#प्रेमकथास्पर्धा
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
न्यारी प्रीत भाग -३(अंतिम)
मागील भागात,
"अहो, मला वाटते आपण आता निर्णय घ्यायला हवा. तसे पण आपल्या मुलीचे पुढे भवितव्य काय हे कोणालाच माहीत नाही." समोर डोळे मिटलेल्या आणि शुद्धीत नसलेल्या आपल्या मुलीकडे नजर ठेवून तिची आई तिच्या बाबांना म्हणाली.
"दादा, तू कसा आहेस?" त्याचा लहान भाऊ त्याला मिठी मारत रडत म्हणाला.
"मी ठीक आहे बारक्या, पण तुझ्या वहिनी ठीक नाहीत." त्याला मिठी मारत रडतच तो म्हणाला.
आता पुढे,
"वहिनी ठीक होतील. तू काळजी करू नको." श्रमेशचा लहान भाऊ विनय म्हणाला.
श्रमेशच्या भावाला आणि ड्रायव्हरला लवकर डिस्चार्ज मिळाला. श्रमेशने मात्र तिच्यासोबत राहण्याचा विचार केला होता म्हणून तो तिच्या खोलीत त्याचे प्लास्टर निघेपर्यंत व्हीलचेअर वर कोणाच्या ना कोणाच्या मदतीने तिच्याकडे जात होता.
आज एक आठवडा झाला होता. सुचित्रा कोणाशीच बोलत नव्हती.
"मला वाटते की आपण इथेच थांबलो तर बरे होईल. आता माझी मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही. त्यामुळे मला तुमच्या मुलाला ह्यात अडकवायचे नाही. फारकत घेवूया. मी माझ्या मुलीला सांभाळण्यास समर्थ आहे." त्यांनी सांगितले.
"मामा, मी किंवा माझे आईवडील असे काही म्हंटले आहेत का आम्ही तुमच्या मुलीला सांभाळणार नाही? " थोडासा आवाज चढवून आज श्रमेश म्हणाला.
"नाही, पण पुढे संसार करणे तुम्हाला कठीण जाईल. तिला पावलोपावली कोणाची ना कोणाची साथ लागणार हे फक्त एक दोन दिवस नाही तर ती स्वतःच्या पायावर उभे राहण्यापर्यंत आहे." तिची आई म्हणाली.
"मान्य आहे. मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच होकार दिला आहे." तो म्हणाला.
"ते म्हणत आहेत ते बरोबर आहे श्रमू, तू पुन्हा विचार कर. तुला संयमाने सगळे हाताळावे लागेल." त्याचे बाबा म्हणाले.
"मी सर्व करण्यासाठी तयार आहे." तो पक्का निर्धार करून म्हणाला.
सर्वानुमते त्याने डॉक्टरांशी चर्चा करून तिला घरी नेण्यास परवानगी घेतली. त्याचे प्लास्टर निघाले होते. ती मात्र क्वचितच बोलत होती.
"आता गृहप्रवेश करूया. श्रमेश आमच्या सुनबाईला आपल्या घरात आण." त्याची आई म्हणाली.
त्याने तिला दोन्ही हातांवर उचलले नवीन जोडप्याचे औक्षण केले आणि त्याने हलकेच तिचे पाय मापाला लावून ते माप ओलांडले.
दोन दिवस तिची आई सासरी थांबली होती. ती शांतपणे बसली होती.
"आई ss आई ss" सुचित्राने आवाज दिला.
तेवढ्यात श्रमेश तिच्याकडे गेला.
"काय झाले? काही हवंय?" त्याने विचारले.
"ते वॉशरुमला जायचे होते. आईला सांगाल का मी बोलवत आहे." ती त्याला हळू आवाजात म्हणाली.
त्याने तिला उचलले.
"अहो, काय करताय ? आईला बोलवा. सोडा खाली मला." ती म्हणाली.
"आता सवय करून घ्या." त्याने तिच्यासाठी आतमध्ये बसण्याची व्यवस्था केली होती तिथे बसवून तो म्हणाला.
"आवरून झाले की सांगा. मला आवाज द्या. मी बाहेर उभा आहे." त्याने मागे वळून न बघता सांगितले.
असेच एकमेकांना समजण्यात दिवस पुढे जात होते. त्यांची सत्यनारायणाची पूजाही त्याने तिला खुर्चीवर बसून विधी करायला सांगितले.
तिला समजून घेत त्याने घरातूनच काम करायचे ठरवले.
तिचे मानसिक स्वास्थ ठीक राहावे म्हणून त्याने तिला प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेली पुस्तके वाचायला दिली. वेळ काढून दोघे काहीना काही टीव्ही नाहीतर लॅपटॉपवर पाहत असायचे. आठवड्यातून एक दिवस जिथे गर्दी नसेल तिथे तिला फेरफटका मारायला न्यायचा.
"मला थोडी सुधारणा दिसत आहे. आता आपण फिजिओथेरपी करायला सुरुवात करूया. मी वरिष्ठ डॉक्टरांशी बोलून तुमच्या मिसेसची केस त्यांना समजून सांगितल्यावर पुढील उपचार काय करायचे हे त्यांनी मला सांगितले आहे." डॉक्टर आनंदाने पुढच्या उपचारांबद्दल सांगत होते.
"मग सुचित्रा आता अजून थोडा त्रास होईल पण हळू हळू तुम्ही चालू शकाल." डॉक्टर तिला पाहून म्हणाले.
"थँक्यू डॉक्टर." ती हसतच म्हणाली.
"थँक्यू मला नाही तुमच्या मिस्टरांना म्हणा. त्यांनी सर्व सकारात्मक दृष्टीकोनातून घेतले आणि तुम्हाला समजून घेतले म्हणून तुम्ही आता ठीक होत आहात." त्यांनी श्रमेशविषयी बोलून त्याचे कौतुक केले.
"असे काही नाही डॉक्टर. तिची बरे होण्याची इच्छाशक्ती त्यामुळेच आता रिपोर्ट्स चांगले येत आहेत." त्याने आताही तिलाच श्रेय दिले.
बसल्या बसल्या सुचित्राही तिला जमेल ते घरातील कामे करत होती. तिने तिचा फॅशन डिझायनरचे काम ऑनलाईन म्हणून सुरू केले.
दोन वर्षांनी,
"थोडे अजून चालून पाहू का?" तिने विचारले.
"नको. जास्त ताण द्यायचा नाही असे डॉक्टर बोलले आहेत हे विसरलात वाटते मिसेस श्रमेश." तो तिला बाजूच्या बाकावर बसण्यास सांगून म्हणाला.
"मला अजूनही प्रश्न पडतो." ती त्याच्याकडे पाहून म्हणाली.
"कोणता?" त्याने विचारले.
"तुम्ही आपला अपघात होऊन पण होकार दिलात म्हणजे मी पुढे चालू शकेन की नाही ह्याची शाश्वती नव्हती तरी तुम्ही माझी साथ सोडली नाहीत." भरलेल्या डोळ्यांनी आणि कंठाने ती म्हणाली.
"माझ्यासाठी एकदा वचन दिले तर ते शेवटपर्यंत पूर्ण करण्याची माझी सवय आहे. अपघात झाला ह्यात तुझी काय चूक होती? ज्याने दारू पिऊन आपल्या गाडीला धडक दिली त्याला शिक्षा तर कायद्याने दिली आहे. मी तुला पाहायला आलेलो ना घरी, तुला माहीत नसेल पण त्याच्या आदल्यादिवशी तू मला बाजारात एका आजींना मदत करताना दिसली होतीस. ती तूच आहेस का हे मला तुझ्या घरी आल्यावर समजले. म्हणून तुझ्या सारख्या मनाने सुंदर आणि समंजस मुलीला माझी बायको म्हणून घेण्यासाठी मी खूप आतुर होतो. संकट येत जात असतात पण आपण ती पार करण्यासाठी म्हणून मला तुला ह्या कारणांसाठी गमवायचे नव्हते." त्याने आज पूर्णपणे व्यक्त व्हायचे ठरवले.
ती त्याच्याकडे कृतार्थ भावाने सोबतच प्रेमळ नजरेने त्याच्याकडे पाहत होती.
साथ सोडण्यास वेळ लागत नाही पण तीच साथ निभावण्यासाठी वेळ लागतो. प्रेम हे प्रत्येक वेळी बोलून किंवा कोणती भेटवस्तू देवून व्यक्त करावे असे जरूरी नाही. आपल्या कृतीतून आणि सोबत राहूनही ते व्यक्त करता येते हेच श्रमेशने सुचित्रा सोबत राहून नकळतपणे दाखवून दिले होते.
राया तुझी आहे
जगावेगळी रीत
व्यक्त न होण्याची
मनमोहक न्यारी प्रीत
जगावेगळी रीत
व्यक्त न होण्याची
मनमोहक न्यारी प्रीत
© विद्या कुंभार
समाप्त.
कथा आवडल्यास लाईक करून तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा