चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा
संघ - सोनल
लघुकथा
संघ - सोनल
डिजिटल अरेस्ट - फसवणुकीचे जाळे.
सुट्टी असल्याने श्लोक आपल्या खोलीत दुपारी शांततेत लोळत पडला होता. तो शहरातील एका नामांकित कंपनीत कामाला होता. इतरवेळी कंपनीत वाजवीपेक्षा जास्त काम असायचे. आठवड्यातून एक दिवस त्याला सुट्टी मिळायची. त्यामुळे त्या दिवशी त्याला कुणीही काहीही सांगू नये असे वाटायचे.
दुपारची मस्त एक झोप घ्यावी असा विचार करत असतानाच त्याचा मोबाईल वाजला. खरंतर त्याला कुणाशी बोलायची इच्छा होत नव्हती. अंगाला आळोखे-पिळोखे देत त्याने मोबाईल नाईलाजास्तव हातात घेतला. एका अनोळख्या नंबरवरून त्याला व्हिडिओ कॉल येत होता. त्याला आश्चर्य वाटले. व्हिडिओ कॉल करणारी व्यक्ती नक्की कोण असेल? हा कॉल घ्यावा की नाही? कुणाला आपल्या मदतीची गरज तर नसेल ना? घेऊन तर बघू, असा विचार करत त्याने तो व्हिडिओ कॉल घेतला.
पलीकडे पोलीस स्टेशन दिसत होते. समोर खुर्चीवर इन्स्पेक्टरच्या गणवेशात एक व्यक्ती बसलेली होती. त्या व्यक्तीच्या बाजूला लॅपटॉप घेऊन हवालदार बसलेला होता.
"श्लोक सरपोतदार तुम्हीच ना? इन्स्पेक्टरने विचारले.
"हो मीच?" श्लोक थेट पोलीस स्टेशनमधून फोन आल्यामुळे मनातून घाबरून गेला.
"आमच्याकडे तुमची तक्रार आली आहे." पोलीस इन्स्पेक्टर गंभीरतेने म्हणाला.
"कसली तक्रार साहेब?" श्लोकने नम्रतेने विचारले.
"तुम्ही तुमच्या कंपनीत आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे." इन्स्पेक्टर म्हणाला.
"तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय साहेब. मी माझे काम अतिशय प्रामाणिकपणे करतो. माझ्या कामाबद्दल कंपनीने माझा गौरव देखील केलेला आहे." श्लोक सांगू लागला.
"याच गोष्टीचा फायदा घेत तुम्ही तुमच्या कंपनीत पैशांची अफरातफर केली वाटतं." इन्स्पेक्टर आवाजात जरब आणत बोलला.
"हे खोटं आहे साहेब? चांगला पगार मिळत असताना मी का असे करू? माझ्यावर चुकीचा आरोप झालेला आहे." श्लोक ठणकावून बोलला.
"ते आता सिद्ध होईलच." इन्स्पेक्टरने देखील आवाज वाढवला.
"कुणी केली माझी तक्रार?" श्लोकने विचारले.
"तुमच्या कंपनीतल्या मॅनेजरने." इन्स्पेक्टर निर्विकारपणे म्हणाला
"पण हे कसं शक्य आहे. कालपर्यंत कंपनीतले बरेचसे व्यवहार मी पाहत होतो. मग आज अचानक माझ्यावर असा आरोप कसा काय करण्यात आला?" श्लोकने मनात आलेली शंका बोलून दाखवली.
"त्याचाच तुम्ही गैरफायदा घेतलेला दिसतोय. कंपनीने तुमच्यावर विश्वास टाकला आणि तुम्ही त्यांचाच विश्वासघात केला." तो इन्स्पेक्टर ओरडला.
"पण साहेब, कालपर्यंत माझ्याशी मॅनेजर साहेब व्यवस्थित बोलत होते. त्यांनी माझी तक्रार केली असेल असे मला मुळीच जाणवले नाही."
"त्याचे कसे आहे ना...मिस्टर श्लोक, प्रत्येक गुन्हेगार पकडला गेला की असेच काहीसे सांगत असतो. आपल्या चांगुलपणाचे आणि प्रामाणिकपणाचे आपल्या बोलण्यातून पुरावे देत असतो. कंपनीतले लोक तुमच्याशी चांगले वागले याचा अर्थ तुम्ही गुन्हा केलेला नाही असे होत नाही. शिवाय संशयित लोकांना आधीच कल्पना दिली तर ते सतर्क नाही का होणार?" इन्स्पेक्टर सांगू लागला.
"माझ्यावर किंवा माझ्या कामावर कुणी बोट ठेवेल असे मी कधीच वागलो नाही साहेब."
"तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे बघा." हातातला कागद त्याला दाखवत इन्स्पेक्टर म्हणाला.
त्या कागदावर स्पष्ट लिहिलेले होते की श्लोकने कंपनीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध योग्य कारवाई करून त्याला तुरुंगवासाची शिक्षा देण्यात यावी. तसेच त्याच्याकडून सर्व रक्कम वसूल करण्यात यावी. त्याखाली कंपनीचा शिक्का व मॅनेजरची सही देखील होती. ते पाहून श्लोकचे धाबे दणाणले.
"आता तुमची खात्री पटलीच असेल. नाही का?" इन्स्पेक्टर म्हणाला.
"तुमच्याकडे माझ्याविरुद्ध पुरावा आहे का? नसेल तर तुम्ही मला असा व्हिडिओ कॉल करून त्रास देऊ शकत नाही." श्लोक स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणाला.
"करायला गेलो तर आम्ही काहीही करू शकतो. तुमचे नशीब चांगले समजा की आम्ही फक्त व्हिडिओ कॉल करून चौकशी करत आहोत. तुमच्या घरी येऊन तुम्हाला बेड्या नाही ठोकल्या. तुमच्यावर जर हा आरोप सिद्ध झाला तर तुम्हाला आजन्म जेलची हवा खावी लागेल. कळतंय का तुम्हाला?" इन्स्पेक्टर रागात येऊन म्हणाला.
"साहेब तुम्ही शांत व्हा. मी बोलतो त्यांच्याशी." हवालदार बोलला.
"हे बघा मिस्टर श्लोक, करोडोंची लोकसंख्या असलेला आपला देश. इथे दर मिनिटाला गुन्हे होत असतात. मूठभर पोलीस कुठे कुठे जातील? आज-काल सर्व काही ऑनलाईन होत असल्याने आम्हाला देखील ऑनलाइन चौकशी करण्याचे काही अधिकार देण्यात आले आहे. यालाच आमच्या भाषेत डिजिटल अरेस्ट म्हणतात. असे केल्याने आमचा आणि तुमचा देखील वेळ वाचतो." तो हवालदार श्लोकला समजावून सांगू लागला.
"अहो, पण मी काही केलेलेच नाही तर मी का चौकशीला सामोरे जाऊ?" श्लोक मंद आवाजात म्हणाला.
"तुम्ही जर काही केलेलेच नाही तर मग तुम्ही कशाला घाबरत आहात? तुम्ही फक्त आम्ही विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे द्या." तो हवालदार बोलला.
श्लोक तसा मनातून घाबरला होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. व्हिडिओ कॉलवरील ते पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते.
"हवालदार, यांच्या घरी जाऊन यांना आहे त्या अवस्थेत उचलून आला. जोपर्यंत पोलीसी खाक्या दाखवत नाही तोपर्यंत स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारे असे लोक आपला गुन्हा कबूल करत नाही. आणि हो पोलिसांची गाडी घेऊन जा. आजूबाजूच्या लोकांना पण कळू द्या." इन्स्पेक्टर चढ्या आवाजात बोलला.
"नाही साहेब, पोलीस स्टेशन मध्ये नको. माझी खूप बदनामी होईल. दया करा माझ्यावर. मी एक सामान्य कर्मचारी आहे. माझं संपूर्ण आयुष्य खराब होईल." श्लोक गडबडून त्यांच्याकडे याचना करू लागला.
समाजापुढे आपली इभ्रत धुळीस मिळू नये म्हणून श्लोकने त्यांच्यापुढे सपशेल शरणागती पत्करून टाकली.
माणूस समाजशील प्राणी आहे, समाजापुढे मान झुकावी लागू नये त्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. श्लोक याच समाजातला एक भाग होता.
"यासाठीच तर आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतोय ना. घरी आलो असतो तर हे प्रकरण किती बिघडले असते. " हवालदार नरमाईने समजावत म्हणाला.
श्लोकच्या चेहऱ्यावर अजूनही संभ्रम दिसत होता. त्याच्या मनातल्या शंकेला दुजोरा मिळू नये म्हणून तो इन्स्पेक्टर पटकन बोलला.
"तुम्ही उगाचच आमचा वेळ वाया घालवत आहात. तुम्ही निर्दोष असाल तर तुमची लवकरच मुक्तता करण्यात येईल. त्या आधी आम्ही वेळोवेळी देत असलेल्या सर्व सूचना लक्ष देऊन ऐका. सर्वात प्रथम तर हा व्हिडिओ कॉल तुम्हाला बंद करता येणार नाही. फोन चार्ज नसेल तर आमच्या समोरच चार्जिंगला लावा. कॅमेरासमोरून हलायचे नाही. संपूर्ण चौकशी होईपर्यंत तुम्ही दुसरे कोणतेही फोन घेऊ शकत नाही. हा सर्व डिजिटल अरेस्टमधील चौकशीचा भाग आहे. तुम्ही जितके आम्हाला सहकार्य कराल तितक्या लवकर आम्ही तुम्हाला यातून मोकळे करू."
पोलीस इन्स्पेक्टरने सक्त ताकीद दिली.
श्लोककडे त्या चौकशीला सामोरे जाण्यावाचून कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. हवालदार व पोलीस इन्स्पेक्टर मिळून त्याला भराभर प्रश्न विचारू लागले. तो त्याला जमेल तशी उत्तरे देत होता. हवालदार त्याने सांगितलेल्या गोष्टी एका फाईल मध्ये लिहून घेत होता. तसेच लॅपटॉपवर देखील नोंद करून ठेवत होता. सुमारे दोन-तीन तास श्लोकची चौकशी सुरू होती. सर्व चौकशीअंती त्याच्याकडे आर्थिक व्यवहारांसाठी एका बँकेच्या खात्याशिवाय दुसरे काहीच नाही असे त्या पोलिसांच्या लक्षात आले.
"बरं, आता आम्हाला तुमच्या बँकेचा तपशील द्या. तुमच्या खात्यात किती रक्कम आहे ते बघावे लागेल. कंपनीतली रक्कम तुम्ही तुमच्या बँकेतील खात्यात तर जमा करून घेतली नाही ना?" इन्स्पेक्टरने श्लोकला विचारले.
"नाही साहेब, कामाला लागल्यापासून मी माझा पगार साठवून ठेवत आहे. मला लागेल तितकीच रक्कम काढतो. आतापर्यंत जमा करून ठेवलेली एकूण रक्कम सुमारे चाळीस लाख रुपये आहे."
"इतके पैसे कुठून आले? नुसत्या पगारातून इतकी मोठी रक्कम जमा होणे शक्य नाही." इन्स्पेक्टरने दरडावून विचारले.
"साहेब, येत्या दोन-तीन वर्षात माझ्या बहिणीचे लग्न करावे लागणार आहे. लग्नात तिला दागिने करावे लागतील. तिची सर्व हौसमौज करावी लागेल. एकुलती एक बहीण आहे हो माझी. म्हणून मी साठवून ठेवत होतो. तसेच कंपनीत अनेक वेळा अतिरिक्त काम देखील केले आहे. माझ्या कष्टाचे पैसे आहेत हे." श्लोक काकुळतीला येऊन म्हणाला.
"ते पैसे तुमच्या कष्टाचे आहे की कंपनीला लुबाडून घेतले आहेत ते आता समजेलच." इन्स्पेक्टर त्याच्याकडे तीष्ण नजरेने बघत म्हणाला.
"हवालदार, यांच्याकडून बँकेचा तपशील आणि ओटीपी घ्या. हे खरं बोलताय का ते तपासून बघा. " इन्स्पेक्टरने हवालदाराला आदेश दिला.
त्याचवेळी अचानक श्लोकला त्याच्या आईचा फोन आला.
"साहेब, गावाकडून आईचा फोन आहे. घ्यावा लागेल."
"तुम्ही हा फोन घेऊ शकत नाही. तुमची चौकशी अजून पूर्ण झालेली नाही." इन्स्पेक्टर बोलण्याआधीच हवालदार घाईघाईत म्हणाला.
परंतु सातत्याने फोन वाजत असल्यामुळे श्लोकचा नाईलाज झाला.
"साहेब, मी जर हा फोन घेतला नाही तर माझ्या आईला माझी काळजी वाटत राहील. मी ठीक आहे एवढे दोन शब्द बोलून लगेच फोन ठेवून देतो. मग तर झालं ना." श्लोक परवानगी मागू लागला.
"आधी तुम्ही तुमच्या बँकेचा तपशील आणि तुम्हाला जो ओटीपी येईल तो द्या. त्यानंतर तुम्ही फोनवर निवांत बोलत बसा." इन्स्पेक्टर म्हणाला.
"साहेब, आईशी बोलायला दोनच मिनिटे लागतील. जोपर्यंत मी आईचा फोन घेणार नाही तोपर्यंत फोन वाजतच राहील. त्यापेक्षा आईशी बोलून घेतो."
एवढे बोलून क्षणाचाही विलंब न करता श्लोकने फोन घेतला. त्याने आईचा फोन उचलताच तो व्हिडिओ कॉल आपोआप बंद झाला. त्यामुळे श्लोक अजून वैतागला.
"अगं आई, फोन उचलत नाही याचा अर्थ मी काहीतरी महत्त्वाच्या कामात असेल ना. समजून घेत जा ना जरा. "
"हो बाळा, मला माहितीये, पण तुझ्याशी फार महत्त्वाचं बोलायचं होतं." श्लोकची आई हिरमुसली.
"हो, बोल आता लवकर. मला इतका वेळ नाहीये." श्लोक चिडून म्हणाला.
एकतर त्याची चौकशी चालू होती. त्यातल्या त्यात तो व्हिडिओ कॉल मधेच बंद झाल्यामुळे तो इन्स्पेक्टर पुन्हा फोन करून काय बोलेल याचा नेम नव्हता. उगाच त्याने अजून एखाद्या दुसऱ्या प्रकरणात अडकवू नये म्हणजे झालं. श्लोकच्या मनात अजून भीती निर्माण झाली.
"तू तुझ्या समाधान नावाच्या मित्राला आम्हाला दहा हजार पाठवायला सांगितले होते का?" आईने विचारले.
"कोण समाधान? तुला माहितीये ना...समाधान नावाचा माझा एकही मित्र नाही."
"तेच तर. तुझ्या तोंडून मी समाधान हे नाव कधीच ऐकले नाही. तो मुलगा सांगत होता की श्लोकने दहा हजार रुपये तुम्हाला ऑनलाईन पाठवायला सांगितले आहे. पैसे मिळताच तुमच्या मोबाईलवर चार आकडी नंबर येईल. तो नंबर त्याला सांगायचा होता."
आईचे बोलणे ऐकताच श्लोकच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.
"आई, तुम्हाला पैसे पाठवायचे असतील तर मी ते स्वतः तुम्हाला पाठवेल. मित्रांना किंवा नातेवाईकांना सांगणार नाही हे कायम लक्षात ठेव. ती व्यक्ती तुला खोटे सांगत होती. बरं झालं, तू मला फोन करून विचारलं ते. हेच बाबांना देखील सांग. मी तुला थोड्या वेळाने फोन करतो. काळजी घे." इतकं बोलून श्लोकने आईचा निरोप घेतला व तडक कंपनीच्या मॅनेजरला फोन लावला.
कंपनीच्या मॅनेजरशी बोलताना त्याच्या असे लक्षात आले की कंपनीने किंवा त्या मॅनेजरने त्याच्याविरुद्ध कोणतीही तक्रार केलेली नव्हती. मॅनेजरसोबत बोलून झाल्यानंतर श्लोक किती वेळ एकटाच रडत बसला होता. कारण ज्या आईवर तो ओरडत होता, त्याच आईच्या एका फोनमुळे तो वाचला होता. त्याच्या एका चुकीमुळे त्याचे संपूर्ण पैसे त्या भामट्यांच्या घशात गेले असते. डिजिटल अरेस्ट हा एक फसवणुकीचा प्रकार आहे जो श्लोक सोबत घडला होता. केवळ त्याच्या आईच्या एका फोनमुळे त्याचे चाळीस लाख रुपये वाचले होते. त्याने तातडीने त्याच्या सोबत घडलेल्या प्रकरणाची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. जेणेकरून त्याच्यासोबत जे घडले ते इतरांसोबत होऊ नये.
श्लोकला आलेला व्हिडिओ कॉल व त्याच्या आईला आलेला कॉल हे दोन्ही आर्थिक फसवणुकीचे प्रकार होते. आपल्या आजूबाजूला अशा कित्येक घटना घडत असतात. भावनांचा गैरवापर करून सहज आणि बेमालूमपणे आपल्याला अशा जाळ्यात अडकवले जाते. त्यामुळे नेहमी सतर्क राहून संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केलेली केव्हाही चांगली. तसेच ज्यांच्या बाबतीत अशी फसगत झाली आहे त्यांच्यावर विनोद न करता त्यांच्या अनुभवातून बोध घेतला तर असे प्रकार वारंवार घडणार नाहीत. शिवाय आर्थिक फसवणुकीचे हे असले प्रकार बंद व्हायला वेळही लागणार नाही.
समाप्त.
लेखन - अपर्णा परदेशी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा