दिलखुलास व्यक्तिमत्वाची राणी

Tyanchya jivnat aaleli anek sthityantare,mumbaila zalela janm ani tithech balpn. Tyanantar ekdam Amravati jawal aslelya chhotya khedyat gelele bakiche jivan tyatla sangharsh tyanni anubhavla aahe.

         ईरा  चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 ची घोषणा झाली आणि स्पर्धेत भाग घेऊ की नको घेऊ  असं करत करत शेवटी भाग घेतलाच. याआधीच्या राज्य स्तरीय करंडक स्पर्धेचा छान अनुभव गाठीशी होताच त्यामुळे इच्छा होतीच पण इथल्या स्पर्धेला आपण पूर्णवेळ न्याय देऊ शकणार की नाही, हे पण मनात होतेच. कारण कोणत्याही वेळी पुढ्यात काय येऊन राहील हे काही सांगता येत नाही  हा माझा आजवरचा अनुभव आहे. त्यातल्यात्यात सांघिक स्पर्धा म्हटली की बांधिलकी आलीच त्यामुळे  थोडं तळ्यात मळ्यात होतं. पण या अशा स्पर्धेमुळे  इतर लेखकांशी जवळून मैत्रीची संधी निर्माण होते. प्रत्येकाची लेखन शैली,विचार करण्याची पद्धत आणि प्रत्येकाकडून बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळणं हा दुहेरी उद्देश लक्षात घेऊन अखेर नाव दिलेच.


संघ घोषित झाले अन् दैवयोगाने पहिल्याच संघात स्थान प्राप्त झाले. टीम मेंबर्स ची नावं ऐकली आणि मी अजूनच खुश झाले. संगीता थोरात आणि डॉ. शिल्पा क्षीरसागर या माझ्या आधीपासूनच असलेल्या मैत्रिणी संघात होत्याच.या दोघींच्या नावाचा आणि लेखनाचा वकूबही मोठाच त्यामुळे ओळखीसोबतच थोडं खरंतर दडपण आलेलं.मृणाल शिंपी आणि प्रियंका बोरुडे यांना आधीपासूनच लेखनातून ओळखत होते. त्यामुळे त्या दोघींचा पण आवाका जाणून होते. खुशी कांबळे हे नाव आणि तिचा ईरा संमेलनावर लिहिलेला सुंदर लेख वाचून तिच्याही लेखणीच्या प्रेमात पडले होते. श्रद्धा मगर हे नाव सुद्धा नजरेखालून गेले होते.आधी कधी तिला वाचलं नव्हतं  पण जलद कथेतील तिच्या लेखनाने मी अक्षरशः भारावले. वनिता शिंदे,स्नेहा प्रकाश आणि प्रणाली चंदनशिवे या तिघीही मात्र माझ्यासाठी अगदीच नवीन होत्या पण तिघींचेही लेखन पाहिले,त्यांच्याही लेखनाचा भारदस्तपणा अनुभवला अन् आपण एका दमदार संघाच्या प्रतिनिधी आहोत याचा अभिमान वाटायला लागला आणि  आपण इथे कमी तर पडणार नाही ना? याचे थोडे दडपण सुद्धा आले.


तर अशी ही आमची दमदार टीम *टीम 1- संगीता* आणि या टीम च्या कर्णधारपदी अविरोध विराजमान असलेल्या संघातील ज्येष्ठ अन् श्रेष्ठ लेखिका संगीता थोरात यांना शब्दबध्द करण्याचा हा माझा अल्पमती प्रयत्न.


       सौ संगीता अनंत थोरात पूर्वाश्रमीच्या संगीता सुधाकरराव श्रृंगारे ज्यांना मी नेहमीच संगीताताई म्हणूनच संबोधत आले. संगीताताई आणि माझी ओळख एका साहित्य ग्रुप मधे झाली. एकमेकींच्या लिखाणावर प्रतिक्रिया देत देत ही ओळख वाढत गेली. दोन लेखनप्रेमी व्यक्ती कसलाही पूर्वसहसंबंध नसतांना सुद्धा एका शब्दमैत्रीच्या धाग्यात अगदी अलगद बांधल्या गेलो.एका मैत्रिणीने अशा शब्दसखींचा एक समूह बनवला अन् मैत्रीचे हे ऋणानुबंध अजूनच बळकट झाले. शब्दांनी आधीच एकमेकींच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडलेल्या आम्ही आता अजूनच जवळ आलो.अतिशय बहारदार आणि भारदस्त व्यक्तिमत्त्वाच्या त्या धनी आहेत. बघताक्षणीच ज्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप पडते अशा उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या त्या धनी आहेत.


संगीता ताई गद्य आणि पद्य दोन्ही भरभरून लिहितात. मी मात्र त्यांच्या गद्य लेखनशैलीच्या जास्त प्रेमात आहे.त्यांची खुमासदार भाषाशैली,लेखनातील खुसखुशीत पणा,उत्तम विनोदबुद्धी अन् ते खुलवत  नेण्याची त्यांची शैली म्हणजे 'क्या बात है' च. वयाने त्या माझ्यापेक्षा मोठ्या असल्या तरी मनाने त्यांचे चिरतरुण असणे त्यांच्या लेखनातून नक्कीच जाणवते. 


त्यांच्या जीवनात आलेली अनेक स्थित्यंतरे, मुंबईला झालेला जन्म आणि तिथेच बालपण.त्यानंतर एकदम अमरावती जवळ असलेल्या छोट्या खेड्यात गेलेले बाकीचे जीवन, त्यातला संघर्ष त्यांनी अनुभवला आहे.अचानक जादूची कांडी फिरावी अन् परिकथेतल्या राजकुमाराचे आयुष्यात आगमन व्हावे तसे पी. एस. आय.अधिकारी असलेले श्री. अनंत थोरात त्यांच्या आयुष्यात आले आणि संगीता थोरात ह्यांच्या जीवनाचा एक समृद्ध प्रवास सुरू झाला.सेवानिवृत्ती वेळी पतीचे सी. आय. डी. अधीक्षक ह्या पोस्ट पर्यंतचे तीन प्रमोशन या प्रवासाच्या त्या सर्वार्थाने साक्षीदार होत्या. पतीसोबत अनेक वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने त्या फिरल्या. आधीची बुजरी संगीता तिच्या दांडग्या निरिक्षणशक्तीमुळे  हळूहळू सारे आत्मसात करत गेली. विविध जागा,तेथील वेगवेगळी संस्कृती, पतीच्या व्यस्ततेमुळे मुलांच्या संगोपनाची पडलेली जबाबदारी यातून ती घडत गेली अन् एक समृद्ध संगीता आकारास आली.


संगीताताईचा दांडगा जीवनानुभव त्यांच्या लेखनातून पदोपदी जाणवतो. त्यांची अभ्यासू ,नवनवीन शिकण्याची वृत्ती त्यामुळे दिवसेंदिवस त्या अजूनच प्रगल्भ होत आहेत. कोरोना मुळे जसे अनेकांना त्यांच्यात दडलेला लेखक गवसला तसाच तो संगीता ताईंना सुद्धा गवसला. चारोळी,कविता ,कथा,वैचारिक लेखन हे सारेच प्रकार त्या समर्थपणे हाताळतात. अगदी कमी वेळात त्यांनी या प्रांतातील बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या आहेत.आधी चुकतमाकत , बिचकत लिहिणाऱ्या संगीताताई आता इतरांना मार्गदर्शन करण्याईतपत सक्षम झाल्या आहेत. त्यांच्या बहुतांश कविता जरी मुक्तछंद या प्रकारातील असल्यातरी त्यांचे सादरीकरण मात्र बहारदार असते.


वय हा प्रकार संगीताताई सारख्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रगतीआड कधीच येऊ शकत नाही. सोशल मीडिया सारख्या माध्यमाचा प्रभावी वापर करणे त्यांच्यासारखे अजून भल्याभल्यांना जमले नाही. फेसबुकवरिल एका साहित्य समूहावर परिसंवादात बाकीच्यांनी लेखनच केले पण संगीताताईने मात्र अगदी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून आपले विचार मांडत त्या किती टेक्नोसेव्ही आहेत हे सगळ्यांना दाखवून दिलं. राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक तरुण मंडळी असतांनाही त्यांच्या टीम साठी अतिशय सुंदर व्हिडिओ बनवण्याची जिम्मेदारी त्यांनी लीलया पेलली. स्टॅण्ड अप कॉमेडी असो की चॅट संवाद कोणत्याही फेरीत त्यांचा परफॉर्मन्स अगदी दमदार आहे. कुणी सहभाग घेतला नाही तरी प्रत्येक फेरीची धुरा सांभाळण्यास मी समर्थ आहे हाच संदेश त्यांनी एकप्रकारे सगळ्यांना दिलाय. नुसतं लेखन हेच त्यांचे क्षेत्र नाही तर अनेक  संस्थांशी त्या जुळल्या आहेत. योगा ग्रुप आणि गुडघेदुखी सतावत असतांनाही त्यांनी नृत्यासाधनेचा केलेला प्रयत्न अगदी दाद द्यावा असाच आहे.त्या अतिशय उत्तम सुगरण आहेत सोबतच सौंदर्य विषयक मार्गदर्शनात सुद्धा त्या अभ्यासपूर्ण अग्रेसर आहेत. अशाच अनेकविध माध्यमातून त्या स्वतःला घडवत व्यक्त होत असतात.


संगीता ताईंशी माझी जवळीक वाढायचं कारण म्हणजे त्यांनी मला दिलेली त्यांच्या ऑनलाईन कविता संग्रहाच्या प्रकाशनाची संधी.तो किस्सा पण भारीच आहे. एक दिवस ताईंचा मला फोन आला."अगं मुक्ता,तुझ्याकडे  मला एक काम आहे,करशील का?" खरंतर मी विचारातच पडलेली की ताईंना माझ्याकडे काय काम असावे बरे? पण लगेच मी " ताई करण्यालयाक असेल तर मी जरूर करेन." असे आश्वासन त्यांना दिले.  त्यांनी माझ्यासमोर मांडलेला प्रस्ताव म्हणजे अगदी सुवर्ण संधी होती पण माझ्यासारखी नुकतीच त्या क्षेत्रात पदार्पण करणारी व्यक्ती त्या गोष्टीला कितपत न्याय देऊ शकेल हा प्रश्नच होता. पण त्यांनीच मला विश्वास दिला की मी हे करू शकते आणि मी तयार झाले. ऑनलाईन पुस्तक प्रकाशनाचा अतिशय देखणा सोहळा त्यांनी घडवून आणला. वेगवेगळ्या मैत्रिणींचे त्यांच्याबद्दलचे अभिप्राय, वेगवेगळ्या मंडळांकडून मिळालेल्या शुभेच्छा,हौशी निवेदिका असलेल्या मैत्रिणीचे सुंदर सूत्रसंचालन,थोरात सरांचे सुमधुर बासरी वादन,संगीता ताईचे मनोगत आणि दोन्ही लेकींनी केलेले आभारप्रदर्शन. त्यातल्या त्यात म्हणजे एकाचवेळी चारोळी संग्रह,कविता संग्रह आणि हिंदी शायरी चे पुस्तक या तिन्ही पुस्तकांचे अनुक्रमे डॉ. श्रद्धा वाशिमकर,मी डॉ. मुक्ता आगाशेआणि माझी मैत्रीण डॉ. रश्मी अग्रवाल अशा आम्ही डॉक्टर त्रयींनी केलेले प्रकाशन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. अशा या सुंदर, हृद्य कार्यक्रमाचा मी एक भाग होती याचा मला आजही अभिमान वाटतो. त्यानंतर त्यांची ' नकळत '  ही कादंबरी प्रकाशित झाली आणि दोन साहित्य पुरस्कारांची ती मानकरी सुद्धा ठरली.


मुलगी,पत्नी,बहिण,आई,मैत्रीण,लेखिका अशा सगळ्याच बाबतीत अगदी फिट असणाऱ्या संगीता ताईंना ग्रुप कॅप्टन म्हणून अनुभवण्याची संधी पुन्हा मला या स्पर्धेच्या निमित्ताने मिळाली. ईरा वरच्या जुन्या जाणत्या लेखिका म्हणून सन्मानित असलेल्या संगीता ताईंना या स्पर्धेच्या निमित्ताने नेतृत्वाची संधी मिळाली. संधी मिळाली आणि तिचे सोने केले नाही असं संगीता ताईंच्या बाबतीत घडणार नाही हे शक्यच नाही मुळी. अतिशय दिमाखदारपणे त्या ही भूमिका निभावत तिला न्याय देत आहेत. टीम मधल्या सगळ्यांना एका धाग्यात बांधून त्यांच्यात समन्वय साधण्यात त्या अतिशय यशस्वी झाल्या आहेत. पुष्कळदा आमच्याकडून चुका होतात,विलंब होतो पण अतिशय शांतपणे सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत,सगळ्यांच्या अडचणींना समजून घेत ,आमच्यातील आत्मभान जागवत त्या आमच्याकडून लेखन करून घेत असतात. सगळ्यांना संधी देत ,सगळ्यांनाच त्या सारख्या ममत्वाने वागवतात. अडचणीत प्रत्येकीला मदतीला तत्पर असतात.प्रत्येकीच्या चांगल्या कामाचे भरभरून कौतुक करतात. त्यांच्या या सगळ्या गुणांमुळे आम्ही सगळ्या त्यांना 'कॅप्टन कुल' म्हणतो.


अशाच वयाच्या काय कोणत्याच बंधनाला  न जुमानता संगीताताईच्या व्यक्तिमत्त्वाचा वारू असाच चौखूर उधळावा आणि यशाची अनेक शिखरं त्यांनी पादाक्रांत करावी. या स्पर्धेच्या विजयाची माळ सुद्धा कॅप्टन म्हणून त्यांच्याच गळ्यात पडावी अशा अनेक शुभेच्छांसह मी त्यांना सुयश चिंतीते.एवढी ओळख असूनही आमची अजून प्रत्यक्ष भेट झाली नाही तो योग सुद्धा लवकरच येईल  या आशेसह मी हे 'शब्दसंगीत ' आळवणे इथेच थांबवते.

कलागुणांची खाण म्हणू की शब्दांची राणी
दिलखुलास व्यक्तिमत्वाची, नार ती स्वाभिमानी

अशा या संगीता ताईंना भरभरून शुभेच्छा!