Login

न्यारी प्रीत भाग-१

कठीण परिस्थितीत साथ निभावण्याची प्रेमकथा !
#प्रेमकथास्पर्धा

प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

न्यारी प्रीत भाग -१

श्रमेश आणि सुचित्रा ह्यांचे लग्न झालेले होते. लग्नानंतर सुचित्रा श्रमेश सोबत गाडीत बसून तिच्या सासरी जात होती.
नववधूच्या मनात जे विचार असतात तेच तिच्या मनातही चालू असतात.

"आता सर्व मला नीट करता येईल ना? माहेरी तर खूप कमी लोक होते पण इथे आता सासरी? त्यात हा बोलत पण नाही जास्त." असा विचार ती करत होती.

तेवढ्यात गाडीला जोरात धक्का लागतो आणि मागून आलेल्या एका ट्रकने गाडीला ठोकले होते. अपघात खूप भीषण असतो त्यामुळे सर्व घाबरून गेलेले होते.

श्रमेश ह्याची छोटी कपड्यांची कंपनी असते त्यात तो सीईओ असतो आणि सुचित्रा ही फॅशन डिझायनर असते तर तिची छोटी फर्म असते. वधू-वर सूचक केंद्रातून त्यांना लग्नासाठी स्थळे आलेली होती आणि त्यातूनच त्यांचे हे लग्न जुळते.

काही वेळानंतर सर्वांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती करतात.

"काय झाले डॉक्टर? तुम्ही काही सांगत नाही आहात?"
श्रमेशची आई घाबरून विचारते.

"तुमच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे पण तो थोड्याच दिवसात बरा होईल पण तुमची सून ..." ते जरा कचरत म्हणाले.

"तिला काय झाले ? ती ठीक तर आहे ना?" श्रमेशचे वडील काळजीने विचारत होते.

झाले होते असे की एक ड्रायव्हर, श्रमेशचा लहान भाऊ विनय ते पुढे बसले होते आणि मागच्या सीटवर श्रमेश आणि सुचित्रा बसले होते. गाडी मागून ठोकल्याने त्या दोघांना इतरांपेक्षा जास्त दुखापत झाली होती.

श्रमेशचे आई वडील आणि दुसऱ्या नातेवाईकांसोबत दुसऱ्या गाड्यांमधून मागून येत होते. त्यामुळे त्यांना काही झाले नव्हते आणि त्यांनीच चौघांना हॉस्पिटलमध्ये आणले होते.

"काय झाले डॉक्टर? आम्हाला सर्व नीट सांगा."  श्रमेशचे इतर नातेवाईक होते ते पण विचारू लागले.

"तुम्हाला तर माहीत आहे की अपघात खूप भीषण होता. सुदैवाने चौघे वाचले पण त्यात तुमच्या सुनेला खूप गंभीर दुखापत झाली आहे. गाडीच्या एका भागाचा तुटलेला एक तुकडा तिच्या पाठीच्या मणक्यात घुसल्याने ती आता पायावर उभा राहू शकत नाही. पुढे ती उभे राहू शकेल की नाही सांगता येत नाही. शक्यता खूप कमी आहे." त्यांनी वस्तुस्थिती सांगितली.

हे सर्व ऐकून ते सुन्न झाले. आता तर त्या दोघांचे लग्न झाले होते आणि आता हे असे झाले. अजून त्यांच्या संसाराला सुरुवात पण झाली नव्हती आणि मध्येच हे असे झाल्याने कोणाला पुढे काय करावे हे समजत नव्हते.

"श्रमेश शुद्धीवर आला आहे. तुम्ही त्याला पाहू शकता पण लगेच एकदम त्याला हे सर्व सांगू नका." दुसरे डॉक्टर त्यांना सांगून निघून गेले.

सुचित्राच्या घरी फोन करून फक्त अपघात झाला एव्हढेच सांगितले होते. त्यामुळे तेही तातडीने हॉस्पिटलला यायला निघाले.

"काय झाले सर्व तर ठीक आहे ना?" श्रमेश आपला दुखरा हात आणि पाय पाहून समोर आलेल्या आपल्या आई-वडिलांना म्हणाला.

आईचे तर डोळे रडून लाल झाले होत पण बाहेर बाबांनी समजल्यावर त्यांनी त्याच्या पुढे रडायचे नाही म्हणून समजावले.

"हो,ठीक आहे. " श्रमेशचे बाबा म्हणाले.

"सुचित्रा कशी आहे? तिला जास्त लागले आहे का?" त्याने आईकडे बघून विचारले.

"ना...ही...  जास्त काही. ती झोपली आहे. तू आराम कर जास्त विचार करू नको." आई कशीतरी बोलली.

पुन्हा आपला लहान भाऊ आणि ड्रायव्हर  याच्याबद्दल विचारणा केली आणि त्यांना जास्त काही झाले नाही समजल्यावर त्याने सुटकेचा निश्वास टाकला.

सुचित्राला पाहायला तिच्या अतिदक्षता विभागात श्रमेशचे आई वडील गेले.

सर्व वेगवेगळ्या पद्धतीची उपकरणे आजूबाजूला होती. ती अजूनही बेशुध्द होती आणि तिच्या पायाकडे नजर जाताच दोघांच्या डोळ्यांत अश्रू आले.

तेवढ्या वेळात सुचित्राचे आईवडील तिथे आले.

"काय झाले माझ्या मुलीला?" असे म्हणून ते तिथे आले.

"शांत व्हा. आपण बाहेर जावून बोलूया का?" श्रमेशचे बाबा सुचित्राच्या बाबांना घेवून बाहेर आले.

त्यांनी वृत्तांत ऐकल्यावर पाया खालची जमीन सरकली आहे असे वाटून त्यांना घेरी आली.

त्यांनाही लगेच बाजूला ॲडमिट केले. बिपी शूट झाल्याने त्यांना असे झाले होते.

सुचित्राची आई तर अविरत अश्रू कोसळत होती. एकीकडे आपली मुलगी आणि दुसरीकडे आपला नवरा कोणाला कसे सांभाळायचे काहीच कळत नव्हते.

काहीवेळाने सुचित्रा शुध्दीवर आली आणि आजूबाजूला एवढे सर्व पाहून ती आधी गोंधळली नंतर पूर्ण अंग ठणकत असताना तिच्या लक्षात आले की त्यांच्या गाडीला जोरात धक्का लागला होता. त्यानंतरच इथे आणले असेल असा अंदाज तिने लावला.

"आ.. ई... हे ?" बोलायला त्रास होत होता तरी तिने शब्दांची जुळवणी करून श्रमेशबद्दल विचारले.

तिला अशा अवस्थेत पाहताना तिची आई अजून रडत होती तर तिच्या सासूने पुढे येवून तो ठीक आहे असे सांगितले.

डॉक्टर तपासून निघून गेले.

"आई, माझ्या पायाला काय झाले गं? ते हालचाल का करत नाहीत? " तिने थोडे दोन्ही पाय हलवून पाहिले.

आता घरचे तिला कसे सांगणार?
श्रमेशला सुचित्राबद्दल समजल्यावर तो काय करेल?

भेटूया पुढच्या भागात लवकरच.

क्रमशः

© विद्या कुंभार

कथा आवडल्यास लाईक करून तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा.

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५

🎭 Series Post

View all