रानफुल
माळावरचा पाऊस आणि सुरांची साद
सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक छोटं गाव आणि गावाला लागून असलेला अथांग पसरलेला माळ.
आकाश तांबूस झालं होतं. ढग दाटून आले होते. खंडू आपल्या मेंढरांचा कळप घेऊन डोंगराच्या उतरणीला लागला होता. हातातील काठीचा जमिनीवर पडणारा टप-टप आवाज आणि गळ्यातील घुंगरांचा मंजूळ नाद यात एक वेगळीच लय होती.
खंडूचं आयुष्य म्हणजे एक वणवण. वयाची पंचविशी गाठलेला खंडू दिसायला रांगडा, उन्हातान्हात रापलेलं शरीर, पण डोळ्यांत कमालीची निरागसता. त्याचं संपूर्ण जग म्हणजे त्याच्या दोनशे मेंढरं आणि त्याची म्हातारी आई. धनगर समाजात जन्माला आल्यामुळे 'भटकंती' त्याच्या पाचवीलाच पुजलेली. आज इथे, तर उद्या तिथे. स्वतःचं पक्कं छप्पर नाही की जमिनीचा तुकडा नाही. पण तरीही, खंडूच्या चेहऱ्यावर एक अजब समाधान असायचं.
"अरे ए... चल की पुढं!" खंडूने आपल्या लाडक्या 'राघू' नावाच्या कुत्र्याला आवाज दिला. राघूने एकदा जोरात भुंकून प्रतिसाद दिला आणि विखुरलेल्या मेंढरांना एकत्र केलं.
तेवढ्यात पावसाचा पहिला थेंब खंडूच्या गालावर पडला. मातीचा तो ओला सुगंध दरवळला. खंडूने आकाशाकडे बघून मातीचा सुगंध श्वासात भरून घेत एक सुस्कारा सोडला. हा पाऊस म्हणजे त्यांच्यासाठी दुधारी तलवार असायची. पाऊस आला की चारा मिळतो, पण रात्रीच्या वेळी उघड्या माळावर भिजत राहणं आणि आपल्या मेंढरांची थंडीपासून रक्षा करणं हे मोठं आव्हान असतं.
"खंडू ... येss खंडू !" मागून एक सुबक साद आली.
खंडूने वळून पाहिलं. ती सजा होती. सजू म्हणजे त्यांच्याच टोळीतल्या एका धनगर कुटुंबातलीच सोळा वर्षाची मुलगी होती . तिचे वडील आणि खंडूचे वडील जुने मित्र. सजू दिसायला साधी, पण तिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. डोक्यावर गवताची पेंढी घेऊन ती वेगाने चालत येत होती.
"सजू, तू अजून इथंच? अंधार पडायला लागलाय, घरी निघ की," खंडू हातातल्या काठीने मालावरचा एक खडा उडवित काळजीने म्हणाला.
"काय करणार , आज जरा जास्तच लांब आले होते. अन हा पाऊस पण आताच यायचा होता," सजू हसत म्हणाली. तिचं हसणं म्हणजे जणू माळावर उमललेलं रानफूल.
खंडू आणि सजू एकत्र चालू लागले. धनगर समाजात जगण्यासाठी लागणारा संघर्ष खूप मोठा असतो. दरवर्षी पावसाळा संपला की हे लोक आपल्या घरादाराचा त्याग करून शेकडो मैल दूर चाऱ्याच्या शोधात जातात. यालाच ते 'वारी' किंवा 'स्थलांतर' म्हणतात. सहा-आठ महिने उघड्यावर संसार, वाघा-बिबट्याची भीती आणि पावसापाण्याची मारामार. तरीही, या लोकांच्या ओठावर नेहमी ओव्या आणि लोकगीतं असतात.
"सजू, यावेळेस वारीला कुठे जाणार तुमचं कुटुंब?" खंडूने विचारलं.
सजूचा चेहरा थोडा पडला. "बाबा म्हणतात यावेळेस कोकणाच्या बाजूला उतरायचं. पण मला भीती वाटते खंडू. गेल्या वेळेस पावसाने खूप हाल केले होते. आपली जनावरं दगावली की काळजात धस्स होतं."
खंडू थांबला. त्याने सजूच्या डोळ्यांत पाहिलं. "संघर्ष तर पाचवीलाच पुजलाय ग आपल्या. पण जोवर हातातील काठी आणि मनात विठ्ठलाची भक्ती आहे, तोवर आपल्याला काय होतंय? आपण धनगर आहोत, कष्ट करणं आपल्या रक्तात आहे."
सजू फक्त हसली. तिला माहीत होतं की खंडू जे बोलतोय ते खरं आहे. त्यांच्या आयुष्यात मूलभूत गरजांची—म्हणजे चांगल्या घराची, शिक्षणाची, पक्क्या अन्नाची—नेहमीच वानवा असते. पण या निसर्गाच्या कुशीत त्यांना जे स्वातंत्र्य मिळतं, ते शहरातल्या महालातही नसेल.
पाऊस आता जोरात सुरू झाला होता. खंडूने आपली घोंगडी (कंबळ) काढली आणि अर्धी सजूच्या डोक्यावर धरली. त्या एका घोंगडीखाली दोन जीव पावसापासून वाचण्याचा प्रयत्न करत होते. हा स्पर्श, ही जवळीक त्यांच्यासाठी नवीन नव्हती, पण आज काहीतरी वेगळं होतं. दोघांच्याही मनात प्रेमाची एक हळवी पालवी फुटत होती, ज्याची कल्पना कदाचित समाजाला आणि त्यांच्या नशिबाला अजून नव्हती.
"घरी चल सजू, आई वाट पाहत असेल," खंडू हळूवार आवाजात म्हणाला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा