Login

DINK भाग 5

मुलं जन्माला घालण्यात रस नसलेल्या एका स्त्रीची कथा, तिच्या नजरेतून जगाचा एक वेगळा दृष्टीकोन
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 5

"मिस पिहू मला सांगा मुंबईत इतक्या नवीन इमारती बांधल्या जात आहेत. तुम्ही कशा प्रकारे लोकांना पटवणार आमच्या इथलेच फ्लॅट घेण्यासाठी?" श्री परांजपेने प्रश्न केला.

"जगात कपड्यांचे बरेच ब्रँड आहेत पण तरीही तुम्ही अरमानीलाच का प्राधान्य देता?" पिहूने त्यांनाच उलट प्रश्न विचारला.

"कारण मिडलक्लास लोकांसाठी अरमानी श्रीमंतीची निशाणी आहे. त्यांच्यात आपला बोलबाला करण्यासाठी अंगावर असे ब्रँड चढवावे लागतात." श्री परांजपे उत्तरले.

"मग तेच आपणही करू." पिहूने उठून भिंतीवरील स्क्रीनवर तिचे प्रेझेंटेशन दाखवायला सुरवात केली, "आपण त्यांना त्यांचे लकझरी हाऊसचे स्वप्न विकू. त्यांना दाखवू कि जरी आपल्या फ्लॅटचा एरिया कमी आहे तरीही या कॉम्पॅक्ट जागेत आपण त्यांना एक आलिशान घराचा फिल देऊ. तसेही आजकाल सर्व कुटुंब सोबत राहत नाही. जास्तीत जास्त एक कपल आणि त्यांची लहान मुलं, तेही एक किंवा दोनच. नवरा बायको ऑफिसमध्ये, मुलं शाळेत किंवा पाळणा घरात. सर्व दिवसभर घराबाहेर. मग मोठा फ्लॅट हवा कशाला?"

परांजपे काहीच बोलला नाही. क्षणभर थांबून पिहूच परत बोलू लागली, "तसे आम्ही प्रोफेशनल ऍड राईटरची मदत घेत असतो. तरीही मी एक झिंगलही बनवले आहे ऍड साठी.

कमी किंमतीत हवे असेल
संपूर्ण सुख सुविधा परिपूर्ण हक्काचे छत
तर लवकरात लवकर हात मिळवणी करावी
परांजपे बिल्डर सोबत."

"छान आहे हे सर्व. आवडले मला पण याचे काय?" श्री परांजपे त्यांच्या असिस्टंटला इशारा करताच त्याने त्याच्या टॅब वर पिहूचा चर्चित व्हिडीओ ओपन करून टॅब पिहूच्या समोर ठेवली.

"मिस पिहू तुम्हाला नाही वाटत कि तुमच्या जाहिरात कंपनीवर याचा वाईट परिणाम होईल? आणि आम्ही तुम्हाला जर कस्तुरीला आमच्या फ्लॅटची जाहिरात करायला दिली तर आमच्या सेलवरही निगेटिव्ह परिणाम होईल?" श्री परांजपे तिला म्हणाला.

पिहूला तो व्हिडीओ पाहून पहिल्यांदा धडधड झाली. आजवर कितीतरी वाद विवादात ती पडली. पण तिला इतकं दडपण कधीच आलं नव्हतं. मात्र यावेळी तिला चक्क पॅनिक व्हायला लागलेलं. हा नक्की हार्मोन्सचा परिणाम आहे कि ती कमकुवत होतेय? पण आता या सर्व गोष्टी बाबत विचार करायला तिच्याकडे वेळ नव्हता. तिने एक लांब श्वास घेऊन चेहऱ्यावर तिचे नेहमीचे आत्मविश्वास झळकणारे सुहास्य आणले. मग ती श्री परांजपेला सौम्यपणे बोलली,

"सर तसे पाहता इशू इतका काही मोठा नाही. त्यांनी मुद्दाम आमच्या कपंनीची बदनामी करण्यासाठी या घटनेला एक वेगळेच वळण दिले आहे. पण आपण निश्चिन्त राहा. आज चार वाजता पत्रकारांसमोर मी माझी बाजू मांडणार आहे. त्या नंतर सर्व ठीक होईल."

"तसे आहे तर आपण कॉन्ट्रॅक्टही सर्व ठीक झाल्यावरच करू." श्री परांजपेने त्याच्या असिस्टंटला इशारा केला. त्याने लॅपटॉप, टॅब बंद करून त्याच्या बॅगमध्ये ठेऊन श्री परांजपेसाठी दार उघडले. तोच समोरून रिद्धी आली. ती जणू याच क्षणाची वाट पाहत कॉन्फरेन्स हॉल बाहेर उभी होती,

"सर तुम्हाला मी हमी देते हा इशू आज क्लियर होईल व तुमच्या सेलवर या घटनेचा काहीच निगेटिव्ह परिणाम होणार नाही." रिद्धी त्याला म्हणाली.

"तीन दिवस झाले त्या घटनेला. माझ्या कंपनीत असे कोणी असते तर मी आतापर्यंत त्याला काढून टाकले असते." श्री परांजपे कणखर आवाजात बोलला.

"नक्कीच सर आमचीही तीच पॉलिसी आहे पण मिस पिहूचा आधीचा रेकॉर्ड पाहता आम्ही त्यांना एक चान्स द्यायचे ठरवले आहे." रिद्धीने, पिहू वरील तिचा राग आवरत सावरा सावर करायचा प्रयत्न केला.

"पण मी माझ्या प्रोजेक्ट सोबत कसलाही चान्स नाही घेऊ शकत." श्री परांजपे म्हणाला.

"आम्ही आताच्या आता मिस पिहूला सस्पेंड करतोय. आपण प्लीज कॉन्फरेन्स हॉलमध्ये चला." रिद्धी, पिहूकडे पाहत बोलली, "मिस पिहू आपण आपले सामान घेऊन इथून चालत्या व्हा."

"तशी काही गरज नाही. मिस पिहू निर्दोष आहेत आणि ते लवकरच सिद्ध होईल." एक आवाज त्यांच्या कानावर पडला.

"ऍडव्होकेट तेजस?" श्री परांजपेच्या असिस्टंटने त्याला ओळखले, "तुम्ही इथे कसे?"

"आपल्या क्लाईंटला निर्दोष सिद्ध करायला आलो आहे." तेजस पिहूकडे इशारा करत उत्तरला.

पिहू त्याच्याकडे पाहतच राहली. तिने त्याला काहीच सांगितले नव्हते. मग तो इथे का?

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"