Login

दिल विल...४

Inocent Love Story



बस निघाली ती सरळ बांदा बस डेपो मध्ये थांबली. अर्सा ही तिथे उतरली. तिथे अजुन दोन तीन फ्रेंड्स यायचे होते. तिथून मग सावंतवाडी ला. तिथे सगळे जमले की तिथून कोल्हापूर ला जाणारी बस पकडायची. असं ठरलं होतं.

अर्सा बस मधून उतरली. तोच तिच्या आई चा फोन आला. आई ला, ती बस मधून उतरली असल्याचं सांगितलं. बाबा आले का...? असं विचारलं तर ते ही तिच्याशी बोलले. व कॉल कट केला. तर मागोमाग कैवल चा कॉल आला.

लहान भाऊ असला तरी त्याला अर्सा ची काळजी होती. त्यांची मोठी बहीण तनु ने ही कॉल केला. आणि ते कॉन्फरन्स कॉल वर बोलू लागले. ते दोघेही तिला सूचना देत होते. तर अर्सा हो हो म्हणत चाललेली. कारण फक्त एकच.... पहिली वेळ एकटी बाहेर जात आहे म्हणून सगळे टेन्शन मध्ये होते. पण अर्सा ला ही ते कळत होतं. त्यामुळे ती सुद्धा चिडचिड न करता त्यांना आश्वस्थ करत होती. स्वतःची काळजी घेईल असा विश्वास देत तिने कॉल कट केला. आणि निःश्वास सोडला.


" देवा... घराबाहेर पडून अजुन अर्धा तास झाला नाही तर यांनी एवढे कॉल केले. अजुन दोन दिवस घालवायचे आहे. माझं काय होईल देव जाणे. " ती वर बघत नकारार्थी मान हलवत होती की समोरून ओळखीच्या व्यक्तीला पाहून तिच्या भुवया ताणल्या गेल्या.

" घ्या... ह्या एकाचीच कमी होती. तो ही आला. " तिने नाक मुरडले व त्याला पाहून तोंड लपवू लागली.

त्याने गाडी एका बाजूला लावली आणि तिच्या समोर येत तिच्या डोक्यावर टपली मारली. थोडसं अंतर ठेवून तो तिच्या बाजूला बसला...

" थोबाड लपवून झालं असेल तर इथे बघ. "

" अरे गौत्या... तू केव्हा आलास...? मी तर पाहिलच नाही तुला..." तिने जणू काही माहीतच नाही. आपण त्याला पाहिलच नाही अशा आविर्भावात खांदे उडवत म्हणाली.

" पुरे ग पुरे... तुझी ही ओव्हर अक्टिंग माझ्या समोर तर अजिबात करू नको समजल ना... मला बघून तोंड लपवलं ते मी बघितलं समजलं ना..." त्याने तोंड वाकडं केलं.

" समजल ना.. मग झालं तर. आता बोल कशासाठी आलास...? की तुला ही विश्वास नाहीये माझ्यावर...?"

" तुझ्यावर पुरेपूर विश्वास आहे. म्हणूनच आलोय. म्हटलं चार उपदेशाच्या गोष्टी सांगाव्या. "

" हो का... तर बोला गौतम ऋषी काय उपदेश देताय...?" तिने त्याच्या समोर हात जोडले आणि नाटकी भाव चेहऱ्यावर घेऊन म्हणाली.

" नको नको. एव्हढा सन्मान करू नको माझा. मला पचत नाही. तू बस बरं तुझ्या जागी. आणि मला सांग तुझे फ्रेंड्स कधी येणार आहेत...? लवकर येणार असतील तर मी जातो. नाहीतर थांबतो थोड्यावेळ. तुला कंपनी देतो. "

" खरं सांगू गौत्या... तू तोंड घेऊन निघून गेलास ना.. तरी माझी काही हरकत नाही. "

" ठीक आहे चाललो मी. मी फक्त हे द्यायला आलेलो. पण आता असो..." त्याने हातातील डबा तिला दाखवला आणि पुन्हा पिशवीत घालून ठेवला.

अर्सा ने एकदा त्याच्या हातातील डबा पाहिला. गौतम च्या आईच्या हातचे पदार्थ जाम टेस्टी असतात. तिने बऱ्याच वेळा ते खाल्ले होते. आणि आता ही डब्यात नक्कीच काहीतरी खाण्याचे पदार्थ असतील. म्हणूनच तो घेऊन आलाय. त्यामुळे त्या डब्यात काय आहे ते पाहिल्या खेरीज तिला चैन पडणार नाही. त्यामुळे मग तिने नमत घेतलं.

" बरं बरं... आता आलाच आहेस तर बस थोडावेळ. मग जा... "

" नाही. नको... जातोच मी..." आता तो थोडा attitude दाखवत म्हणाला.

" अरे... बस म्हणून सांगितलं तर..." अर्सा ने आवाज चढवला तसा तो खाली बसला.

" काय आहे..?"

" कशात काय आहे...?" तो मुद्दाम न समजल्याचे नाटक करत म्हणाला.

" त्या डब्यात काय आहे...? ( माकड ) मनातच त्याला शिव्या घातल्या तिने.

" कुठल्या डब्यात...?" तो मुद्दाम ताणत होता.

" आयला माकडा , रेड्या , हत्ती , बैला.... तुझ्या तर...." म्हणत तिने त्याने दुसऱ्या बाजूला ठेवलेली पिशवी हिसकावून घेतली व ती उघडून त्यातील डबा उघडला.

त्या डब्यात मस्त काकडी घालुन जाड रव्याची भाकरी होती. त्याला मालवणी भाषेत तवसुळा किंवा गोडाची भाकरी असं म्हणतात.

अर्साला गोडाची भाकरी जाम आवडते. त्याला माहित होतं. म्हणून मग त्याने मित्रासाठी दे थोडी म्हणून सांगून घेऊन आलेला.

गौतम च्या घरी त्यांच्या मैत्रिबद्दल काहीच माहीत नव्हते. तसं पाहायला गेलं तर अर्साच्या घरी ही गौतम बद्दल माहित नव्हते. कारण एकच.... दोघांच्या ही घरात असणारी शिस्त आणि चुकीचे विचार.

एक मुलगा आणि एक मुलगी कधीच मित्र असू शकत नाहीत. एक तर ते भाऊ बहीण असतात नाहीत तर gf- bf.

अशा वेळी जर त्यांच्या घरी चुकून सुद्धा त्यांच्या मैत्री बद्दल कळलं तर एक तर त्या दोघांचंही लग्न लावून दिलं जाईल. नाहीतर दोघांना ही एकमेकांशी मैत्री तोडा असं सांगितलं जाईल. तर अर्साच्या घरी सरळ तिचं दुसरी कडे लग्नच लावून दिलं जाईल. बाबांच्या नजरेत ही ती उतरेल अशी तिला भीती होती. म्हणून मग त्यांनी आपली मैत्री कोणासमोर ही उघडी केली नव्हती.

अर्सा च्या तोंडाला पाणी सुटलं. तिने पटकन डब्यातील एक तुकडा तोंडात घातला.

" आहाहा... काय टेस्ट आहेस काकूंच्या हाताला... जब्बर...! गौत्या ... एकदा तरी तुझ्या आईच्या हाताला पप्पी द्यायची आहे मला. एकदा तरी ...." तो खाता खाता बोलली.

" हो हो .. दे ना. जी पप्पी झप्पी द्यायची असेल ना.. ती दे. आणि कायमची मग आमच्या घरी राहा. चालेल ना तुला...?" तो मस्करी करत म्हणाला.

" नाही. नको... राहू दे. एक काम कर माझ्या ऐवजी तूच तुझ्या आईच्या हाताला पप्पी दे." तिने घाबरून जोरजोरात नकारार्थी मान हलवली. तसा तो मनमोकळा हसला.

दोन बाजूंनी दोन बसेस आल्या. आणि त्यातून दोन चार मुला मुलींचा घोळका उतरला. तशी अर्साच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

" गौत्या माझे फ्रेंड्स आले. तू थांब ना मी त्यांची ओळख करून देते."

" नाही.. नको. राहू दे. मी जातो गाडी जवळ. बाय... सांभाळून जा. लक्ष दे आजुबाजुला. कॉल कर. " तो तिथून उठत तिला सूचना देत म्हणाला.

" अरे पण थांबलास तर काय होईल का तुझं...?" ती नाराज होऊन म्हणाली.

" नाही. पण उगाच त्यांच्या मनात संशय नको. चल बाय... काळजी घे..." तो तिथून निघाला सुद्धा. ती मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली.

गौतम त्याच्या गाडीवर जाऊन बसला. मोबाईल काढून तिला मेसेज केला. " मला पाहू नको. तुझ्या फ्रेंड्स शी बोल... पागल.."

त्याने केलेल्या मेसेज च्या ट्यून मुळे ती भानावर आली. मेसेज वाचून तिने डोळे मोठे करत त्याला पाहिलं." मी पागल तर तू कोण...? येड्या.. " तिने मेसेज टाकला आणि समोरून येणाऱ्या तिच्या फ्रेंड्स जवळ गेली.

निशिगंधा ( निशू ) , वर्षा, प्रीती , स्वप्नाली ( स्वप्ना ) , प्रतिमा ( पिंकी ) , सचिन , विश्वजित ( विश्र्वा ) , नितीन , असे आठ जण. त्यात अर्सा...! सावंतवाडी ला आत्माराम ( atm / आत्मा) राहुल ( राहू ) आणि जर आलाच तर तो.... अर्साचा क्रश... ध्रुव...!

असा एकूण अकरा जणांचा ग्रुप होता त्यांचा. पण आता सध्या नऊ जनच तिथे जमले होते.

अर्सा सगळ्यांशी भेटली. हाय हॅलो करून सगळे बस मध्ये चढले. अर्साला विंडो सीट मिळाली तशी ती तिथे बसली. बाजूला पिंकी म्हणजेच प्रतिमा बसली.

त्या पूर्ण ग्रुप मध्ये पिंकी आणि निशु तिच्या जवळच्या मैत्रिणी. त्यामुळे पिंकी बाजूला बसताच अर्साला ही आनंद झाला.

गाडी स्टार्ट होताच तिने गौतम जिथे होता तिथे पाहिलं. ते तो तिलाच पाहत होता. त्याने हात हलवून तिला बाय केलं व गाडी स्टार्ट केली.

बस् निघालेली. अर्साच्या मनात धाकधूक सुरू झालेली. जर ध्रुव आला तर...? तो येणार का..? व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये त्याचं बोलणं असं नव्हतच. त्यामुळे तो येणार आहे की नाही हे ठाऊक नव्हतं. कोणाला विचारावं तर परत त्यांच्या मनात संशय येईल. त्यापेक्षा नकोच...


अर्साने नकारार्थी मान हलवली व खिडकी बाहेर पाहू लागली. नेमका गौतम ही त्याचं दिशेने जाणारा असल्याने त्याची गाडी ही बस च्या बाजूने जात होती.

तिची नजर जाताच तिने हसत त्याला हाक मारली.

" कोणाला हाक मारतेस तू..?" पिंकीच्या प्रश्नावर अर्सा थोडी गडबडली.

" नाही. कोणाला नाही. मला ओळखीची काकू दिसली. त्यांना हाक देत होते." तिने कसानुसा चेहरा करून खोट सांगितलं. व पुन्हा बाहेर पाहिलं.

गौतम ने एकवार तिच्याकडे पाहिलं आणि स्माईल करत गाडी फास्ट नेली.

" अरे.. हा वेडा झालाय का.. ? किती फास्ट गाडी मारतो हा... त्याला तर ना..." असं म्हणत अर्साने गाल फुगवले.