दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 26
पिहूला पाहून रिद्धीला आनंद होणार नाही उलट आपल्या प्रतिस्पर्धीला तिच्या कामात सफल होताना पाहून तिच्या स्पर्धात्मक मनाला ठेच लागेल. पण बाळ झाल्यावर ऑफिस मधील रिद्धीचे सर्व मित्र मंडळ तिच्या घरी जाऊन तिला बाळाच्या शुभेच्छा देऊन आले होते. अशात पिहूचे न जाणे चांगले वाटणार नाही म्हणून तेजस ने तिला रिद्धीला प्रत्यक्ष भेटून कागदपत्र घेऊन येण्याचा सल्ला दिला. पिहूलाही ते पटले. पिहूने फोन करून ती येणार असल्याचे रिद्धीला कळवले तेव्हापासून रिद्धीचे मन थाऱ्यावर नव्हते. तिने आपल्याला अशा अवस्थेत पाहायला नको. पिहू घरी आल्यावर आपण मानसिकरित्या खचत आहोत याची तिला जराही जाणीव होता कामा नये. म्हणून तिने शशीलाही तिच्यासोबत घरी थांबण्याची विनंती केली. मात्र त्याला त्याचे काम सोडून चालणार नाही अशी सबब सांगून तो त्याच्या ऑफिसमध्ये निघून गेला. जाण्याआधी त्यांनी त्याच्या आईला पिहू आल्यावर परिस्थिती सांभाळून घेण्याची विनंती केली. पण ते बोलून काही उपयोग होईल अशी शंका रिद्धीला होती. परिणामी रिद्धी आणखीच काळजीत पडली.
दुपारी लंच नंतर पिहू एक तास आधी कळवून मग रिद्धीच्या घरी गेली. रिद्धी तिचा बेबी फीडिंग टॉप काढून ऑफिसमध्ये घालायची तसा फॅन्सी टॉप व ट्राउजर घालून, चेहऱ्यावर तिच्या आत्मविश्वासाची झलक असलेल्या स्मित हास्याला घेऊन ती पिहूशी बोलायला हॉलमध्ये आली. तिकडे आतमध्ये पिहू च्या आईची व सासूबाईची कसल्याशा कारणावरून किचकीच सुरूच होती. पिहूने, रिद्धीची औपचारिक विचारपूस केल्यावर तिला फाईल विषयी विचारले.
" अरे ती फाईल का? तुला तर माहित आहे ना सध्या तरी बाळाला बघण्यात माझा सर्व वेळ जातो. त्यामुळे लक्षातच नाही राहिले ती फाईल शोधून ठेवायचे. पण तू काळजी करू नकोस मला जशी ती फाईल भेटली मी कोणाच्यातरी हाताने ती पाठवून देईल. " रिद्धीने पिहूला त्रास देण्यासाठी बहाना मारला.
" ठीक आहे तशी त्या ब्रँड कंपनीकडून आलेल्या ई-मेल मध्ये सॉफ्ट फाईल असेलच. पण हार्ड कॉपी मिळाली असती तर दोन्हीही कागदपत्रामधील टर्म्स अँड कंडिशन्स सारख्याच आहेत याची खात्री करता आली असती. " तिच्याशी जास्त बोलून काही फायदा नाही हे माहीत असूनही पिहूने तिला समजावण्याचा एक शेवटचा प्रयत्न करून बघितला.
" हो मी तुझी अडचण समजू शकते. " रिद्धी नाटक करत बोलली, " अगं काल संध्याकाळी तुझा फोन आल्यावर मी कपाटात पाहायला सुरुवातही केली पण ऐनवेळी बाळ रडायला लागले आणि सगळं सोडून मला त्याला जवळ घ्यावे लागले. कसं आहे आता तोच माझी प्रायोरिटी आहे ना. तशी आई व सासूबाई दोघीही आहेत त्यामुळे मला इतका टेन्शन घ्यायची काही गरज नाही पण कधी कधी ना त्यांच्याजवळही तो जात नाही मला सोडून."
थोडा वेळ दोघीही शांत बसल्या.
" ठीक आहे मी निघते मग. " हताश होऊन पिहू रिद्धीला म्हणाली.
" अरे आताच तर आली आहेस. आई कॉफी घेऊन येत आहे बस दोन मिनिट." असं बोलत रिद्धीने किचन कडे बघितलं तेव्हा तिची सासूबाई इशाऱ्यात तिला आत बोलवत असल्याचे तिच्या लक्षात आलं.
"मी आलेच एक मिनिटात." रिद्धी आत जात तिला म्हणाली. पिहूने होकारार्थी मान हलवली.
"काय झालं? थोडा वेळ शांत नाही बसू शकत तुम्ही?" रिद्धीने चिडून तिच्या सासूबाईला विचारले.
"सोनू बाळ रडत आहे." तिच्या सासूने तिला सांगितले.
" मग तुम्ही आणि आई आहात ना मग तुम्ही आणि आई कशासाठी आहे? " रिद्धीचा प्रश्न.
"अगं तो शांतच बसत नाही आहे. मला वाटतं भुकेने व्याकुळ झाला आहे सोनू." तिची सासूबाई उत्तरली.
" पहिली गोष्ट त्याला सोनू म्हणत जाऊ नका. जगात भरपूर नाव आहेत चांगली चांगली." रिद्धीने तिच्या सासुबाईला दटावले, "आणि मी दूध काढून ठेवले होते ना त्याचे काय झाले? "
"अगं संपले ते." रिद्धीची आई बेडरूमच्या दारातून तिला बोलली, " तू लवकर इकडे येऊन याला घे."
"ठीक आहे तुम्ही पिहूला कॉफी द्या." सासूबाईला सांगून ती बेडरूममध्ये बाळाला पाजायला गेली. घाई घाईत टॉप काढण्याच्या प्रयत्नात टॉपची हुक आणखीच अडकली.
"आई टॉपची हुक काढून दे." रिद्धीची चिडचिड सुरु झाली. बाळही तिला पाहताच तिने जवळ घ्यावे म्हणून गळा काढून रडू लागले.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा