ध्यास स्वप्नपूर्तीचा भाग २
रुचिताने डॉ सोनलची मुलाखत घ्यायला सुरुवात केली,
"तुम्ही तुमच्या आयुष्याचा पूर्ण प्रवास सांगितला तर त्यात मला सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि वाटलंच तर त्यावर आधारीत प्रश्न मी तुम्हाला विचारेल."
डॉ सोनलने आपल्या आयुष्याचा प्रवास सांगायला सुरुवात केली,
" माझा जन्म एका छोट्याशा खेड्यात झाला. मला लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. मी दहा वर्षांची असताना माझी आई खूप आजारी पडली होती. गावात दवाखाना नव्हता, पैशांअभावी तिला उपचारांसाठी शहरात नेता आले नव्हते. पैशांच्या व उपचारांअभावी माझ्या आईचा मृत्यू झाला.
मी आईच्या मायेला पोरकी झाले होते. मी तेव्हाच ठरवले होते की, मोठी होऊन डॉक्टर व्हायचे आणि गावात गरिबांवर मोफत उपचार करायचे.
ज्या दु:खाला मला सामोरे जावे लागले ते दु:ख कोणाच्याही वाट्याला येऊ नये हीच प्रामाणिक इच्छा होती.
गावात दहावीवी पर्यंतच शाळा होती, अकरावी साठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागायचे. एकट्या मुलीला तालुक्याच्या ठिकाणी कसे पाठवावे? या विचाराने माझ्या वडिलांनी माझे शिक्षण थांबवले.
वयाच्या सतराव्या वर्षी अविनाश रावांशी लग्न झाले. अविनाश राव एका बॅंकेत नोकरीला होते. त्यांचे वडील आमच्या लग्नाआधीच वारले होते. लग्नानंतर अविनाश रावांना मी पुढे शिक्षण करण्याची इच्छा असल्याचे सांगितले, त्यांचा शिक्षणासाठी पूर्ण पाठिंबा होता. फक्त त्यांची एक अट होती की, घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून शिक्षण घ्यायचे, सासूबाईंचा ही पूर्णपणे पाठिंबा होता. पण म्हणतात ना सगळचं आपल्या मनाप्रमाणे घडत नाही.
लग्नानंतर एका महिन्यातच सासूबाईंना अर्धांगवायूचा झटका आला, सासूबाई अंथरुणाला खिळल्या, घराची सर्व जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. सासूबाईंची तब्येत बिघडल्यामुळे माझ्या शिक्षणाला पुन्हा एकदा पूर्ण विराम लागला.
पुढच्या दीड वर्षात आम्हाला एक कन्यारत्न प्राप्त झाले. मुलगी व सासूबाईंची तब्येत सांभाळताना दिवस असे भरभर जाऊ लागले. मुलगी तीन वर्षांची असताना पुत्ररत्न प्राप्त झाले. मुलांना वाढवण्यात व घर सांभाळताना पुढे शिक्षण घेण्याचा विषय मी डोक्यातून काढूनच टाकला होता.
माझी मुलगी कांचन इयत्ता चौथीत असताना माझ्या सासूबाईंचा मृत्यू झाला.
असेच दिवसा मागून दिवस जात होते, मुले मोठी होत होती.
Life is unexpected.
कांचन पाचवीत होती तर माझा मुलगा शुभम दुसरीत होता. एक दिवस आम्ही घर आवरत होतो, सुट्टीचा दिवस असल्याने सगळेच घरात होते. जुन्या कागदपत्रात माझ्या गुणपत्रिका होत्या. माझी दहावीची गुणपत्रिका कांचनने बघितली.
" वाव आई, तुला दहावीत ८०% गुण होते. आई तुला इतके छान गुण होते, तरी तू पुढे का शिकली नाहीस?" कांचनने विचारले.
तेव्हा मी तिला त्या वेळच्या परिस्थिती बद्दल, माझ्या असलेल्या स्वप्नांबद्दल कल्पना दिली. बोलता बोलता सहजच मी तिला विचारले,
" बेटा, मला घरच्या परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेता नाही आले. माझे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. आता तू करशील ना माझे स्वप्न पूर्ण, तू डॉक्टर होशील ना."
कांचन काय उत्तर देईल? बघूया पुढील भागात…
©®Dr Supriya Dighe