाहीत, कळलं?" ललिताबाई अगदी कडक आवाजात बोलल्या.
सायलीच्या हातापायाला कंप सुटला होता; पण तिने स्वतःला सावरलं.

"हा, असा धाक दाखवून किती दिवस सुनांना घरात कोंडायच?" सायलीने ललिताबाईंना प्रश्न विचारला आणि त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली.

"हेमंत… सांग तुझ्या बायकोला… चोर तर चोर वरून शिरजोर… स्वतः चुका करतेय, खोटं बोलून काल परिक्षा द्यायला गेली आणि वरतून मलाच उलटे प्रश्न विचारतेय." ललिताबाई गरजल्या.

"आई… सायली खोटं बोलली नाही… मीच खोटं बोललो तुझ्यासोबत… आणि तसंही खरं बोललो असतो तर तू असाच धिंगाणा घालून तिला परिक्षा देऊ दिली नसती." हेमंतने सायलीची बाजू सावरली.

"वा रे! झाला का लगेच बायकोचा बैल! आता मला उत्तरं दे तू पण!" ललिताबाई

"आई, तू विषय कुठल्या कुठे नेतेय…" हेमंत

"मी विषय कुठल्या कुठे नेतेय, का तुम्ही घरण्याचे संस्कार, परंपरा, चालीरीती वेशीवर टांगताय?" ललिताबाई

हेमंत यावर काही बोलणार, तोच सायलीने त्याला थांबवलं.

"मान्य आहे, या घराचे काही नियम आहेत; पण काळाप्रमाणे त्यात बदलही करायला हवेत. हा काळ वेगळा आहे, आधीसारखं पुरुषाने कमवायचं आणि स्त्रीने फक्त रांधा वाढा, उष्टी काढा यातच अडकून राहायचं असा नाहीये. स्त्री अवकाशातही जाऊन आलीये हो; पण आपले इथले ग्रहणच अजून सुटले नाहीयेत. आज स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहणं ही काळाची गरज आहे, भविष्य कसे असेल कोणालाच माहिती नाही; आपण जर स्वतःच्या पायावर उभे असू तर नक्कीच ते सोयीचे राहील." सायली

"हे असलं बोलणं ना भाषणात शोभतं बरं… इथं राहायचं असेल तर मी म्हणेल तेच आणि तसंच झालं पाहिजे; नाहीतर दरवाजे उघडेच आहेत…" ललिताबाई

"ठीक आहे. आम्ही इथे राहू नये अशी तुझी इच्छा असेल तर आम्ही आताच हे घर सोडून जातो, चल सायली…" हेमंतने ललिताबाईंना बोलता बोलता सायलीचा हात पकडला.

"हेमंत, आपण कुठेही जाणार नाहीयेत… आपण इथेच राहणार आहोत… मी पण इथेच राहून शिकूनही दाखवणार आणि स्वतःच्या पायावर उभी राहूनही दाखवणार." सायली आत्मविश्वासाने बोलली.

"मी पण बघतेच! कसं होतं ते सगळं… या घराची मालकीण मी आहे आणि मी म्हणेल तेच होईल." ललिताबाई अगदी कडक आवाजात बोलल्या आणि आपल्या रूममध्ये निघून गेल्या.

राधा बिचारी सगळा प्रसंग अगदी जीव मुठीत धरून बघत होती.
"सायली बोलली ते खरंच करून दाखवेल की नेहमीप्रमाणे सासूबाईंचाच विजय होईल… ही बदलावाची नांदी तर नाहीये ना! आणि तसं असेल तर किती बरं होईल… माझ्यासाठी नाही, माझ्या मनुसाठी… बिचारीला एवढ्या लहान वयातही सासूबाई मुलगी म्हणून दुय्यम वागणूक देतात… माझ्या मनुच्याही स्वप्नांचे दरवाजे त्यामुळे उघडले जातील… देवा, सायलीला यश दे." राधाने मनोमन प्रार्थना केली.

क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर
टीम- नागपूर

🎭 Series Post

View all