Login

DINK भाग 11

तिला तुमची पूजा नको. आपल्या सारखेच माणूस म्हणून पाहा. तिच्या पिल्लांना सांभाळण्याचे बळ तिच्या पंखात असू द्या
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 11

ऑफिस नंतर शशी व पिहू मरीन ड्राइव्हवर बोलायला बसले जिथे तो व रिद्धी लग्ना आधी नेहमी भेटायचे.

"शशी बघ तिची इच्छा नसतांना तिच्यावर मातृत्व लादून फक्त तिला किंवा तुलाच त्रास होणार नाही तर येणाऱ्या बाळा वर सुद्धा फार वाईट परिणाम होईल. सर्व म्हणतात बाळ होऊ द्या. आम्ही बघू, आम्ही करू. पण प्रत्यक्षात तुम्ही आईची जागा नाही घेऊ शकत." पिहू त्याला म्हणाली.

"हो अर्थातच आता मी थोडी बाळाला दूध पाजू शकणार किंवा नऊ महिने पोटात ठेऊ शकणार. शक्य असते तर रिद्धीच्या मागे लागलोच नसतो मी. लग्ना आधीच आम्ही याविषयी बोललोही होतो कि एक वर्ष एंजॉय करू मग बाळ आणि फॅमिली पूर्ण. पण सध्या तिला तिच्या करियर पुढे काहीच दिसत नाही आहे. तुही तिला समजावण्या ऐवजी तिचीच बाजू घेत आहेस." शशी बोलण्याच्या ओघात पिहूला बोलला, "म्हणा मीही कोणाला मदत मागत आहे. आजन्म आईपन स्वीकारणार नाही असे आधीच घोषित केलेल्या बाईला काय कळणार बाळ असण्याची गोडी?" तो इतकं काही बोलल्यावरही पिहूचा भावहीन चेहरा पाहून तो जास्तच बोलल्याची जाणीव त्याला झाली. तो पिहूला म्हणाला,

"सॉरी, तुझ्या वैयक्तिक आयुष्या विषयी मी बोलायला नको होतं."

"शशी, मला फक्त इतकंच वाटतं कि तिला थोडा वेळ दे कारण मी जे भोगलं आहे ते आणखी कोणत्याही मुलाच्या वाट्याला येऊ नये." बोलता बोलता थांबून तिने कॉफीचा एक घोट घेत गळ्याशी आलेला आवंढा गिळून घेतला.

"माझी आई जिल्हा परिषदमध्ये क्लर्क होती आणि वडील सरकारी शाळेत शिक्षक. घरी बाबा आई आधी आलेले असूनही आई संध्याकाळी घरी आल्यावरच चहा घेत." पिहू परत बोलू लागली, "तिच्या प्रेमापोटी नाही तर पुरुष हा कामावरून दमून येतो, त्याला आरामाची गरज असते म्हणून. बाकी स्त्रीचे काय? कार्यालयात सर्व तिची हाजी हाजी करायला तयारच असतात जणू. आजीने, आमच्या बाबाच्या आईने, आमच्या आईच्या दुःखाची झळ कधी बाबा पर्यंत पोहचू दिली नाही आणि आईच्या आईने तिला आपलं दुःख कितीही मोठं असलं तरीही सहन करायची शिकवण दिलेली. नवरा देव माणूस, सासूबाई सासरे यांना उलटून बोलायचे नसते. नातेवाईकात आपला संसार कसा चांगला सुरु आहे हेच दाखवायचे असते. मग तिच्या जीवाची तगमग फक्त माझ्या व लहान भावा समोरच येई. तिचा आमच्यात जीव होता, आजही आहे. पण तिने दिलेली वागणूक, त्याला जबाबदार बाबा मनातून जाता जात नाही आणि त्यामुळे मला ना माझ्या बापाशी बोला वाटत ना आईशी. अगदी सात आठ वर्षाची असेल तेव्हा पहिल्यांदा मला वाईट स्पर्शाचा अनुभव आला तो बाबाच्या मित्राने माझा हात पकडून मला त्याच्या मांडीवर बसवून बळ जबरीने माझी पप्पी घेतली तेव्हा. मी त्याला चिमटा काढून धूम आई जवळ पळत गेले. आपल्या पेक्षा मोठ्या माणसाला चिमटा घेतला म्हणून तिने उलट मलाच चांगला चोप दिला. बाबा मित्रासोबत बाहेर गेल्यावर आई जेवणाचे ताट घेऊन माझ्याजवळ आली. मी तिला सांगितले तो माणूस मला घाण वाटल्याचे. ती माहित आहे काय बोलली? " पिहूने प्रश्नार्थक नजरेने शशीकडे बघितले.

त्याची मान खाली झुकली होती. ती परत बोलू लागली,

"तिला कल्पना होती त्या माणसाच्या वागणुकीची पण तो बाबाच्या नात्यातील दूरच्या काकाचा मुलगा असल्याने त्याला काही बोलले असता नातेवाईकात तो आपल्या विषयी अफवा पसरवणार, मग नाव खराब होईल, लोकं आपल्यावर थू थू करणार, मग मी मोठी झाल्यावर माझ्याशी लग्न कोण करणार? अरे एक चांगली शिकली, सवरलेली, कमावती स्त्री असूनही तिचे असे विचार. म्हणून मला वाटतं जे आपल्या मुलांना जपू शकत नाहीत, त्यांच्या गरजा पूर्ण करणं ज्यांना जमत नाही, जे आपल्या मुलांना सुरक्षित वातावरण देऊ शकत नाहीत त्यांनी मुलं जन्माला घालूच नये." पिहूचे डोळे काठोकाठ भरून गालावर पाण्याचे पाट वाहतांना पाहून शशी त्याच्या रुमालने तिचे अश्रू टिपत तिला म्हणाला,

"पण मला वाटतं तु एक आदर्श आई सिद्ध होणार."

"पण माझ्या अंगात माझ्या आई बाबाचेच जिन्स आहेत, माझ्या रक्तात त्यांचाच डिएनए आहे. ते आपला असर दाखवतीलच. त्यामुळे मला त्या फंदातच पडायचं नाही. नको मी माझी एकटा जीव सदाशिव छान आहे." पिहू त्याला म्हणाली.

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

धन्यवाद.
0

🎭 Series Post

View all