Login

धम्माल पुनर्जन्माची .......(भाग 8)

सुमन च्या रूपाने ग्रामीण भागाचा त्या काळातील मागोवा घेण्याचा केलेला प्रयत्न...

मागील भागात आपण पाहिलं,तुळशीबागेत राम मंदिर मात्र आहे तसं शांत सात्विक पाहून या पाच मैत्रिणी क्षणभर विसावल्या. संजू ने दिलेली तुळशीबाग सफर यांना खूप आवडली आणि काही बदल पाहून मन हळवे देखील झाले पण म्हणतात ना कालाय तस्मै नमः



आता सर्व जनी निघाल्या सुमन च्या घरी.पुण्यापासून दूर जुन्नर तालुक्यातील बागायती गावात असलेला टुमदार बंगला पाहूनच सगळ्या हरकल्या. गोदा हसतच म्हणाली,"सुमे किती छान ,परसदारी सुद्धा किती झाड आहेत,सगळं कसं हिरवं निर्मळ अगदी कवितेतल्या सारखं.काशीसुद्धा हसली,"हो!प्रसन्न वाटल खूप इथे.सुमन मात्र डोळे भरून पहात होती त्या वास्तूला.सुमन आणि दिनकरचे नाव बंगल्यावर झळकत होते.सुमे,रंगू बोलली मुलां ,नातवंडांनी जाण ठेवली हो!सुमन मात्र हरवली होती भूतकाळात........यमू जवळ जात हळूच पाठीवर हात फिरवत म्हणाली,"सुमे,बोल..बोलावं ग माणसाने घडाघडा आणि तू तर शिक्षिका होतीस ना!सुमनने डोळे पुसले,"मैत्रिणींनो ही समोर दिसतेय ती वस्तू साक्ष आहे माझ्या व दिनकर च्या स्वप्नपूर्तीची,दिनकर रावानी मला दिलेल्या आदर आणि प्रेमाची.एक रांगडा,शेतकरी माणूस आतून मात्र मऊ गोड अगदी नारळाच्या पाण्यासारखा.....





सुमनने आता मनाला भूतकाळात पूर्ण सोडून दिले,तुला आठवत यमे साधारण 1945 ला आपण इंटर झालो,आणि मग तुमची लग्न पाठोपाठ झाली.माझे कुटुंब खानदानी मराठा,मला इतकं शिकवलं ते काकांनी अगदी माझ्या आबांचा विरोध असून सुद्धा.आजी तर म्हणायची कोण करेल एवढ्या शिकलेल्या पोरीशी लग्न?नाकापेक्षा मोती जड.... आजीच ते बोलणं म्हणजे समाजातील वास्तव आहे,हे मला लवकरच कळून चुकले.अनेक स्थळांकडून मुलगी इंटर पास आहे हे ऐकूनच नकार यायचा ग!!!आता मात्र आई आबा आणि आजी काकाला बोलायच्या खूप.तशातच जुन्नर कडील हे स्थळ आलं.100 एकर जमीन ,गायी म्हशी आणि मोठा बारदाना. परिवारात मोठे घराणे म्हणून प्रसिद्ध.अट फक्त एकच होती ,मुलीने खेड्यात रहावे.. इतके नकार ऐकून आबा वैतागले होते.काका मात्र विरुद्ध होते या लग्नाच्या.तरीही मी होकार दिला...आता आपले आयुष्य गायी गोठा,शेती यातच जाणार.लग्न झालं,नऊवारी सांभाळत अंगावरचे प्रचंड दागिने घालून आलेली मी,मला खरतर खूप बोलायचे होते.आता सगळे मनातच राहणार...दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता दारावर थाप पडली,सूनबाय उटा, आव देवाच्या दर्शनाला जायचं हाय!दरवाजा उघडला.एक सुंदर ठेंगणी सुबक आजी,म्या बायजा!आवरा बिगी बिगी.मी शक्य होईल तेवढे लवकर आटोपले.दागिने घालून बाहेर आले.तेव्हा बाहेर पाच बैलगाड्या जुंपून तयार.आता यात बसणार कसे?तेवढ्यात माझ्या सासूबाई पुढे आल्या,बायजा ! बायजा लगेच एक खुर्ची घेऊन आली.सूनबाय यावर पाय ठिवून चढा, आव आमाला पण येत नव्हतं ,आणि त्या गोड हसल्या.सारजाक्का!माझ्या सासूबाई .गाड्या निघाल्या. मी मात्र यांना शोधत होते.जाताना शिवार दिसत होतं.गाव पाहून माझं मन हरकून गेलं.सुंदर पाऊलवाटा, हिरवे मळे,पाटाने वाहणारे पाणी,जराशी अक्कडबाज पण मनाने छान माणसे.देव दर्शन झाले,सगळे घरी आलो.स्वयंपाकघरात मात्र घाबरायला झालं.तेवढ्यात बायजा आली,आव म्या हाये ना मदतीला.तुमी फकस्त सांगा काय काय करायचं हाय?बायजा माझ्याच वयाची. मला एक नवी मैत्रीणच मिळाली.



हळूहळू मी रमू लागले.दिनकर त्या काळात सातवी पास..त्यांना शिकायची खूप हौस पण...आजीने बाहेर पाठवायला नकार दिला.माझ्याशी छान बोलायचे.माझे सासरे तर देव माणूस.पण....या सुंदर चित्राला नजर लागली.कूळ कायदे आले,जमिनी जाऊ लागल्या,भाऊबंदकी सुरु झाली...100 एकरवरून जमीन 20 एकर उरली.तीसुद्धा पाणी नसलेली.तेवढ्यात तो प्रसंग घडला....ज्याने आमचं सगळ्यांचं आयुष्य बदलून गेले.





लग्नाला पाच वर्षे झाली,पण मुलं नव्हतं मला.खेड्यातल्या त्या बायका सासूबाईंना आडून आडून विचारायच्या. इतकंच काय दिनकर चे दुसरे लग्न कर म्हणायच्या.आक्का मात्र खमक्या होत्या,तरीही हे बदल मला कळत होते,डोहाळे सारख्या कार्यक्रमात  आक्काला एकटीला बोलावले जायचे.दिनकर सुद्धा खूप समजावे मला.तेवढ्यात बायजे कडे गोड बातमी आली.तिला मुलगा झाला.बायजेच्या सासूने तिला सांगितलं आता वाड्याव काम करू नग.पाटलांची सून वांझोटी हाये!!पण बायजा ऐकत नसे,बाळाला खुशाल माझ्याकडे देई.एकदा मी मळ्यात गेले होते.तेवढ्यात बायजा पळत येताना दिसली.वैनी!!!मी पळतच तिच्याकडे गेले.वैनी माझा धोंडू!!!काय झालं बायजा???चल लवकर घरी.मी घरी आले.धोंडूच्या तोंडातून फेस आलेला.तेवढ्यात म्हातारी पूड आली,मी विचारलं काय झालं??तेव्हा एक छोटा पोरगा म्हणाला,ह्ये बघा या पुड्यातली पावडर चाटली. मी कागद वाचला,धोंडूला उचलला,जोरात ओरडले अहो बुलेट  चालू करा ,बायजे जुन्नरला ये मागणं. दिनकरने अर्ध्या तासात गाडी दवाखाण्यात नेली.मी डॉ.ना सगळं सांगितलं.तातडीने उपचार सुरु झाले.मागची मंडळी पोहचेपर्यंत धोंडू वाचला.डॉ.बायजेच्या सासूला म्हणाले,हि पोरगी शिकलेली होती म्हणून नातू वाचला तुझा.बायजेच्या सासूने तोंडावरून हात फिरवत आशीर्वाद दिला परमेश्वरा माझ्या बायला काय कमी पडणार न्हाई.धोंडू घरी आला आणि मला उलट्या सुरु झाला.बायजेच्या सासूने स्वतः माझी हौस पुरवायला सुरुवात केली.एकदा त्या हळूच सारजाक्का ला म्हणाल्या, आक्का आव तुमी बोला ना!सुमन काय न्हाई म्हणायची नाय.मी बाहेर आले.काय हो?काय विचारायचं?सारजाक्का सुद्धा जरा चाचरत म्हणाल्या,"सुमन आपुन गावात शाळा काडू या का?काय!!!!आक्का आहो माझ्या मनातलं बोललात तुम्ही.त्या दोन म्हाताऱ्यानी तन, मन आणि धन सुद्धा दिलं शाळेसाठी पण?????आता शिक्षक कुठून आणायचे या आड गावी.मग दिनकर एक दिवस मला म्हणाले,"सुमन तू का नाही शिकवत गावातल्या शाळेत???मी अशी अवघडलेली, शिवाय ट्रेनींग कोर्स लागतो त्याला.त्यासाठी पैसे लागतील.आपण दुसरे शिक्षक शोधू.दुसऱ्या दिवशी आक्का ने मला आवाज दिला,सुमी बाहेर ये!!काय आक्का?तर माझ्या या सासूने दागिन्यांचा डबा हातात ठेवला.एवढ पुरत्याल ना?अहो कशाला पण??आग ते मास्तरणीचा कोरस करायला?काल आईकल मी.ते काय नाय तू हा कोरस करायचा ....माझ्या आई वडिलांच्या सुद्धा जो विचार केला नव्हता तो माझ्या नवऱ्याने आणि सासूबाईंनी केला.मला शिक्षिका म्हणून उभं केलं.





पंचक्रोशीत आजही प्राचार्या सुमन पाटील प्रसिद्ध आहेत पण त्यामागे दिनकर पाटलांच्या भक्कम पाठबळाचा हात होता ग.......आता दिसतो हा बंगला आम्ही हौसेने बांधायला घेतला आणि त्याचवर्षी दिनकर गेले...एवढ्यात आतून आरडा ओरड ऐकू येऊ लागली,सगळ्या आत गेल्या,सुमनचे दोन्ही नातू आता तिथे रहात होते.काहीतरी भांडण चालू होते.....ते काही नाही तू जाणार नाहीस..तेवढ्यात सुमनच्या नाताची मुलगी समोर आली,का???ती तुमची सून आहे म्हणून??अहो बाबा सुमन आजीला काय वाटेल??जाऊ द्या दादा वहिनीला दोन वर्षे शिकायला...





काय असेल हे भांडण???सुमनचा वारसा चालू असेल का पुढे????जाणून घेऊ पुढच्या भागात.


0

🎭 Series Post

View all