मागील भागात आपण पाहिले की आधी खूप प्रेमाने बोलणार्या शोभाताई सुमेधाशी बोलणे कमी करतात.. बघू आता पुढे काय होते ते.
" मला सांग तू काही त्यांचे मन दुखावेल असे वागलीस का?" आशिषने सुमेधाला विचारले.
" मला तरी वाटत नाही.. आणि जर त्यांचे मन दुखावले गेले असेल तर त्यांनी सांगावे ना मला मोकळेपणाने. तेवढे नाते तर आहे ना आमचे.." सुमेधाला अजून रडू येऊ लागले.
" अग बस.. किती रडशील?" आशिष हसत म्हणाला.
" तुम्ही हसता आहात मला?" सुमेधाने रागाने विचारले.
" तुला नाही तुझ्या निरागसपणाला. अग त्या काकू ज्यांना तू ओळखतही नव्हतीस. त्या तुझ्याशी बोलत नाहीत म्हणून एवढे रडायचे? थोडा त्यांच्या बाजूने विचार कर. त्यांना नसेल वाटत बोलावेसे तुझ्याशी. त्यांच्या मताचा आदर राख. सोपे आहे."
"तुमच्यासाठी सोपे असावे. माझ्यासाठी नाही. मी खरंच मनातून त्यांना आपलं मानलं होतं.. त्या भांडून मोकळ्या झाल्या असत्या ना तर काही वाटले नसते. पण हे असं काहीच न बोलता गप्प बसणं जास्त मनाला त्रास देते."
" बरं.. तुझं बरोबर.. मला सांग तुला नक्की वाटतं का त्यांना तुझ्याशी बोलायचे नाही, तुझा गैरसमज सुद्धा असू शकतो ?" आशिषने विचारले.
क्षणभर सुमेधाने सांगू की नको असा विचार केला.
" मला रखमाताईंनी सांगितले."
" काय?"
" काकूंच्या मुलाचे लग्न ठरलेले.. मला सांगा, आम्ही दोघी सोबत फिरायचो. त्या मला, मी त्यांना घरी केलेली प्रत्येक गोष्ट दाखवायचो.. त्या मला नेहमी त्यांची मुलगी असल्यासारखे वागवायच्या. पण तरिही ही गोष्ट त्यांना मला सांगाविशी वाटली नाही. कोणालाच सांगितली नसती तर समजून घेतलं असतं.. पण रखमाताईंपासून सगळ्यांना माहित होते.. मी सोडून. मी अशी काय वागले होते की त्यांना ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवावीशी वाटली? " सुमेधा हुंदके देत होती.
" मला एक सांग, तुझ्या रडण्याने त्या तुझ्याशी बोलणार आहेत का?" सुमेधाने नकारार्थी मान हलवली.
" मग तू तुझ्या जीवाला त्रास करून घेणार. त्याचा आम्हाला त्रास होणार. मग सोडून दे ना तो विषय. मी समजू शकतो आपण एखाद्याला जीव लावतो. तोच जेव्हा तडकाफडकी संबंध तोडतो तेव्हा वाईट वाटते. पण आपल्या हातात काहीच नसतं गं. समजतंय का?" सुमेधाने मान हलवली.
सुमेधाला हे अजिबात सोपे गेले नाही. खूपच अवघड होते हे तिच्यासाठी. काकू अजूनही बोलणे टाळायच्या. तिनेही स्वतःच्या मनाला समजावले. यातून बाहेर पडण्यासाठी तिने पार्टटाईम कोर्स करायला सुरुवात केली. रखमाकडून तिला काकूंबद्दल समजायचे. पण आधी जो उत्साह असायचा तो मावळला होता. काकूंच्या मुलाचे लग्न झाले. पूजा झाली. हिला आमंत्रण मिळालेच नाही. ती जणू सुमेधासाठी उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरली. तिला समजून चुकले काकूंना तिच्याशी काहीच संबंध ठेवायचा नाही म्हणून.. मग तिनेही शेवटी त्यांचा विचार सोडला. नेमकी तेव्हाच तिच्याकडे गोड बातमी आली आणि सुमेधा त्यातच व्यस्त होऊन गेली. चोरओटी, डोहाळजेवण मग आईकडे बाळंतपण.. सगळे लाड तिने पुरवून घेतले.
बाळाला घेऊन सासरी आल्यावर तर तिचा दिवस कसा जायचा ते तिलाच समजायचे नाही. एक दिवस बाळाला घेऊन डॉक्टरकडे जायचे म्हणून ती बाहेर पडली. समोरच काकू होत्या. त्या काय वागतील याचा अंदाज नसल्यामुळे ती मान खाली घालून पुढे निघाली. तोच त्यांनी हाक मारली.
" सुमेधा, अग थांब तरी.." सुमेधा थांबली. काकू पुढे झाल्या. बाळाला हात लावून म्हणाल्या..
" छान आहे ग.. अगदी तुझ्याचसारखा." सुमेधा काहीच बोलली नाही हे बघून मग त्याच म्हणाल्या,
" काय ग, बोलणार नाहीस? चिडलीस का?"
सुमेधाने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली,
" काकू, तुमच्यावर चिडणारी मी कोण?"
" नाही म्हणजे मी तुला ते..." काकू शब्द शोधू लागल्या..
" काकू, माझी आई ना मला नेहमी म्हणायची.. आपल्याला माणसं धार्जिणी नाहीत म्हणून.. मला तेव्हा ते पटायचे नाही. असं वाटायचं आपण चांगले वागले की सगळेच चांगले वागतात. पण तुम्हाला भेटल्यावर मला जाणवले की हे असू शकते.. आपण माणसांना जीव लावतो पण माणसे मात्र कामापुरती जवळ करतात. झाले ते चांगलेच झाले.. आता यापुढे मी ही इतरांशी वागताना खबरदारी घेईन.."
" तो जरा माझा नाईलाज होता." काकू मान खाली घालत बोलल्या.
" तुम्ही मला समोरून तसं सांगितलं असतं ना तर मी स्वतः तुम्हाला हवं तसं वागले असते. पण न सांगून तुम्ही मला जास्तच परकं केलंत. आणि आता परत.. जाऊ दे काकू.. मी निघते. डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे."
काकूंना बोलायची संधी न देता सुमेधा तिथून निघाली. तिच्या एका डोळ्यात पाणी होते आणि दुसर्या डोळ्यात माणसे ओळखू न शकल्याचे शल्य..
आपल्या रोजच्या आयुष्यात अनेकजण येतात. काहीजण प्रेमाने राहतात. काही कामापुरते येतात आणि जातात.. वाईट तेव्हा वाटते की लोकं जेव्हा आपला कामापुरता उपयोग करून घेतात. अशाच एका दुखावलेल्या व्यक्तीची मनस्थिती मांडण्याचा हा प्रयत्न.. कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा