Login

दिखावा (भाग:-१)

दुरून दिसणाऱ्या सुंदर गोष्टी फक्त दिखावा असतो हे सांगणारी कथा

#जलद लेखन स्पर्धा- नोव्हेंबर:-२०२५

विषय:- दुरून डोंगर साजरे

शीर्षक:- दिखावा

भाग:-१

" अग्गं बाई, किती भारी बंगला हाय ना! बाहेरून इतका भारी तर आतून तर अजून भारी असलं ना, ओ." लांबून दिसणाऱ्या टुमदार बंगल्याला भान हरपून पाहत रसिका तिचा नवरा शुभमला म्हणाली.

त्यावर त्याने फक्त मान डोलावली.

"जा बाबा, तुम्हाला ना माझ्या कोणत्याच बोलण्याकडे लक्ष नसते. मी काय वेडी म्हणून बडबड करतेय का?" ती गालाचा फुगा करत म्हणाली.

"अगं, ऐकले की मी! हुं पण म्हणालोच की मग अजून काय करू? नाचू का तुझ्यासमोर?" तो वैतागून तिच्यासमोर वेडेवाकडे हातपाय हलवत म्हणाला.

तशी ती रागावलेली तोंडावर हात ठेवून हसू लागली.

ती हसू लागली तेव्हा तो तिला रोखून पाहू लागला, तेव्हा ती हसायची थांबली.

"दात काढून आणि बडबड करून झालं असेल तर जा कामाचं बघ जरा. काय त्या बंगल्याकडे टक लावून बघत असतेस काय माहिती?" तो तिला दटावत म्हणाला.

"आता तो बंगला आहेच इतका भारी त्याला मी काय करू? बघतच बसावंसं वाटतं मला! " ती पुन्हा त्या बंगल्याकडे पाहू लागली.

"किती वेळा सांगू तुला? जाऊ दे तुला बोलण्यात काहीच अर्थ नाही. जातो मी आता. संध्याकाळी येतो. तू पण जा आत आणि कामाचं बघ जरा." तो पुन्हा तिला दटावत स्कूटर चालू करून त्याच्या कामासाठी निघून गेला.

रसिका आणि शुभम हे नवीन लग्न झालेले जोडपे, चार महिन्यांपूर्वी शहरात आले होते. तो एके ठिकाणी क्लार्क म्हणून कामाला होता. ते दोघे एका दोन रूमच्या घरामध्ये भाड्याने राहत होते. त्यांच्या घरासमोरच एक टुमदार मोठा सुंदर बंगला होता. तो बंगला जरी दूर असला तरी तिला त्याच प्रचंड आकर्षण होतं. नेहमी त्या बंगल्याला पाहिले की तिचे ते वाक्य ठरलेले असायचे त्यामुळे तो वैतागून जायचा. आता तर त्यालाही तिचे बोलणे सवयीचे झाले होते.

एकदा ती म्हणाली,"अहो, त्या बंगल्यातील माणसेपण लय भारी दिसतात. काल कसल्या आलिशान गाडीत बसून, सगळेजण भारी भारी कपडे, दागिने घालून कोठेतरी जात होते. मी बघत होते तर त्यातील एक बाई माझ्याकडे बघून हसली. मी पण हसले. मला लय भारी वाटलं बघा." ती खूप मोठी गोष्ट झाल्यासारखी सांगत होती.

"ए येडपट .. काहीही काय सांगतेस? कोणीतरी तुला बघून हसलं, ह्यात सांगण्यासारखं काय आहे?" तो वैतागत तिची टर उडवत म्हणाला.

"सांगण्यासारखे काय म्हणजे? त्या बंगल्यातली ती, किती श्रीमंत बाई ! माझ्याकडे बघून हसली, ही गोष्ट साधी झाली का?" तिने उलट त्यालाच प्रतिप्रश्न केला.

क्रमशः

काय उत्तर असेल शुभमचे?

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all