Login

दिखावा (भाग:-३ अंतिम)

दुरून दिसणारी कोणतीही सुंदर गोष्ट दिखावा असते हे सांगणारी कथा

#जलद लेखन स्पर्धा-नोव्हेंबर:-२०२५

विषय:- दुरून डोंगर साजरे

शीर्षक:- दिखावा

भाग:-३ (अंतिम)

मागील भागात बंगल्यातील शालीनी रसिकाच्या घरी तिला भेटायला येते.

आता पुढे:-

रसिकाला तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच वेदना दिसत होती. पण पहिल्याच भेटीत कसे विचारणार म्हणून ती शांत राहिली.

"मी तुमच्यासाठी चहा करते तुम्ही बसा." रसिका तिला म्हणाली आणि तिच्याशी बोलत चहा करू लागली.

रसिका बडबडी आणि चौकशी वृत्तीची होती. त्यानुसार ती बडबड करत होती.

आता तर तिच्या घरी तिचे आकर्षक असणाऱ्या बंगल्यातील शालीनी आली म्हटल्यावर तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. किती अन् काय बोलू असे झाले होते तिला.

तिच्याशी गप्पा मारत चहा झाला. तेवढ्यात एक माणूस शालिनीला शोधत तिथे आला. त्याने तिला बोलावले असे सांगताच शालिनी पटकन तेथून निघून गेली.

संध्याकाळी शुभम आल्यावर तिने हि गोष्ट सांगितली. तेव्हा त्याने चांगली गोष्ट आहे तुला नवी मैत्रीण भेटली असे म्हणून चिडवून झाले. तिने लटका राग दाखवला.

असेच काही दिवस निघून गेले. शालिनी रोज रसिकाला भेटायला येऊ लागली. तिच्याशी बोलताना तिला छान वाटायचे.

थोड्याच दिवसांत दोघींमध्ये छान मैत्री झाली होती. त्यामुळे मनमोकळ्या गप्पा मारत होत्या.

एकदा रसिकाचा वाढदिवस होता तर शुभमने तिला एक ड्रेस घेऊन दिला होता. आणि जाताना त्याने छानसा मोगऱ्याचा गजरा तिच्या केसांत माळला होता. हे शालिनीने पाहिले होते आणि तिच्या मनात एक हलकीशी कळ उठली. तिला तिचा खूप हेवा वाटला.

शुभम निघून गेल्यावर शालिनी नेहमीसारखी तिला भेटायला आली. रसिकाला खुश पाहून म्हणाली,"काय गं आज खूप खुश आहेस? काही स्पेशल आहे का आज नाही म्हणजे नवीन कपडे, गजरा माळलास म्हणून विचारले?"

"ते आज माझा वाढदिवस आहे ना तर यांनी हा ड्रेस गिफ्ट दिला आणि मला आवडतो म्हणून मोगऱ्याचा गजरा पण रात्रीच आणला होता, आता जाताना माळला." रसिका लाजून हसत म्हणाली.

"अरे व्वा! मस्तच की. हॅपी बर्थडे, डियर रसिका." शालिनी तिला मिठी मारत म्हणाली.

"ड्रेस मस्तच आहे गं. खुलून दिसतो तुला. आणि गजरा तर लय भारी." तिचं कौतुक करत म्हणाली.

"खूप थॅंक्यू, शालू. तुझ्या वाढदिवसाला तुझे मिस्टर खूप छान छान गिफ्ट देत असतील ना?" रसिकाने कुतूहलाने हसत विचारले.

"कशाच काय गं? त्यांना कुठे लक्षात असतो माझा वाढदिवस आणि जरी लक्षात असले तरी वेळ कुठे असतो त्यांना साजरा करायला?" ती उदास चेहरा करून म्हणाली.

"का गं काय झालं? " रसिकाने तिच्या खांद्यावर हात ठेवत काळजीने विचारले.

"रसिका, तुला वाटतं असेल ना गं, इतका छान टुमदार बंगला आहे, सोन्या-चांदीने मडलेली असूनही मी नेहमी उदास का? दुरून डोंगर साजरे असे आहे माझे. माझ्या घरी प्रेमाने दोन शब्द बोलायला कोणाकडे वेळ नसतो. पण हे वाढदिवस साजरा करणे तर दूरच. सगळं फक्त दिखावा.. पैशाची गड्डी समोर फेकायचं आणि पाहिजे ते घे म्हणायचे. बसं एवढंच माहिती त्यांना. कोणतेही भावना नाही की आपुलकी, जिव्हाळा नाही. आता तू भेटल्यापासून मी माझं मन तरी मोकळं करू शकते. नाही तर .." असे म्हणत ती स्फुंदत रडू लागली.

रसिका काय ते समजून गेली. शालिनी नंतर निघून गेली.
तिला आधीपासूनच त्या बंगल्यात काही तरी वेगळे वाटायचे आणि आज पूर्ण सत्य समजलं.

त्यानंतर रसिका कधी त्या बंगल्याकडे ना बघत होती ना की बोलत होती. याचे शुभमला आश्चर्य वाटत होते.

न राहवून एकदा त्याने गमतीने विचारले,"रसिका, काय गं? या दिवसात तू बंगल्याविषयी तेथील माणसाविषयी काही बोललीच नाहीस."

"हो, कारण आता मला कळलं आहे हो दुरून डोंगर साजरे.." इतकं म्हणतं तिने त्या बंगल्याकडे एक कटाक्ष टाकला आणि आत निघून गेली.

समाप्त -

दुरून कोणतीही गोष्ट सुंदरच दिसते पण जेव्हा त्याच्या जवळ जातो त्याचे खरे रूप दिसते तेव्हा म्हणावे लागते दुरून डोंगर साजरे.

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all