Login

दिल विल...३

Inocent Love Story...?




कोल्हापूर ला जायचं म्हणून सगळी तयारी केलेली अर्सा ने. कोणत्या दिवशी कोणता ड्रेस घालायचा...? जाताना काय घालायचं...? मेकअप सामान सगळं व्यवस्थित बॅग मध्ये भरून तिने ठेवलेलं.

पहिली वेळ ती अशी एकटी कुठेतरी फिरायला जात होती. त्यामुळे अर्सा च्या आईबाबांना थोडं टेन्शन आलेलं. पण त्यांच्या मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून ते स्वतःला समजावत होते.

शेवटी तो दिवस आलाच.... अर्सा ने तयारी केली. जीन्स त्यावर टॉप. लांबसडक केसांचा बन घातलेला. कपाळावर लाल बिंदी अन् डोळ्यात काजळ. ओठांना लीप बाम... झाला. तिचा मेकअप करून झालेला. की बाबा आले. त्यांना पाहून तिने गोड हास्य केलं. पण बाबांच्या चेहऱ्यावर रागाची लकेर उमटली.

तिच्या ही ते लक्षात आलेलं. तिने जीन्स घातलेली कदाचित त्यांना आवडली नव्हती. तिचा मुड ऑफ झाला.

" मी चेंज करते...." ती हळूच पुटपुटली की बाबांनी अडवले.

" स्कार्फ घे. आता चेंज नको करू उशीर होईल उगाच. " बाबा गंभीरपणे म्हणाले. आणि तिच्या चेहऱ्यावर निराशा पसरली.

बाबा गेले तशी ती ही गळ्याभोवती स्कार्फ घेऊन आपली बॅग घेऊन आली.

" आई येते.... बाबा येते मी. " ती म्हणाली की आई आली.

" अर्सू.. हे घे. आंबोळ्या आणि बटाट्याची भाजी आहे. बाहेर काही खाऊ नको. आणि गोळी घेतली का...? तुला गाडी चा त्रास होतो ना...? मग...?"

" हो आई घेतली गोळी मी. आणि डबा नको ग..आम्ही लगेच पोचू. उगाच ओझं होईल. " तिने टाळाटाळ केलेली की बाबा आले मागून...

" का..? आता डब्याचे सुद्धा ओझे झाले का तुला...? बाहेर खायची सवय अजिबात करून घ्याची नाही. गप डबा घे... " बाबांनी डोळे मोठे केले तशी अर्सा ने होकारार्थी मान हलवत डबा बॅग मध्ये सारला.

देवाच्या पाया पडताना डोळे मिटलेले की पुन्हा त्याचा चेहरा आला डोळ्यांसमोर. " का हा असा छळतो मला बाप्पा...? का...? ह्या गौत्या मुळे अजूनच आठवण येतेय त्याची. देवा बाप्पा... प्लीज. तो येऊ नये लग्नाला. जर तो आला तर...? मग तर माझं काही खरं नाही. देवा... एवढं तरी ऐक माझं. मला माहित आहे... माझी कोणतीच प्रार्थना तुझ्यापर्यंत नाही पोहोचत. नेहमी जे मी मागते त्याच्या उलट मिळतं मला. पण कधी बोलले नाही मी. आज ऐक बरं...." ती हात जोडून बाप्पा शी बोलत होती. त्यांनतर आई बाबांचा आशिर्वाद घेऊन ती बाहेर पडली. आणि मोकळा श्वास घेतला तिने. घरापासून जवळच बस स्टॉप होता. ती चालत तिथपर्यंत जाणार होती.

तिने मोबाईल काढला आणि कॉल करणार की बाबांचा आवाज आला. त्यांना मागून येताना पाहून अर्सा चालायची थांबली.


" बाबा... "

" हा. मी येतो स्टॉप पर्यंत. " बाबा म्हणाले आणि तिने होकारार्थी मान हलवली.

दोघे ही शांतपणे चालत होते. बस् स्टॉप आला. गाडी येईस्तोवर बाबा तिथेच थांबणार तिला कळून चुकलं होतं.

" लक्ष दे आजुबाजुला. काही गडबड वाटली तर घाबरु नको. बाप्पा चे नाव घे. मित्र आहेत म्हणून अंधविश्वास नको. तुमच्या ग्रुपमध्ये रहा. गाडीतून उतरताना एकत्र उतारा आणि चढा. स्वतःबरोबर तुझ्या मैत्रिणी पण आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही लक्ष असू दे. काय...? समजतंय ना...?" बाबा एकापाठोपाठ तिला सूचना देत होते. आणि ती खाली मान घालुन हो ला हो करत होती.

" पैसे किती घेतलेस...? घेतलेस ना...?" त्यांनी विचारलं तशी तिने फक्त हो मध्ये मान हलवली आणि बाबांनी ही नकारार्थी मान हलवली. त्यांनी खिशातून काही पैसे काढले व तिच्या हाती दिले.

" आहेत माझ्याकडे बाबा..."

" तरीही असू दे. आणि हो सगळे पैसे एकिकडेच नको ठेवू. थोडे बॅग मध्ये ठेव. थोडे तुझ्या जवळ असू दे. "

अर्सा हसली. खरंच... वडिलांना कोणीच समजू शकत नाही. नारळा सारखी असतात ही वडील माणसं...! वरून कणखर अन् आतून गोड मायेचा निखळ झरा...! आपल्या मुलांवर आणि खास करून मुलींवर ते वचक ठेवतात. पण त्यांचा उद्देश नेहमी त्यांना आपल्या मुठीत ठेवणं असं नसतं. कधी कधी आपल्या मुलांवर संकट येऊ नये. आणि आलंच तर त्या संकटाशी दोन हात करता यावेत म्हणून त्यांना तयार करत असतात. बाहेरच्या निर्दयी माणसाचं अंशतः रूप ते आपल्या स्वभावातून दाखवत असतात. आणि हाच प्रत्यय नेहमी यायचा तिला. म्हणूनच कदाचित ती तिच्या वडिलांचा शब्द कधीच डावलत नसावी.

गाडी आली तसे बाबा पुढे झाले. त्यांनी हात दाखवून गाडी थांबवली. अर्सा ची बॅग घेऊन ते गाडीत चढले. तिला व्यवस्थित बसवून ते खाली उतरणार तोच तिने हाक मारली.

" बाबा... "

त्यांनी वळून पाहिेले तिला तशी गोड हसली. " बाय... येते मी लवकर. नका काळजी करू आणि पोचले की कॉल करते. "

त्यांनी ही गोड हास्य करत होकारार्थी मान हलवली. ते झाली उरताच कंडक्टर ने बेल वाजली. आणि गाडी पुढच्या प्रवासाला निघाली.

अर्सा ने खिडकी तून मागे वळून पाहिलं. तर बाबा हात हलवत तिला बाय करत होते. तिने ही खिडकी तून हात काढत त्यांना बाय केलं. पण पुढच्याच क्षणी हात घेतला.

खिडकी तून हात बाहेर काढताच बाबांचे वटारलेले डोळे तिला लांबून ही दिसले. घाबरून तिने डोळेच मिटले व सिट ला मागे टेकून बसली.

क्रमशः....

" नमस्कार वाचक मंडळी... काय झालं...? कथा बोअरिंग वाटते का..? तुमचा रिस्पॉन्स नाही येत आहे म्हणून विचारलं. डोन्ट वरी मी कथा अपूर्ण ठेवणार नाहीये. त्यामुळे तुम्ही बिनधास्त कथा वाचू शकता. पण हा... जर मला हवा तसा प्रतिसाद नाही भेटला तर मात्र कथा लवकर संपवली जाईल. हे नक्की. त्यामुळे कथा आवडली तर नक्की सांगा. तुमचं मत नक्की सांगा.
सहसा मी सस्पेन्स थ्रिलर कथा लिहीत असते. पहिले वेळ मी इनोसंट लवस्टोरी लिहिण्याचा प्रयत्न करतेय. तर प्लीज काही चुकलं तर नक्की सांगा....