ओढ
पहाटेची वेळ होती. अजून पक्ष्यांचा किलबिलाटही सुरू झाला नव्हता, पण खंडू आणि सजूची तयारी झाली होती. धनगर वस्तीवर एक प्रकारची शांतता पसरली होती, जी एखाद्या वादळापूर्वी असते. आक्काने खंडूच्या झोळीत दोन बाजरीच्या भाकरी आणि कांदा बांधून दिला होता. तिच्या डोळ्यांत पाणी होतं, पण ती बोलली काहीच नाही.
"आक्का, मेंढरांकडं लक्ष दे. राघूला वेळच्या वेळी खायला घाल," खंडूने शेवटची सूचना दिली आणि तो सजूच्या वडिलांसोबत चालू लागला.
एसटी स्टँडवर पोहोचल्यावर त्यांना शहराकडे जाणारी पहिली बस मिळाली. खिडकीतून मागे सुटणारा आपला माळ, डोंगर आणि लांबवर दिसणारी आपली पालं बघून खंडूचं मन भरून आलं.
सजू त्याच्या बाजूच्या सीटवर बसली होती. तिने आपला पदर डोक्यावरून घेतला होता. शहरातल्या अनोळखी जगाची भीती तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होती.
दोन तासांच्या प्रवासानंतर ते शहराच्या सीमेवर पोहोचले. चहूबाजूला सिमेंटचे अर्धवट उभे असलेले सांगाडे, उंच क्रेन आणि कानाचे पडदे फाडणारा मशिनचा आवाज. माळावरच्या शांततेत राहणाऱ्या या दोन जीवांना हे जग एखाद्या नरकासारखं वाटलं.
"चला रे, कामाला लागा! वेळ वाया घालवू नका," मुकादमाने ओरडून सांगितलं.
खंडूच्या हातात एक मोठी हातोडी देण्यात आली. त्याला दगड फोडून त्याची खडी करायची होती. तर सजूला त्या खडीच्या पाट्या वाहून ट्रकपर्यंत न्यायच्या होत्या. रणरणतं ऊन डोक्यावर होतं. माळावरचं ऊन सुखद वाटायचं, कारण तिथे वारा सोबतीला असायचा. पण इथे शहरातल्या सिमेंटच्या भिंतींमुळे वाफ बाहेर येत होती.
दुपारपर्यंत खंडूचे हात रक्ताळले होते. त्याला मेंढरांच्या लोकरीसारखे मऊ स्पर्श करायची सवय होती, आज दगडांशी झुंज द्यावी लागत होती. पण जेव्हा तो लांबून सजूला पाहायचा, तेव्हा त्याचा थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. सजू सुद्धा उन्हात काळी पडली होती, पण तिने एकदाही तक्रार केली नाही.
दुपारी जेवणाच्या सुट्टीत ते एका लिंबाच्या झाडाखाली बसले.
"खंडू, तुझे हात बघ किती सोललेत," सजूने काळजीतून त्याचा हात हातात घेतला.
"काही नाही ग सजू, हे तर फक्त ओरखडे आहेत. एकदा का सावकाराचे पैसे झाले की आपण मुक्त होऊ. मग तुला असं उन्हात काम करायला लावणार नाही मी," खंडूने तिला धीर दिला.
पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता. संध्याकाळी जेव्हा ते घरी परतण्याची तयारी करत होते, तेव्हा सजूचे वडील, सयाजी तात्या तिथे आले. त्यांच्या सोबत एक पांढरा शर्ट घातलेला तरुण मुलगा होता. त्याला पाहून खंडूच्या काळजाचा ठोका चुकला.
"सजू, हा बघ 'अविनाश'. शहरातल्या मोठ्या कारखान्यात सुपरवायझर आहे. आपल्या पाहुण्यांनी सुचवलेलं स्थळ आहे हे," तात्यांनी ओळख करून दिली.
अविनाश दिसायला टापटिपीचा होता. त्याचे हात खंडू सारखे रापलेले नव्हते. तो सजूकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत होता.
"नमस्ते सजू. तात्यांनी तुमच्याबद्दल खूप सांगितलं होतं. तुम्ही इथे कामाला येता हे माहीत नव्हतं, नाहीतर मी आधीच काहीतरी मदत केली असती," अविनाश मोठ्या थाटात म्हणाला.
सजूने मान खाली घातली. खंडू तिथेच उभा होता, पण अविनाशने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. खंडूला स्वतःची उणीव प्रकर्षाने जाणवली.
एकीकडे तो स्वतः होता—ज्याचं घर नाही, ज्याचं शिक्षण नाही आणि ज्याच्याकडे फक्त घाम आणि कष्ट आहेत. दुसरीकडे अविनाश होता—ज्याला समाजाच्या नजरेत 'मान' होता.
"तात्या, आपण घरी गेल्यावर बोलूया का?" सजूने कसाबसा शब्द फोडला.
"हो, चल. अविनाश सुद्धा आपल्या वस्तीवर येणार आहे आज. त्याला आपलं राहणीमान बघायचंय," तात्या उत्साहात म्हणाले.
खंडू मागे राहिला. त्याने आपली हातोडी पुन्हा एकदा हातात घेतली. त्याला वाटलं, हे दगड फोडणं सोपं आहे, पण हे जे नशिबाचे दगड आडवे येत आहेत, त्यांना कसं फोडणार?
वस्तीवर परतल्यावर वातावरण बदललं होतं. अविनाशच्या स्वागतासाठी तात्यांनी गडबड सुरू केली होती. खंडू आपल्या पालासमोर बसून राघूच्या डोक्यावरून हात फिरवत होता. राघूने खंडूचा हात चाटला, जणू तो म्हणत होता, "धनी, मी आहे ना तुझ्यासोबत."
रात्रीच्या अंधारात खंडूने पाहिलं, सजू अविनाशशी बोलत होती. ते काय बोलत होते हे त्याला ऐकू येत नव्हतं, पण सजूचा चेहरा अस्वस्थ होता.
खंडूच्या मनात एक विचार आला—'जर सजूला खरंच सुखाचं आयुष्य हवं असेल, तर ती या शहरातल्या मुलासोबत सुखी राहील.. की माझ्यासारख्या भटक्यासोबत तिचं आयुष्यही चिखलात जाईल?'
हा विचार त्याला आतून खात होता. पण त्याच वेळी, सजूने लांबून त्याच्याकडे पाहिलेलं ते एक क्षण... त्या नजरेत विश्वास होता... खंडूला समजल नाही ती का बघत होती त्याच्याकडे...पण तिच्या नजरेत अस काही होत खंडू ला अस्वस्थ करून गेलं..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा