गौतम ने गाडी त्याच्या घराच्या बाजूलाच काढलेल्या पडवीत लावली. व चावी तर्जनी मध्ये गोल गोल फिरवत स्वतःशीच हसत आत आला. पण समोर आदिमाया अंबाबाई चे रूम घेऊन उभ्या आईला पाहून त्याचे धाबे दणाणले.
गौतम चे घर म्हणजे छोट्याश्या गावात असणारं शेतकरी कुटुंब. त्याला दोन मोठ्या बहिणी. मोठीच नाव गौरी, त्यानंतर गीता तीन नंबर भाऊ.... गंधर्व. त्यानंतर अजुन एक बहिण गुंजन आणि सगळ्यात लहान तो. म्हणजे पाच भावंडं. तिन्ही बहिणींची लग्न झालेली. आणि मोठ्या भावाच्या लग्नाला ही सहा महिने होत आलेले.
त्याचा मोठा भाऊ गोव्याला कामाला होता. तो दर शनिवार रविवार येऊन जाऊन करायचा. आणि त्याची बायको गिरिजा घर सांभाळायची. गौतम चे आई बाबा ही साधे सरळ. त्यांची शेती होती. तसेच चार पाच दुभत्या म्हशी ही होत्या. एकूणच सधन शेतकरी कुटुंबातील गौतम होता.
तो ही गोव्यालाच कामाला होता. त्याला ही शेतीची भारी हौस त्यामुळे घरी शेतीला ही मदत करायचा.
गिरिजा चा स्वभाव ही शांत आणि संयमी होता. ती शिकलेली असूनही कधी शिक्षणाचा गर्व नाही केला. की कुठल्याही कामाला ना नाही केली. गोठ्यात शेण भरण्यापासून ते शेतात उन्हातान्हात राबणे असू दे. ती मनापासून सगळं आवडीने करायची. घरात सगळ्यांशी ही प्रेमाने वागायची. त्यामुळे घरी एकोपा होता.
गौतम ची आहे म्हणजेच गंगा बाईंच्या मते आता फक्त गौतम चे लग्न झाले की झाले...! त्या घरातील सगळ्या कामांतून सुट्टी घेणार होत्या. मग सूनांवर घराची जबाबदारी टाकून त्या आपल्या मुलांचा सुखी संसार बघायची स्वप्न रंगवत होत्या. पण त्यांना अश्या मुलीची गरज होती जी गिरिजा सारखीच मनमिळावू आणि कामात निष्णात असेल.
तर ही झाली गौतम आणि त्याच्या फॅमिली ची ओळख. तर जेव्हा गौतम आपल्याच विश्वात घरात आला तेव्हा घरात आईचा अंबाबाईचा अवतार पाहून त्याचा हसणारा चेहरा क्षणात पडला.
" कुठे गेलेला....?"
" कुठे म्हणजे....? मी म्हणालो होतो ना.. माझा मित्र ऋषी. त्याला गोडाची भाकरी आवडते. तीच द्यायला गेलेलो. " गौतम उसणे हसू चेहऱ्यावर आणून म्हणाला.
" अच्छा...?" आईच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहत त्याने एक आवंढा गिळला.
त्याने एकदा आई ला पाहिलं व तिच्या मागेच चहाचा कप हातात घेऊन बसलेल्या ऋषी वर नजर गेली. आणि तो चाट पडला.
" आई शप्पथ... हा माकड माझ्या घरी उड्या मारतोय तर...? पण हा असा मध्येच का आला...?" गौतम त्याला पाहत विचारात हरवलेला. की आईच्या आवाजाने भानावर आला.
" जर हा इथे आहे तर तू भाकरी कोणाला जाऊन दिली...?" आईच्या प्रश्नावर काय उत्तर द्यावे हा प्रश्न पडलेला गौतम ला. त्याने एक नजर ऋषिवर टाकली...
" अरे तू इथे आहे होय. अग मी याच्याच घरी गेलेलो. पण हा तिथे नव्हता. म्हणून मग भाकरी चा डबा घरीच देऊन आलो याच्या. " गौतम ने कसे बसे शब्द जुळवले.
" पण मला भाकरी आवडत नाही ..." ऋषी काहीतरी बोलतच होता की गौतम ने जाऊन त्याच्या तोंडावर हात दाबला.
" आई मला जरा काम आहे. चल बे... तुझ्या तोंडात भाकरी देतो... चल." ऋषिला दम देत त्याला ओढून घेऊन तो बाहेर आला.
" काय यार गौत्या... तू खोटं का बोलला...? ते ही माझं नाव घेऊन...?"
" साल्या... आधी हे सांग मला. तू इथे काय करतोयस...?" गौतम ने त्याच्या हाताला पकडत प्रश्न केला.
" काय म्हणजे...? तुला भेटायला आलो सहज.." ऋषीला त्याच्या चिडण्याचे कारण समजेना.
" सहज....? याआधी काढू भेटायला आला नाहीस. आजच कसा तडमडलास....?" त्याच्या या प्रश्नावर ऋषी मात्र सीआयडी मधील एसीपी प्रद्युमन सारखा डोळे मिचकावत संशयित नजरेने पाहू लागला.
" ए.. ए.. ए... हे ना सीआयडी वाले एक्स्प्रेशन देणं बंद कर आधी."
" अरे तूच म्हणत होतास ना... एकदा घरी येऊन जा. एकदा घरी येऊन जा. म्हणून म्हटलं आज जाऊन भेटून यावं तुला. तेवढीच काकूंची ही भेट होईल."
" आजचा काय मुहूर्त होता का...?"
" पण तू एवढा का चिडतोयस...? आणि मला एक सांग. माझ्या नावाचं बिल पाडून तू गोडाची भाकरी कोणाच्या नावाने देऊन आलास...?"
" त्याच्याशी तुझं काय देणंघेणं नाही."
" असं कसं... असं कसं...? एक तर मला गुळाची भाकरी आवडत नाही. त्यात तू माझं नाव घेऊन ती कुणाला तरी दुसऱ्याला देऊन आलास. मग मला कळायला नको....?हा... आता तू ते मला सांगतोयस... की काकूंना याच्यावर डिपेंड आहे." ऋषी ब्लॅकमेल करत म्हणाला.
" तु मला ब्लॅकमेल करू नकोस आधीच सांगून ठेवतोय."
" ना... ना मी कुठे तुला ब्लॅकमेल करतो.य मी तर सहज विचारलं तुला. की कोणाला दिलास तू डब्बा...?"
गौतमला कुठे झक मारली आणि ह्याच्याशी बोलायला आलो असं झालं. याला आता उत्तर काय देऊ...?
याचं आपलं ठीक आहे. काहीतरी इकडचे तिकडचे सांगून पटवेन. पण घरात लेडी एसीपी प्रद्युमन आहे तिचं काय करायचं..? बरं खोटं सांगितलं तर मला लगेच पकडेल की मी खोटं बोलतोय. गौतम विचारात हरवलेला की ऋषीने त्याच्या खांद्याला धरून त्याला जोर जोरात हलवलं व भानावर आणले.
" एक मिनिट.... तू कुठल्या मुलीच्या भानगडीत तर पडला नाहीयेस ना...?"
त्याच्या या प्रश्नावर गौतम ने असा काही लूक दिला की बस...
" ठीके ठीके... मी जास्त काही विचारत नाही तुला. निघतो मी बाय.." ऋषीने त्याचा लूक पाहता तिकडंन पळ काढला.
गौतम ने त्याला पाहत नाकारार्थी मान हलवली व टेन्शनमध्ये तो घरात आला. तर त्याची आई अजूनही त्याच्याकडे संशयित नजरेने पाहत होती. ते पाहून त्याने एक गोड स्माईल केली.
" काय आई तू पण ना... कशाला संशय घेतेस एवढा...? अग बाई खरंच मी त्यालाच डबा देऊन आलोय. त्याच्या घरी फोन करून विचार हवं तर. लावून देऊ का कॉल तुला...?" गौतम गोड बोलत आईला गुंडाळत होता.
" जा हात पाय धुऊन घे." असं म्हणत आईने त्याच्यावर एक तिरपा कटाक्ष टाकला व ती किचनमध्ये गेली.
किचनमध्ये गिरीजा भाकऱ्या करत होती. एक भाकरी तव्यावर टाकलेली व दुसरी ती हाताने करत होती. गौतम च्या आईने तव्यावरची भाकरी परतली व गिरीजा ला पाहिलं.
" गिरीजा... आजकाल मला या पोराचं ना काही धड दिसत नाही. "
" का सासुबाई काय झालं...?" गिरीजा तिच्या सासूला सासूबाई म्हणायची.
लग्नानंतर तिने त्यांना आईच म्हटलेलं पण त्यांनी नकार दिला व सासूबाई म्हण असं म्हणाल्या. आई तर घरात सगळेच म्हणतात सासुबाई म्हटल्यानंतर जो अधिकार जो मान असतो तो त्यांना अनुभवायचा होता. त्यात जर गिरीजा ने त्यांना आई म्हटलं तर ती गंधर्व ची बहिण होईल. असाही अर्थ निघतो म्हणून त्यांनी आई म्हणायला साफ नकार दिलेला व सासूबाई म्हणायला भर दिलेला.
तर गिरीजा च्या प्रश्नावर सासूबाई एकदम गंभीर चेहरा करून बसल्या...
" काही नाही ग आजकल तो थोडा विचित्र वागतो म्हणून असं वाटलं. तू भाकरी कर... आता आबा ही येतील. म्हणजे गौतम आणि आबा दोघांनाही नाश्ता द्यायला. मग जरा आपण शेतात जाऊन येऊ. " तिला पुढच्या सूचना देत गौतम च्या आईने तव्यावरची भाकरी बाजूच्या भांड्यात काढली....
***********
अर्सा ने डोळे उघडले तेव्हा त्यांची बस सावंतवाडी बस डेपो मध्ये थांबली होती. बस तिथे फक्त पंधरा मिनिटं थांबणार होती. त्यामुळे सगळ्यांना फ्रेश व्हायला किंवा नाश्ता वगैरे करणे याच्या सूचना देऊन ड्रायव्हर कंडक्टर निघून गेलेले.
अर्सा व तिच्या मित्र-मैत्रिणी जागेवरून अजिबात उठले नव्हते. फक्त त्यांनी जवळ जवळ सिट पकडली. म्हणजे सचिन च्या बाजूला विश्वा, नितीन च्या बाजूची जागा रिकामी होती. त्याने त्यावर बॅग ठेवलेली.
स्वप्ना आणि वर्ष बसलेल्या. नीशू प्रीती एकत्र बसलेल्या. पिंकी आणि अर्सा एकत्र बसलेल्या. पिंकी ने कानात कॉड घातलेले आणि कॉल वर तिच्या bf बरोबर बोलणं चालू होतं. तर अर्सा विंडो सीट वर बसलेली. तिच्या ही कानात कॉड होते पण गाणी ऐकत ती डोळे मिटून बसलेली.
की अचानक.... " स्वागत नाही करोगे हमारा...?" जोरदार घोषणा करत आत्मा गाडीत चढला.
गाडीतील सगळी माणसं त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती. पण त्याला त्याचं काहीच नव्हत. त्याने हसुन त्याच्या फ्रेंड्स ना पाहिलं व सगळ्यांना हाय हॅलो करत तो नितीन च्या बाजूला जाऊन बसला.
त्याच्या पाठोपाठ राहू कॉल वर बोलत चढला. त्याच बोलणं चालूच होतं. आणि हातवारे सगळ्यांना हाय करणं ही चालू होतं.
अर्सा अजूनही कानात इअरफोन घालून येणाऱ्या प्रत्येकाला हसून हाय करत होती. तिचा लक्ष दरवाज्याच्या दिशेने होता. कदाचित तो येणार नसेल लग्नाला. ती हिरमुसली.
आणि तिने घरी सगळ्यांना कॉल लावला. आई बाबा कैवल ला कॉल लावून झाल्यावर तिने गौतम ला कॉल लावला.
तिचा कॉल पाहून त्याने एकदा आई ला पाहिलं. जी त्याच्या समोरच कार्यक्रम बघत बसलेली. एक डोळा जणू त्याच्यावरच होता. त्याने हसत कॉल रिसिव्ह केला...
" हा... बोल ऋषी... पोचला का घरी...?" तो बोलता बोलता घराबाहेर आला.
" काय ग कुठे पोचली...? की घरी परत यायची गाडी पकडली तू...?" तो तिची मजा घेत म्हणाला.
" गप बे माकडा... असं काहीही नाही. आम्ही अजून सावंवाडी लाच आहोत. आता सुटेल गाडी एक दोन मिनिटात. ड्रायव्हर सुद्धा आला. म्हटलं तुला कॉल करून सांगावं. कारण त्यानंतर मी छान झोपणार आहे. त्यामुळे मला डिस्टर्ब करू नको हे सांगायला कॉल केलेला. " ती हळूच बोलत होती. कारण बाजूला पिंकी ही होती. आणि तिच्या फ्रेंड्स मधील कोणालाच खबर नव्हती.
" बरं बरं.... तुझ्यामुळे माझ्या घरी CID एपिसोड सुरू होईल. ठेव तु... बाय. पण पोचल्यावर कॉल कर... आणि भाकरी खाल्ली का...? तुला एकटीलाच नाही दिलेली. तुझ्या फ्रेंड्स ना पण दे. आणि झोपून नको राहू... जरा बोल त्यांच्याशी. एवढी मिन्नते करून फिरायला गेलीस ते फक्त झोप काढायला नाही. समजलं ना..."
" हो रे... मला ना कधी कधी अस वाटतं की तू आणि माझ्या घरचे एकच शाळेतील बॅक बेंचर आहात. सगळे एकच डायलॉग मारतात... ठेव बाय. "
" काय करणार... तू आहेच मंद. डोक्याने बंद. जोपर्यंत मागून तुला धक्का नाही देत तोपर्यंत तुझ्या डोक्याची गाडी सुरूच होत नाही. "
अर्सा.... जणू त्याचे सगळे डायलॉग तिला माहित आहेत अशा आविर्भावात डोळे फिरवत होती. की अचानक तिचा लक्ष समोर गेला.
" गौत्या... तो आला....! गौत्या... वो आ गया.... देखो... वो आगया..."
क्रमशः.....
