Login

धार्जिणं

कथा बदलत्या नात्यांची


धार्जिणं..


" अग ए.. थांब जरा.." रस्त्याने चालणाऱ्या सुमेधाला कोणीतरी हाक मारली म्हणून ती थांबली. इथे तिथे बघू लागली.

" अग मी बोलावले तुला.." बाजूच्या घरातून आवाज आला. सुमेधा त्या दिशेला वळली. खिडकीत एक काकू धान्य पाखडत उभ्या होत्या.

" मला बोलावलत का?" सुमेधाने त्या काकूंना विचारले.

" अग हो.. तू मालतीताईंची सून ना?"

" हो.. पण मी ओळखलं नाही तुम्हाला." सुमेधा गोंधळून म्हणाली.

" कशी ओळखशील? तुझ्या सासूने बोलावले कुठे आम्हाला लग्नाला?"

" हो ते आमचे गावी झाले ना लग्न आणि.." बोलता बोलता सुमेधा थांबली. आपल्याला अनोळखी असलेल्या व्यक्तीला लग्नातल्या अडचणी सांगायच्या का? हा तिला प्रश्न पडला.

" ते समजले ग. नको मनाला लावून घेऊस. मी असंच बोलले. तुला खूपदा बघितले जातायेताना. पण बोलणे झालेच नाही कधी. आज म्हटलं बोलूयात. कुठे चाललीस?" काकूंनी विचारले


" बाजारात जाते आहे."

" एकटीच?"

" हो.. आई बाबांसोबत थांबल्या आहेत. ते झोपून असतात ना. आणि यांना यायला उशीर होणार आहे म्हणून.."

" एवढंच ना? चल मी येते तुझ्यासोबत. थांब पाच मिनिटे." काकू तयार व्हायला आत गेल्या. सुमेधा त्यांचा विचार करू लागली. "किती बोलक्या, चांगल्या आहेत या.. कशा लगेच तयार झाल्या माझ्यासोबत यायला." तिला अजून काही विचार करायची संधी न देताच काकू तयार झाल्यासुद्धा आणि तिला घेऊन बाजारात गेल्या.

सुमेधा, नुकतेच लग्न होऊन गावातून शहरात आलेली नवविवाहिता. एका लग्नासाठी आशिष त्यांच्या गावी आला काय, बघण्याचा कार्यक्रम झाला, दोन्ही बाजूंनी पसंती झाली आणि बघता बघता लग्न झालेसुद्धा. त्यामुळे बऱ्याच नातेवाईकांना , मित्रपरिवाराला बोलावता आले नव्हते. त्यात आशिषच्या वडिलांचे आजारपण. त्याच्या बाजूने मदतीला कोणीच नव्हते. म्हणून जास्त गाजावाजा करणे टाळले होते. पण सुमेधासाठी हे सगळे स्वप्नासारखेच होते. एका महिन्यात तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते. मालतीताई सतत बाबांच्या औषधपाणी, पथ्यपाणी यात गुंतलेल्या. आशिष दिवसभर ऑफिसमध्ये. नवीन आलेल्या समिधाचा जीव कंटाळला होता. छोट्याश्या बंगलीत दिवसभर हे तिघेच असायचे. घरकामाला असलेली रखमा यायची तेवढाच काय तो आवाज असायचा. उरलेला अख्खा दिवस सुमेधाच्या अंगावर यायचा. मग सासूबाईंची परवानगी घेऊन हळूहळू तिने बाहेर पडायला सुरुवात केली. नोकरी करायची असे अजूनतरी तिने ठरवले नव्हते कारण नाही म्हटले तरी शहर तिला अनोळखी होते, मालतीताईंना तिची मदत लागायची. सध्या होता होईल तेवढी इकडच्या शहराची ओळख करुन घ्यायची हाच तिचा कार्यक्रम होता. नवीन असल्यामुळे इथे तिच्या कोणी मैत्रिणी नव्हत्या ना कोणी जवळचे नातेवाईक. अशा परिस्थितीत काकूंनी पुढे केलेला आपुलकीचा हात तिने प्रेमाने स्वीकारला..

" मग, आज काय केले दिवसभर?" आशिषने सुमेधाला विचारले.

" आज ना मला त्या काकू भेटल्या. मला एकटीला बाजारात जाताना बघून त्यासुद्धा माझ्यासोबत आल्या. मला इतके बरे वाटले ना.. नाहीतर रोज एकटीने जायचे आणि एकटीने यायचे. काही न बोलता खरेदी करायची. खूप बरं वाटले." सुमेधा उत्साहात बोलत होती.

" त्या काकूंच्या नादात मला विसरू नकोस म्हणजे झाले.." आशिष हसत म्हणाला.

" तुमचं आपलं काहीतरीच.."


काकूंच्या येण्याने सुमेधाचे आयुष्य बदलेल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all