Login

ध्यास स्वप्नपूर्तीचा भाग १

Inspiring Story

ध्यास स्वप्नपूर्तीचा भाग १


रुचिताने झोपेतचं मोबाईलचा अलार्म बंद केला. रुचिताला झोप लागून गेली होती. जाग आली तेव्हा तिने मोबाईलमध्ये वेळ बघितली आणि ती खडबडून जागी झाली. 


मोबाईल चार्जिंगला लावून तिने ब्रश केला व ती अंघोळीला गेली. एरवी रुचिताला अंघोळ करायला पंधरा ते वीस मिनिटे लागायचे, आज मात्र तिने पाच मिनिटांत अंघोळ उरकली.


रुचिता खूप घाईघाईने आवराआवर करत होती. नाश्ता ही घाईघाईनेच खात होती, तिला असं बघून तिच्या आईच्या मनात प्रश्न उभे राहिले. 


" रुचिता एवढी कसली घाई आहे? अंघोळही पटकन उरकलीस. आता नाश्ताही एवढ्या घाईने करत आहेस." आईने विचारले.


"अगं आई, आज उठायला उशीर झाला. आज डॉ सोनलची मुलाखत घ्यायची आहे, त्या खूप व्यस्त असतात, खूप मुश्किलीने त्यांची वेळ मिळाली आहे." रुचिताने सांगितले.

यावर रुचिताची आई म्हणाली,

"ह्या डॉ सोनल कोण आहेत? याआधी नाव नाही ऐकलं. त्यांचा इंटरव्ह्यू का घ्यायचा आहे? असं त्यांनी स्पेशल काय केलं आहे?"


"वयाच्या 29 व्या वर्षी त्यांनी 11वी ला प्रवेश घेतला. वयाच्या 35 व्या वर्षी त्या डॉक्टर झाल्या आणि विशेष म्हणजे आठवड्यातून दोन दिवस आपल्या मूळ गावी जाऊन गरिब रुग्णांवर मोफत उपचार करतात." रुचिताने नाश्ता करता करता सांगितले.


"एवढया उशीरा शिक्षण का चालू केले? डॉक्टरचं का झाल्या? गरिबांवर मोफत उपचार का?" आईने तिच्या मनातील प्रश्न विचारले.


"अगं आई, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मला त्यांची मुलाखत घ्यायची आहे. आता मी जाते, परत आल्यावर तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे असतील." रुचिताने सांगितले.


रुचिता नाश्ता संपवून घराबाहेर पडली, ती थेट डॉ सोनलच्या घरी पोहोचली. डॉ सोनल रुचिताची वाट पाहत होत्या. 


रुचिता डॉ सोनलला बघून हात जोडून म्हणाली,

" नमस्कार डॉ सोनल, अखेर तुमच्या भेटीचा योग आलाच. तुमच्या बद्दल ऐकल्या पासून तुम्हाला भेटण्याची खूप उत्सुकता लागलेली होती."

" माझ्या भेटीची उत्सुकता लागायला मी काही महान व्यक्ती नाहीये. माझी मुलाखत घेण्यामागे तुझा उद्देश काय आहे?" डॉ सोनलने विचारले.

"आपल्या आजूबाजूला अशा खूप स्त्रिया आहेत, ज्या वय जास्त झाले म्हणून शिक्षण घेत नाहीत, इच्छा असूनही शिक्षण घ्यायला घाबरतात. तुमची कथा अशा स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरु शकते." रुचिताने उत्तर दिले.


डॉ सोनल पुढे म्हणाली,

"बरं ठीक आहे, आपण वेळ न दवडता मुलाखतीला सुरुवात करुया."


डॉ सोनलचा प्रवास बघूया पुढील भागात…


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all